‘बबन’ नावाचे ‘सैराट’!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘बबन’चं पोस्टर
  • Sat , 24 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie बबन Baban भाऊसाहेब कऱ्हाडे Bhaurao Karhade

‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटानं ग्रामीण रांगड्या ढंगाचा बाज मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय करणारे भाऊसाहेब कऱ्हाडे यांचा ‘बबन’ हा दुसरा चित्रपट. ‘ख्वाडा’ पाहून खुश झालेल्या एका रसिक प्रेक्षकानं भाऊसाहेबांना शंभर रुपयाची नोट बक्षीस म्हणून दिली आणि तेच भांडवल समजून त्यांनी 'बबन'ची निर्मिती केली. हा देखील अस्सल ग्रामीण ढंगाचा बाज असलेला चित्रपट आहे. तो पाहून करमणूक होत असली आणि त्याचा प्रभाव पडत असला तरी त्याची भडक मांडणी अंगावर येते. पटकथा आणि मुख्य नायिकेसह काही प्रमुख व्यक्तिरेखा विकसित करण्याबाबत ज्या त्रुटी राहिल्या आहेत, त्याची भरपाई करण्यासाठी ‘बबन’ची प्रतिमा भडकपणे रंगवण्यात आली की काय, असा प्रश्न पडल्याखेरीज राहत नाही.  

ही बबन नावाच्या तरुणाची हळुवार प्रेमकथा आहे. बबन हा एक स्वप्नाळू तरुण असतो. महाविद्यालयात शिकत असलेल्या बबनचं वर्गातल्या कोमलवर प्रेम असतं. अर्थात त्याला ग्रामीण भागातील राजकारणाची जोडही आहे. आई, आजी, दारुडा बाप असा घरचा संसार सांभाळून तो दुधाचा व्यवसाय करत असतो. मात्र गावातील दूध सोसायट्यांच्या राजकारणात बबन विनाकारण अडकत जातो आणि त्याची होरपळ सुरू होते. त्यातच कोमलवर एकतर्फी प्रेम करणारा महाविद्यालयातील अभय नावाचा त्याचा प्रतिस्पर्धी याच्याशी त्याचा खटका उडतो. त्यातून जे ‘महाभारत’ घडतं ते म्हणजे हा चित्रपट. 

लेखक-दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी ‘बबन’चा अस्सल ग्रामीण बाज सुरुवातीपासून कायम ठेवला आहे. अगदी घरातील संवादापासून ते महाविद्यालयातील तरुणांमधील संवादापर्यंत त्यातील ‘रांगडं संभाषण’ ऐकताना मजा येते. ‘बबन’चं ते मुख्य वैशिष्ट्य असलं तरी दारुड्या बापाकडून सातत्यानं दिल्या जाणाऱ्या अस्सल शिव्या ‘संवाद’ म्हणून काही वेळा खटकतात. बबन आणि कोमलचं परस्परांवरील प्रेम मात्र संवादापेक्षा गाण्यातून जास्त व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे ही गाणी मधूनमधून पेरण्यात आली आहेत असं वाटत राहतं. अर्थात संगीतकार हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी श्रवणीय ठरली आहेत यात वाद नाही. बबन-कोमलची प्रेमदृश्यं दाखवताना जी कल्पकता दाखवण्यात आली ती मात्र अफलातून आहे. (त्यासाठी त्यांना चिखलातही डुंबवण्यात आलं आहे.) या प्रेमदृश्यांचं चित्रीकरण आणि एकूणच चित्रपटाचं छायांकन याबद्दल छायालेखक रणजित माने अभिनंदनास पात्र आहेत.

चित्रपटाची कथा प्रवाही ठेवण्यात दिग्दर्शकाला फारसं यश मिळालं नाही असं जाणवत राहतं. पटकथा बंदिस्त नसल्यामुळे कथेतील काही उणीवा अगदी ठळकपणे जाणवतात. कोमलच्या घरची पार्श्वभूमी काय आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. तसंच तिच्या हातून गंभीर गुन्हा घडला असताना आणि त्याचे परिणाम काय होतील हे माहीत असतानादेखील बबन तिला एकटीला सोडून शहराकडे का जातो, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. दूध सोसायट्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातलं राजकारण हा कथेचा एक मुख्य भाग असल्यामुळे त्यातून होणारा संघर्ष ठळकपणे रंगवणं अपेक्षित होतं. त्यासाठी नाना आणि त्याचा प्रतिस्पर्धी यांच्या व्यक्तिरेखा अधिक विकसित करण्याची गरज होती. अनेकदा या व्यक्तिरेखा अधूनमधून प्रकट होतात आणि जातात.  वास्तवतेच्या नावाखाली केलेला चित्रपटाचा शेवटही खूप भडक आणि बटबटीत असल्यामुळे तो अंगावर आल्यासारखा वाटतो.  

मात्र प्रमुख कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे हा चित्रपट चांगला तरला आहे. भाऊसाहेब शिंदे यानं बबनची मुख्य भूमिका आपल्या रांगड्या अभिनयानं अतिशय झोकात केली आहे. त्याच्या दारुड्या बापाचं भूमिकेत स्वतः भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी चांगली मजा आणली असून आपण एक चांगले अभिनेतेही आहोत हे सिद्ध केलं आहे. देवेंद्र गायकवाड यांनीही मुख्य खलनायक चांगला रंगवला आहे. अभय चव्हाण, चंद्रकांत राऊत आदी नवख्या कलाकारांनीही कॉलेजकुमारांच्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. नायिका कोमल झालेली गायत्री जाधव हिचं नवखेपण मात्र सतत जाणवत राहतं. याउलट बबनची शेजारी असलेली आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी शीतल चव्हाण छोट्याशाच पण बिनधास्त भूमिकेत चांगली चमकून गेली आहे. तसेच बबनच्या आईच्या भूमिकेत काम करणाऱ्या सुरेखा डिंबळे यांनी संवाद कमी असूनही आपल्या नुसत्या भावनजरेनं प्रभावी अभिनय केला आहे. 

'बबन'मधील काही प्रेमदृश्यं, महाविद्यालयातील वातावरण आणि शेवटचा संघर्ष पाहताना कितीही नाही म्हटलं तरी 'सैराट' चित्रपटाची आठवण होतेच. त्यामुळे “बबन’ नावाचे ‘सैराट’! हेच नामाभिधान त्यास योग्य ठरतं. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sourabh suryawanshi

Sat , 31 March 2018

व्यक्तिरेखा जास्त विकसित करायला गेलं तर ती "नाटकी" होते. आज पर्यंत आपण प्रस्थापित कलाकारांचा तोच नाटकी अभिनय पाहून टाळ्या ठोकून तसेच "नाटक" करायला आतुर होतो आणि खऱ्या जीवनात तसे करतो ही. फँड्री,सैराट,ख्वाडा,बबन या चित्रपटात हा "नाटकी" अभिनिवेश नसून येत नाही त्यामुळे चित्रपट व्यवसायिक वाटत नाही. सैराट ने यावर मात केली कारण चित्रपटातील गाणी आणि संगीत. सैरातच्या चित्रीकरणावर ही इतर व्यवसायिक मराठी चित्रपटांच्या तुलनेने जास्त खर्च केला आहे. बबन बाबत तसे नाही, खूप कमी खर्चात केलेल्या सिनेमातून तुम्ही आवास्तव अपेक्षा नाही करू शकत हे जाणवते.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख