अजूनकाही
वय नसताना लग्न झालं आणि कारण नसताना तलाक! १८ वर्षाच्या अशक्त मुलीवर आभाळ कोसळलं. स्वत:च्या दु:खाचा विचार करताना तिच्या लक्षात आलं की, आपलं दु:ख फक्त आपलं नाही. यवतमाळ जिल्ह्यातील आरणी या छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच जणी अशाच तलाकशुदा नाहीतर हाकलून दिलेल्या परित्यक्त्या दिसू लागल्या. पदरात मूल-बाळही. मग अवघ्या १८-१९ व्या वर्षीच निराधार महिलांसाठी त्या खंबीर आधार बनून उभ्या राहिल्या. त्यांच्या मुलांच्या हाती शिक्षणाचा दीप दिला. रेहाना बैलिम यांनी स्वत:बरोबरच इतरही महिलांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला.
रेहाना जन्म मूळचा राजस्थानातला. त्या मुस्लिम तेली समाजातील घुंघट वगैरेसारख्या अतिशय कट्टर पारंपरिक चौकटीत वाढल्या. त्यांचा अवघ्या १५ व्या वर्षी निकाह झाला. मात्र या लहानग्या रेहानाचा सासरी या ना त्या कारणानं छळ होऊ लागला. त्यामुळे शरीर स्वास्थ्य बिघडलं. तीन-चार वर्षांच्या संसारानंतर त्या आजारपणासाठी माहेरी आल्या, तेव्हा त्यांना तलाकचं पत्र पाठवलं गेलं. यापूर्वी घरात कोणाचाही तलाक झालेला नव्हता. त्यामुळे सगळेच हादरले.
आपल्याला हा एकतर्फी तलाक मंजूर नाही म्हणत रेहाना सासरी जाऊन राहू लागल्या. मात्र सासरच्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. महिनाभर त्या प्रयत्न करत राहिल्या, पण सासरच्यांचं काळीज विरघळलं नाही. हतबल होऊन त्या परतल्या. माहेरी आल्यावर पतीविरुद्ध त्यांनी पोटगीसाठी दावा दाखल केला आणि सासरच्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
ही घटना साधारण १९९६-९७च्या काळातील. त्यांना पोटगी मिळाली नाही आणि पोलिस तक्रारीला दादही. या सगळ्या घटनेचा १८-१९ वर्षांच्या रेहाना यांना खूप मोठा धक्का बसला. एकतर्फी तलाकविरुद्ध दाद नाही, पोटगी नाही, मौलानांकडे याचं उत्तर नाही, मग मुस्लिम मुलींनी ही अशीच फरफट सहन करत राहायची का? या प्रश्नानं रेहाना यांना अस्वस्थ केलं. हळूहळू त्यांच्या लक्षात आलं, त्या एकट्याच नव्हे तर हा प्रश्न अनेक मुलींचा आहे. स्वत:च्याच गावाचा कानोसा घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं, गावात अशा कित्येक जणी होत्या. काहींना तलाक दिलेला होता, तर काहींना नुसतंच हाकललेलं होतं. इतर महिलांच्या अत्याचाराच्या घटना ऐकून त्यांना अपार दु:ख आणि बेचैनी येऊ लागली. काहीतरी करावं असा विचार पक्का होऊ लागला.
त्याच सुमारास त्यांनी पाचवीत सुटलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि बाहेरून परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. दुसरीकडे इतर काही जणींच्या मदतीनं त्यांनी मुस्लिम परित्यक्ता व तलाकपीडित महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी गावात सर्वेक्षण सुरू केलं. त्यातून मुख्यत्वेकरून खरंच किती जणी एकतर्फी तलाकच्या बळी आहेत, हे माहीत करून घ्यायचं होतं. आरणीसारख्या छोट्याशा परिसरात एक-दोन नाही तर दीडशे महिला तलाकपीडित किंवा हाकलून दिलेल्या आढळल्या. त्यांचा वयोगट १४ ते १८. ही माहिती खूपच धक्कादायक होती. त्यातून मुस्लिम महिलांच्या प्रश्नाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात आलं.
यानंतर रेहाना वेगवेगळ्या सभा-संघटनांमध्ये त्या जाऊ लागल्या. तलाकचे बारकावे समजून घेऊ लागल्या. बायकांची मूलभूत रोजगाराची अपेक्षा समजून घेऊ लागल्या. दरम्यान रेहाना यांनी मुस्लिम घटस्फोटित महिलांची चर्चा घडावी यासाठी गावात एका कार्यशाळेचं आयोजन केलं. मात्र लोक विरोध करू लागले. आज ना उद्या मुलींना दुसऱ्यांदा उजवता येईल. त्यामुळे अशा मिटिंगा करून काय करणार, असं तलाकपीडित मुलींचे कुटुंबीय बोलू लागले. कार्यशाळा होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी काही महिला त्यांना गुपचूप भेटायला आल्या. त्यानंतर दोन दिवस ही कार्यशाळा महिलांनीच सुरळीत पार पाडली.
महिलांचे विविध प्रश्न लक्षात आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी महिला मंडळ स्थापन केलं. त्याचंच पुढे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई बहुद्देशीय ग्राम सेवा’ या नावानं रजिस्ट्रेशन करून संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण वर्ग सुरू केले. कौटुंबिक सल्ला केंद्र सुरू केलं. रेहाना स्वत: ठिकठिकाणी या प्रश्नावर उदबोधन करण्यासाठी जाऊ लागल्या.
एकीकडे हे सुरू असलं तरी उदरनिवार्हाचा प्रश्न होताच. वडिलांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहणं महत्त्वाचं वाटलं. त्यांनी बँकेतून लोन काढून किराणा मालाचं दुकान सुरू केलं. त्यामुळे इतर महिलांना रोजगाराविषयी सांगताना त्यांचा आत्मविश्वास दुणावला. महिलांसाठी घेतले जाणारे कार्यक्रम, कार्यशाळा यात महिलांचा सहभाग वाढला. मुलीबाळींना रोजगार मिळू लागला. अशा विविध गोष्टींनी रेहाना यांचा आत्मविश्वास दुणावू लागला आणि संस्थेच्या कामानंही वेग धरला.
मात्र रेहाना यांच्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडणं सोपं नव्हतं. मुलींचं डोकं फिरवते, भडकवते म्हणत जमातीतील लोकं त्यांच्या जीवावर उठले. मारून टाकण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पण त्या बधल्या नाहीत. काम करत राहिल्या. जसे विरोधक होते तसेच त्यांच्या कामाचं महत्त्व समजून सोबत करणारेही भेटत गेले अन निराधार बायकांसाठी रेहानांची काम करण्याची आस प्रबळ होत गेली.
एकीकडे महिलांचे प्रश्न हाताळताना त्यांना वेश्यावस्तीतील मुलांचे प्रश्न दिसू लागले. त्यांची शिक्षणाची हेळसांड दिसू लागली. त्यांच्यासारखीच पारधी समाजातील मुलंही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली गेलेली होती. मानधन व कोणत्याही मदतीशिवाय त्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेश्या व पारध्यांच्या वस्तींवर १५ ते १८ शाळा सुरू केल्या. मुख्य शाळांमध्ये या मुलांना प्रवेश नाकारला जात होता. पण मुलांना शिक्षण मिळायलाच हवं म्हणून रेहाना यांची संस्था झटू लागली.
दरम्यान या कामाविषयी युनिसेफच्या कार्यकर्त्यांना माहिती झाली. त्यांनी रेहाना यांची भेट घेतली. त्यांच्या वस्तीशाळा पाहिल्या. यानंतर त्यांना युनिसेफच्या सहकार्यानं संपूर्ण आरणी तालुक्यात अशा प्रकारे काम करण्यासाठी तीन वर्षांचा प्रकल्प दिला गेला. हा प्रकल्प रेहाना व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षांतच पूर्ण केला. यामध्ये त्यांनी जवळपास ८० गावांचं सर्वेक्षण करून १३४८ मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचं शोधून काढलं. गावातील शाळाबाह्य मुलं शोधल्यावर त्याच गावच्या मुख्याध्यापकांकडून यादीवर ही मुलं शाळेत नसल्याची त्या सही घेत. या पद्धतीमुळे त्यांच्या कामातील विश्वासार्हता वाढली. सरकारी पातळीवर एकही मूल शाळाबाह्य नाही, या घोषणेतील हवाच रेहाना यांच्या संस्थेनं काढून टाकली होती. मात्र अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आजही त्यांची संस्था शाळाबाह्य मुलांसाठी झटते आहे.
आज संस्था गावातील महिलांच्या सर्व पातळीवरील प्रश्नांशी झुंजते आहे. तलाकपीडितच नाही तर निराधार बायकांना रोजगार मिळवून देणं, सरकारी मदत, स्कॉलरशीप मिळवून देणं यांसारख्या विविध प्रश्नांवर काम करते. स्थानिक पायाभूत सुविधांसाठीही काम करते. समुपदेशन केंद्र चालवते.
अवघ्या ४० वर्षांच्या रेहाना यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. सर्वप्रथम हमीद दलवाई पुरस्कार समितीच्या पुरस्कारानं सन्मानित केल्यानंतर स्थानिक परिसरामध्ये त्यांच्या कामाला महत्त्व प्राप्त झालं. स्वत:च्या गावाबरोबरच आसपासच्या गावातील महिला, कार्यकर्ते पाठीशी उभे राहिले. यानंतर त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा सामाजिक कार्यासाठीचा पुरस्कार देण्यात आला. आयबीएन लोकमत, झी २४ तास या वृत्तवाहिन्यांनीही त्यांच्या कार्याला पुरस्कृत केलं.
रेहाना यांचं काम या मान-सन्मानांच्या पलिकडे जाऊन सुरू आहे…
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383
.............................................................................................................................................
लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.
greenheena@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment