“आपल्याला काय वाचायचंय याची निवड मुलं स्वत:च करू शकतात” : माधुरी पुरंदरे
संकीर्ण - मुलाखत
मुलाखत - अमृता पटवर्धन, मराठी अनुवाद - चैताली भोगले
  • माधुरी पुरंदरे पुरस्कार स्वीकारताना. खालील सर्व चित्रं - माधुरी पुरंदरे
  • Mon , 21 November 2016
  • मुलाखत माधुरी पुरंदरे Madhuri Purandare टाटा साहित्य महोत्सव Tata Literature Live बालसाहित्य Children Literature

यंदापासून टाटा साहित्य महोत्सवाने जीवनगौरव पुरस्कारासोबत बालसाहित्यातील योगदानासाठी पुरस्कार सुरू केला. या पहिल्याच पुरस्काराच्या मानकरी ठरल्या मराठीतील प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे. काल मुंबईत त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्ताने घेतलेली त्यांची मुलाखत अनुवादित स्वरूपात... खास ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी... 

..................................................................................................................................................................

पटवर्धन : लहान मुलांसाठी पुस्तकं लिहावीत असं तुम्हाला कशामुळे वाटलं?

पुरंदरे : २५-३० वर्षांपूर्वी ‘वनस्थळी’त आम्ही काही गावांमधील बालवाड्यांसाठी काम सुरू केलं जिथे मुलांना औपचारिक शिक्षणपद्धतीशी जुळवून घेताना अनेक अडचणींनी सामोरं जावं लागत होतं आणि शाळा गळतीचं प्रमाण खूप जास्त होतं. या बालवाड्यांसाठी आम्हाला प्रशिक्षित शिक्षकांची चणचण खूपच जाणवायची, कारण गावातील स्त्रियांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी शहरांतल्या केंद्रांमध्ये जाता येणं शक्य नव्हतं आणि शहरातील स्त्रिया गावांत येऊन शिकवायला तयार नव्हत्या. मग आम्ही गावातच आमचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. या वर्गांना येण्यासाठी मुलींना तयार करण्यासाठी त्यांच्या पालकांची आणि खुद्द त्यांचीही खूप समजूत पटवून द्यायला लागली. त्यानंतर या मुलींबरोबर प्रत्यक्ष काम करताना आमच्या लक्षात आलं की, प्रशिक्षणाबरोबरच या मुलींच्या जाणिवा विकसित करण्याचीही गरज आहे. त्या जे काम करत आहेत ते पुढच्या पिढीला आकार देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. असं काम करणाऱ्या जबाबदार नागरिक म्हणून समाजाच्या नजरेत आणि त्यांच्या स्वत:च्याही नजरेत त्यांना आदराचं स्थान मिळवून देणं महत्त्वाचं होतं. वनस्थळीकडून आम्ही एक आठ पानी द्वैमासिक वार्तापत्र सुरू केलं होतं. बालवाडी प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींचे अनुभव, अडचणी, त्यांनी केलेले नवे प्रयोग हे सगळं सांगण्यासाठीही ते वार्तापत्र हा एक उपयुक्त मंच ठरला. मी या वार्तापत्राचं संपादन सुरू केलं. लवकरच आमच्या लक्षात आलं की, बालवाडीत शिकवणाऱ्यांकडे लहान मुलांची गाणी, गोष्टी वगैरे साहित्य फारसं उपलब्ध नाही. त्यासाठी आम्ही आमच्या वार्तापत्रात खास मुलांसाठी ‘छोट्यांची वनस्थळी’ हा विभाग सुरू केला. पण ग्रामीण भागांतील मुलांबद्दल लिहायला तयार असणाऱ्या लेखकांची वानवा आम्हाला लगेचच भासू लागली. कारण शहरी लेखकांना या मुलांचं जगणं पूर्णपणे अपरिचित होतं. त्यामुळे मलाच ते लिखाण हाती घेणं भाग पडलं.

मी ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधून चित्रकलेचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे या विभागासाठी चित्रंही मीच काढू लागले. मुलांसाठी लिहायचंय म्हटल्यावर मी इंग्रजी आणि अगदी फ्रेंचमध्येही मुलांसाठी उपलब्ध असलेलं भरपूर साहित्य वाचून काढलं. सुरुवातीला तर मी इतर ठिकाणांहून गोष्टी उचलून त्यांना माझ्या पद्धतीने आकार द्यायचे.

 पटवर्धन : मुलांसाठी लिहिताना कोणत्या गोष्टीची विशेष आवश्यकता असते असं तुम्हाला वाटतं?

पुरंदरे : मुलांसाठी लिहिताना आपण अप्रामाणिक असून चालत नाही, कारण मुलं आपल्याकडून विशिष्ट दर्जाची अपेक्षा करू शकत नाहीत किंवा टीकाही करू शकत नाहीत. मोठ्यांसाठी लिहिताना कधीकधी डेडलाइनच्या दडपणाखाली लिखाणात तडजोड केली जाते, पण मुलांसाठी लिहिताना असं चुकूनही होता कामा नये.

पटवर्धन : मुलांसाठी लिहिणारे, चित्र काढणारे यांना तुम्ही आणखी काय सांगाल?

पुरंदरे : या क्षेत्रातल्या व्यक्तींनी मुलांच्या जगाकडे समग्रपणे बघायला हवं. मुलं कधीच बंदिस्त आणि कप्प्याकप्प्यांमध्ये विभागलेलं आयुष्य जगत नाहीत. त्यांच्या अवतीभोवती मोठ्यांचा वावर सतत असतो आणि मोठ्यांच्या जगाशी त्यांची सतत देवाणघेवाण चाललेली असते. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीत वेगवेगळ्या पिढ्यांची, वयांची मोठी माणसं, शिवाय इतर मुलंही त्यांच्याभोवती असायची, तेव्हा ही देवाणघेवाण आणखी सुस्पष्ट स्वरूपाची असायची. तेव्हा एखाद्या मुलाचं जग फक्त त्याच्या किंवा तिच्यापुरतं मर्यादित असतं हा दृष्टिकोन भ्रामक आहे.

लहान मुलांसाठी लिहायचं तर लेखकांनी मुलांच्या आयुष्याकडे साकल्याने पहायला हवं, ऐकायला हवं, त्याचं निरीक्षण करायला हवं. मुलांचं जगणं तुकड्यातुकड्यांमध्ये पाहणं, उदाहरणार्थ फक्त शाळेपुरतं इत्यादी हे टाळायला हवं. मुलांसाठी लेखन करणार्यांनी इतराचं लेखनही भरपूर वाचायला हवं.

पटवर्धन : तुमचं मुलांशी असलेलं नातं कसं आहे? तुमच्या लेखनावर त्याचा प्रभाव कशा प्रकारे पडला आहे?

पुरंदरे : मला स्वत:ची मुलं नाहीत आणि आयुष्यातील बराच मोठा काळ माझ्या अवतीभोवतीही फारशी मुलं नव्हती. खरं म्हणजे लहान मुलांशी जुळवून घेण्यासाठी लागणारा संयमही माझ्याजवळ खूप नाही. मुलांसाठी लिहिण्यासाठी (आणि एरवीही आयुष्य समजून घेण्यासाठी) मी खूप वाचते आणि खूप निरीक्षण करते. माझ्या जाणिवांची जडणघडण ही प्रामुख्याने सर्व प्रकारच्या साहित्याच्या वाचनातून झाली आहे. फक्त अभिजात साहित्य नव्हे तर लोकप्रिय आणि वाईट साहित्यसुद्धा. एखाद्या लिखाणातले बारकावे समजून घेण्यासाठी तीच गोष्ट मी अनेकदाही वाचते. नाटक आणि चित्रपटांच्या क्षेत्रातही मी भरपूर भटकंती केली आहे आणि सर्व तऱ्हेच्या प्रभावांसाठी, सारं काही आत्मसात करण्यासाठी मी माझ्या मनाची दारं उघडी ठेवली आहेत. ‘वाचू आनंदे’च्या निर्मितीमध्ये या प्रभावांचं योगदान मोठं आहे.

पटवर्धन : तुम्ही तुमच्या बालवाचकांना आदराने वागवता असं दिसतं. जणू काही तुम्ही त्यांच्या मेंदूमध्ये बसून जग पाहताहात असं वाटतं. मुलांशी प्रत्यक्ष फारसा संवाद नसताना तुम्ही त्यांना इतक्या चांगल्या प्रकारे कसं काय समजून घेता?

पुरंदरे : त्यासाठी मी लहान असतानाच्या माझ्या जाणिवांमध्ये डोकावते आणि तेव्हा मी वाचलेल्या कोणत्या लेखनाचा माझ्यावर काय प्रभाव पडला, तो वेदनादायी होता की आनंददायी, त्याने माझ्यावर काय परिणाम केला ते पाहते. त्या काळामध्ये लहानांनी मोठ्यांशी फार मोकळं बोलण्याची रीत नव्हती. लहान मुलांनी जगण्याचा अर्थ आपला आपणच लावून घ्यावा. मलाही आयुष्याबद्दलचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी कुणीच मदत केली नाही. अशा वेळी ती उत्तरं शोधण्यासाठी मला साहित्याने मदत केली. एखादा लेखक किंवा कवी वाचताना माझं त्यांच्याशी खूप वैयक्तिक आदराचं नातं तयार व्हायचं, मैत्रीच व्हायची. जसं की विजय तेंडुलकर किंवा कुमार गंधर्वांचा मृत्यू हे माझं वैयक्तिक नुकसान होतं. कारण मी त्या रचनाकारांशी स्वत:ला व्यक्तिश: जोडून पाहत होते.

आज शिकण्यासाठी मुलांना वेगवेगळे मार्ग धुंडाळणं अत्यावश्यक बनलं आहे आणि नेमकं हेच कारण आहे की, आज आपण लहान मुलांचं साहित्य काटेकोर व्याख्येत बसवू शकत नाही. ‘वाचू आनंदे’साठी मी उतारे निवडत होते, तेव्हा त्यातल्या खूप उताऱ्यांबद्दल मतांतरं होती. काहींना वाटत होतं की, ‘मुलांना याचा आस्वाद घेता येणार नाही.’ एखाद्या वयोगटासाठी कोणतं साहित्य योग्य आहे याची निवड करताना इतकी काटेकोर विभागणी करणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्यासमोर सर्व प्रकारचं साहित्य ठेवा. त्यांना आवडलं तर ती ते वाचतील. जर त्यांना ते आताच पूर्णपणे समजत नाहीये तरीही ठीकच आहे. आता नाही तर पुढच्या वर्षी समजेल.  

पटवर्धन : समाजात बालसाहित्याचं स्थान उंचावण्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं?

पुरंदरे : मला स्वत:ला पैशांची चिंता कधीच वाटली नाही. मी नेहमीच माझं काम उत्कट प्रेरणेने करत आले आहे. पण इतर लोकांनी या क्षेत्राला गांभीर्याने घ्यायला हवं असेल आणि या क्षेत्राला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी असेल तर या क्षेत्रात पैसा आणि नाव या दोन्ही गोष्टी असायला हव्यात.

हे काम प्रौढांसाठीच्या लिखाणाइतकंच गंभीर आणि महत्त्वाचं आहे हे लोकांच्या लक्षात येण्यासाठी कुणीतरी उच्च प्रतीचं काम करण्यापासून सुरुवात करायला हवी. असं चांगलं काम केल्यानंतरच त्याचा लहान मुलांवर होणारा प्रभाव आपल्याला दिसेल. मी मुलांसाठी १६-१७ वर्षं लिहिते आहे, पण कधीच दर्जामध्ये तडजोड केलेली नाही. अगदी १९८७ साली केलेलं काम पुस्तकरूपात प्रकाशित व्हायला २००२ साल उजाडावं लागलं तरीही. लोकं सांगतात, ‘तुमच्या लिखाणामुळेच माझं मूल बालवाडीत यायला लागलं.’  कठोर परिश्रमांनी बदल घडू शकतात. फक्त बोलत राहून काहीच होणार नाही.

पटवर्धन : या क्षेत्रासमोरचे मुख्य प्रश्न कोणते आहेत?

पुरंदरे : मराठी साहित्यामध्ये, बरेचदा असं दिसतं की, लोक काळाबरोबर प्रगल्भ झालेले नाहीत. खरंतर काळाबरोबर पुढे जाणं म्हणजे काय किंवा कामात दर्जा आणण्यासाठी काय करायला हवं हेच मुळात अनेकांना कळलेलं नाही. ते कळायचं तर वेळ काढायला हवा, त्या कामाला वाहून घ्यायला हवं. पण बऱ्याच लोकांना इतका वेळ काढणं जमत नाही.

बरं, सात-आठ वर्षांच्या मुलांसाठी साहित्य शोधणं तसं सोपं आहे. पण ९-१४ वर्षांच्या म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी खूप कमी लिखाण झालंय. या वयात मुलं ना धड लहान असतात, ना धड प्रौढ. अशा संक्रमणाच्या टप्प्यावर असलेल्या मुलांसाठी खरंतर जास्तीत जास्त साहित्य तयार व्हायला हवं, कारण या टप्प्यापर्यंत त्यांची वाचनक्षमता चांगली विकसित झालेली असते. आपल्याला काय वाचायचंय याची निवड ही मुलं स्वत:च करू शकतात. या महत्त्वाच्या टप्प्यावर मुलांच्या हाती चांगलं साहित्य पडलं नाही तर त्यांची वाचनाची सवय सुटेल… जी खरंतर प्रौढपणातही जपली जायला हवी.

किशोरवयीन मुलांसाठी लिहिताना जागरूक असायला हवं. त्यांच्या वयाला पडणारे प्रश्न, त्यांच्या काळज्या, त्यांचं मोठ्यांबरोबरचं नातं, त्यांचं जग हे सारं समजून घ्यायला हवं. आपण किशोरावस्थेत असताना आपल्याला काय वाटत होतं एवढ्यावरच विसंबून राहून लिहिता येणार नाही. या वयासाठी लिहिताना कोणते विषय निवडावेत, भाषा कशी असावी, शब्दांतून कोणती प्रतिमासृष्टी आपल्याला उभी करता येईल या सगळ्याबद्दलच आपण संवेदनशील असायला हवं. पण या वयोगटासाठी लिहिताना लोक एकतर खूपच साध्यासोप्या भाषेत लिहितात किंवा मग लिखाणात संस्कृतप्रचूर भाषेचा भरणा करतात.

पटवर्धन : मुलांच्या पुस्तकांसाठीच्या चित्रांबद्दल काय सांगाल?

पुरंदरे : पुस्तकातील चित्रभाषेशी मुलांच सर्वात सहजपणे नातं जुळतं. त्यामुळे या दृकभाषेबद्दल खूप विचार होण्याची गरज आहे. कथाचित्रं म्हणजे लिखित मजकूराचं चित्रकलेत भाषांतर किंवा मजकूराला चित्रामध्ये नकलून काढणं नव्हे. काही काही वेळा तर पुस्तकांसाठी चित्र काढणाऱ्यांना सिंह काढायचाय की पक्षी हे समजण्यासाठी मजकूर वाचायचीही गरज वाटत नाही. कशाचं चित्रं हवंय असं ते थेट विचारतात आणि गोष्टीतील संदर्भ लक्षात न घेताच चित्र काढतात. वाक्यांच्या मधला अवकाश चित्रांनी भरून काढायचा तर त्यांनी ऐकायला हवं, वाचायला हवं आणि विचार करायला हवं. कला लेखनाला पूरक आणि जोड देणारी हवी.

..................................................................................................................................................................

मूळ इंग्रजी मुलाखत पुढील दुव्यावर वाचता येईल -

http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare-Author-Interview.pdf

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......