अजूनकाही
उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांतील लोकसभा अन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकांत दबदबा निर्माण केलेल्या आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांना सत्तेतून अलगद बाहेर करून संयुक्त जनता दलासोबत (जेडीयू) सत्तेत सहभागी झालेल्या भाजपसाठी हे निकाल अनपेक्षित ठरले. त्यातही, उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे निकाल अधिक महत्त्वाचे आहेत. या मतदारसंघांमध्ये मतदान कमी झाल्याने हा पराभव झाला, असे भाजपला वाटत आहे. पण, खरेच असे असेल, तर ते अधिक धोकादायक आहे. कारण, आपला हक्काचा मतदार मतदान करायला बाहेर यायला तयार नाही, असे भाजपला वाटते का? ज्या गुजरातमध्ये भाजपने नेमलेल्या ‘पेजप्रमुख’ संकल्पनेचे वारेमाप कौतुक झाले होते, ती यंत्रणा येथे अपयशी ठरली का? यंत्रणा आणि जनमत याचा संबंध एका मर्यादेपलीकडे नसतो, हे सिद्ध झाले असे मानावे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. त्यामुळेच या पोटनिवडणुकीच्या निकालांनी अनेक शक्यतांना जन्म दिला आहे. या पोटनिवडणुकांत कोण जिंकले? यापेक्षाही कोण हरले? याभोवतीच चर्चाविश्व केंद्रित झाले होते, आणि त्याचे उत्तर भाजप हरले होते. भाजप बालेकिल्ल्यातही हरू शकतो, हे या निकालातून सिद्ध झाल्याने हे निकाल महत्त्वाचे आहेत.
योगींचा बालेकिल्ला निसटला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या अनुक्रमे गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. या पोटनिवडणुकीसाठी आजपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले होते. बसपने सपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला, त्याच दिवशी फुलपूर मतदारसंघ भाजपच्या हातून जाणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, १९८९ पासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये भाजप हरेल, याचा विचार कदाचित सप-बसपनेही केला नसेल.
गोरखपूर लोकसभा मतदारसंघावर १९६७ पासून प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे महंतांचे आणि मंदिराचे वर्चस्व राहिले आहे. १९६७ ते ७० दरम्यान महंत दिग्विजयनाथ आणि १९७० – ७१ दरम्यान महंत अवैद्यनाथ यांनी अपक्ष म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर काँग्रेस व भारतीय लोकदलाचे खासदार वगळल्यास १९८९ – ९० दरम्यान पुन्हा महंत अवैद्यनाथ यांनी हिंदू महासभेकडून आणि १९९१ – ९६ आणि १९९६ – ९८ दरम्यान भाजपकडून प्रतिनिधित्व केले.
१९९८ पासून २०१७ पर्यंत सलग पाच वेळा योगी आदित्यनाथ या मतदारसंघातून निवडून आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे राजमती निषाद यांच्यावर ३ लाख १२ हजार ७८३ मतांनी विजय मिळवला होता. हा विजय केवळ मोदीलाटेवर नव्हता, तर तो योगींचा वैयक्तिक विजय होता. त्यावरून मतदारसंघावरील योगी आदित्यनाथ यांची पकड लक्षात येईल. परंतु, मतदारसंघावर इतकी पकड असताना, योगी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री असताना भाजपचे उमेदवार उपेंद्र दत्त शुक्ला यांना समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रवीणकुमार निषाद यांच्याकडून २१ हजार ८८१ मतांनी पराभव पत्करावा लागला. ज्या योगींकडे पुढील ‘मोदी’ म्हणून पाहिले जात होते किंवा किमान बोलले जात होते, त्यांच्याच बालेकिल्ल्यातील पराभव भाजपच्या गोटात चिंता वाढवणारा आहे.
लाटेत आलेला फुलपूर पोटनिवडणुकीत गेला
फुलपूर लोकसभा मतदारसंघ हा काही कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला नव्हता. कारण, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विजयालक्ष्मी पंडित यांनी दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसनंतर, भारतीय लोक दल, जनता पक्ष, जनता दल, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष अशा सर्वच प्रमुख पक्षांनी या मतदारसंघांत विजय मिळवलेला आहे. २०१४ मध्ये मात्र मौर्य यांच्या रूपाने पहिल्यांदा भाजपला येथे विजय मिळवता आला होता. त्यामुळे, मोदी लाटेत मिळालेला हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे ठेवण्याचे सर्वांत मोठे आव्हान भाजपपुढे होते आणि भाजप हे आव्हान पेलू शकले नाही. समाजवादी पक्षाचे नागेंद्र प्रताप सिंह पटेल यांनी भाजपचे कौशलेंद्र सिंह पटेल यांच्यावर ५९ हजार ४६० इतक्या मताधिक्यांनी विजय मिळवला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार धरम राज सिंह पटेल यांच्यावर तब्बल ३ लाख ८ हजार ३०८ मतांनी विजय मिळवला होता. हा फरक निश्चितच भाजपला विचार करायला लावणारा आहे.
बिहारमध्ये आरजेडीच नंबर वन
बिहारमध्ये भाजप हा नीतीशकुमार यांच्या ‘जेडीयू’सोबत सत्तेत भागीदार आहे. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद व नीतीश हे दोन्ही नेते एकत्र येऊन काँग्रेसच्या सहाय्याने ‘महाआघाडी’ स्थापन केली आणि विधानसभेत विजय मिळवला. परंतु, हा संसार दीर्घकाळ टिकला नाही. नीतीश व लालू यांच्या पक्षात घटस्फोट घडवून आणण्यात भाजपचा वाटा होता, हे काही लपून राहिलेले नाही. लालूंच्या मागे सुरू झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी, घरांवरील धाडी वगैरे सर्वांना माहीत आहेच. परंतु, राष्ट्रीय जनता दलाची मुख्य ताकद असलेले लालूप्रसाद यादव हे सध्या तुरुंगात असताना त्यांच्या पक्षाने पोटनिवडणुकीत केलेली कामगिरी भाजपला नक्कीच विचार करायला भाग पाडणारी आहे.
बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडून आलेले राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मोहम्मद तस्लिमुद्दिन यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. तसेच, २०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जहानाबादमधून निवडून आलेले आरजेडीचे मुद्रिका सिंह यादव आणि भबुआ मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आनंद भूषण पांडेय यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. अरारिया लोकसभा मतदारसंघात आरजेडीने ही जागा कायम राखली आहे. आरजेडीच्या सर्फराज आलम यांनी भाजपचे प्रदीप सिंह यांचा ६१ हजार ९८८ मतांनी पराभव केला. जहानाबाद मतदारसंघही आरजेडीने कायम ठेवला असून, येथे सुदय यादव यांनी जेडीयूचे अभिराम शर्मा यांचा ३५ हजार मतांनी पराभव केला. तर, भबुआ हा एकमेव मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवण्यात भाजपला यश आले असून, येथे भाजपच्या रिंकी राणी पांडेय यांनी काँग्रेसचे शंभू पटेल यांचा १५ हजार ४९० मतांनी पराभव केला.
बिहारमधील या तिन्ही जागांवरील पोटनिवडणुकांचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे एकत्र आलेल्या भाजप व जेडीयू या ताकदीची लढाई लालूंच्या आरजेडी पक्षाशी होती. २०१५ च्या विधानसभेच्या वेळी जेडीयू – आरजेडी व काँग्रेस या महाआघाडीची लढाई एकट्या भाजपशी होती. या समीकरणाचा विचार करता, २०१५ च्या निवडणुकीच्या तुलनेत आरजेडीच्या उमेदवारांनी आता अधिक मते घेतल्याचे दिसते. नीतीशकुमार यांच्यासारखा ‘चाणाक्ष’ सोबत असताना झालेला पराभव ‘तोडपाणी’च्या राजकारणावर ओरखाडे ओढणारा आहे. तसेच, हा पराभव नीतीश नावाच्या ‘चाणाक्ष मिथका’चाही आहे. त्यामुळे या निमित्ताने भाजपला आयात केलेले नेते अन जनमताच्या कौलाशी प्रतारणा करून केलेल्या आघाडीच्या विचित्र राजकारणाबाबतही विचार करावा लागणार आहे. एकूणच एकारलेले राजकारण–समाजकारण फार काळ टिकत नाही, हेही यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
सप + बसप = सर्वाधिक मते
उत्तर प्रदेश आणि भाजप हे समीकरण पाहता, भाजपकडे असलेले पाशवी बहुमत समोर येईल. २०१४ च्या लोकसभेत राज्यातील एकूण ८० पैकी ७१ जागा आणि ४२.६३ टक्के मते भाजपने मिळवली होती. (आता दोन जागांवर पराभव झाल्याने खासदारांची संख्या ६९ वर आली आहे.) तर, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी ३१२ जागा आणि ३९.६७ टक्के मते मिळाली होती. समाजवादी पक्षाला ४७ जागा आणि २१.८२ टक्के मते मिळाली होती. बहुजन समाज पक्षाला १९ जागा आणि २२.२३ टक्के मते मिळाली होती. सप आणि बसपला केवळ ६६ जागा मिळाल्या असल्या, तरी या दोन्ही पक्षांना राज्यातील ४४.५ टक्के इतकी मते मिळाली होती. म्हणजेच, ही मते भाजपच्या मतांहून अधिक होती. भाजपला मिळालेली ही मते मोदी लाटेतील असली, तरी सप आणि बसपची मते मात्र स्वत:ची हक्काची आहेत. ही दोन्ही मते एकत्र आल्यानंतर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे या पोटनिवडणुकीत दिसून आले.
असे असले तरी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष अन बहुजन समाज पक्षांचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. काँग्रेस तर अस्तित्वाच्या संघर्षाच्या जवळही नाही. ती फक्त रायबरेली अन् अमेठीपुरतीच उरली आहे की काय असा प्रश्न पडतो. त्यात काँग्रेसची ताकद कमी होत आहे, हे खरेच आहे. त्याला मोदी लाटेने आणखी कमी केले. कारण, २०१४ ची लोकसभा आणि २०१७ ची विधानसभा ही सबकुछ मोदी अन् योगी अशीच होती. त्यामुळे, या पोटनिवडणुकीतील पराभव हा जसा योगींचा आहे, तसाच मोदींचाही आहे. कारण, मोदी स्वत: याच राज्यातून लोकसभेचे (वाराणसी) प्रतिनिधित्व करत आहेत. इतकी मुबलक परिस्थिती असतानाही भाजपचा पराभव कसा झाला? हा भाजपच्या चिंतनाचा विषय आहेच; मात्र तरीही पराभवाची कारणे समजून घेतली पाहिजेत.
पर्याय जातीचा की धर्माचा?
एकतर उत्तर प्रदेशात योगींच्या सरकारला अजूनही स्वतःची छाप टाकता आलेली नाही. शेतकर्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे विकासाच्या राजकारणात योगी यशस्वी झालेले दिसत नाहीत. ते स्वाभाविक आहे. कारण, ते मूळचे मठाधिपती आहेत. त्यांचा आजवर विकासाच्या राजकारणाशी अपघाताने सबंध आलेला आहे. ते भाजपसाठी धार्मिकतेचे भडक राजकारण यशस्वी करण्यासाठी जेवढे उपयुक्त आहेत, तेवढे ते विकासाचा गाडा किमान हाकतो येतो यासाठी नाहीत, हे या निकालाने काही अंशी दाखवून दिले आहे. सप आणि बसपने त्यांच्या आघाडीमुळे अन् त्यांच्या जातकेंद्री राजकारणामुळे ही निवडणूक जिंकली असे भाजपला वाटत असेल. तसेच, जातवाद कसा चुकीचा, संकुचित आहे, याचे स्पष्टीकरणही ते देतील. पण, मुळात ज्या समाजात जात टिकून आहे, तिथे आदर्शवादाच्या गप्पा काय मारायच्या? गप्पा मारायच्याच झाल्या, तर कोणता आदर्श पर्याय समोर येतो? जात सोडली तर धर्म आळवावा लागतो. तोही आदर्श पर्याय नाहीच ना? त्यातच भारतीय संदर्भात धर्मापेक्षा जातीची जवळीकता अधिक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मध्यमवर्गातील मर्यादित समूह जातीपेक्षा धर्म जवळचा मानत असतील, पण जिथे गरिबी अन् मागासलेपण टिकून आहे, तिथे धर्मापेक्षा नेहमी जातच वरचढ राहणार, हे वास्तव आहे. उत्तर प्रदेशातील हे जुनेच वैशिष्ट्य आताच्या आणि आगामी राजकारणात नव्याने पाहायला मिळेल.
भाजपपुढील आव्हान
समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर जातींच्या मतांचे जे गणित पुढे येते, ते भाजपच्या धार्मिक राजकारणाला पराभूत करू शकते, हे या पोटनिवडणूक निकालातून दिसून आले. त्यामुळे, पुढील निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत, यासाठी भाजपकडून आगामी काळात सर्वतोपरी प्रयत्न होतील, यात काही शंका नाही. मग ते विविध चौकशींच्या माध्यमातून असो वा अन्य माध्यमांतून असो. या प्रयत्नांची चर्चा आजवर झालेलीच आहे. त्यामुळे आघाडीच्या भवितव्यासमोर आव्हानांचे सावट कायम आहे. मात्र, यातूनही ही आघाडी झाली अन् या आघाडीने सामाजिक आकलनातून मतभेदांच्या पलीकडे जाऊन काम केले, तर मात्र २०१९ मध्ये मोदींचे रथ रोखण्याचे आव्हान येथेच तयार होईल. राष्ट्रीय सत्ताकारणाला उत्तर प्रदेशचा कौल नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे, आताच्या निकालांनी भाजपला हादरा दिलेला आहेच; त्याहीपेक्षा सपा अन बसपा यांना एकत्र या तुम्हाला यश येऊ शकते हा संदेश दिलेला आहे. आणि हे एकीचे बळच या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ आहे.
............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/3506
.............................................................................................................................................
लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.
kdraktate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment