अजूनकाही
विज्ञानविश्वाच्या आकाशगंगेतील स्टीफन हॉकिंग या तार्याचा अस्त झाला. या तार्याचा जरी अस्त झाला असला तरी त्याच्या प्रकाशात आपल्याला जे काही पाहायला मिळालेय ते अमूल्य आहे. एखादा सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ जग सोडून जातो आणि चोवीस तासातच त्याच्याविषयी भरभरून बोललं जातं, लिहिलं जातं हे चकित करणारं आहे. शास्त्रज्ञ असतानाही एखाद्या राजकारण्यासारखी किंवा अभिनेत्यासारखी प्रसिद्धी मिळवणं, त्यानं लिहिलेली वैज्ञानिक पुस्तकं सर्वसामान्य माणसांनी रहस्यकथांसारखी वाचणं असं भाग्य मिळणं ही खूप दुर्मीळ गोष्ट आहे. हॉकिंगपूर्वी अल्बर्ट आईनस्टाईनला शास्त्रज्ञ म्हणून एवढी प्रसिद्धी मिळू शकली होती. पण हे इतकं मिळवण्याची साधनाही आपणा सर्वांना तोंडात बोट घालायला लावणारी आहे. खूर्चीला खिळून राहणारा, स्वतःच्या शरीरावर ताबा नसणारा, एवढंच नव्हे तर तोंडातून शब्द काढण्यासाठी झटणारा हा शास्त्रज्ञ आपल्याभोवती पसरलेल्या अथांग अंतराळाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो, ही फक्त विज्ञानविश्वातलीच नव्हे तर मानवी इतिहासातली अविस्मरणीय गोष्ट आहे. या ज्ञानवंताचा जन्म गॅलिलीओच्या पुण्यतिथी दिनी आणि मृत्यू आईनस्टाईनच्या जयंती दिनी व्हावा, ही गोष्टसुद्धा एक आश्चर्यकारक योगायोग म्हणावा लागेल.
हॉकिंग हे भौतिकशास्त्रज्ञ असले तरी जगभराला ते माहीत आहेत, त्यांच्या ‘ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम’ या बेस्टसेलर पुस्तकामुळे. एखादा भौतिक शास्त्रज्ञ एखादं पुस्तक लिहितो आणि जगभरातील सामान्य लोकांच्या त्यावर उड्या पडतात ही गोष्ट अदभुतच म्हणावी लागेल. पण ‘ब्रीफ हिस्ट्री...’नं ते घडवलं. इतकं की त्यानं ग्रिनिज बुक ऑफ रेकार्डमध्येही नाव पटकावलं. त्याच्या एक कोटीपेक्षा जास्त प्रति विकल्या गेल्या आहेत. जगभरातील थोड्याथोडक्या नव्हे तर चाळीस भाषांत ते अनुवादित झालं आहे. भौतिकशास्त्राला प्रयोगशाळेतून दिवाणखान्यात नेणं आणि तिथून ते बेडरूममध्ये नेणं, ही किमया हॉकिंगच्या या पुस्तकानं साधली आहे. ‘ब्रीफ हिस्ट्री...’ व्यतिरिक्त त्यांनी इतरही पुस्तकं लिहिली आहेत.
हॉकिंग यांनी केलेलं संशोधन इतकं महत्त्वाचं आहे की, त्यामुळे त्यांना न्यूटन, आईनस्टाईन यांच्या रांगेत स्थान मिळालं आहे. कृष्णविवरं, विश्वाची उत्पत्ती, युनिफाईड फिल्ड थेअरी या क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. कृष्णविवराच्या बाबतीत तर ते सर्वांत अधिकारी व्यक्ती समजले जायचे. कृष्णविवरं ही आकाशातली अशी ठिकाणं असतात, जिथं ही कृष्णविवरं पाण्याच्या भोवर्याप्रमाणं सर्व काही ओढून घेतात. त्यांची ताकदही इतकी प्रचंड असते की, त्यातून काहीच सुटू शकत नाही. आता हे कशामुळे बरं होत असेल हा प्रश्न पडणं साहजिक आहे. जेव्हा प्रचंड तारे मृत्यु पावतात, तेव्हा त्या तार्यांच्या गुरुत्वाकर्षणाची ताकद इतकी प्रचंड असते की, ती आसपासच्या सर्व ग्रहांना, तार्यांना गिळंकृत करू लागते. त्यातून साधे कण सोडा, प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हळूहळू ही कृष्णविवरं आसपासच्या इतर कृष्णविवरांनाही ओढून घेतात आणि त्यातून महाकाय कृष्णविवरांचा जन्म होतो. अशा या कृष्णविवरांना समजून घेण्यासाठी हॉकिंग यांनी दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. १९७४ मध्ये हॉकिंग आणि त्यांचे सहकारी जेकब बेकेनेस्टाईन यांनी केलेलं ‘हॉकिंग रेडिएशन’ या दृष्टीनं महत्त्वपूर्ण काम आहे.
या संशोधनापूर्वी कृष्णविवरं ही पूर्णतः कृष्ण (Black) समजली जायची, पण या संशोधनानं लक्षात आलं की, कृष्णविवरांतून जरी काहीही बाहेर पडत नसलं तरी त्यातून काही प्रारणं (Rays) बाहेर पडतात. कृष्णविवराच्या सीमेजवळ होणार्या आण्विक क्रियांमुळे असं घडतं. या संशोधनापूर्वी कृष्णविवरं नष्ट होत नाहीत असं समजलं जायचं, पण या संशोधनानंतर लक्षात आलं की, त्यांचाही मृत्यु असतो. हॉकिंगला स्वतःलाही या शोधाचं आश्चर्य वाटत होतं. त्यानंही असं काही असेल याची कल्पना केली नव्हती.
हॉकिंग या शोधासाठी जरी प्रसिद्ध असले तरी त्यांनी विश्वनिर्मिती कशी होते, याविषयी दिलेलं योगदानही तितकंच, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी विश्वनिर्मितीविषयी मांडलेला सिद्धान्त ‘सिंग्युलरिटी थेअरम’ म्हणून ओळखला जातो. हा सिद्धान्त त्यांनी रॉजर पेनरोज या गणिततज्ज्ञाबरोबर मांडला. कृष्णविवरात जेव्हा प्रचंड वस्तुमान बिंदूवत ठिकाणी एकवटलं जातं, तेव्हा बिंदुवत स्थिती बनते. या बिंदुवत स्थितीमध्ये आपण कल्पनाही करू शकत नाही, इतकं वस्तुमान एकवटलेलं असतं. हॉकिंग यांना या गोष्टी जेव्हा समजल्या, तेव्हा त्यांनी ती गोष्ट विश्वाच्या निर्मितीला लावली. जर कृष्णविवरात प्रचंड वस्तुमान मावत असेल तर संपूर्ण विश्वाचीही तशीच स्थिती असणार. विश्वातलं सगळं वस्तुमान एका ठिकाणी एकवटत असणार आणि या वस्तुमानाचा एकदम स्फोट (बिग बॅग) होऊन विश्व निर्माण झालं असणार असं निरीक्षण मांडलं.
पेनरोज-हॉकिंग यांचा सिंग्युलरिटी थेअरम आता भौतिकशास्त्रात मान्य होत आहे. हे म्हणजे एकदम बारीक असणारा फुगा फुगत जाऊन मोठा होत जावा तसं. विश्वसुद्धा सुरुवातीला न फुगलेल्या फुग्यासारखं असून महास्फोट म्हणजे फुग्याची फुगण्याची झालेली सुरुवात होय. फुगत जाणार्या फुग्याप्रमाणे विश्व प्रसरण पावत जातं. फक्त फरक एवढाच की, फुग्यात ज्याप्रमाणे हवा असते, त्याप्रमाणे विश्वाच्या बिंदुवत पातळीत प्रचंड घनतेत दबावाखाली असणारं वस्तुमान असतं. हॉकिंगनी मांडलेला हा सिद्धान्त खगोलशास्त्रातला मुलभूत असा सिद्धान्त आहे.
‘हॉकिंग रेडिएशन’, ‘सिंग्युलरिटी थेअरम’ या व्यतिरिक्त हॉकिंग यांनी ‘युनिफाईड फिल्ड थेअरी’ यासाठी दिलेलं योगदानही महत्त्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर १९७४ साली त्यांनी ‘नेचर’ या पत्रिकेत लिहिलेल्या ‘ब्लॅक होल इकस्पोजन’ या शोधनिबंधात युनिफाईड फिल्ड थेअरीची बीजं होती. हा निबंध प्रसिद्ध झाल्यानंतर भौतिकशास्त्रातल्या सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. युनिफाईड फिल्ड थेअरी म्हणजे भौतिकशास्त्रातल्या सर्व नियमांना बांधणारा एकच सिद्धान्त होय. असा सिद्धान्त ज्याच्या साहाय्यानं निसर्गातील विविध गोष्टींचं एकाच नियमानं स्पष्टीकरण देता येईल. विशेषतः अणुच्या पातळीवर असणारे पुंजगतिकी नियम (Quantam Mechanics) आणि सापेक्षतावाद सिद्धान्त (Relativity Theory) यांचं एकीकरण. हॉकिंगना या सिद्धान्ताविषयी सुरुवातीला प्रचंड खात्री होती, पण नंतर नंतर त्यांच्या लक्षात आलं की, असा सिद्धान्त मांडणं तितकंसं सोपं नाही. पण एवढं निश्चितच म्हणता येईल की, हॉकिंग यांचं संशोधन या सिद्धान्तात भर घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलं आहे.
इतकं मोठं योगदान देऊनही हॉकिंग यांना आतापर्यंत नोबेल पुरस्कार का मिळाला नाही? याचं उत्तर हॉकिंग यांच्या सैद्धान्तिक पातळीवरील संशोधनात दडलं आहे. जेव्हा एखादा भौतिकशास्त्रज्ञ सिद्धान्त मांडतो, तेव्हा तो जोपर्यंत प्रयोगानं, परीक्षणानं सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यावर नोबेल पुरस्काराची छाप पडू शकत नाही. हॉकिंगनी मांडलेले सिद्धान्त प्रत्यक्षरूपानं पडताळणं खूपच अवघड आहे. कृष्णविवरांचं निरीक्षण करणं जवळजवळ अशक्यप्राय आहे.
आता हेच पहा ना. १९२० साली आईनस्टाईननं गुरुत्व लहरींविषयी भाकीत केलं होतं, पण जवळजवळ शंभर वर्षांनी म्हणजे २०१६ साली त्याची सत्यता तपासल्यानंतर ते त्या विषयाला मिळालं. या अर्थानं पाहता हॉकिंग यांचं संशोधन पूर्णपणे सिद्ध झाल्यावर त्याची छाप पडेल. हॉकिंगनीच एका ठिकाणी म्हटलंय की- ‘‘विज्ञान ही फक्त बुद्धीची शिस्त नसून तो एक ध्यास आहे, एक प्रणय आहे’’. साहजिक आहे, त्यामुळेच ते अशा प्रकारचं काम करू शकले.
हॉकिंग भौतिकजगतास नव्हे तर संपूर्ण मानवजातीस मिळालेली एक प्रेरणा आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी रोगामुळे दोनच वर्षं हातात असलेला हा महामानव पुढे पंचावन्न वर्ष जगला, आपल्या कामामुळे एक जिवंत दंतकथा बनला. बंधन ही गोष्ट त्याला मान्य नव्हती. नाहीतर खुर्चीत खिळून राहणार्या या असामीनं साठावा वाढदिवस हॉट एअरबलूनमध्ये साजरा केला नसता, पासष्टावा वाढदिवस झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव घेण्यात घालवला नसता. ‘‘जोपर्यंत तुम्ही तुमच्या चैतन्यानं स्वतंत्र असता, तोपर्यंत तुम्हाला तुमचं शारीरिक अपंगत्वही रोखू शकत नाही’’ हे हॉकिंगचे उद्गार यापुढे आपल्याला सतत आठवत राहतील.
.............................................................................................................................................
‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी - माय लाइफ विथ स्टीफन’ या स्टीफन हॉकिंग यांच्या प्रथम पत्नीच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4396
‘काळाचा छोटासा इतिहास’ या स्टीफन हॉकिंग यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/3014
.............................................................................................................................................
लेखक प्रदीपकुमार माने प्राध्यापक असून त्यांना तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य, कला या विषयांत रस आहे.
pradeeppolymath@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment