आयुष्यभर समाजॠण फेडणारे प्रा. जैमिनी कडू मृत्युनंतरही समाजाच्या उपयोगी पडले!
संकीर्ण - श्रद्धांजली
सुरेंद्र बुराडे
  • जैमिनी कडू (१९५०-१७ मार्च २०१८)
  • Wed , 21 March 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली जैमिनी कडू Jaimini Kadu

शेकडो वर्षांच्या विषमतेविरुद्ध समतेचा जागर करणाऱ्या शिलेदारांत प्रा. जैमिनी कडू हे कडवे सेनानी म्हणून सर्वांना परिचित होते, राहतील. त्यांनी अभ्यासपूर्ण वक्तृत्व, डोळस नेतृत्व आणि विशुद्ध कर्तृत्व बहुजनांपुढे ठेवलं. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांची वैचारिक परंपरा पुढे नेली. आयुष्याची पन्नास वर्षं त्याकरिता वाहिली.

वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचा देह अपघाती विसावला. जैमिनी रंजल्यागांजल्यासाठी जगले. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी हाती लेखणी उचलली. ध्येयनिष्ठ पत्रकारिता स्वीकारली. दोन-अडीच तपांआधीचा तो काळ. मोडेल पण वाकणार नाही अशी जिद्द. दै. लोकमत जैमिनींच्या शोधपत्रकारितेनं गाजू लागलं. महाराष्ट्रभर गर्जू लागलं. लोकमतचा वाचकवर्ग वाढला. जैमिनींचं नाव होऊ लागलं. बातम्या लिहिण्यात तडजोड त्यांना मान्य नव्हती. तिथंच ठिणगी पडली. मालक शरणभूमिका त्यांनी घेतली नाही. सत्याची बाजू न सोडल्यानं संघर्ष उद्भवला. अखेर ‘लोकमत’चा राजीनामा देऊन ते बाहेर पडले. मुक्त पत्रकारिता करू लागले.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जैमिनींची ओळख परखड वक्ता म्हणून होती. ते चळवळीतील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लहान-मोठ्या गावात पडेल ती किंमत देऊन पोहोचायचे. दलित, पीडित बहुजनांना जागे करायचे. जहाल शब्दांनी चेतवायचे. आपला खरा इतिहास सांगायचे. महाराष्ट्रभर फिरायचे. अस्खलित मराठीतून आपला प्रतिपाद्य विषय प्रतिपादन करायचे. बामसेफच्या देशभरातील अधिवेशनांत आणि मुख्यत: उत्तर भारतीय दौऱ्यांत त्यांची व्यक्त होण्याची भाषा हिंदी असायची. दोन्ही भाषांवर त्यांचं सारखंच प्रभुत्व होतं. अभ्यासातून त्यांनी ते प्राप्त केलं होतं. त्यामुळेच त्यांचा चाहता वर्ग देशभर पसरलेला होता.

जैमिनींचं लेखन कौशल्य पाहून स्तंभित व्हायला व्हायचं. पानामागे पानं ते सलग लिहायचे. त्यात कुठेही खाडाखोड नसायची. अक्षर मोत्याच्या दाण्यासारखं. ही अक्षर तपस्या त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत केली. एकदा त्यांना रेल्वेनं मुंबर्इला एका कार्यक्रमाकरता जायचं होतं. वेळेत लेख तयार नव्हता. त्याच दिवशी वृत्तपत्राच्या कार्यालयात लेख पोहोचवणं अनिवार्य होतं. त्यांनी मला निरोप देऊन रेल्वेस्थानकावर बोलावलं. घरून ते ऑटोरिक्षानं आले. ऑटोतून उतरतानाही त्यांच्या एका हातात खर्डा व त्यावर अर्धवट लिहिलेला लेख आणि दुसऱ्या हातात सुटकेस होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं घामाघूम झालेला चेहरा, गाडी सुटायला दहा मिनिटं बाकी. स्थानकावर प्रचंड गर्दी. त्यातून मार्ग काढताना, स्वत:ची आरक्षित जागा शोधताना हातातलं सामान घेऊन धावपळ सुरू. मध्येच क्षणभर थांबून लिहिणं सुरू. लेखातील काही ओळी गाडीच्या दारात उभं राहून, तर काही ओळी गाडीनं शिटी दिल्यावर लिहिल्या. गाडी सुरू झाली. जैमिनींचा पेन थांबला. खिडकी शेजारी मी होतो. त्यांनी हस्तलिखित माझ्या स्वाधीन केलं. महत्त्वाच्या सूचना दिल्या. मी तो तिथंच वाचला. त्यात कुठेही खाडाखोड नव्हती. ना त्यातील विचारसूत्र विस्कळीत होतं.

त्यांच्या पुस्तकांची शीर्षकं विद्रोहाचा हुंकार आहेत. जसं, ‘ब्राह्मणवाद’, ‘फुले-आंबेडकरवादाची मूलतत्त्वे’, ‘बहुजनांच्या महापुरुषांचे विकृतीकरण का?’, ‘सत्यशोधकी विचारसूत्र’, ‘मला समजलेले आंबेडकर’, ‘तुकोबांच्या हत्त्येचा पंचनामा’, ‘शिवराय : एक सामाजिक संदर्भ’ , ‘शिवराय : काल, आज आणि उद्या’, ‘कुणबी समाज : स्वरूप, संस्कृती आणि सभ्यता’ , ‘भारतातील ओबीसींचे भवितव्य’,  ‘फुले - शाहू - आंबेडकर आणि कुणबी मराठा समाज’ इ. यावरून जैमिनींच्या चिंतनाची व लेखनाची कल्पना येर्इल. इतरही बरंच प्रासंगिक लेखन त्यांच्या नावावर आहे.

ओबीसींचं उत्थान हा त्यांच्या जगण्याचा गाभा होता. ‘कुणबी’ हा शब्द त्यांनी जातिवाचक मानला नाही. कृषी संस्कृतीशी इमान राखणारा, जमिनीत बी पेरणारा तो कुणबी या अर्थानं त्यांनी कुणबीपणाचा स्वाभिमान जपला. महाराष्ट्रातील कुणबी समाजाचं एकमेव वैचारिक मासिक- ‘कुणबी समाज दर्पण’ त्यांनी १९९२ पासून आजतागायत सुरू ठेवलं. बराच काळ या मासिकाचा मी मानद संपादक होतो. हल्ली मासिक चालवणं सोपं नाही. तरीदेखील अनंत आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी मासिक चालवलं.

‘जैमिनी शारदा भाऊराव’ या नावानं विविध नियतकालिकांतून त्यांनी काव्यलेखनही केलं आहे. त्यांचा ‘उदध्वस्त क्षणांचा उदयास्त!’ हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. ‘वार’ या कवितेत ते लिहितात-

ज्यांना हात दिला त्यांनी पार वार केले

ज्यांना प्यार दिला ते गद्दार यार मेले

पडली कैक भोके, उडाल्या कैक चिंध्या

गोड गोड शब्दांनी, हाल फार केले!

जैमिनी भन्नाट जगले. असं असूनही त्यांनी कुणाचा आकस वा द्वेष केल्याचं स्मरत नाही. कवी हृदयाचा, संवेदनशील मनाचा हा फकीर नेहमीच आशावादी राहिला. ‘हे शब्द माझे’ या कवितेत ते लिहितात-

हे शब्द माझे बुद्ध-मार्क्स व्हावे

घराघरातुनी त्यांचेच वंश यावे.

सत्यशोधकी विचारांचा वारसा घेऊन जैमिनींचा जीवनप्रवास सुरू होता. जीवन संग्रामात जैमिनींनी अनेक खस्ता खाल्या. आर्थिक ओढाताण खूप झाली. ‘तडजोड’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसल्यानं अनेक नोकऱ्या सोडल्या. पन्नाशीच्या उंबरठ्यावर अंशकालीन मराठीचे प्राध्यापक म्हणून मोहता विज्ञान महाविदयालयात ते रुजू झाले. त्यांचं व्यक्तिमत्त्व आकर्षक होतं. आपल्या अध्यापनानं विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांत त्यांची गणना होऊ लागली. महाविद्यालयाच्या परिसरात जैमिनी सतत विद्यार्थ्यांच्या घोळक्यात दिसायचे. शिक्षणासाठी अनेकांना मदत करायचे. कित्येक मुला-मुलींना त्यांनी दत्तक घेतलं होतं. ही असंख्य मुलं चळवळीचा कणा झाली. जैमिनी निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या कार्यशाळांना मार्गदर्शन करण्यास आवर्जून जात.

जैमिनींचा प्राचीन व अर्वाचीन साहित्याचा व्यासंग होता. खासगी चर्चेत हे पदर ते उलगडून दाखवत. त्यांनी कधी डोळ्याला झापडं बांधली नाहीत. प्रवाहात ते वाहवतही गेले नाहीत. चिकित्सा करायला तत्पर असत. मात्र विषमतेचा संदर्भ येताच तुटून पडत, तेव्हा भल्या-भल्या विद्वानांची भंबेरी उडत असे.

जैमिनी वेगळंच रसायन होतं. त्यांच्या सहवासात दीर्घकाळ राहिल्यामुळे जाणवायचं की, ते एककल्ली नाहीत. स्वभावत: त्यांना एकांत आवडायचा. वाचन, लेखन, चिंतन त्यांचा स्थायीभाव होता. असं असूनही लोकांत ते रमायचे. त्यांची ज्ञानपिपासा अखेरपर्यंत कायम होती. ग्रंथालयात तासनतास बसायचे. त्यांच्या अभ्यासिकेत शेकडो पुस्तकांचा मेळा पाहायला मिळायचा. पलंगावर बसून लोडाला टेकून त्यांचं लेखन-वाचन चालायचं. उशाशी नेहमीच कागद आणि पेन असायचं. हवी ती पुस्तकं शेजारी दिसायची. कार्यक्रमात ढाण्या वाघासारखा डरकाळी फोडणारा हा फर्डा वक्ता बैठकीतल्या मैफिलीत संयतपणे आपलं मत सोदाहरण मांडायचा. मिश्किलपणे हसायचा. निर्व्याज प्रेम करायचा.

जैमिनींना चाहते ‘बापू’ या नावानं हाक मारत. त्यांची पत्नी, शैलदेखील त्यांना याच नावानं संबोधत. त्यांनी कुटुंबात मातृसत्ताक पद्धतीचा मनोमन स्वीकार केला होता. यामुळे घरात शैलचा अधिकार सर्वत्र दिसायचा. जैमिनींचा आंतरजातीय विवाह होता. गुळगुळीत प्रेमाच्या आणाभाका त्यात नव्हत्या. तर सामाजिक लढ्याला पुढे नेण्यास ज्योतिबांना सावित्रीची साथ, तशी जैमिनीला शैलची साथ मिळाली.

अशा गुणसंपन्न पत्रकार, शिक्षक, लेखक, समीक्षक, संघटक, प्रभावी वक्ता, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ता असलेल्या प्रा. जैमिनी कडू यांचा जाहीर अभिनंदन समारंभ घेण्याचं भाग्य मला तीन वेळा लाभलं. त्साठी असंख्य मित्रांची साथ मिळाली. प्रथमत: १९९८ मध्ये त्यांना ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ पुरस्कार मिळाला तेव्हा, त्यानंतर ऑक्टोबर २०१० मध्ये मुंबर्इत झालेल्या अखिल भारतीय कुणबी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि १२ डिसेंबर २०१३ रोजी एकसष्टीपूर्तीनिमित्त नागपुरात शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत. ही आम्हा कार्यकर्त्यांकरता पर्वणी होती. ‘असाही एक स्नेहगंध’ या नावानं त्यांच्यावर लिहिलेल्या अनेकांच्या लेखांचा संग्रह मला संपादित करता आला.

जैमिनींनी आपलं कृतिशील जीवन बहुजनांसाठी समर्पित केलं. १७ मार्च २०१८ ला ते स्मृतिशेष झालं. २५ वर्षांपूर्वी त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेनुसार नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचा देह दिला गेला. आयुष्यभर समाजॠण फेडणारे जैमिनी मृत्युनंतरही समाजाच्या उपयोगी पडले!

.............................................................................................................................................

लेखक सुरेंद्र बुराडे हे कवी, लेखक आणि वक्ते आहेत.

buradesurendra2563@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 22 March 2018

एव्हढं उमदं व्यक्तिमत्व मार्क्स आणि तुकाराम महाराजांची हत्या वगैरेसारख्या फालतू विषयांत फुकट गेलं. खेद आहे. असो. प्राध्यापक जैमिनी कडू यांना शांती लाभो. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......