अजूनकाही
१. देश नव्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं प्रवास करत असून या लढाईत ५० दिवस मोदींना साथ देणारा माणूस एक शिपाई बनेल, तर जो मोदींना साथ देणार नाही तो देशाचा विरोधक असेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाना फडणवीस तुमचे कोण हो? अगदी सेम टु सेम मुत्सद्देगिरी हो! पण असं आहे की देश आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं चाललाय, अशी तुमची कल्पना आहे. त्यात तुम्हाला शिपाई, खानसामा, अंमलदार जे काही बनायचं असेल ते बना. जो सरकारचा विरोधक तो देशाचा विरोधक ठरवताना आपल्याकडे सगळी मिळून ३१ टक्केच मतं आहेत, याचं भान ठेवलंत तर बरं!
...............
२. कर्नाटकातल्या खाणसम्राट जी. जनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या शाही विवाहसोहळ्याला सेवा पुरवणाऱ्या पुरवठादारांची प्राप्तीकर खात्याकडून चौकशी लग्नातल्या उधळपट्टीबदल रेड्डी यांना मात्र अद्याप जाब विचारला गेला नाही.
तो विचारला जाईल याचा काही भरवसाही नाही. रेड्डी यांनी मुलीचं लग्न नोंदणी पद्धतीनं पाच साक्षीदारांच्या साक्षीनंच लावायचं ठरवलं होतं, पण त्यांच्या राजकीय विरोधकांनी कट करून शाही विवाहसोहळा रचला आणि त्या कारस्थानात या दहा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या सहभागी झाल्या, असा निष्कर्ष निघाला, तरी आश्चर्य वाटायचा नको.
...............
३. गिरणा धरणातून नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून मुख्यमंत्र्यांमार्फत जलवाहिनीचे काम मार्गी लावून शहर व परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवणार आहे. त्यासाठी नगर परिषदेत भाजपलाच मतदान करा : पंकजा मुंडे यांचं आवाहन
म्हणजे काय, राज्यात आमची सत्ता असताना विकास हवा असेल, तर आम्हालाच मतदान करा, असं सगळेच राज्यकर्ते मतदारांना खासगीत बजावत असतात. विरोधात गेलेल्या वस्त्यांना नागरी सेवासुविधा पुरवण्यात कुचराई करून त्यांचे हाल हाल करून धडा शिकवण्याचा फंडाही जुनाच आहे. पंकजा मुंडे यांनी तो फक्त बोलून दाखवला, इतकंच.
...............
४. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोबाइल पाकीट सेवा पुरवणाऱ्या पेटीएमची भरभराट, रोज १२० कोटी रुपयांचे ७० लाख व्यवहार; पाच अब्ज डॉलरचं उद्धिष्ट चार महिन्यांपूर्वीच पार पडलं.
मेक इन इंडियाचा गजर करणाऱ्या, चिनी मालावर बहिष्काराचं आवाहन करणाऱ्या विचारसरणीचं सरकार सत्तेत असताना त्याच्या निर्णयाचा लाभ पेटीएममध्ये सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या अलीबाबा या चिनी कंपनीला व्हावा, हा योगायोग विलक्षण आहे. आता ही कंपनी सरकारस्नेही उद्योगपतींच्या 'मुठ्ठी में' येते की, पतंजलीचं स्वदेशी मोबाइल पाकीट सुरू होतं, ते पाहायला हवं.
...............
५. नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा नष्ट करण्यासाठी घेतला असताना त्याचा त्रास होण्याचं कारण काय? : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल
असं आहे मोदीजी, हिंदी सिनेमातला एका प्रसंगाप्रमाणे ही स्थिती झाली आहे. नायक मोठ्या आवेशात खलनायकाचा जबडा तोडण्यासाठी फाइट मारायला हात उगारतो आणि त्याच्या तोंडावर फटका मारतो… प्रत्यक्षात त्याने उगारलेल्या हाताच्या फटक्याने त्याच्याच पाठीमागे उभे राहिलेले त्याचेच तीन समर्थक कोलमडून पडतात… तो हात हवेत झेपावतो, तेव्हा आणखी तीन समर्थकांची बत्तिशी तुटते… शिवाय तो हात खलनायकाच्या जबड्याऐवजी लोखंडी खांबावर आदळून हाड मोडतं ते वेगळंच… नायक तरीही ओरडत असतो, मी खलनायकाची बत्तिशी तोडायला निघालेलो असताना तुम्ही सगळ्यांनी ओय ओय ओय ओय ओरडण्याचं कारण काय… ओय ओय ओय ओय…
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment