अजूनकाही
मोदी–शहांच्या भाजपने सत्ता हाती घेतली, तेव्हा त्यांच्याकडे लोकसभेत २८२ जागा होत्या. चार वर्षांनी, आजच्या घडीला उत्तर प्रदेशात झालेल्या दोन आणि बिहारमध्ये झालेल्या एका पराभवानंतर ती संख्या कमी होऊन सभापतींसह २७५ वर आली आहे. हा आकडा २७२ या जादुई संख्येच्या थोडासाच वर असला तरी १९८४ नंतर कुठल्याही पक्षाला एवढ्या घसघशीत जागा मिळालेल्या नाहीत.
अर्थात्, केंद्रातील मोदी सरकारच्या मजबुतीला किंवा सत्तेला त्यामुळे लक्षणीय फरक पडत नाही. संसदेत वित्त विधेयक ज्या तऱ्हेने कुठल्याही वादविवाद किंवा चर्चेविना संमत झालं, त्यातून एक घृणास्पद पायंडा पडलाच. शिवाय सरकारची प्रचंड सत्ताही दिसून आली. सांसदीय औचित्य आणि शिष्टाचार पाहता हे सरकार मागील परंपरा पाळणारं नाहीये. त्यामुळे ते जुने नियम तोडते आणि नवे बनवते.
पोटनिवडणुकांतील निकालामुळे केंद्र सरकारवर परिणाम होत नसला तरी राजकारणावर विशेषतः भाजप, त्याचे मित्रपक्ष आणि विरोधक यांच्यावर मात्र खूपच परिणाम होतो.
नरेंद्र मोदी हे जुन्या प्रथा न पाळणारे पंतप्रधान असले तरी ही एक प्रथा त्यांनी कधीही मोडलेली नाही, ती म्हणजे पोटनिवडणुकांत पंतप्रधानांनी कधीही प्रचार करायला उतरायचं नाही. लक्षात घ्या की २०१४ सालापासून भाजप सातपैकी सहा पोटनिवडणुकांत हरला आहे. त्यामुळेच त्यांची संख्या सुरुवातीच्या संख्येपेक्षा सातांनी घटली आहे. या पोटनिवडणुकांपैकी शेवटच्या चार तर त्यांच्या मोक्याच्या राज्यांतील होत्या. जिथं त्यांना कचकचित बहुमत मिळालं होतं. त्या चारपैकी प्रत्येक जागा त्यांनी भल्या मोठ्या म्हणजे जवळजवळ तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं जिंकली होती. आता त्यातील प्रत्येक जागेवर ते हरले आहेत. हे आपल्याला काय सांगतं?
काही मुद्दे –
सर्वप्रथम म्हणजे मोदी प्रचारात अग्रभागी नसले तर भाजपला तुलनेनं सहज पराभूत करता येतं. दुसरं म्हणजे मोदींइतकी मतं मिळवण्यात अग्रेसर व्यक्ती भाजपकडे दुसरी कुठलीही नाही. योगी आदित्यनाथ हे भाजपचे नवे, तरुण, आम जनतेचे नेते आहेत असं चित्र रंगवलं जात होतं. या मिथकाचा चक्काचूर झालेला आहे. त्यांच्या गोरखपूर या सडक्या, रोगराईग्रस्त शहरातील रस्त्यांवर चालताना वाटेत जे कचऱ्याचे ढीग दिसतात त्याच कचऱ्यातच हे चक्काचूर झालेलं मिथक पुरलं गेलं आहे.
एके काळच्या आम जनतेच्या नेत्या वसुंधरा राजे यांची राजस्थानमध्ये शोभा झाली आहे, भूतकाळात कधीही वापरली नव्हती एवढी साधनं वापरून आणि जवळजवळ संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच प्रचारासाठी उतरवूनदेखील शिवराज सिंह चौहान हल्लीच पोटनिवडणूक हरले आहेत. या पराजयातून आपल्याला कळतं की, ते स्वतःच्या बळावर यापुढे निवडणुका जिंकून देऊ शकत नाहीत.
मतं मिळवून देणारा आणखी कुणी भाजपनेता तुम्ही सांगू शकत असलात तर कृपया मला त्याचं नाव सांगा. सत्य हेच आहे की, असा कुणीही नेता नाहीये. त्या दृष्टीनं पाहता भाजपचं ‘इंदिरा’करण पूर्ण झालं आहे आणि पक्ष पूर्णपणे एका व्यक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला प्रचंड सामर्थ्य तर मिळतंच, पण त्याचसोबत हे सत्यही अधोरेखित होतं की, देशातील जवळजवळ प्रत्येक राजकीय पक्षाप्रमाणे भाजप हेसुद्धा व्यक्तिकेंद्रित पद्धतीनं चालवलं जाणारं साम्राज्य आहे. विलिनीकरणातून आणि संपादनातून मिळवलेल्या ईशान्य भारतातील छोट्या छोट्या राज्यांबद्दल मी बोलत नाही, परंतु ज्या २२ राज्यांचा राज्यकारभार भाजपच्या हातात आहे त्यांची स्थिती पहा आणि अशा एका मुख्यमंत्र्याचं नाव सांगा ज्याच्या अंगी स्वतःच्या राज्यात पुन्हा विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. आजच्या घडीला तसा एकही नाही.
आता पुढे जाऊया. या पोटनिवडणुका विशेषतः उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुका तुम्हाला विचारधारेच्या मर्यादा दाखवतात. त्यातून आणखीही एका मिथकाचा चक्काचूर होतो. ते मिथक म्हणजे भाजप/ राष्ट्रीय सेवा संघ हे भारतीय (हिंदू) समाजाचा स्वभाव एवढ्या मूलभूत स्तरावर बदलत आहेत की, बहुसंख्यांकाची मतं आपसूकच त्यांच्या पारड्यात पडतील. म्हणूनच तर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाच्या इच्छुकांतून योगींची निवड करण्यात आली होती. त्यांच्या तरुण वयामुळे ते मोदींचे भावी वारसदार असण्याच्या शक्यतेकडेही कित्येक जण बघू लागले होते. त्यामुळे विचारधारेत अधिक शुद्धता येईल आणि हिंदुत्वाची परियोजना अधिक वाढेल, असाही हेतू त्यामागे होता. या गैरसमजालाही आता मूठमाती मिळाली आहे.
तिसरं म्हणजे सामाजिक मनोबदल घडवून आणण्यातील मर्यादाही उघड झाल्या आहेत. त्या मागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे जीवनाच्या गुणवत्तेसंबंधीचे मूलभूत मुद्दे समोर ठाकतात. २०१४ मध्ये मी जसा होतो, तेव्हापेक्षा माझी स्थिती आता बरी आहे का, असा विचार समोर येतो तेव्हा ध्रुवीकरणाचा उपयोग होत नाही. दुसरं म्हणजे मताधारित सामाजिक बदलीकरणाचा काही कुणाला ठेका मिळालेला नाहीये किंवा दुसऱ्या कुणाला जमणारच नाही असं कौशल्यही त्यात नाहीये. इतर लोकही हाच खेळ खेळू शकतातच की! त्यासाठी फक्त दोन पक्षांनी आपल्या मतपेढ्या एकत्र आणायच्या, की झालं.
आज काय घडलं त्या आधारावर आजच्या तारखेपासून चौदा महिन्यांनी काय घडेल याचा निष्कर्ष काढण्यात बरेच धोके आहेत. परंतु त्यामुळे मोदी-शहा ‘थिंक टॅंक’ समोर भाजपपुढे १९८९ पासून उभा राहिलेला एक प्रश्न पुन्हा येऊन उभा राहिला आहे हे मात्र नक्कीच. कारण १९८९ साली त्यांना सर्वप्रथम सत्तेचा वास लागला होता, तेव्हापासून पडलेला तो प्रश्न आहे. तो म्हणजे जातींनी जे तोडलं आहे, ते पुन्हा जोडण्यासाठी तुम्ही धर्माचा (हिंदुत्वाचा) वापर करू शकता का?
१९९२ मध्ये राममंदिराच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं. २०१४ मध्ये ‘विकास’ आणि ‘अच्छे दिन’ यांच्या माध्यमातून त्यांना उत्तर मिळालं. आता उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या मतदारसंघात भाजपला दणदणीत विजय मिळवून दिल्याला एक वर्ष होतंय, तेवढ्यातच ते उत्तर काम करेनासं झालं आहे, तर २०१९ साली ते काम करीलच याची खात्री देता येत नाही. अर्थात् मोदींची जादू असेलच आणि तिचा पराभव करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतीलच. परंतु यापुढे सर्व भाजपविरोधी पक्षांनी (आणि त्यांच्या कुरबुर करणाऱ्या मित्रपक्षांनी) विश्वास ठेवावा की, या पक्षाचा पराभव होऊ शकतो!
............................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख १४ मार्च २०१८ रोजी theprint.in वर प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
https://theprint.in/politics/bypolls-prove-bjp-one-vote-catcher-narendra-modi/41941/
............................................................................................................................................
मराठी अनुवाद - सविता दामले
savitadamle@rediffmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment