‘रेड’ : जरासा उजवा, तरीही बॉलिवुडपटच! 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार 
  • ‘रेड’चं पोस्टर
  • Sat , 17 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie रेड Raid अजय देवगण Ajay Devgn इलियाना डिक्रूज Ileana D'Cruz

एखादं विशिष्ट इन्व्हेस्टिगेशन, स्पेशल ऑपरेशन आणि इतर सरकारी कामगिरीबाबतचा चित्रपट हॉलिवुडला जरी नवीन नसला तरी बॉलिवुडमध्ये असे फारसे चित्रपट नाहीत. राज कुमार गुप्ताच्या ‘रेड’च्या निमित्तानं असा चित्रपट बॉलिवुडला लाभलाय. त्यातही त्यानं सत्यकथेचा आधार घेत असूनही आपला 'बॉलिवुड'पणा सोडलेला नाही, हे विशेष. त्यामुळे 'रेड' बऱ्याच टाळ्याखाऊ जागा कायम ठेवत, क्लिशे असण्याचं आपलं बॉलिवुडशी असलेलं नातं कायम ठेवत, एक अर्ध-सत्यकथा म्हणावा असा प्रकार आपल्यासमोर मांडतो. 

'रेड' अगदी सुरुवातीलाच आपल्याला 'रेड'च्या तयारीत, संभाव्य रेड टाकण्याच्या ठिकाणाकडे धाव घेणाऱ्या इन्कम टॅक्स ऊर्फ आयटी डिपार्टमेंटच्या गाड्या आणि रेड पडणार असल्याची खबर पोचवण्यासाठी धडपडत एखाद्या लो बजेट पार्कर गेमप्रमाणे उत्तर प्रदेशातील घरांवरून उड्या मारणारे लोक अशा वातावरणात घेऊन जातो. 

मात्र नंतर 'वन मन्थ अॅगो' असं कार्ड दाखवत मागे नेतो. आणि इथूनच जरा गफलत व्हायला सुरुवात होते. म्हणजे सुरुवातीच्या काही क्षणात तयार झालेलं फास्ट पेस्ड थ्रिलर चित्रपटाचं वातावरण थेट एखाद्या रॉम-कॉम चित्रपटास समांतर पातळीवर येऊन थांबतं. मग पुढील जवळपास अर्धा तास अमेय पटनायक (अजय देवगण) कसा इमानदार आहे वगैरे बोललं जातं. ज्यावर त्याची पत्नी नीता (इलियाना डिक्रुझ) बरेच विनोद करत राहते. पात्रांची ओळख करून देणं वगैरे उद्देश ठीक असला तरी सुरुवातीलाच हे प्रकरण जरासं हास्यास्पद वाटायला लागतं. अर्थात नंतर जवळपास पाऊणेक तासानंतर चित्रपट जास्त जलदगतीनं पुढे जाऊ लागतो आणि त्याची कथेवरील पकडही बरीच घट्ट होत जाते. 

अमेय पटनायक या आयकर विभागातील अधिकाऱ्याची नुकतीच लखनौमध्ये बदली झालेली असते. तिथं आल्यावर पहिलीच कारवाई म्हणून तो गुप्त खबरीनुसार रामेश्वर सिंग ऊर्फ ताऊजीच्या (सौरभ शुक्ला) घरी छापा टाकण्याचा प्लॅन करतो. ज्यासाठी त्याला वरिष्ठांकडूनही परवानगी मिळते. नियोजनाप्रमाणे तो छापा टाकतो. मात्र त्याला काहीच अवैध रक्कम किंवा मालमत्ता मिळत नाही. पण इकडे रामेश्वर तर हे सगळं त्याच्या 'स्टेटस'वर ओढवून घेत असतो. ज्यामुळे त्याच्यात आणि पटनायकमध्ये शीतयुद्ध सुरू होतं. अर्थात पुढे काय होतं, रेड सक्सेसफुल होते की नाही, रामेश्वर गप्प बसतो का, वगैरे बऱ्याचशा प्रश्नांचा ऊहापोह म्हणजे हा एकंदर चित्रपट. 

चित्रपट म्हणून हा कदाचित जास्त उत्तम होऊ शकला असता. कारण एक बरीच गुंतवून ठेवणारी कथा, बरीच चांगली स्टारकास्ट, असं बरंच त्याच्या पारड्यात होतं. मात्र होतं काय की 'रेड' सर्रास वापरल्या जाणाऱ्या बॉलिवुड ट्रिक्स व ट्विस्ट्स वापरत राहतो. म्हणजे रामेश्वरच्या आईचं किंवा अगदी लल्लन सुधीरचं पात्रही केवळ काही विनोद उकळण्यासाठी उभं केलं जातं. 

शिवाय कथानकात उगाचच येणारी गाणी अधूनमधून जागेवर येत असलेल्या कथानकाच्या गतीला जराशी मारक ठरतात. ज्यात पुन्हा अमेयच्या प्रेमकथेचं आणखी एक उपकथानक येत राहतं. त्यामुळे व्यावसायिक हेतू समोर ठेवून केलेल्या या गोष्टी खुद्द या चित्रपटालाच अडथळा आणतात. 

अजय देवगण पटनायक म्हणून शोभत असला तरी अलीकडे तो सर्व पात्रांमध्ये सरसकट ‘माचो मॅन’चा अवतार घेऊन समोर येत राहतो. त्यामुळे सौरभच्या ताऊजीपुढे तो जरासा कमी पडतो. इलियाना डिक्रुझला तसाही मुळात कथानकातच फारसा वाव नव्हता. त्यामुळे तिच्या कामगिरीबाबत काही म्हणणं गैर ठरेल. इतर सर्वांनी आपापल्या भूमिकेनुसार कमी-जास्त प्रमाणात योग्य म्हणावीत अशी कामं केली आहेत. 

एकूण चित्रपटाचा प्रभाव हळूहळू वाढत जातो, यामागील एक कारण म्हणजे पटनायक आणि रामेश्वर यांच्यामध्ये वाढत जाणारा संघर्ष, त्यांचं होणारं शाब्दिक द्वंद्व आणि या सगळ्याला सोबत देणारं अमित त्रिवेदीचं पार्श्वसंगीत. त्रिवेदीच्या गेल्या काही काळातील कामाकडे पाहता त्याला अजून प्रकाशझोतात येण्याची आणि अधिकाधिक कामं मिळण्याची गरज का आहे ते लक्षात येतं. म्हणजे एरवीही हिंदी चित्रपटांमध्ये ठरावीक जागांवर, ठरावीक प्रभावाकरिता एकतर क्लिशे झालेलं पार्श्वसंगीत वापरायची किंवा नव्यानं तयार करूनही पुन्हा आधीच्याच संगीताचा कित्ता गिरवत प्रेक्षकांना अगदी घास भरवल्यागत पडद्यावर घडणारी प्रत्येक कृती सोबतीला नकोशा वाटणाऱ्या पार्श्वसंगीतासोबत दाखवण्यात येते. 

त्रिवेदीचं पार्श्वसंगीत यावर जरासं वेगळं उठून दिसतं. अर्थात तोही टिपिकल वाटाव्या अशा गोष्टी करत असला तरी एकूण प्रभाव म्हणून त्यानं केलेला स्कोअर चित्रपटाला केवळ पूरकच ठरत नाही, तर बऱ्याचदा अभिनेत्यांहूनही अधिक महत्त्वाची कामगिरी बजावतो. 

एकूणच वरवर पाहिल्यास ‘रेड’ ऐंशीच्या दशकातील उत्तर प्रदेश समोर आणण्यात, काही सुंदर लोकेशन्स दाखवण्यात आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा मुख्य हेतू असल्याप्रमाणे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतो. अर्थात तो कुणासाठी कसा वर्क होईल आणि कोण त्याची कशाशी तुलना करेल यावर त्याचं एखाद्याला आवडणं न आवडणं ठरेल. नसता रामायण-महाभारतातील संदर्भ देत, टाळ्याखाऊ संवाद तोंडावर फेकणाऱ्या या 'रेड'कडेही अजून एक बॉलिवुड मसालापट म्हणून पाहणं फारसं कठीण नाही. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख