अजूनकाही
पुणे शहरापासून २५ कि.मी. अंतरावर, पुणे-अहमदनगर महामार्गावर, भीमा नदीच्या काठी भीमा-कोरेगाव हे गाव वसलेले आहे. पुण्याची ही पूर्वदिशा आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ७००० ते ८००० हजार आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव युद्धाच्या विजयाला २०० वर्षे झाली. हा दिवस महार रेजिमेंटने पेशव्यांवर मिळविलेल्या विजयाचा दिवस म्हणून १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शौर्य\विजय दिन’ असल्याचे जाहीर केले होते. येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रातून जमणाऱ्या दलितांची संख्या १९२७ पासून ते २०१८ पर्यंत हजारांपासून १५ लाखांपर्यंत जाऊन पोचली आहे. या वर्षीच्या शौर्य दिनाच्या आधी ‘एल्गार परिषद’ या नावाने सुमारे शंभर जात-विरोधी गट एकत्र जमले होते. आणि त्यांनी ठिकठिकाणी या संदर्भात कार्यक्रम घेतले होते. त्यात राष्ट्र सेवा दलाचाही समावेश होता. यामुळेच या वर्षी भीमा-कोरेगाव येथे इतक्या मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. प्रशासनाला याबाबतची पूर्ण माहिती दिली गेली होती.
१९९०-९१ साली महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाची, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी पूर्ण होत होती. तेव्हा काही वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक घटनांच्या संदर्भाने त्या त्या घटनास्थळी कार्यक्रम नियमित साजरे करण्याचे ठरले होते. त्यानुसार पुण्यातील भिडे वाडा येथील पहिली मुलींची शाळा, नायगाव येथील सावित्रीबाई फुल्यांचे जन्मस्थळ, पुण्यातील देहू रस्ता येथील डॉ. आंबेडकरांनी उभारलेला पहिला गौतम बुद्धांचा पुतळा आणि भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभ ही ठिकाणे होती.
भीमा-कोरेगाव येथील युद्ध ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये झाले. पेशव्यांकडे २०,००० सैनिक होते, तर ब्रिटिशांच्या बॉम्बे नेटिव्ह इनफंट्रीच्या बटालियन-२ च्या पहिल्या रेजिमेंटकडे केवळ १००० सैनिक होते. परंतु युद्ध सामग्रीने ते सज्ज होते. या पहिल्या रेजिमेंटमध्ये बहुतांश सैनिक हे महार होते. हे युद्ध ब्रिटिशांनी जिंकले आणि पेशवाई संपुष्टात आली. पेशवाईच्या काळात जातीव्यवस्थेने कळस गाठला होता. पिळवणूक आणि अपमानास्पद वागणुकीचे महिला आणि दलित बळी ठरले होते.
दलितांना रस्त्याने जाताना थुंकण्यासाठी गळ्यात मडके बांधणे व कमरेला झाडू बांधून तो त्यांच्या पाठी असणे बंधनकारक होते. ब्रिटिशांच्या बाजूने दलित शौर्याने लढले त्यामागे हा अपमान हे एक कारण होते. आणि म्हणूनच आंबेडकरांनी हा विजय दिवस ‘शौर्य दिन’ म्हणून प्रस्थापित केला.
दुसऱ्या एका मतानुसार पेशवाई संपूनही जातीवर आधारित पिळवणूक थांबली नव्हती. उलट १८५७नंतर ब्रिटिशांनी ब्राह्मण आणि मुस्लिमांना आश्वासन दिले की, त्यांच्या धार्मिक बाबीत ते लक्ष घालणार नाहीत. या आश्वासनानुसार त्यांनी महार रेजिमेंटला बेदखल केले. म्हणूनच या मतानुसार ब्रिटिशांच्या नीतीकडे आपण संशयाने पाहून हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करणे थांबविले पाहिजे. हा दिवस साजरा करून आपण ब्रिटिशांना अनुमोदन देतो व एकप्रकारे देशद्रोही ठरतो. पेशव्यांचे आताचे वारस व काही हिंदुत्ववादी शक्तींनी हाच मुद्दा पुढे करून शौर्य दिनावर बंदी यावी यासाठी कोर्टात धाव घेतली. परंतु कोर्टाने त्याबाजूने निर्णय दिला नाही.
युद्धाच्या स्मृतिस्थळी विजयस्तंभ गेली २०० वर्षे उभा आहे आणि त्यावरील हुतात्म्यांच्या नामावलीत महारांच्या नावाबरोबर काही नावे मराठा जातीतील व इतर काही मागास जातीतील सैनिकांचीदेखील आहेत.
या स्मृतिस्थळापासून जवळच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वढू (बुद्रुक) या ठिकाणी आहे. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ वा. सी. बेंद्रे यांना १९३९ साली ही समाधी तेथील महारवाड्यात सापडली होती. संभाजी महाराज संस्कृत पंडित होते ही गोष्ट ब्राह्मणांच्या डोळ्यात खुपत होती. कारण संस्कृतमधील ज्ञान शिकण्यास ब्राह्मणेतरांना ‘मनुस्मृती’नुसार परवानगी नव्हती.
ब्राह्मणांनीच औरंगजेबास संभाजीस ‘मनुस्मृती’नुसार शिक्षा करावी असा सल्ला दिला होता. वेद-मंत्र वाचल्याबद्दलच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून डोळे बाहेर काढणे, ते मंत्र लक्षात ठेवले म्हणून डोके कापणे आणि शरीराचे तुकडे करून फेकून देणे… या शरीराच्या तुकड्यांवर अंत्यसंस्कार करण्यावरदेखील बंदी घालण्यात आली होती. परंतु गोविंद महाराने हे शरीर एकत्र शिवून अंत्यसंस्कार केले. वा. सी. बेंद्रे, कमल गोखले आणि शरद पाटील यांनी या संशोधनास दुजोरा दिला आहे.
दुसऱ्या एका समजेनुसार हे शरीराचे तुकडे महाराने नव्हे तर मराठा जातीतील लोकांनी शिवले. म्हणूनच गावातील शिवले हे आडनाव लावणारे लोक म्हणतात की, आमच्या पूर्वजांनी शरीराचे तुकडे शिवून संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराचे कार्य केले.
गेली २५ वर्षे संभाजी महाराजांच्या मूळ शिक्षेच्या गोष्टीला बगल देण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी शक्ती करीत आहेत. यामुळेही १ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत आगीत तेल ओतले गेले. २८ डिसेंबर २०१७ रोजी गोविंद महार यांच्या वंशज-कुटुंबाने गोविंद महार यांच्या समाधीकडे जाणारा रस्ता दर्शविणारी पाटी तेथे लावली होती. गावातील काही उपद्रवी लोकांनी ती काढली आणि गोविंद महार यांच्या समाधी स्थळावरील पत्र्याची शेडही तोडून टाकली. गोविंद महार यांच्या वारस-कुटुंबाने याविषयी पोलिस तक्रार नोंदविली आणि ४९ जणांना अटक झाली. १ जानेवारीला अशी बातमी वेगाने पसरली की, संभाजी महाराज समाधीपाशी काहीतरी संशयास्पद घडले आहे. या भागात ‘हिंदू आघाडी’ ही संघटना अनेक दिवस कार्यरत आहे. तीन आठवडे जागोजागी सभा घेऊन ते अशी सूचना देत होते की, जे कोणी १ जानेवारीच्या कार्यक्रमात हजर राहणार आहेत ते सर्व देशद्रोही. त्यांपैकी एकाने २८ डिसेंबर रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन असे सांगितले की, जगात केवळ भारतच असा देश असेल जिथे काही देशद्रोही परकीय शक्तींचा विजय साजरा करतात. आणि सद्य सरकार त्याची छाननी करायची सोडून त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देते.
२९, ३० व ३१ डिसेंबर २०१७ रोजी भीमा-कोरेगाव, वढू (बुद्रुक) आणि सणसवाडी येथे पूर्ण शांतता होती. परंतु काही अपरिचित लोक या गावांतून फिरताना दिसत होते. भीमा-कोरेगाव ग्राम-पंचायतीने १ जानेवारी २०१८ रोजी बंद पाळण्याचा ठराव संमत करून त्याची प्रत शिक्रापूर पोलिस स्टेशनला दिली होती. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले.
१ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे सर्व दिशांनी लोक येत होते. त्याच वेळी हातात भगवे झेंडे घेतलेले हजारो लोक १० वाजता वढू (बुद्रुक) येथे जमले होते. भीमा-कोरेगावातील रिकाम्या जागांवर शौर्य दिनासाठी जमलेल्या लोकांनी आपली वाहने उभी केली होती. वाहने उभी करून इतरांसह मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तीन-चार कि.मी. चालत स्मृतिस्थळापाशी येत होते. ११ वाजता त्यांच्यावर व उभ्या वाहनांवर भगवा झेंडा हातात घेतलेल्या जमावाने हल्ला केला. हे दंगलखोर लोक पुढे सणसवाडी आणि चाकण-शिक्रापूर रस्त्याला गेले. त्यांनी भीमा-कोरेगाव स्मृतिस्थळाकडे शौर्य दिन साजरा करायला येणाऱ्या लोकांवर दगडांनी व इतर शस्त्रांनी हल्ला केला. सलीम-इनामदार या व्यक्तीचे दुकान त्यांनी जाळले.
वाहने जाळण्यासाठी पेट्रोलचा सर्रास वापर केला गेला. सलीम खान यांच्या गोडाऊनला आग लावण्यात आली. असगर अली अन्सारी यांचे टायरचे दुकान जाळण्यात आले. त्यांचा धाकटा भाऊ दुकानात लपून बसला होता, आगीतून तो निसटला. आगीमुळे शेजारील हॉटेलमधील सिलेंडर फुटले व त्यालगत असलेले भाऊसाहेब खेत्रे यांचे सर्वेश ऑटोलाईन्स हे दुकान जळाले. रझाकभाई यांच्या गॅरेज बाहेर उभे असलेले दोन ट्रक पेटवून देण्यात आले. (त्यांचे नंबर – MH 12 786 व MH 12 2757.), शिवराज प्रजापती यांचे राणाभाई मार्बल हे दुकान लुटण्यात आले. हरिभाऊ दरेकर यांचे वखारीच्या लाकडाचे गोडाऊन जाळण्यात आले.
सुदाम शंकर पवार हे एक प्रकल्पग्रस्त आहेत. ते दलित आहेत. त्यांचे पुनर्वसन सणसवाडी येथे करण्यात आले आहे. तेथे त्यांना दोन एकर जमीन मिळाली असून त्यातील दीड एकरात त्यांनी ऊस लावला होता. उरलेल्या जागेत त्यांनी बुद्ध विहार बांधला असून तेथेच एक सभागृह बांधले आहे. उर्वरित जागा मोकळी आहे. त्यांनी तेथे २९ खोल्या असलेली चाळदेखील बांधली आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी संध्याकाळी सहा वाजता स्टील कारखान्याच्या बाजूने एक-दीड कि.मी. चालत येऊन जमाव त्यांच्या शेतात घुसला आणि त्यांच्या मोकळ्या जागेत ठेवलेली वाहने त्यांनी तोडली, शेताला चोहोबाजूने आग लावली व बुद्ध विहाराची काचदेखील फोडली. त्यांच्याच घरासमोर असलेल्या दरकेर आणि हरगुडे यांच्या शेतीला आणि घराला मात्र काहीही नुकसान केले गेले नाही. यावरून हे स्पष्ट होते की, दंगलखोर जमावाला फक्त सुदाम पवारांच्या घराचे आणि शेताचेच नुकसान करायचे होते.
त्याचप्रमाणे त्यांनी रवी कांबळे आणि आठवले यांच्या घरावर दगडफेक केली. प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार एल्विम फर्नांडिस यांचा स्टुडिओदेखील जाळण्यात आला. मुथा जैन यांची मालमत्ताही पेटवण्यात आली. पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोकांना अडवून छळण्यात आले. अग्रिनशामक दलाच्या वाहनांनाही आग लावण्यात आली. एकूण ५००० वाहनांचे नुकसान झाले. ५० कार व आरामबस पेटवण्यात आल्या.
या पूर्ण घटनेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात ते असे –
१) १ जानेवारी २०१८च्या बंदचा निर्णय कोणाचा होता? दरवर्षी बाहेरून जमणाऱ्या लोकांचे आदरातिथ्य करीत असल्याचा दावा करणारे गावकरी बरोबर याच दिवशी गाव बंद कसे ठेवतात? ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना ग्लासभर पाणीही मिळू शकत नाही?
२) भीमा-कोरेगावमधील सर्वसामान्य लोकांच्या मनात भयानक भीती निर्माण झाल्याचे आम्हाला दिसले. त्यांनी त्यांची नावे अहवालात न लिहिण्याविषयी आम्हाला वारंवार सांगितले. याच भीतीने वडू (बुद्रुक) मधील गोविंद महार यांच्या वंशज-कुटुंबाने केलेली पोलीस तक्रार आता मागे घेतली आहे. गोविंद महार यांच्या समाधीस्थळाचे नुकसान करणाऱ्या ४९ जणांना आता सोडून देण्यात आले आहे. या भीती पाठीमागचे नक्की कारण काय?
३) या पूर्ण घटनाक्रमात सहभागी असलेले हिंदुत्ववादी खुलेआम मोकळे फिरत आहेत. ते मुलाखती देत आहेत आणि दलितांना १ जानेवारीच्या घटनेविषयी दोष देऊन सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती पसरवत आहेत. शासन काय करीत आहे?
४) दलित आणि मराठ्यात फूट पाडून महाराष्ट्राची सामाजिक वीण उसविण्याचा हा प्रयत्न आहे, हे पूर्ण घटनेतून कळते. कायदा आणि सुव्यवस्था चालविणाऱ्या संस्थांसमोर घडवली जात असलेली ही दुफळी त्यांना दिसत नाहीये का?
आमच्या मागण्या –
५) भीमा-कोरेगाव दंगलीच्या प्रमुख गुन्हेगारांना त्वरित अटक करा.
६) या घटनेची न्यायालयीन चौकशी होऊन त्वरित अहवाल प्रसिद्ध करावा.
७) पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी व्हावी आणि अपराध्यांना शिक्षा व्हावी.
८) मीडियाची या सर्व घटनेसंदर्भातील भूमिका तपासली जावी.
राष्ट्र सेवा दलाच्या सत्यशोधन समितीचे सदस्य –
डॉ. सुरेश खैरनार (अध्यक्ष), अल्लाउद्दिन शेख, विनय सावंत, फिरोज मिठीबोरेवाला, पूजा बाडेकर आणि शिवराज सूर्यवंशी.
या सत्यशोधन अहवालासाठी भारत पाटणकर आणि किशोर ढमाले यांचे सकार्य मिळाले.
(‘राष्ट्र सेवा दल पत्रिका’च्या मार्च २०१८च्या अंकातून साभार.)
............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/3506
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vinod Bhosale
Fri , 16 March 2018
Sambhaji maharajachi samadhi maharvadyat Kashi bhadhali ya varahi sanshodhan zale pahije
Kimantu Omble
Thu , 15 March 2018
मा. संपादक विनम्र विनंती सदर लेखातील 'गोविंद महाराने हे शरीर एकत्र शिवून अंत्यसंस्कार केले.' हा उल्लेख चुकीचा आहे तसेच शिवपुत्र कमल गोखले यांनी या विधानाला संमती दिली हे देखील खोटे आहे. 'शिवपुत्र संभाजी' या कमल गोखले लिखित पुस्तकात पुढील विवरण आहे. 'शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर त्यांनी पेशव्यांस वृंदावन बांधण्याचा आदेश दिला. सदर ठिकाणी गोविंद महार येऊन स्वच्छता करू लागला म्हणून त्यास खर्चपाण्याची सोय लावून द्यावी असा नंतर आदेश दिला. वरील वर्णन खरे असण्याचे शाहू महाराज व पेशव्यांमधील पुरावे देखील कमल गोखले यांनी दिले आहेत. संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणीही शिवले नाहीत आणि अंत्यसंस्कार देखील केले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. तरी आपण या विषयावर अधिक संशोधन करून वरील लेखात जर आपणास वरील विधान चुकीचे आढळले तर त्यात सुधारणा करावी ही नम्र विनंती आपला विनम्र किमंतु ओंबळे-सरकार