राज ठाकरे आणि नवज्योतसिंग सिद्धू यांचं असं का होतं?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • नवज्योतसिंग सिद्धू आणि राज ठाकरे
  • Thu , 22 March 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar नवज्योतसिंग सिद्धू Navjot Singh Sidhu राज ठाकरे Raj Thackeray

राज ठाकरे आणि नवज्योतसिंग सिद्धू या दोघांत काय साम्य आहे? राज हे राजकीय नेते. नवज्योतसिंग सिद्ध हे ख्यातनाम क्रिकेटपटू. राज हे उत्तम वक्ते. आपल्या चाहत्यांना भूलवणारं व्यक्तिमत्त्वं त्यांच्याकडे आहे. सिद्धू हेसुद्धा उत्तम वक्ते आहेत. कॉमेडियन म्हणून त्यांचं अलीकडच्या काळात टीव्ही शोमुळे नाव झालं आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्वही चाहत्यांना लुभावणारं आहे.

राज आणि नवज्योतसिंग या दोघांची गुढीपाडव्याच्या दिवशी भाषणं झाली. राज मुंबईत शिवाजी पार्कवर बोलले, नवज्योतसिंग दिल्लीत काँग्रेसच्या मंचावर ८४व्या अधिवेशनात बोलले. राज यांनी त्यांच्या चाहत्यांना खुश केलं. नवज्योतसिंग यांनी खुद्द सोनिया गांधींना पोटधरून हसवलं, काँग्रेस कार्यकर्त्यांचं वारेमाप मनोरंजन केलं.

राज आणि नवज्योतसिंग यांचं वैशिष्ट्य असं की, ज्या बाजूनं बोलायचं ती बाजू ते आपल्या चाहत्यांना पटवून देण्यात शंभर टक्के यशस्वी होतात. राज त्वेष, उपहास, वक्रोक्ती, खिल्ली उडवत विरोधी बाजूला चीत करतात. नवज्योतसिंग यांचं हिंदीवर प्रभुत्व आहे. त्यांची शब्दफेक एवढी आकर्षक आणि आक्रमक असते की, त्यांचा मुद्दा चाहत्यांच्या गळी उतरल्याशिवाय राहत नाही. त्याला परत विनोदाची, शब्दखेळांची खमंग फोडणी असते. त्यामुळे चाहते हसत हसत कधी पटवले जातात ते कळतही नाही.

हे दोघेही प्रभावी राजकीय नेते आहेत. नेत्याजवळ अभिनयाचं अंग असावं लागतं. ते दोघांजवळही भरपूर आहे. नवज्योतसिंग यांची दाढी, पगडी, पंजाबी पोशाख हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावी करतो. राज यांची केशभूषा, चष्मा, गुळगुळीत चेहरेपट्टी, पांढरा कुर्ता-पायजमा त्यांच्यातल्या नेत्याला अधिक उठाव देतो. अगदी मध्ये मध्ये रुमालानं नाक पुसणं हेही स्टाइल वाटावं इतकं जमून येतं. राज यांचा खर्जातला आवाज हा युनिक सेलिंग पॉइंट आहे, तर नवज्योतसिंग यांची बहारदार शेरोशायरी, भरदार आवाज त्यांच्या भाषणबाजीत महत्त्वाचा ठरतो.

या दोघांकडेही एवढी प्रभावी व्यक्तिमत्त्वं असूनही त्यांना कुणाची तरी भाषा का बोलावी लागते? जसं वारं येईल तसं का बोलावं लागतं? त्याबरहुकूम भूमिका का घ्याव्या लागतात? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर काय दिसतं?

नवज्योतसिंग हे भाजपमध्ये होते, तेव्हा ते तो पक्ष कसा मायबाप आहे याविषयी शेरोशायरी करत. मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण पक्ष सोडणार नाही असं त्यावेळी पंजाबात आणि देशभरही सांगत फिरत. पण नंतर पंजाबच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांची पत्नी व त्यांनी अचानक भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसवाशी होण्याआधी त्यांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांनाही शेरोशायरीनं लुभावण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. पण तिथं सौदा जमेना. मग ते काँग्रेसमय झाले. त्यानंतर त्यांनी माझं घराणं कसं काँग्रेसी आहे, माझे आजोबा-पणजोबा कसे काँग्रेसी होते, असं सांगून काँग्रेसवाल्यांना खुश करायला सुरुवात केली.

राज यांनी रतन टाटा यांच्या सांगण्यावरून गुजरात वारी केली आणि नरेंद्र मोदी हे कसे आदर्श नेते आहेत, विकासपुरुष आहेत, त्यांची देशाला कशी गरज आहे, हे प्रभावीपणे मांडायला सुरुवात केली. २०१४साली तर ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ‘मोदीं’कारणी राज यांनी स्वत:चं वक्तृत्व आणि व्यक्तित्व लावलं. ते त्यात इतके वहात गेले की, त्यांना त्यात स्वत:च्या पक्षाचा तोटा होतोय हेही उमगलं नाही. त्यांनी मोदी आणि विकासदृष्टीची केलेली भलावण पोकळ होती, हे आता सिद्ध झालंय.

आता चार वर्षांनी राज यांनी ‘मोदीमुक्त भारत’ करण्याची हाळी दिलीय. त्यांच्या या भूमिकेला त्यांनी पुण्यात घेतलेली शरद पवार यांची छान छान मुलाखत आणि पाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेली पवारांची भेट या घटनांची पार्श्वभूमी आहे. ‘मोदी लाटे’त वाहत गेलेले राज आता ती लाट उलटी करू पाहत आहेत. त्यामागे प्रेरणा, शिकवण कुणाची याविषयी लोक प्रश्न विचारायला लागले आहेत.

राज यांच्या नेतृत्वाची एक खासीयत अशी की, ते आपल्या भूमिका चुकल्या हे कधीही मान्य करत नाहीत. त्याविषयी ते ना त्यांच्या पक्षात चर्चा करतात, ना इतर कुणाजवळ, ना सार्वजनिकरीत्या जाहीरपणे बोलतात. ही खास ठाकरे शैली आहे. ती त्यांच्या काकांकडून त्यांच्याकडे आली आहे. आताही ‘मोदीमुक्त भारत’ करण्याची भूमिका घेताना मी मोदींना ओळखायला कसा चुकलो, का चुकलो, या गंभीर मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. माझ्यापुढे जे चित्रं उभं केलं त्याआधारे मी तेव्हा बोललो एवढीच टिपणी त्यांनी केली. पण त्याही वेळी गुजरात मॉडेल, गुजरातचा वंशसंहार, मोदींची एकाधिकारशाही, गुजरातमधील शिक्षण, सार्वजनिक आरोग्याची हेळसांड याविषयी खूप बोललं-लिहिलं जात होतं. त्याकडे राज याचं लक्ष का गेलं नाही? म्हणजे ती भूमिका राज यांनी एकांगीपणे घेतली होती, हे स्पष्ट होतं.

आता राज यांनी ‘मोदी मुक्त भारत’ करण्याची जी भूमिका घेतली आहे, त्यातही एक चतुराई आहे. मोदींची भारतातली सत्ता ही काही त्यांची एकट्याची नाही. ती भाजप या पक्षाची आहे. हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यांवर चालतो. संघाचा अजेंडा हाच भाजपचा अजेंडा असतो. त्यानुसार मोदी-शहा काम करत आहेत. हे दोघं वाईट आणि भाजप-संघ चांगला असं काही नसतं. राज यांचं संघाच्या अजेंड्याबद्दल काही म्हणणं नसतं, हे त्यांच्या आजवरच्या भूमिकांवरून दिसून आलं आहे. गुढीपाडव्याच्या भाषणात त्यांनी मी मोहन भागवत यांना भेटतो हेही सांगितलं. त्या भेटीत त्यांनी शाळांत सरस्वती वंदना झाली पाहिजे, यासाठी आग्रह धरला. पण जे मुस्लिम, ख्रिश्चन मुलं सरस्वती वंदना म्हणत नाहीत, ती असताना बाजूला थांबतात त्याविषयी राग व्यक्त केला. हिंदूबहुल शाळांत सरस्वती वंदना व्हावी, तशी ख्रिश्चनबहुल शाळांत त्यांच्या प्रार्थना व्हाव्यात अन तिथं अल्प हिंदू मुलांनी त्या म्हणाव्यात काय? त्याविषयी राज यांची काय भूमिका आहे?

सरस्वती वंदना इतर अल्पधर्मीय मुलं म्हणत नाहीत, हे मोठं अरिष्ट वाटणाऱ्या राज यांना या सरकारनं अनुदानित १३०० मराठी शाळा बंद करायचा निर्णय घेतला, शिक्षकांना छळलं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला त्याबद्दल काय वाटतं? त्याबद्दल राज गर्जताना कधी दिसले नाहीत. म्हणजे मराठी भाषेचं, माणसाचं जिथं खरं नुकसान होतंय, तिथं हे गप्प राहतात. आणि एरवी आम्ही मराठीचे कैवारी म्हणायचं असं हे त्रांगडं आहे.

मुळात ‘नवनिर्माण’ हे आकर्षक नाव पक्षाला घेऊनही राज यांनी गेली बारा वर्षं या पक्षाचं समग्र तत्त्वज्ञान, अजेंडा कधी मांडला नाही. द्रमुक, तेलगू देशम, अकाली दल या पक्षांचा स्वत:चा अजेंडा, तत्त्वज्ञान आहे. म्हणून ते त्यांच्या राज्यात राजकीय पर्याय बनू शकले. राज यांनी मराठीचा मुद्दा शिवसेनेकडून उसना घेतला. पण खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनेचं राजकीय तत्त्वज्ञान आणि समग्र अजेंडा कधी मांडला नाही. म्हणून तर त्यांना भाजपची कुबडी घ्यावी लागली. उलट स्वत:चं तत्त्वज्ञान असल्यानं भाजपनं शिवसेनेवर मात केल्याचं आणि सेनेला सापळ्यात अडकवल्याचं आपण पाहत आहोत.

मुद्दा असा की, पंजाबी नवज्योतसिंग काय किंवा मराठी राज ठाकरे काय हे चांगले वक्ते आहेत म्हणून चांगले, प्रगल्भ नेते होतील असं नव्हे. त्यासाठी त्यांना स्वत:ची समग्र राजकीय विचारप्रणाली असावी लागेल. ती मुदलात या दोघांजवळही नाही. मराठी प्रसारमाध्यमांचे राज लाडके आहेत. त्यांना ते फार प्रभावी नेते वाटतात. पण राज यांनी सतत प्रभावी राहण्यासाठी ‘पोलिटिकली अनकरेक्ट’ राहिलं पाहिलं. ते राहण्यासाठीची विचारप्रणाली त्यांच्याजवळ नाही हे वास्तव आहे. ती नसल्यानं त्यांना मोदी नको वाटतात, पण संघ जवळचा वाटतो.

स्वत:चा राजकीय अजेंडा नसलेल्या घटकांना (कार्यकर्ते, नेते, पक्ष, संस्था इ.) इतर चलाख नेते, पक्ष वापरून घेतात. म्हणूनच आताच्या राज यांच्या ‘मोदीमुक्ती’च्या घोषणेमागे पवार फॅक्टर आहे, असं टीकाकार बोलू लागले आहेत. म्हणजे तेव्हा राज ‘मोदी लाटे’साठी वापरले गेले, आता ‘मोदीमुक्ती’साठी वापरले जाणार. या वापरा-वापरीच्या खेळात मनसैनिकांची हेळसांड होणार हे उघड आहे. यात राज यांचीही विश्वासार्हताही पणाला लागणार.

थोडक्यात नवज्योतसिंग आणि राज यांना लाटा निर्माण होतात तशा भूमिका घ्याव्या लागणं हे अपरिहार्य आहे. त्यांच्यातल्या मर्यादांमुळे ते घडतं. म्हणूनच मूळ भूमिका ठिसूळ असल्यानं शिवाजी पार्कात राज यांनी प्रसारमाध्यमांची मोदीकृत मुस्कटदाबी, न्यायव्यवस्थेचं दमणं, गुजरार्थ्यांची कमजोरी, हिटलरी कारभार, हे महत्त्वाचे मुद्दे मांडले असतानाही लोक म्हणतात की, हे मुद्दे अगोदरपासूनच अनेक जण सोशल मीडियावर मांडत होतेच की! आता राज यांनी मांडले त्यात काय एवढं कौतुक!

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

anirudh shete

Fri , 23 March 2018

खूपच छान विश्लेषण


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......