फ्रेंकोची हत्या – गरिबी आणि हिसेंविरोधातला लढा संपवण्याचा प्रयत्न  
पडघम - विदेशनामा
अभिषेक भोसले
  • मारिअले फ्रेंको (२७ जुलै १९७९ - १४ मार्च २०१८)
  • Sat , 17 March 2018
  • पडघम विदेशनामा मारिअले फ्रेंको Marielle Franco

हिंसेनं ग्रासलेल्या ब्राझीलमध्ये गुरुवारी आणखी एका हत्येची भर पडली. रिओ द जेनिरो शहराची सिटी काऊन्सिल सदस्य, मानवाधिकार कार्यकर्ती मारिअले फ्रेंको हिची गुरुवारी हत्या झाली. देशात चालू असलेल्या हिंसाचाराविरुद्ध लढणाऱ्या फ्रेंकोच्या हत्येनं ब्राझीलमधला गरिबांचा आवाज ठार केला आहे, अशा प्रतिक्रिया जागतिक मानवाधिकार समूहांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. 

जगातल्या चळवळी समजून घेत असताना २०१६ च्या दरम्यान अफ्रो – ब्राझीलीयन लोकांच्या संघर्षाबद्दल आणि फ्रेंकोबद्दल वाचनात आलं होतं. त्यावेळी रिओ शहराची सिटी काऊन्सिलची निवडणूक पार पडणार होती. झोपटपट्टीमधून आलेली आणि तिथल्या लोकांच्या अधिकार - हक्कांसाठी लढणारी फ्रेंको ही देखील निवडणुकीला उभी होती. अधिकार - हक्क म्हणण्यापेक्षा पोलिसांकडून झोपडपट्टीवासियांवर होत असलेल्या निर्दयी अत्याचाराच्या विरोधात ती आवाज उठवत होती. तेव्हा ब्राझीलमधील समाजकारण आणि अर्थकारणात उजव्या विचारसरणीचं प्रस्थ वाढत होतं. 

ब्राझीलमधल्या राजकारणाचं एक वैशिष्ट्यं सातत्यानं राहिलं आहे. ते म्हणजे तिथल्या महिलांचा राजकारणातील कमी सहभाग. फ्रेंको काऊन्सिलच्या निवडणुकीला उभी होती. पण एक तर ती कृष्णवर्णीय, त्यातही समलैंगिक, परत गरिबांच्या बाजूनं बोलणारी, सैन्याच्या विरोधात आवाज उठवणारी. त्यामुळं तिचं निवडून येणं थोडं अवघडच आहे अशी शक्यता वर्तवली जात होती. अर्थात त्याला ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या वर्णभेदाची पार्श्वभूमी होतीच. 

या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणं एकूण ५१ सदस्यांपैकी फक्त ७ महिला सदस्य निवडून आल्या. त्यातही फक्त अनपेक्षितपणेच नव्हे तर सर्वाधिक मतं मिळवणारी पाचव्या क्रमांकाची सदस्य ठरत फ्रेंकोही निवडून आली. ती काऊन्सिलची एकमेव कृष्णवर्णीय सदस्य होती. 

फ्रेंको मानवाधिकार कार्यकर्ती तर होतीच, पण ती ‘लेफ्टिस्ट सोशालिस्ट अँड लिबर्टी पार्टी’चीही नेता होती. तिची हत्या का झाली? त्याची कारणं काय होती? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण तिच्या कामाची प्रार्श्वभूमी समजून घेतली तर हे कळणं अवघड नाही. अर्थात उजव्या विचारसरणीनं जिथल्या सरकारांवर वर्चस्व प्रस्थापित केलेलं असतं, तिथं झालेल्या विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या हत्यांची कारणं कधीच स्पष्ट होत नाहीत. मारेकरीही सापडत नाहीत. आपल्याकडं दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्या, यासंदर्भात उदाहरणं म्हणून आपण पाहू शकतो. 

ब्राझीलमधली रिओ शहरातली मरे ही सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. १ लाख ३० हजार लोकसंख्या असलेला हा परिसर. याच झोपडपट्टीमध्ये फ्रेंकोचा जन्म झाला होता. या झोपडपट्टीमधल्या लोकांसाठी शाळा, दवाखाना आणि स्वच्छता या गोष्टी अजूनही कोसो दूर आहेत. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेत, समाजशास्त्रातली पदवी फ्रेंकोनं संपादित केली. त्यामुळे ती रिओमधल्या झोपडपट्टीवसियांची आशा होती. त्यांची ती खंबीर नेता होती. मरेमध्ये लहानाची मोठी झाल्यामुळे तिला तिथली सर्व परिस्थिती माहिती होती. शिक्षणानं तिला लढण्याचा मार्ग मिळाला होता. 

ब्राझीलमधली सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. या गरिबीचं जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरणामध्ये रूपांतर करण्यात येत आहे. त्यात मरे झोपडपट्टीमधल्या मुलांची संख्या अधिक आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ड्रग्जच्या व्यापारामध्ये ओढलं जातं. त्यातच वर्णभेदाचंही सावट आहेच. त्यामुळे सर्वच कृष्णवर्णीयांकडं गुन्हेगार म्हणूनच पाहिलं जातं. परिणामी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला गोऱ्या आणि मध्यमवर्गीय समूहाकडून नैतिक समर्थनही प्राप्त करणं सोपं होतं. 

झोपडपट्टीमधून सातत्यानं पोलिस आणि ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांमध्ये चकमकी होत राहतात. त्यात अनेक निष्पाप अफ्रो – ब्राझीलीयन तरुणांना लक्ष्य केलं जातं. काही वेळेला विनाकारण पोलिसांकडून हत्या करण्यात येतात. उजव्या विचारसरणीचा प्रभाव वाढल्यामुळे या झोपडपट्ट्या गुन्हेगारीचं आणि हिंसेचं केंद्र बनत चालल्या आहेत, असा यशस्वी प्रचार करण्यात त्यांना यश मिळालं आहे. हा प्रचार इतका केला गेलाय की, झोपडपट्टी परिसरात वाढत चाललेल्या ‘गँग वॉर’वर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याचा हस्तक्षेप वाढवण्यास राष्ट्राध्यक्ष मिशेल टेमिर यांनी परवानगी दिली होती. एवढंच नाही तर रिओमधल्या सुरक्षा आणि तपास यंत्रणांचं मोठ्या प्रमाणात सैनिकीकरणही करण्यात येत आहे. 

या सगळ्या सैनिकीकरणाचे बळी झोपडपट्टीमधले कृष्णवर्णीय असतील हे स्पष्ट होतं. फ्रेंकोचा लढा याविरोधातच चालू होता. तो किती महत्त्वाचा होता हे आकडेवारीच्या माध्यमातून समजून घेणं गरजेचं आहे.  

‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या जागतिक मानवाधिकार संघटनेनं प्रकाशित केलेल्या ‘कल्चर ऑफ रेसिझम’ या अहवालानुसार, २०१० ते २०१३ या कालावधीत पोलिसांनी तब्बल १२७५ हत्या केल्या आहेत. त्यात ८० टक्के अफ्रो – ब्राझीलियन नागरिक आहेत. २०१७ मध्ये प्रत्येक दिवसाला १८ हत्या होत होत्या. ताजी आकडेवारी पाहता जानेवारी २०१८ मध्ये तब्बल १५४ हत्या करण्यात झाल्या आहेत.

फ्रेंको स्वत: लेसबियन होती. त्यासाठीही ती लढत होती. २०१७ मध्ये समलैगिंकांच्या हत्या ३० टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामुळे तिचं राजकारण हे मुख्यत: आर्थिक असमानता आणि पोलिसांची झोपडपट्ट्यांमधली हिंसा याभोवती केंद्रित होतं. हत्येच्या एक दिवस अगोदर तिनं झोपडपट्टीमधील तरुणाची हत्या झाल्याचं ट्विट केलं होतं. झोपडपट्टीवासियांविरुद्ध सुरू केलेलं हे युद्ध संपवण्यासाठी अजून किती बळी पाहिजेत, असा प्रश्नही तिनं या ट्विटमध्ये विचारला होता… आणि या युद्धातला पुढचा बळी तिचाच ठरला. 

कृष्णवर्णीयांसंबंधीचा हा प्रश्न तिनं व्यापक बनवल्याचं तिला मिळालेल्या मतांमधून दिसून आलं होतं. तिच्या लढ्याला, संघर्षाला सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळत असताना तिची हत्या होणं, हा रिओमधल्या कृष्णवर्णीयांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. रिओ आणि इतर शहरांतील रस्त्यावर आंदोलनं पेटली आहेत. सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहली जात असताना तिचा लढा पुढं नेण्याची जिद्दही दिसत आहे. तिच्या हत्येचं समर्थम करणारी ट्विटही मोठ्या प्रमाणात येत आहेत. “गुन्हेगारांच्या बाजूनं उभं राहाल तर अशीच अवस्था होईल,” अशी धमकीवजा ट्विटही वाचायला मिळत आहेत. परिस्थिती सारखीच आहे. आपणही अशाच काहीशा संक्रमण अवस्थेतून जात आहोत. पण फ्रेंकोसाठी ब्राझीलमध्ये हा संघर्ष उभा करणं, सैन्याच्या विरुद्ध आवाज उठवणं आपल्याएवढं सोपं नव्हतं. 

पंधरा महिन्याच्या काऊन्सिलच्या कारर्किदीमध्ये फ्रेंकोनं एकूण १६ विधेयकं मांडली होती. त्यातलं महत्त्वाचं विधेयक होतं, रात्र पाळीमध्ये काम करणाऱ्या एकल महिलांच्या मुलांसाठी कमी दरामधली बाल संगोपन केंद्र निर्माण करण्याचं. अशी बालसंगोपन केंद्र रिओमध्ये सुरू झाली आहेत. मागच्या वर्षी ‘न्यू इंटरनॅशनलिस्ट’ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “राज्यसंस्था ही आमच्या हक्कांचं उल्लंघन करणारी आणि आमच्यावर हिंसा लादणारी सर्वांत मोठी यंत्रणा आहे. पण तीच एकमेव यंत्रणा आहे, ज्यात प्रवेश करून आम्ही आमचे हक्क मिळवू शकतो.” 

ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलमधील महिला, कृष्णवर्णीय, श्रमिक वर्ग आणि समलैगिंक यांचं जगणं अवघड होणार आहे. मागच्या दोन दिवसांत हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे सर्व तिथल्या उजव्या शक्तींसाठी फायद्याचंच  आहे. त्यामुळे या हिंसाचाराला जाणीवपूर्वक खतपाणीही घातलं जाईल.

आता मरे झोपडपट्टीचं भविष्य अंधकारमय दिसतं आहे. पण त्याच झोपडपट्टीच्या भूतकाळातील अंधारातून आलेल्या मारिअले फ्रेंकोला जग रिओमधील सर्वांत गरीब समूहाची नेता, अफ्रो – ब्राझिलियन लढवय्यी महिला म्हणून लक्षात ठेवेल.

.............................................................................................................................................

लेखक अभिषेक भोसले औरंगाबाद येथील एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पत्रकारिता विषयाचे प्राध्यापक आहेत.

bhosaleabhi90@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......