कुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ!
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर
  • कुमार केतकर आणि प्रवीण बर्दापूरकर (छायाचित्रं - विवेक रानडे यांच्या सौजन्यानं.)
  • Sat , 24 March 2018
  • पडघम माध्यमनामा कुमार केतकर Kumar Ketkar

१.

कुमार केतकर यांना काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आणि माध्यमांत अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रियांचा महापूर आला. अनेकांचा पोटशूळ उमाळून आला. कुणाला केतकर ब्राह्मण असल्याचं आठवलं, अनेकांना त्यांनी शिवस्मारकाच्या संदर्भात केलेली टीका आठवली, अनेकांना त्यांचं गांधी-नेहरू प्रेम आठवलं, तर अनेकांना त्यांच्या कथित भूमिका बदलू म्हणजे कम्युनिस्ट ते काँग्रेसचे ‘चमचे’ प्रवासाचा आठव झाला... अनेक जण त्याहीपुढे गेले. दुसऱ्या बाजुला अनुकूल प्रतिक्रियात केतकरांच्या बदल भरभररून लिहिलं गेलं. हे सुरू असताना ‘तुम्ही काहीच का व्यक्त होत नाही?’ असं अनेकांनी विचारलं. त्याचं कारण निवडणुकीची प्रक्रिया सुरूच होती. ती प्रकिया संपून केतकर राज्यसभा सदस्य म्हणून विजयी झाल्याची घोषणा झाल्याशिवाय काही व्यक्त होणं अप्रस्तुत होतं. मतदान घ्यावं लागलं असतं आणि केतकरांचा राम प्रधान झाला असता तर...? पत्रकाराला प्रत्येक वेळी घाई करून चालत नाही.

माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसकडून कुमार केतकर यांची उमेदवारी सलग तिसऱ्यांदा चर्चेत होती. सर्वांत प्रथम २००८मध्ये हा विषय चर्चेला आला, तेव्हा केतकर यांनी आम्हा काहींना एक एसएमएस पाठवून त्यांना राज्यसभा सदस्य होण्यात रस नसून ‘लोकसत्ता’च्या संपादकपदी ते खूष असल्याचं कळवलं. तो एसएमएस लिक झाला (की केला गेला?) आणि केतकर तयार नाहीत तर मग त्यांना कशाला उमेदवारी, असा कावा करत दुसऱ्यानंच तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्व पटकावलं! तेव्हापासून केतकर राज्यसभा सदस्य होण्यासाठी आतुर/इच्छुक असल्याची चर्चा\हवा एका गटात कायम होत राहिली. दुसऱ्यांदा त्यांचं नाव २०१४मधे पुन्हा चर्चेत आलं, तेव्हा मी दिल्लीत होतो. केतकरांच्या उमेदवारीची मला माहिती देणारा स्त्रोत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे होते. तेव्हा मी बातमीही दिली होती, पण शेवटच्या क्षणी दुसऱ्यालाच उमेदवारी मिळाली. त्यानंतर आता, चार वर्षांनी केतकरांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. एव्हाना केतकर अधिकृतपणे काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यसभा सदस्य झालेले आहेत.

एखाद्या पक्षाचं राज्यसभा सदस्यत्व स्वीकारण्यापेक्षा चो रामास्वामी, कुलदीप नय्यर, खुशवंतसिंग, यांच्याप्रमाणे नियुक्त सदस्य म्हणून केतकर राज्यसभेत गेले असते तर ते अधिक गौरवशाली झालं असतं असं मला वाटतं. पण केतकर काँग्रेसकडून राज्यसभा सदस्य झाले (राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वीकारल्यामुळे ते आता एकारले होण्याचा धोका आहे.) हे काही त्यांच्या भूमिकेच्या विरोधात झालं आणि त्यासाठी त्यांनी चाटुगिरी वगैरे केली यात तथ्य नाही. अर्थात अशा होणाऱ्या आणि झालेल्या टीकेला उत्तर देण्यास केतकर समर्थ आहेत; ते कदाचित याबाबत बोलतील किंवा बोलणारही नाहीत. मी मात्र काहीच बोलणार नाही कारण मी काही केतकर यांचा प्रवक्ता किंवा अंधभक्त नाही; तर एका विद्वान, अफाट वाचन असलेल्या, राजकारण-समाजकारण-अर्थकारण मानवी नजरेतून जाणणाऱ्या, धर्मांध आणि प्रतिगामी शक्तींच्या विरोधात न डगमगता आवाज उठवणाऱ्या, बहुसांस्कृतिकवादी, बहुश्रुत, बहुपेडी कुमार केतकर नावाच्या एका उमद्या व्यक्तिमत्त्वाचा मी एक निस्सीम विवेकी चाहता आहे. कुमार केतकर ज्ञानसंपन्नतेचा कवेत न मावणारा डेरेदार विशाल वृक्ष आहे असं माझं मत आहे!

२.

कुमार केतकरांची आणि माझी पहिली भेट बार्शीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाली. आणीबाणी नुकतीच संपलेली होती. बहुसंख्य पत्रकार आणीबाणीच्या विरुद्ध बोलत होते, लिहीत होते. जेलची हवा खाऊन आलेले त्यांच्या झालेल्या छळाच्या कहाण्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी केलेला त्याग रंगवून सांगत होते. नुकतीच पत्रकारितेत आलेली आम्ही मंडळी हे ऐकत, वाचत होतो. त्यातच आपण समाजवादी असल्याचा साक्षात्कार नुकता-नुकताच झालेला असल्यानं आणीबाणी आणि इंदिरा गांधींविषयी ‘समाजवादी बालमना’त चीड होती. इंदिरा गांधीचं समर्थन करणारा तो लोकशाहीद्रोही, अशी आमची समाजवादी नवभावना होती. या पार्श्वभूमीवर कुमार केतकर नावाचा पत्रकार इंदिरा गांधीविषयी चांगलं लिहितो-बोलतो हे खटकायचं. इंदिरा गांधींवरचं त्यांचं पुस्तक नुकतंच आलेलं होत. ते घ्यायला बार्शीला ग्रंथालीच्या स्टॉलवर गेलो तर, तिथं केतकर, अरुण साधू आणि बहुधा दिनकर गांगलही होते. डोक्यावर काळे आणि बर्‍यापैकी कुरळे केस, कुठला तरी झिटँग रंगाचा टी-शर्ट आणि चेहर्‍यावर आत्मविश्वास विस्तृतपणे विसावलेला तो माणूस कुमार केतकर आहे हे कळलं. पुस्तकावर केतकरांची सही घेतली. तेव्हा मी चिपळूणच्या ‘सागर’ या दैनिकात नोकरी करत होतो. सागरसाठीच संमेलन कव्हर करायला मी आलेलो होतो. पत्रकार म्हटल्यावर केतकरही पाच-सात मिनिटं बोलले. बहुधा आम्ही सोबत सिगारेटही ओढली. पहिल्याच भेटीत ते मला ‘अरे-तुरे’ करू लागले, पण मला ते काही मुळीच खटकलं नाही.

त्यानंतर अधूनमधून फार क्वचित का होईना भेटी होत राहिल्या. मी मुंबईत ‘लोकसत्ता’साठी पत्रकारिता करत असताना दिग्विजय खानविलकरांनी दिलेल्या दोन पार्टीत आम्ही खूप वेळ सोबत होतो. तेव्हा ते मटाचे संपादक होते. नंतरही कुठे ना कुठे भेटी व्हायच्या. मी औरंगाबादला बदलून आल्यावर तीन वेळा केतकर औरंगाबादला आले. तिन्ही वेळा कार्यक्रम संपल्यावर भेट झाली तर ‘कोरडं कोरडंच काय भेटायचं?...’ वगैरे रुखरुखही आमच्यात व्यक्त झाली. लोकमतच्या मुख्य संपादकपदाची सूत्र स्वीकारल्यावर संध्याकाळी रफीक झकेरियांच्या संस्थेत पत्रकारदिनानिमित्त केतकरांचं भाषण झालं. मुद्रणाच्या क्षेत्रात झपाट्यानं होणार्‍या बदलांमुळे मुद्रित माध्यमांनी आता वृथा अभिमान सोडावा आणि अधिक समाजाभिमुख व्हावं असा केतकरांनी दिलेला सल्ला मला सॉलिड भावला. व्याख्यान संपल्यावर मी ते त्यांना बोलूनही दाखवलं. असेच काही महिने गेले आणि केतकर ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. पहिली भेट ते ‘लोकसत्ता’च्या संपादकपदी पोहोचेपर्यंत लेखन, वक्तृत्व आणि व्यासंग या तिन्ही आघाड्यांवर केतकर हे एक लोकप्रिय आणि बडा ‘​ब्रँड’ झालेला होता. केतकरांच्या सोबत कधी काम करायला मिळेल अशी कल्पनाही मनात आलेली नव्हती. त्यांच्या टीममध्ये मी एक संपादक असेन असं तर स्वप्नही मला पडलेलं नव्हतं.

३.

‘लोकसत्ता’चे संपादक झाल्यावर तीन आठवड्यानी कुमार केतकर यांच्याशी माझी पहिली भेट अहमदनगरला झाली. त्या पहिल्याच भेटीत मी नागपूरचा निवासी संपादक होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. पुढची साडेनऊ वर्ष केतकरांसोबतच काम करणं हा एक विलक्षण अनुभव होता. कुमार केतकरांनी कामाचं पूर्ण स्वातंत्र्य मला दिलं. नियुक्त्या असो की पदोन्नत्या, व्यवस्थापनातल्या वरिष्ठांशी थेट संपर्क, नागपूर आवृत्तीच्या नियोजनाचं स्वातंत्र्य असं मला सर्व काही मुक्तपणे करू दिलं. अनेकदा तर एचआरचे प्रमुख अशोक प्रधान म्हणत, ‘प्रवीण , तुमच्या बॉसची मंजूर म्हणून सही झाली आहे. आता तरी तुमची सही करा आणि प्रपोजल सबमिट करा’. आणि स्वतःची सही करत तो कागद ते माझ्या हाती देत. मी कोणाला नियुक्त करतोय, त्याची क्रेन्डेशियल्स काय आहेत वगैरेची साधी पदसुलभ उत्सुकताही केतकरांनी कधी व्यक्त केली नाही. मलाच काय कोणाही सहकार्‍याला केतकरांच्या हाताखाली आम्ही काम करतो, हे कधीच केतकरांनी जाणवू दिलं नाही. सहकार्‍याला समान वागणूक देण्याचाच केतकरांचा स्वभाव आहे... ‘माझ्या हाताखाली काम करतो’ असं केतकरांनी सहकार्‍याला तर सोडाच चपराशालाही कधी म्हटलं नाही. ‘हा माझा सहकारी’, असाच उल्लेख ते कायम करत. नागपूर कार्यालयात आल्यावर माझ्या खुर्चीत बसणं ते टाळत.

स्वतःच्या मतांविषयी केतकर केवळ आग्रहीच नव्हे तर अनेकदा टोकाचे हट्टी होतात, पण त्याचवेळी समोरच्यालाही प्रतिवादाचा अधिकार आहे, त्यालाही तो व्यक्त करायचा अधिकार आहे, हा उदारमतवाद त्यांच्याकडे आहे. स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत ठाम असणारे केतकर समोरच्याही अभिव्यक्तीचा अधिकार मान्य करण्याचा उमदेपणा दाखवतात, हे मी असंख्य वेळा अनुभवलं आहे. कनिष्ठ सहकार्‍यांना कामाचं स्वातंत्र्य देतानाही हाच उमदेपणा केतकरांनी कायम दाखवला.

उमदेपणाचा कळस गाठणारा केतकरांचा एक अनुभव खासच आहे- विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यांनी केतकरांच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी चार-पाच महिने आधी मराठवाडा लोकविकास मंचचा ‘मराठवाडा गौरव’ स्वीकारण्यासंबंधीचा माझ्याकडे प्रस्ताव आला आणि केतकरांशी बोलून मी संमती कळवली. विनायक मेटे या संस्थेचे सर्वेसर्वा. मराठवाड्यातल्या कर्तृत्वाचा सन्मान मुंबईत करण्याची मेटेंची कल्पना मुंबईतल्या मराठवाडेकरांनी उचलून धरली आणि हा कार्यक्रम चांगलाच गाजू लागला, सन्मानाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मराठवाडा गौरव स्वीकारण्याची संमती दिल्यावर काही महिन्यांनी केतकरांच्या घरावर हल्ला झाला. ती घटना राज्यच नाही तर देशपातळीवर गाजली. विनायक मेटे खूपच वादग्रस्त ठरले. या वादळात मी मराठवाडा गौरव सन्मानाचं विसरून गेलो.

असेच आणखी तीन-चार महिने गेले आणि विनायक मेटेंचा फोन आला की, आपण आता हा कार्यक्रम करू या. गौरव सन्मानात नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी, माझी खूप जुनी मैत्रीण आणि जयश्री खारकर उपाख्य श्रद्धा बेलसरे हेही होते, तर ‘मराठवाडा भूषण’ गोपीनाथ मुंडे यांना देण्यात येणार होता. आता मी नाही म्हणणं प्रशस्त दिसलं नसतं आणि केतकर बॉस असल्यानं हो म्हणणं शिष्टाचाराला मुळीच धरून नव्हतं. माझी विलक्षण कोंडी झाली. हे कळल्यावर केतकरांनीच फोन केला आणि सांगितलं, ‘माझ्यावरचा हल्ला आणि तुझा सन्मान या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत. तुझ्या मातीच्या माणसांकडून हा सन्मान होणार आहे, निःसंकोचपणे स्वीकार. माझ्यावरच्या हल्ल्याचं नंतर बघू’.

केतकरांचा उमदेपणा हा असा बेनिहायत लाजवाब. मी मराठवाडा गौरव सन्मान स्वीकारला. भाषणात केतकरांच्या घरावर हल्ला केल्याबद्दल विनायक मेटेंना चार खडे बोल सुनावत कुमार केतकरांचा आलेला हा अनुभव सांगून आलो. त्याला व्यासपीठावरील विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासकट उपस्थितांनी प्रचंड दाद दिली.

४.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, संगीत, कला, धर्म, जे. कृष्णमूर्तीचं तत्त्वज्ञान, दहशतवाद अशा एक ना अनेक विषयांत केतकरांना केवळ रुचीच नाही तर या विषयाचं त्यांचं जागतिक भान स्तिमित करणारं, या सर्वच विषयांवरचा त्यांचा व्यासंग तर आश्चर्यानं थक्क व्हावा असाच. अफाट स्मरणशक्‍तीमुळेच केतकरांना हे साध्य होत असावं. स्मरणशक्तीचं आणि व्यासंगाचं सोंग आणता येत नाही. वाचल्यासारखं करून आपल्या ग्रहणशक्तीचं प्रदर्शन करणारे पावलीला पन्नास मिळतात. केतकर या पन्नासपैकी कधीच नाहीत. एखादा कागद अर्ध्या मिनिटात वाचून ते परत करतात, तेव्हा क्षणभर समोर्‍याला त्यांनी वाचनाचं सोंग वठवलं असं वाटू शकतं. प्रत्यक्षात मात्र नंतर कधी दोन-तीन-चार वर्षांनी तो संदर्भ निघाला तर तो मजकूर खालून पाचव्या ओळीत काय होता, तो केव्हा वाचला, तेव्हा कोण कोण तिथे हजर होतं आणि तो कुणी दिला होता हे सर्व तपशील केतकर सहजपणे सांगणार, असा अनुभव मी अनेकदा घेतला, अनेकांनी घेतला आहेच. तारीख, वार, महिना आणि वर्षांचे तपशील केतकरांना असेच पाठ. मात्र, पांडित्याचा कोणताच आव केतकरांनी कधीच आणत नाहीत. मुळात ज्ञानताठा त्यांच्या स्वभावातच नाही. आपल्याला जे ज्ञान आहे, तेवढंच अस्तित्वात आहे अशी विद्यमान बहुसंख्य संपादक तसंच विचारवंतांची धारणा आणि इतरांप्रति ओतप्रोत असलेली तुच्छ वृत्ती केतकरांमधे नाही. त्यामुळे ज्या सहजतेनं एखाद्या विद्वानाशी किंवा बड्या माणसाशी केतकर संवाद साधू शकतात, त्याच सहजतेनं भाषण ऐकायला आलेल्या एखाद्या श्रोत्याशीही सहजपणे गप्पा मारू शकतात.

आमची मुलगी सायली ही कुमार केतकरांपेक्षा वयानी किमान साडेचार दशकांनी लहान, पण सायलीशी त्यांचा संवाद वेगळ्याच पातळीवरचा. सायलीची आणि केतकरांची भेट झाली तेव्हा सायली जेमतेम ग्रॅज्युएशनला होती आणि केतकरांनी एका विशिष्ट उंचीचं वलय प्राप्त झालेलं होतं, पण ते सायलीशी अगदी तिच्या जनरेशनच्या भाषेत संवाद साधत. एवढंच कशाला, मधला काही काळ तर ती स्वतःला केतकरांची ड्रेस अ‍ॅडव्हायझर म्हणवून घ्यायची, कारण केतकरांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर बाईट देताना किंवा कार्यक्रमात सहभागी होताना कोणते शर्ट घालावेत हे सल्ले सायली द्यायची आणि केतकर ते निमूटपणे ऐकायचे. कोणी त्या शर्टचं कौतुक केलं तर केतकर सांगणारही, प्रवीणची मुलगी माझी याबाबतीत अ‍ॅडव्हायझर आहे. केतकरांशी असलेली सायलीची मैत्री इतकी पक्की की, नोकरी लागल्यावर तिनं पहिल्या पगारात आईला साडी आणि केतकरांना शर्ट घेतला. हे असं असूनही आमच्या कौटुंबिक जीवनात केतकरांची तसूभरही ढवळाढवळ नाहीच.

कधीकधी केतकरांचं वागणं अनाकलनीय वाटे, त्यांना माणसं खरंच कळतात की नाही असा पश्न पडे. काही माणसांच्या केतकर एवढ्या आहारी का गेले किंवा वेगळ्या शब्दांत सांगायचं तर काही माणसं केतकरांच्या निकटस्थ का झाली याचं नवलही वाटे, इतकी ती माणसं रंगबदलू आणि खुजीही असल्याचं सर्वांना ज्ञात असायचं, अपवाद फक्त केतकरांचा. केतकर हे मुद्दाम करतात किंवा एखादा खेळ स्वतःशीच खेळत आहेत असं म्हणावं तर तेही खरं नाही. काहींच्या रंग बदलण्याची खंत त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली आहे. असं असलं तरी अशा रंग बदलणार्‍यासकट सर्वांच्याच मदतीसाठी केतकर धावधाव करणार आणि त्या मदतीचा उल्लेखही ते करणार नाही, हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य.

कुमार केतकरांच्या कामाची शैली उमेदपणा आणि वर उल्लेख केलेल्या अनाकलनीयनता याचा मिलाफ कसा आहे याचा अनुभव संजय आवटे या पत्रकाराशी संबधित आहे. नागपूरला वृत्त संपादकाची जागा रिक्त होती आणि त्या जागी संजय आवटेला घ्यावं, अशी विनंती केतकरांनी केली. केतकरांच्या विनंती या शब्दानं मला फारच अवघडल्यासारखं झालं, पण केतकर म्हणाले , ‘तू त्याच्याशी बोल आणि मग काय ते मला कळवं’.

संजय आवटे तेव्हा लोकमतच्या अकोला आवृत्तीला होता. व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)च्या गेटला लागून असलेल्या ओट्यावर बसून आमच्या गप्पा झाल्या हे मला पक्कं आठवतं. झालेल्या गप्पातून एक पत्रकार म्हणून संजयचा आवाका माझ्या लक्षात आला. जसजशा गप्पा होत होत्या तसतसा मी त्याच्या नियुक्तीविषयी अनुकूल होत गेलो, मात्र त्याचवेळेस त्याच्यात लाऊडनेस आणि घमेंड जरा जास्तच आहे, हेही लक्षात आलं होतं. त्याला त्याच्या नियुक्तीबद्दल संकेत देणारी चर्चा मी सुरू केली. असं सुरू असतानाच मी त्याला पगाराची अपेक्षा विचारली आणि इथेच बिनसलं. ‘कुमार ते ठरवेल’, असा त्यानं केतकरांचा उल्लेख एकेरी केला.

‘केतकरांचे तुझे इतके घनिष्ठ संबंध आहेत?’ मी सहज म्हणून विचारलं तर संजय म्हणाला, ‘मी लोकसत्तात नसलो तरी कुमार माझा सल्ला घेतो, मी त्याला संदर्भ पुरवतो...वगैरे वगैरे.’ मला त्याचं हे बोलणं अगोचरासारखं वाटलं. एकदम त्याच्याशी बोलण्याचा कंटाळाच आला. त्याला मध्येच तोडत मी ती भेट आटोपली आणि घरी निघालो. घराकडे जाता जाताच केतकरांना फोन केला आणि विचारलं, ‘तुमचे आणि संजयचे संबंध अरे-तुरेचे आहेत?’

केतकर म्हणाले, ‘हो, म्हणजे मी त्याला अरे-तुरे करतो आणि तो मला आहो-जाहो. का रे, काय झालं?’

काय घडलं हे मी केतकरांना सांगितले आणि म्हणालो, ‘मला हा मुलगा चालणार नाही. मी त्याची शिफारस मुळीच करणार नाही. मात्र, तुम्ही जर त्याला अपॉइंट करणारच असाल तर बॉस म्हणून तुमचा अधिकार मला मान्य आहे.’

पुढे एकदा केतकरांचा फोन आला. ते म्हणाले, ‘संजयला तू नागपूरला घेत नाहीस, पण मी त्याला पुण्याला घेतलं तर तुझी काही हरकत आहे का?’ 

मी क्षणभर विचार केला आणि ‘माझी हरकत नाही’ असं म्हणालो. कुमार केतकरांच्या उमदेपणाचा हा अनुभव विलक्षण होता. पुढे संजय पुण्यातही ‘अवघड जागेवरच दुखणं’ झाला आणि केतकरांनी त्याला घेण्यात चूक झाली असं मान्य करत संजयची नागपूरला माझ्या हाताखाली बदली केली. अर्थात तो नागपूरला फार टिकला नाही, टिकणारच नव्हता. त्याला राजीनामा द्यावा लागला. अशात एका प्रकाश वृत्तवाहिनीवर त्याच्यासोबत केतकर दिसले. केतकरांच्या क्षमाशील वृत्तीचं कौतुकच वाटलं. (हा अनुभव ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘दिवस असे की...’ या पुस्तकात पान १४४ वर सविस्तर आहे.)

५.

आमचे परस्परविरोधी स्वभाव, वृत्ती-शैली आणि विचारही भिन्न तरीही मला कुमार केतकरांच्या सहवासात ज्ञानसंपन्नतेची दिशा मिळाली; खूप काही शिकायला मिळालं; उदारमतवाद आणि उमदेपणा म्हणजे नेमकं काय हे मुळातून समजलं. म्हणूनच केतकर म्हणजे ज्ञान आणि उमदेपणाच्या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलेलं झाड आहे, अशी माझी धारणा झालेली आहे. ‘लोकसत्ता’च्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या आवृत्तीचा संपादकपद म्हणून मला पदोन्नती मिळाली; ‘लोकसत्ता’त एकाच वेळी दोन संपादकपदं निर्माण होण्याची ती पहिलीच वेळ होती, पण, ते सेलिब्रेट उमदेपणानं केतकरांनीच केलं. एक माणूस म्हणून त्यांच्यात काही दोष नसतीलच असं नाही. त्यांच्या स्वभावातल्या काही उणीवा मलाही जाणवल्या, पण आपल्या ओंजळीत ज्ञानसंपन्नतेचा दरवळ टाकणार्‍यांबद्दल कृतज्ञता न बाळगणं हा करंटेपणाच नाही का? शिवाय माणसातलं चांगलेपण मनात कायम ठेवावं आणि वाईटपण विसरून जावं, हा माई-म्हणजे माझ्या आईचा संस्कार असल्यानंही कुमार केतकर यांच्याविषयी नेहमीच मला आदर, अगत्य आणि आपुलकीही वाटत राहणार... कोणी काहीही म्हणो, त्यांचा मी आजन्म निस्सीम विवेकी चाहताच राहणार!

(‘दिवस असे की...’मधील मजकुराचा हा केलेला सुधारीत संक्षेप आहे.)

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......