हिंदुत्ववादी फॅसिस्टांशी झुंज देण्याची हीच वेळ
संकीर्ण - पुनर्वाचन
सुरेश भट
  • सुरेश भट, ‘हिंडणारा सूर्य’चं मुखपृष्ठ आणि बाबरी मशीद
  • Tue , 20 March 2018
  • संकीर्ण पुनर्वाचन सुरेश भट हिंडणारा सूर्य बाबरी मशीद संघ भाजप हिंदुत्ववादी

कविवर्य सुरेश भट यांनी प्रस्तुत लेख लिहिला, त्याला आज २५ वर्षे पूर्ण झाली. काही संदर्भ वगळता या लेखातली परिस्थिती, आव्हाने आज अधिक गंभीर झाली आहेत. त्यामुळे या लेखाचे हे पूर्वपरवानगीने खास पुनर्मुद्रण...

.............................................................................................................................................

गेल्या ६ डिसेंबर रोजी अयोध्येत जे घडले त्याचा अर्थ असा की, आता आपला देश ‘भारत’ म्हणून शिल्लक राहणार आहे किंवा नाही याचा विचार करून ताबडतोब सर्वांनी एक होऊन प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा मी ‘भारत’ असा शब्द उच्चारतो, तेव्हा माझ्या नजरेसमोर माझ्या या देशातील नद्या, खेडी, गावे, शहरे, जमीन, अवकाश, तारे, वारे, फुले, पर्वत किंवा निसर्ग नसतो. माझ्या दृष्टीने माझा देश म्हणजे माझ्या देशात राहणारी सर्व जातीची व धर्मांची विविध भाषा बोलणारी सामान्य माणसे आहेत.

या माणसांशिवाय ‘देश’ हा शब्दच अर्थशून्य आहे. या माणसांशिवाय साहित्य आणि कलेला काहीही अर्थ नाही. ‘देशभक्ती’ म्हणजे जेथे आम्ही राहतो, तेथील सर्व माणसांच्या सुखाची आणि स्वप्नांची काळजी घेणे. ‘देशभक्ती’ म्हणजे आपल्या देशात राहणाऱ्या सर्व माणसांवर प्रेम करणे, त्यांना आपल्यासारखीच माणसे समजणे आणि आपण सर्वांनी एकमेकांसाठी जगणे. हे लोक या देशात राहणाऱ्या माणसांच्या मूलभूत समस्यांचा विचार न करता स्वत:च्या वर्चस्वासाठी फक्त देशभक्तीच्या कोरड्या गप्पा मारतात, आणि त्याच वेळी या भारतात राहणाऱ्या साध्यासुध्या गरीब माणसांना एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी चिथावणी देतात. अशा दोन पायांच्या प्राण्यांना बेवारस कुत्र्यासारखी वणवण करणाऱ्या युवकांना आम्ही हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध मानून त्यानुसार त्यांचा वेगवेगळा विचार करायचा काय? मी परमेश्वर किंवा धर्म यांचा विचारच करीत नसतो. ज्या अर्थी भारतात रा.स्व.संघ, विहिंप, बजरंग दल, शिवसेना, काँग्रेस, एकून तेहतीस कोटी अखिल भारतीय रिपब्लिकन पार्ट्या, मुस्लीम लीग, जमात-ए-इस्लामी आणि भारतीय जनता पक्ष आहे, त्याअर्थी परमेश्वर नाही. निदान आपल्या भारतात तरी परमेश्वर नाही, अशी माझी खात्री आहे.

तेव्हा आता आम्हाला सार्वजनिक जीवनात परमेश्वर आणि धर्माची गरज नाही. आमची खरी गरज म्हणजे आम्हाला आधी माणूस म्हणून सन्मानपूर्वक ताठ मानेने जगता आले पाहिजे. आम्हाला फक्त कागदावर असलेले नागरिक म्हणून प्राप्त झालेले आमचे हक्क खऱ्या अर्थाने उपभोगता आले पाहिजेत. मशिदी किंवा मंदिरे यांची नासधूस करून आम्ही भारतीय लोक आमचे मूलभूत प्रश्न सोडवूच शकत नाही. धर्म हा माणसांच्या आत्मिक (Siritual) विकासाठी असतो. धर्म ही एक संपूर्ण खाजगी बाब आहे. ज्याचा धर्म त्याच्या घरात. पण रस्त्यावर जो तो फक्त साधा माणूस असतो – एक भारतीय नागरिक असतो.

मला आज दु:ख याचेच वाटते आहे की, आमच्या रोजच्या ज्वलंत प्रश्नांकडे आम्ही दुर्लक्ष करावे आणि एकमेकांच्या छातीवर बसावे, म्हणूनच हे सर्व काही घडविण्यात येत आहे. खरे तर आज वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांनी एकवटून लढा उभारला पाहिजे. आम्ही फक्त धर्माचा जयजयकार करीत, इतरांचा द्वेष करीत आहोत; पण आमच्या करोडो बेरोजगार युवकांना हक्काचे काम मिळावे म्हणून आम्ही एकवटून, संघटित होऊन लढा देत आहोत काय? याचा आम्ही सर्वांनी, विशेषत: बेकार युवकांनी विचार केला पाहिजे. आम्हाला सदैव बेकार, भुकेकंगाल, हैराण, गरजू आणि आसऱ्यावाचून ठेवणाऱ्यांविरुद्ध आमचा लढा असायला पाहिजे; पण हे सारे बाजूला ठेवून इतर वाद पेटविले जात आहेत. गरिबांनाच गरिबांचे रक्त सांडण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे; पण सामान्य लोकांनी एकमेकांना ठार मारले तरीसुद्धा त्यांचे प्रश्न सुटणार आहेत काय?

आपल्या या देशातील एकूण एक मशिदी पाडून तेथे भगव्या झेंड्यांसह मंदिरे बांधली तरीसुद्धा हिंदू युवकांचे प्रश्न सुटणार आहेत का? जरा शांत डोक्याने आणि बारकाईने विचार केला तर फक्त महाराष्ट्रच नव्हे तर साऱ्या भारतात उठल्यासुटल्या ‘हिंदुत्वा’चा जय करणारा एकही माणूस बेकारी व गरिबीमुळे मेल्याचे एकही उदाहरण माझ्यातरी लक्षात नाही. घरी दोन वेळच्या जेवणाची उत्तम व्यवस्था असल्याशिवाय किंवा तेवढी समाधानकारक मजुरी मिळाल्याशिवाय कोण धर्मवीर अयोध्येला जाऊ शकतो? आणि गोरगरिबांपैकी गेले असतील तर त्यांची टक्केवारी किती? आता साधुसंतांचे म्हणाल, तर आपल्या देशात सामान्य माणसेच गरिबी किंवा उपासमारीने मरतात, एकही ‘साधू’ किंवा ‘संत’ उपाशी मेल्याचे एकतरी उदाहरण आम्ही कुठेतरी पाहिले आहे काय? गावागावांतून जे धर्मवीर अयोध्येला गेले ते कोण होते? ते आपल्या गावात हमाली करत होते काय? किंवा ते शेतमजूर किंवा रिक्षावाले होते काय? त्यांच्या घरी गरिबीमुळे उपासमार होत होती काय?

हे सर्व प्रश्न मी विचारत आहे. सर्वांनीच हे प्रश्न संघवाल्यांना विचारले पाहिजेत. मग त्या संघवाल्यांचे मुखवटे कोणतेही असोत. वस्तुस्थिती अशी आहे की, या देशाची सत्ता आपल्या ताब्यात यावी म्हणून हे राजकारणी देवधर्माला वापरत आहेत. वास्तविक १९२५ साली संघाची स्थापना झाली. त्यावेळीसुद्धा बाबरी मशीद नेहमीच्या ठिकाणी होती; इंग्रजांचे राज्य असताना (१९२५-१९४७) त्यांना प्रभू रामचंद्रांची आठवण झाली नाही आणि इंग्रज निघून गेल्यावरसुद्धा या सनातन्यांना किमान २५ वर्षे तरी बाबरी मशीद दिसली नाही. ‘आमचा राजकारणाशी संबंध नाही’ असे सांगत सांगत ते राजकारणात घुसले (ते कुठे घुसलेले नाहीत?). त्यांनी भारतीय लोकशाहीलासुद्धा वापरले. राज्य सरकारे स्थापन केली. फक्त दिल्लीत अजून त्यांचे सरकार आले नाही. यापूर्वी त्यांनी साधूसंत वापरले. गोमातेचा उपयोग केला आणि गंगाजलही अपवित्र केले. आता प्रभू रामचंद्रांची पाळी आली.

पण ही केवळ विनोदाची बाब नाही तर हे एक भारतीय इतिहासात निर्माण झालेले सर्वव्यापी संकट आहे. कारण शतकानुशतके यातूना सोसून आणि त्याचबरोबर संघर्ष करून भारतीय जनतेने जे थोडे मिळविले, तेही गमावण्याची वेळ आलेली आहे. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली तर आमचा भारत देश केवळ भूतकाळात जाणार नाही तर एक अखंड देश म्हणून शिल्लकच राहणार नाही. कागदी का होईना, पण भारताचे संविधान अजूनही शिल्लक आहे. या संविधानानुसार भारत म्हणजे हिंदूराष्ट्र नाही आणि याच संविधानानुसार भारताच्या सरकारचा कोणताही धर्म नसतो. भारतीय राज्यघटना हाच भारताच्या सरकारचा धर्म आहे आणि आम्हा भारतीयांसाठीसुद्धा आम्हा भारतीयांचाही भारतीय राज्यघटना हाच धर्म आहे.

जर आम्ही या तथाकथित हिंदुत्ववादी फॅसिस्टांसमोर माघार घेत राहिलो तर आता बोट पकडतील, उद्या मनगट धरतील आणि परवा तर गळाच धरतील. म्हणून प्रत्येक लोकशाहीवाद्याने आता सावध होऊन सर्व लोकशाहीवादी शक्तींच्या मोर्च्यात सामील झाले पाहिजे. ही काही करमणूक किंवा राजकारण नाही तर हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर त्यांचे राज्य आले तर त्यांच्यासारखा नसणारा प्रत्येक भारतीय माणूस देशद्रोही ठरेल. त्यांच्या मर्जीनुसार जगावे लागेल, वागावे लागेल. शिवसेनेचा अनुभव सर्वांना आहेच. सेनावाल्यांनी आधीच घाई केली म्हणून ते फसले. संघवालेही तेच आणि तसेच आहेत. फक्त ते ‘शहाणे’ आहेत एवढेच.

मी आजवर रा.स्व. संघ, शिवसेना आणि भाजपवर सतत टीकाच केलेली आहे. त्यांच्यापैकी कोणत्याही नेत्याचा मी द्वेष करतो म्हणून नव्हे, तर मला पटतच नाही म्हणून मी हे लिहितो. सर्व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येऊन मोर्चा बांधण्याची ही वेळ आहे. कुणीही गप्प बसू नये. जे कार्ल मार्क्स आणि लेनिनला मानतात, त्यांनाही गप्प बसण्याचा अधिकार नाही आणि जे त्याबरोबरच महात्मा फुले आणि परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले दैवत मानतात त्यांनी तर लोकशाहीवादी शक्तींच्या अग्रभागी असायला पाहिजे.

आता सर्व साहित्यिक आणि कलावंतांनी या फॅसिस्ट हिंदुत्ववादी शक्तींशी एकवटून वाणी व लेखणीने झुंज दिली पाहिजे. मग ती शिवसेना असो की भाजप असो. आता नाही बोलायचे तर मग कधी बोलणार? मी आशा करतो की, कविवर्य नारायण सुर्वे, कविवर्य केशव मेश्राम, डॉ. गंगाधर पानतावणे, शिवाय पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, मंगेश पाडगावकर आदी लोकशाही मंडळी माझ्याशी सहमत होतील. कविवर्य नारायण सुर्वे यांच्याकडून तर मला साहित्य क्षेत्रातील फॅसिस्टविरोधी मोर्च्याच्या नेतृत्वाची अपेक्षा आहे.

आता आपण सर्वांनी या फॅसिस्ट हिंदुत्ववाद्यांविरुद्ध एक झालेच पाहिजे. हीच ती वेळ आहे!

(‘हिंडणारा सूर्य’ या सुरेश भट यांच्या पुस्तकातून साभार.)

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4402

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

deepak jadhav

Wed , 21 March 2018

vicar van taji turdisti paha ani at a vichar vant tach noko manun marle jatat


Sourabh suryawanshi

Wed , 21 March 2018

आणि विशेष याच गझल सम्राटांच्या खालील कडव्यावरून विधानसभेत याच वर्षी गोंधळ झाला... पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी


Sourabh suryawanshi

Wed , 21 March 2018

विषयाला धरून मुद्दे खोडून काढता येणार नाहीत त्यामुळे विषयच बदलला जाऊ शकतो कारण विचारांचा सामना करायला विवेक लागतो... सुरेश भट त्यावेळीही बरोबर होते आजही आहेत...!


Gamma Pailvan

Tue , 20 March 2018

भटसाहेब हयात नाहीत. त्यामुळे त्यांना उद्देशून प्रतिसाद देता येणार नाही. पण ज्या वाचकांना हा लेख पटला त्यांना एक गंमत सागतो. त्याचं काये की फॅसिस्ट हे नामाभिधान डाव्या विचारवंतांनी इतरांना दिलेलं आहे. स्वत:ला फॅसिस्ट म्हणवून घेणारा फक्त मुसोलिनी होऊन गेला. तो कमालीचा निरुपद्रवी होता. दुसऱ्या महायुद्धात कुठल्याशा आलतूफालतू मोहिमा आखल्या आणि त्यांतही मार खाऊन स्वस्थ बसला. खरे उपद्रवी होत ते नाझी. त्यांनी बरोबर डाव्यांच्या गोळ्या कपाटांत घातल्या होत्या. पण आज डावे विचारवंत मात्र नाझी हा शब्दही तोंडातनं काढीत नाहीत. सगळे डावे आपले फॅसिस्टांच्या नावाने शंख करतांना दिसतात. काय कारण असेल बरं? उत्तर उघड आहे. नाझी म्हणजे नॅशनल सोशालिस्ट. काय म्हणालांत? नाझी सोशालिस्ट आहेत? हे तर शांतम पापम. स्वत:चं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून! आजून काय! मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी जगाचे डोळे उघडे आहेत म्हंटलं. -गामा पैलवान


Umesh Madavi

Tue , 20 March 2018

Sir bahut sundar lekh likha hai. Dil tak aap ki baat utari hai.


Niyati R

Tue , 20 March 2018

हा लेख १९९३ चा आहे, त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या नंतरच्या कालावधीत १९९३ चे बाॅम्बस्फोट झाले, २००१चा संसदेवर हल्ला झाला, २००३, २००५ ला मुंबईत पुन्हा बाॅम्बस्फोट झाले, २००८ ला मुंबईवर हल्ला झाला. यातल्या बरयाच घटना घडल्या तेव्हा गजलसम्राट हयात नव्हते, जर त्यांनी या सर्व देशद्रोही घटना पाहिल्या असत्या, तर त्यांचे कदाचित बिजेपी, सेना, संघ याबाबत मतपरिवर्तन झाले असते व देशाला खरा धोका कोणापासून आहे हे त्यांना कळले असते.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......