मराठीच्या अभिजातत्वाची मांडणी साधार आणि निर्दोष असावी : अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३ आणि संबद्ध चर्चेच्या निमित्तानं
पडघम - सांस्कृतिक
मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर
  • अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३
  • Tue , 20 March 2018
  • पडघम सांस्कृतिक अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३

“The society which scorns excellence in plumbing as a humble activity and tolerates shoddiness in philosophy because it is an exalted activity will have neither good plumbing nor good philosophy : neither its pipes nor its theories will hold water.” 

- John W. Gardner, Excellence: Can We Be Equal and Excellent Too? (1961)

(चौकोनी कंसातले आकडे "संदर्भ आणि टीपा" या शेवटच्या भागातल्या संदर्भ/टीपांचे आहेत.)

१. प्रास्ताविक

महाराष्ट्र शासनाच्या जालपृष्ठावर उपलब्ध असलेल्या अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३ [१,२] मधल्या एका विपर्यस्त आणि एका निव्वळ असत्य अशा दोन विधानांची चर्चा ह्या लेखात केली आहे.

प्रस्तुत लेखाचं प्राथमिक टिपण अभिजात मराठी भाषा समितीकडे २०१४ मार्चमधे पाठवलं होतं; त्याची पोचही मिळाली होती. समितीला २०१५ मार्चमध्ये आठवणही केली, पण निश्चित प्रतिसाद मिळाला नाही. समितीत विचारविमर्श होऊन अहवालाच्या प्रकाशित किंवा अप्रकाशित आवृत्तीत काही दुरुस्त्या/बदल केले गेले असले तर तशी माहिती शासनाच्या जालपृष्ठावर आजच्या घटकेला तरी उपलब्ध नाही. अहवालात बदल केले गेलेले नाहीत, आणि नजीकच्या भविष्यात सुचवलेल्या दुरुस्त्या होण्याची शक्यता दिसत नाही, अशा गृहीतकाखाली हे टिपण संक्षिप्त लेख म्हणून ‘भाषा आणि जीवन’ ह्या नियतकालिकानं प्रकाशित केलं []. मूळ टिपण आणि लेख [] यांमधले मुद्दे आणि शब्दांकन प्रस्तुत लेखात वापरले आहेत.

समितीला वस्तुस्थितीची कल्पना दिल्यानंतरही विपर्यस्त माहिती पसरवली जात असल्याचं आढळल्यामुळे वस्तुस्थिती काय आहे हे स्पष्ट करणं हा ह्या लेखाचा उद्देश आहे.

२. महाभारतात मराठी?

रामायण आणि महाभारत ह्या प्राचीन ग्रंथांमध्ये शेकडो शब्द मराठी असल्याचे डॉ.अर्जुनवाडकर यांनी दाखवून दिले आहे. (अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३ (मराठी आवृत्ती), महाराष्ट्र शासन [], पृष्ठ १०५) 

Dr.K.S.Arjunwadkar, a learned scholar of Sanskrit and Marathi has pointed out that the ancient works of literature Mahābhārata contain a number of Marathi words. (अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३ (इंग्रजी आवृत्ती), महाराष्ट्र शासन [], पृष्ठ २०७)

वर उद्धृत केलेली विधानं कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या "महाभारतात मराठी" [४] ह्या लेखाचा संदर्भ देऊन मराठीच्या अभिजातत्वाचा एक पुरावा म्हणून अभिजात मराठी भाषा समितीच्या अहवालांमधे केली गेली आहेत.

"महाभारतात मराठी" ह्या लेखात कृष्ण श्रीनिवासांनी संस्कृत महाभारतात (म्हणजे चित्रशाळा प्रत आणि भांडारकर संस्थेची चिकित्सक आवृत्ती यांमधे) त्यांना मराठीशी साधर्म्य वाटलेले शब्द, वाक्प्रचार, रचना, रूपकं, इत्यादींची एक जंत्री दिली आहे. ह्या लेखाची पार्श्वभूमी त्यांच्याच शब्दांत अशी आहे :

मराठी ही संस्कृताधारित भाषा असल्यामुळे बहुसंख्य मराठी शब्दांची मुळं संस्कृतात आढळावीत यात नवल नाही. नवल हे की मराठी (क्वचित् हिंदी ...) वाक्प्रचार, शब्द, संकल्पना यांच्याशी मिळतेजुळते पुष्कळ वाक्प्रचार, शब्द, अर्थ, संकल्पना, भाषाविकृती इत्यादी सामग्री ह्या ग्रंथात आम्हाला आढळून आली. अन्य संस्कृत ग्रंथ वाचताना सहसा न आढळणारी ही सामग्री महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथात सापडते याचं मला नवल वाटतं. ती सर्वसाधारण मराठी वाचकांना उद्बोधक, मनोरंजक वाटेल असं वाटतं.

(जाड ठसा : प्रस्तुत लेखाच्या लेखकाचा भर.) लेख काळजीपूर्वक वाचणाऱ्या साक्षेपी वाचकाला पुढचे हे मुद्दे सहज समजण्यासारखे आहेत:

(१.) "महाभारतात मराठी" हे शीर्षक कृष्ण श्रीनिवासांनी रंजकतेच्या उद्देशानं दिलेलं आहे. वरच्या अवतरणातलं "मिळतेजुळते" हे स्पष्टीकरण नेमकं आहे. संस्कृत महाभारतात मराठी ही भाषा वापरली गेली आहे, किंवा ज्यांना आपण खास मराठी म्हणू असे शब्द त्यात मोठ्या संख्येनं किंवा तुरळक आलेले आहेत, असा निष्कर्ष त्यांनी काढलेला नाही [].

(२.) जंत्रीतल्या बहुतेक नोंदींचं मराठीशी असलेलं साधर्म्य सहज कळतं. काही नोंदींमधे संदिग्धताही जाणवते, पण ती दूर करायला कृष्ण श्रीनिवास आता हयात नाहीत.

(३.) लेखात नोंदवलेल्या रचना, वाक्प्रचार, शब्द, संकल्पना, इत्यादी केवळ मराठीतच सापडतात, अन्य आधुनिक भारतीय भाषांमध्ये दिसत नाहीत, असाही ह्या लेखाचा निष्कर्ष नाही.

(४.) सुरुवातीला उद्धृत केलेल्या मराठी आणि इंग्रजी अहवालांमधल्या समकक्ष विधानांच्या अर्थच्छटांमधला फरकही लक्षणीय आहे.

(५.) कृष्ण श्रीनिवासांनी त्यांच्या लेखात रामायणाचा उल्लेखही केलेला नाही!

अहवालातली कृष्ण श्रीनिवासांचा हवाला देऊन केलेली वरची विधानं विपर्यस्त, अतिरंजित, आणि दिशाभूल करणारी आहेत हे वेगळं सांगायची गरज नसावी. कृष्ण श्रीनिवासांच्या लेखाच्या अहवालांबाहेर होत असलेल्या विपर्यासांबद्दल पुढे अनुभाग ६ मध्ये लिहिलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

३. गुणाढ्याची मराठी बृहत्कथा?

पैशाची भाषेतील गुणाढ्याने लिहिलेल्या ‘बृहत्कथा’ ह्या ग्रंथात तर अनेक प्रकरणेच मराठीत आहेत. (मराठी अहवाल [], पृष्ठ १०५) 

In Gunadhya's, Brihatkatha which is in the Paishachi language contains many Marathi words. This is obvious, as Gunadhya himself was a Maharastrian hailing from Vatsgulm (Washim). (इंग्रजी अहवाल [], पृष्ठ २०८)

पैशाची ह्या भाषेतली गुणाढ्याची मूळ बृहत्कथा महाराष्ट्र शासनाला सापडली आहे का? अवश्य प्रसिद्ध करावी; जगभरचे अभ्यासक दुवा देतील. इथेही एकाच विधानाच्या मराठी आणि इंग्रजी शब्दांकनांच्या अर्थच्छटांमधला फरक लक्षणीय आहे.

प्रत्यक्षात पैशाची ह्या भाषेतली गुणाढ्याची मूळची ‘बृहत्कथा’ही आज उपलब्ध नाही आणि पैशाची ही भाषाही लुप्त झाली आहे []. बृहत्कथेचा मराठीशी असलेला धागा जैन परंपरेतल्या माहाराष्ट्री प्राकृतात लिहिलेल्या वसुदेव-हिंडी (हिंडी = भटकंती) ह्या ग्रंथामार्फत असावा, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे []. पैशाची ही लुप्त झालेली भाषा मुंडा भाषाकुळातली असावी, असा कयास आहे [].

(मायबाप शासनानं मुंडा भाषेलाही अभिजातत्वाचा दर्जा अवश्य मिळवून द्यावा; आदिसमूहांच्या अस्तित्वाची सामाजिक/शासकीय दखल घेण्याचा हा एक उत्तम मार्ग असू शकतो!)

४. विपर्यस्त आणि अतिरंजित विधानं – कशासाठी?

अशा प्रकारच्या विपर्यासाची कारणं काय काय असू शकतात?

(१.) अहवालाचा उद्देश पूर्णत: राजकीय आहे; ह्या निमित्तानं केंद्राकडून मिळणारा निधी आणि राजकीय/वैयक्तिक उद्दिष्टं-गणितं यांच्या पलिकडे राज्यकर्ते, प्रशासक, अभिनिविष्ट लाभार्थी, आणि संधीसाधू यांना मराठीच्या अभिजातत्वाशी किंवा भल्या-बुऱ्याशी फारसं घेणं-देणं नाही?

(२.) अभिजातत्वाचा शिक्का आणि निधी बहाल करण्याचा निर्णयही अहवालाच्या दर्जावर किंवा कशा प्रकारे मराठीचं अभिजातत्व सिद्ध केलं आहे यावर अवलंबून नसून केंद्र-राज्य संबंधांवर किंवा इतर राजकारणावर आहे?

(३.) राजकीय अनास्था आणि प्रशासकीय घिसाडघाई यांमुळे समितीतल्या व्यासंगी अभ्यासकांना पुरेसा वेळ दिला जाऊन, त्यांच्या सर्व सूचनांवर काळजीकाट्यानं चर्चा होऊन, त्या सूचनांचा अहवालात अंतर्भाव झालेला असेलच असं नाही?

(४.) "छोड दो यार, कोण वाचणार आहे? बघू नंतर ..."?

इतरही उपपत्ती आणि अन्वयार्थ असू शकतील. नेमकं सत्य काय ते समितीच्या धुरीणांनाच ठाऊक.

५. महाराष्ट्र शासनानं काय करावं?

अशी निष्काळजी/बेफिकीर विधानं असलेल्या ह्या अहवालांमुळे महाराष्ट्र शासनाची, महाराष्ट्रातल्या अभ्यासपरंपरेची आणि विद्वत्तेची, ज्ञानव्यवहाराची, आणि पर्यायानं मराठी भाषेची बेअब्रूच होत असण्याची शक्यता आहे. या लेखात उल्लेखिलेल्या दोन विपर्यस्त/असत्य विधानांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं हे अहवाल साक्षेपी अभ्यासक आणि भाषातज्ज्ञांकडून काळजीपूर्वक तपासून घेणं, अहवालांमधल्या त्रुटी दूर करून घेणं, आणि मराठीच्या अभिजातत्वाची मांडणी करायची झाल्यास भाषाभ्यास आणि संशोधनाची शिस्त आणि तत्त्वं कटाक्षानं पाळून करून घेणं गरजेचं आहे. हे काम होईपर्यंत अधिक बेअब्रू टाळण्यासाठी हे अहवाल महाराष्ट्र शासनाच्या जालपृष्ठावर न ठेवणंही इष्ट ठरेल.

६. कृष्ण श्रीनिवासांच्या लेखाचे अहवालाबाहेरचे विपर्यास: भोंगळवाद, खोडसाळपणा, की जाणीवपूर्वक अपप्रचार?

(१.) एका गुरुवर्यांनी [] तर याच लेखाचा विपर्यस्त हवाला देऊन मराठीला महाभारतातून उचलून थेट ऋग्वेदातच नेऊन बसवलं. हा स्मृतिभ्रंश, भोंगळपणा, की लेख प्रकाशनासाठी पाठवण्यापूर्वी संदर्भ नीट वाचून-तपासून बघावेत हे भान सुटलं म्हणायचं?

(२.) BBC-मराठी वरची [१०] एक प्रतिक्रिया: "मराठीचे भले व्हावे, गोमटे व्हावे यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. आम्ही अहवालात ..., के.एस.अर्जुनवाडकर, ... अशा असंख्य मान्यवरांचे संदर्भ दिलेले आहेत." अहवालात संदर्भ दिलेले आहेत हे खरंच आहे. पण संदर्भ जरी दिले, तरी मूळ मांडणीचा विपर्यास करणं संशोधनाच्या आणि भाषाभ्यासाच्या कुठल्या तत्त्वात बसतं? अशा विपर्यास आणि दिशाभूल करून सिद्ध केलेल्या अभिजातत्वानं नेमकं कोणाचं भलं आणि कोणाचं गोमटं होणार आहे, असा प्रश्न पडतो.

(३.) मराठीच्या गौरवार्थ कृष्ण श्रीनिवासांच्या लेखाच्या विपर्यासावर उभारलेली आणखी एक गुढी खालील चित्रात दाखवली आहे. अभिजात मराठी भाषा समिती अहवालांमधली वर उल्लेखिलेली विपर्यस्त विधानं सौम्य वाटावीत इतकी ही गुढी तर्कदुष्ट, विपर्यस्त, आणि अतिरंजित आहे. मराठी खरंच ज्ञानभाषा व्हायला हवी असेल, तर प्रथम (मूळ) संदर्भ स्वतः वाचणं-तपासून घेणं आणि असत्य/निराधार दावे न ठोकणं ही ज्ञानक्षेत्राची किमान शिस्त अंगीकारणं गरजेचं आहे.

(४.) एका लेखकमहोदयांची (ते के न जानीमहे!) ही वैखरी [११] पाहा:

काही वर्षांपूर्वी ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकात श्री.अर्जुनवाडकर यांनी ‘महाभारतातील मराठी शब्द’ हा शोधनिबंध लिहिला. श्री. अर्जुनवाडकर हे जागतिक कीर्तीचे संस्कृततज्ज्ञ. स्वा.सावरकरांनी जसे इंग्रजीला मराठी प्रतिशब्द दिले तसेच श्री. अर्जुनवाडकर सरांनी अनेक इंग्रजी अभिवादनांना संस्कृत प्रतिअभिवादने दिलीत, उदा. Good morning = सुप्रभातम्, Good day = सुदिनम् इत्यादी. सर म्हणजे भाषाप्रभूच! 

सरांनी भांडारकर संस्थेच्या महाभारताच्या चिकित्सक प्रतीचा अभ्यास केला आणि त्यांना त्यामध्ये अनेक ‘मराठी’ शब्द आढळले. त्यावर त्यांनी एक निबंध लिहिला; जो प्रा. अशोक केळकर यांनी संपादित केला आणि छापला. याचा उल्लेख अनेकदा श्री. हरी नरके सर त्यांच्या भाषणांतदेखील करतात. 

पठारे समितीने त्या निबंधाचा अभिजात दर्जासाठीच्या अहवालासाठी उपयोग केला. या निबंधाच्या संदर्भात पठारे समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांची प्रा. केळकर आणि प्रा. अर्जुनवाडकर यांच्याशी चर्चा झालेली होती. आता तुम्हीच सांगा, यामध्ये कसला आलाय खोटारडेपणा?

लेखकमहोदयांनी कृपया नोंद घ्यावी :

(१.) कृष्ण श्रीनिवासांच्या लेखाचं शीर्षक "महाभारतात मराठी" असं आहे, "महाभारतातील मराठी शब्द" असं नाही.

(२.) खुद्द कृष्ण श्रीनिवासही या लेखाला "शोधनिबंध" म्हणालेले नाहीत.

(३.) लेखकमहोदयांना कृष्ण श्रीनिवासांच्या मराठीशी संबद्ध विस्तृत कामाची काहीच माहिती नसावी असं वाटतं.

(४.) कृष्ण श्रीनिवासांच्या लेखात चित्रशाळा प्रत आणि भांडारकर संस्थेची चिकित्सक आवृत्ती या दोन्हींचा उल्लेख आहे. त्यांनी काय म्हटलेले आहे आणि नाही हे समजून घेण्याकरता कृपया मूळ लेख आणि प्रस्तुत लेखाचा अनुभाग २ हे दोन्ही स्वतः वाचावेत.

(५.) कृष्ण श्रीनिवासांचा लेख ज्या अंकात आला आहे, त्याचे संपादक प्र.ना.परांजपे होते, अशोक केळकर नव्हे. अशोक केळकरांनी संपादित केलेला कृष्ण श्रीनिवासांचा कुठला लेख लेखकमहोदयांना सापडला आहे? लेखकमहोदयांनी कृपया तपशील द्यावा. हयात नसलेल्या अभ्यासकांच्या नावानं दावे ठोकणं सोपं असलं, तरी ते निभावून नेणं तितकं सोपं नसतं.

(६.) हरी नरके आणि कृष्ण श्रीनिवास यांच्यातली ही शिखर परिषद कधी झाली? लेखकमहोदयांनी कृपया तपशील द्यावा. मराठी अहवालात [] काही मान्यवरांशी चर्चा केल्याचा उल्लेख आहे (पृष्ठ ५); त्यात कृष्ण श्रीनिवासांचा उल्लेख नाही. इंग्लिश अहवालातही [] नाही (पृष्ठ viii).

(७.) शास्त्रीय चर्चेत प्रमाण/पुरावा म्हणून गुरुवाणी ग्राह्य नाही.

(८.) बहुमत हा जसा २ + २ = ५ या गणिती "सिद्धांता"चा पुरावा होऊ शकत नाही, तसंच समर्थकांचं संख्याबळ, तीन विरोधकांची "कुटिल"ता, इच्छा, भावना, किंवा सकारात्मक दृष्टिकोन हे मराठीच्या अभिजातत्वाचे पुरावे होऊ शकत नाहीत.

मराठीच्या पुढे "ज्ञानभाषा" हे बिरूद लागायला हरकत नाही. पण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचा तर भाषाशास्त्रीय शिस्त आणि कस यांची किमान बूज तरी राखणं आवश्यक आहे, हे लेखकमहोदयांनी आणि त्यांच्या "लक्षावधी समर्थकांनी" लक्षात घ्यायला हरकत नसावी.

 कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या कामाची विटंबना आता पुरे

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर हे "डॉ." नव्हते; त्यांनी जन्मच विद्या आणि अभ्यास यांना वाहून घेतला होता. त्यांचं काम आणि त्यातला कस हीच त्यांची ओळख आहे. विद्याक्षेत्रातली बिरुदं मिरवणाऱ्यांनी ज्ञानमार्गापासून घेतलेली फारकत आणि सुमारांची सद्दी/सुगी [१२] हे वास्तव बघायला ते हयात नाहीत तेच बरं आहे.

मराठी ज्ञानभाषा व्हावी अशी खरोखरीची इच्छा असेल, तर "थोर महात्मे होउनि गेले, चरित्र त्यांचे पहा जरा / आपण त्यांच्या समान व्हावे, हाचि सापडे बोध खरा" या वृत्तीनं त्यांची आणि त्यांच्यासारख्या खऱ्या ज्ञानमार्गींची अभ्यास-संशोधनाची शिस्त, निष्ठा आणि कस आपल्यात बाणवून घेणं हाच एक मार्ग आहे.

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या लेखाचा विपर्यास आणि त्यांच्या जन्मभराच्या कसोशीनं केलेल्या कामाची विटंबना पुष्कळ झाली; आता कृपा करून अपप्रचार पुरे करा!

८. मराठीच्या अभिजातत्वाची मांडणी साधार आणि निर्दोष असावी

मराठी भाषेला केंद्र शासनाचा अभिजात भाषेचा दर्जा मिळायला विरोध नाही, पण अभिजातत्वाची मांडणी भाषाशास्त्राच्या शिस्तीनं खरे पुरावे आणि ग्राह्य प्रमाणं यांच्या आधारावर केली जाणं गरजेचं आहे. मुद्दा आहे तो अभ्यास आणि मांडणी चिकित्सापूर्वक विद्याक्षेत्राच्या शिस्तीनं करण्याचा. शंकास्पद मांडणी, सांगोवांगीच्या गोष्टी, आख्यायिका, दंतकथा, आणि विपर्यस्त किंवा अभिनिवेशपूर्ण भावनिक "पुरावे" हे मराठीच्या अभिजातत्वाचे आधार समजले गेले, तर त्यातून मराठी भाषेचं भलं होण्याची शक्यता नाही. केंद्र शासनाच्या अभिजातत्वाच्या निकषांमध्ये मराठी बसते हे सिद्ध करायला विपर्यास आणि खोटे "पुरावे" अशा "साधनां"ची गरज नसावी.

९. अभिजातत्वाचं राजकारण आणि भाषाभ्यासाच्या परंपरा

आपापल्या भाषांवर अभिजातत्वाचा शासकीय शिक्का बसावा म्हणून खेळल्या गेलेल्या गेल्या शतकभराच्या राजकारणाचा आढावा घेणारा वेंकटाचलपती यांचा लेख [१३] मुळातून वाचावा असा आहे. ह्या लेखाच्या शेवटी आलेले तीन मुद्दे मराठीच्याही संदर्भात महत्त्वाचे आहेत:

(१.) भाषेच्या अभिजातत्वाचा निर्णय हा शासनानं करण्याचा नसून व्यासंगी अभ्यासकांनी भाषाभ्यासाच्या सर्व शिस्ती आणि तत्त्वं कटाक्षानं पाळून करण्याचा असतो. तात्पर्य: राजकीय लाभ, अर्थकारण, किंवा प्रशासकीय सोय/कर्मकांड यांवर अभिजातत्वाची मांडणी ठरू नये.

(२.) एका भाषेचं अभिजातीकरण हे तुलनेनं "लहान" भाषांचं क्षुद्रीकरण ठरू नये. तात्पर्य: प्रादेशिक, बोली आणि उपभाषा, आणि विशेषत: आदिवासी भाषांचा विसर पडू नये. जागतिकीकरणाच्या रेट्याखाली भाषा वेगानं लुप्त होण्याच्या आजच्या काळात हे विशेष महत्त्वाचं आहे.

(३.) भारतभरात तुटत चाललेल्या भाषाभ्यासाच्या परंपरांबद्दल ह्या लेखात कमालीची काळजी व्यक्त केली गेली आहे. (अर्थकारणातल्या बदलांच्या जोडीला निव्वळ दुर्लक्ष हे ही ह्या स्थितीला जबाबदार आहे, असं स्पष्टपणे [१४] मधे म्हटलं आहे.) तात्पर्य : एक समूह/समाज म्हणून भाषाभ्यास आणि त्यातला कस आपल्याला किती महत्त्वाचा वाटतो, याबद्दल स्पष्ट कल्पना असलेली बरी.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

१०. तात्पर्य आणि सारांश

(१.) मराठी भाषेला केंद्र शासनाचा अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजिबात विरोध नाही, पण अभिजातत्वाची मांडणी भाषाशास्त्राच्या शिस्तीनं खरे पुरावे आणि ग्राह्य प्रमाणं यांच्या आधारावर केली जाणं गरजेचं आहे. शंकास्पद मांडणी, सांगोवांगीच्या गोष्टी, आख्यायिका, दंतकथा, आणि विपर्यस्त किंवा अभिनिवेशपूर्ण भावनिक "पुरावे" हे मराठीच्या अभिजातत्वाचे आधार समजले गेले, तर त्यातून मराठी भाषेचं भलं होण्याची शक्यता नाही. केंद्र शासनाच्या अभिजातत्वाच्या निकषांमधे मराठी बसते हे सिद्ध करायला विपर्यास आणि खोटे "पुरावे" अशा "साधनां"ची गरज नसावी.

(२.) या लेखात उल्लेखिलेल्या दोन विपर्यस्त/असत्य विधानांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं हे अहवाल [१,२] साक्षेपी अभ्यासक आणि भाषातज्ज्ञांकडून काळजीपूर्वक तपासून घेणं, अहवालांमधल्या त्रुटी दूर करून घेणं, आणि मराठीच्या अभिजातत्वाची मांडणी करायची झाल्यास भाषाभ्यास आणि संशोधनाची शिस्त आणि तत्त्वं कटाक्षानं पाळून करून घेणं गरजेचं आहे. हे काम होईपर्यंत अधिक बेअब्रू टाळण्यासाठी हे अहवाल महाराष्ट्र शासनाच्या जालपृष्ठावर न ठेवणंही इष्ट ठरेल.

(३.) ज्यांनी जन्म विद्या आणि अभ्यास यांना वाहून घेतला होता त्या कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या लेखाचा [] विपर्यास आणि त्यांच्या जन्मभराच्या कसोशीनं केलेल्या कामाची विटंबना पुष्कळ झाली; आता कृपा करून अपप्रचार पुरे करा!

(४.) अभिजात मराठी भाषा समिती अहवाल 2013 [१,२] आणि आजही त्यावरून चालू असलेलं महाभारत यांतून पुढे येणारं मराठी ज्ञानव्यवहाराचं चित्र निश्चितच स्पृहणीय नाही.

संदर्भ आणि टीपा

खाली उल्लेखिलेले सर्व जालतंतू (URLs) या लेखाच्या तारखेपर्यंत तरी उपलब्ध.

१.) अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३ (मराठी आवृत्ती), महाराष्ट्र शासन.

२.) अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३ (इंग्रजी आवृत्ती), महाराष्ट्र शासन.

३.) मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर, मराठीच्या अभिजाततेतील ‘महाभारत’ आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर, भाषा आणि जीवन ३३:१ हिवाळा २०१५, पृष्ठ २५-२८.

४.) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर, महाभारतात मराठी, भाषा आणि जीवन २२:४ दिवाळी २००४, पृष्ठ ४२-४५. हा लेख अभिजात मराठी भाषा समिती अहवालाला परिशिष्ट क्रमांक ४ म्हणून जोडलेला आहे.

५.) महाभारतात मराठीसदृश रचना का सापडाव्यात याची एक उपपत्ती विश्वनाथ खैरे यांनी सुचवली आहे (विश्वनाथ खैरे, महाभारत आणि लोकभाषा, भाषा आणि जीवन २३:१ हिवाळा २००५, पृष्ठ ५६-५९). संस्कृत, प्राकृत, आणि आधुनिक भारतीय भाषा यांचे – आणि त्या भाषा बोलणाऱ्या समाजसमूहांचे – परस्परसंबंध हा जटिल विषय आहे. उदाहरणार्थ, विश्वनाथ खैरे यांची संस्कृत-मराठी-तमिळ संबंधांबद्दलची उपपत्ती सर्वश्रुत आहे. या विषयात कुठलीही एक उपपत्ती सर्वमान्य आहे किंवा भविष्यात होईल, असं वाटत नाही.

६.) पाहा, उदा., विकिपीडिया: बृहत्कथा आणि पैशाची.

७.) Donald Nelson, Brhatkatha Studies: The Problem of an Ur-text, The Journal of Asian Studies, 37:4, 663-676 (Aug.1978).

८.) Sheldon Pollock, The language of the gods in the world of men: Sanskrit, culture, and power in premodern India, University of California Press (2006). मुंडा भाषा विंध्यप्रदेशातली आहे असं विधान इथे केलं आहे. प्रत्यक्षात ती आणखी पूर्वेकडची आहे. ह्या संदर्भातलं द.ना.धनागरे यांचं स्पष्टीकरण (वैयक्तिक संपर्क, २०१५) त्यांच्याच शब्दात:

Munda (or Mundari, as Irawati Karve would have put it) is one of the three language families, besides Sanskrit (i.e.Indo-Aryan) and Dravidian, has origins not in the Vindhyas but more in lower Gangetic belt of Bihar/ today's Jharkhand. The areas of Vidhyas are predominantly inhabited by the Adiwasis who speak Bhili and Gondi dialects or their mixtures which are closer to Hindi, i.e.Indo-Aryan family, though Gondi has a good deal (of) commonalities with Telugu.

९.) द.दि.पुंडे, मराठी..राष्ट्रीय संवेदन-भाषा!, लोकसत्ता (१ मार्च २०१५).

१०.) अनाम, 'अभिजात दर्जामुळे मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दूर व्हायला मदत होईल', BBC मराठी (३ मार्च २०१८).

११.) सुचीकांत वनारसे, मराठीचा "अभिजात" दर्जा : लक्षावधी समर्थक, इनमिन तीन कुटील विरोधक!, inमराठी.com (४ मार्च २०१८).

१२.) विनय हर्डीकर, सुमारांची सद्दी, विठोबाची आंगी, देशमुख प्रकाशन, २००५.

१३.) A.R.Venkatachalapathy, The ‘Classical’ Language Issue, Economic \& Political Weekly, 13-15 (January 10, 2009).

१४.) Sheldon Pollock, The real classical languages debate, unidentified newspaper article.

.............................................................................................................................................

लेखक मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर हे कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचे सुपुत्र असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्यूलेशन विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. 

mihir.arjunwadkar@gmail.com

 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

daya Salgaonkar

Fri , 23 March 2018

सदर लेख माहितीपूर्ण आहेच. याच संदर्भात, दिनांक १०.०३.२०१८ रोजी पुणे येथे, पॉपुलर प्रकाशन, मुंबई आणि पुस्तक पेठ, पुणे, आयोजित ‘रियासतकार गो. स. सरदेसाई स्मृती व्याख्यान’ या कार्यक्रमात ‘मराठी भाषेचा इतिहास आणि इतिहासातील मराठी’ हा विषय मांडताना जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरकेसरांचे ‘अभिजात मराठी भाषा’ यावर अत्यंत मुद्देसूद आणि मौलीक विचार ऐकायला मिळाले त्याची आठवण झाली.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......