वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचं उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्यानं ‘अक्षरमित्र’ नावाची एक चळवळ सुरू केली आहे. या चळवळीचं एक सोपं सूत्र आहे. लोकांना वाचनाची आवड असते, पण त्यांना नेमकं काय वाचायचं ते ठाऊक नसतं. शिवाय वाचनाचा जामानिमा कोठून मिळवायचा हेही ठाऊक नसतं. वाचक आणि पुस्तकं यांच्यामधील दुवा होण्याचं काम ‘अक्षरमित्र’ ही चळवळ करत आहे. या चळवळीचा आणखी एक उद्देश म्हणजे शालेय स्तरातील मुलांमध्ये उत्तम मूल्यबिंदू असणारी पुस्तकं, नियतकालिकं पोचवणं आणि त्यांना पडणाऱ्या प्रश्नांच्या ऊर्मीला रीतसर उत्तरं देणं. सध्या वेगवेगळ्या लोकांकडून चांगल्या पुस्तकांची यादी करण्याचं काम ‘अक्षरमित्र’ करत आहे.
आमीरनं ‘अक्षरमित्र’ची संकल्पना २०१३ मध्ये अहमदनगर येथून रुजवण्यास सुरुवात केली. आता त्याचं पुणे आणि लातूर इथंही काम सुरू आहे. ‘अक्षरमित्र’ या संकल्पनेपाशी पोहचण्याआधी आमीरनं खूप वेगवेगळ्या वाटा चोखंदळून पाहिल्या. मुख्य म्हणजे खूप लहान वयात तो विविध चळवळींच्या संपर्कात आला. चळवळींनी भारावून जाणं आणि आपल्याला कार्यकर्ता व्हायचंय, असं वाटू लागणं एकाच वेळी घडू लागलं. पण थोड्या दिवसांत त्याच्या लक्षात आलं, समाजाच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी रस्त्यावर उतरणं, निषेध-मोर्चे करणं हा आपला स्वभाव नाही. मग काय करता येईल असा विचार सुरू झाला आणि त्यातूनच ‘अक्षरमित्र’ची कल्पना डोक्यात आली.
आमीरला ‘अक्षरमित्र’च्या कल्पनेविषयी विचारलं तर तो भरभरून बोलू लागतो- “आपण मुलं मोठी झाली की, त्यांना विवेकी, विज्ञानवादी कसं वागायचं याविषयी सांगू लागतो. पण तोपर्यंत मुलं घडलेली असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जर हे विचार रुजवायचे असतील तर पुस्तकांशिवाय दुसरं उत्तम माध्यम नाही. मी स्वत: पुस्तकांच्या सान्निध्यानं घडत गेलो. आणि मग पुस्तकांची ही चळवळ सुरू करायची असा विचार पक्का केला. लोकांच्या मनात एकाच वेळी अस्वस्थताही निर्माण करायची आणि त्याचवेळी त्यांना आशावाद, सकारात्मकताही दाखवायची असा माझा उद्देश होता.”
आमीर ध्यास घेऊन कामाला लागला. सुरुवातीला त्याला पुस्तकं कोठून मिळवायची हेही ठाऊक नव्हतं. पुण्यात प्रकाशन संस्था अधिक असल्यानं नगरहून तो पुण्यात येऊ लागला. सुरुवातीला त्यातील गणित कळत नव्हतं. प्रकाशकही फारसे दाद देईनात, तरीही त्यानं चिकाटी सोडली नाही. तो शहरातील एका प्रकाशन संस्थेतून दुसऱ्या प्रकाशन संस्थेकडे पायी फिरत राही, नवीन माहिती मिळेल तिकडे धाव घेत असे. त्याच्यावर ‘साधना साप्ताहिका’नं सर्वांत पहिल्यांदा विश्वास टाकला. आमीरनं ‘साधना’ आणि ‘वाटसरू’ या नियतकालिकांच्या वर्गणीदाराच्या माध्यमातून वाचनवेडे लोक गोळा करायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं मल्टिलेव्हल मार्केटिंगप्रमाणे कार्यप्रणाली योजली. नगरमधील दोन परिचित व्यक्तींना वर्गणीदार करायचं. नंतर त्यांच्या परिचरातील, वाचनाची आवड असणारे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र अशा पाचजणांची नावं घ्यायची. मग त्या पाच व्यक्तींकडे जाऊन, त्यांना वर्गणीदार बनवून, त्यांच्याकडून आणखी पाचजणांची नावं घ्यायची. अशा प्रकारे आमीर सेतू बांधत गेला.
त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही आले. आठ जणांचा ग्रुप तयार झाला. सुरुवातीला त्याला ‘साधना’च्या शिफारसीनं ‘मनोविकास प्रकाशना’ची पुस्तकं मिळाली. मात्र त्यांना ती पुस्तकं स्वत: विकत घेऊन पुढे न्यावी लागत असत. पुस्तकाची विक्री न झाल्यास ती ठेवायची कुठं इथपासून ते त्यांचं करायचं काय इथपर्यंत प्रश्न उभं राहायचे. त्यामुळे ‘अक्षरमित्र’नं प्रत्येक महिन्यात फक्त एक-दोन पुस्तकं विकत घेऊन फिरायचं ठरवलं. हळूहळू वाचकच त्यांच्याकडे वेगवेगळ्या पुस्तकांची मागणी करू लागले. ती पुस्तकं त्यांना घरपोच दिली जाऊ लागली. वाचकांचा आणि प्रकाशकांचा अक्षरमित्र’वरील विश्वास वाढला.
त्या दरम्यान, आमीरच्या लक्षात आलं की, अनेकांना पुस्तकांबरोबर नियतकालिकं वाचायची असतात. मात्र लोकांना सगळीच नियतकालिकं उपलब्ध होत नाहीत. पुस्तकांपेक्षा नियतकालिकं मिळणं अवघड असतं. अनेकदा नियतकालिकं वर्गणीदारांपर्यंतच पोचतात, पण त्यांना नवे वर्गणीदार गोळा करण्यात मर्यादा येतात. ‘अक्षरमित्र’नं ते लक्षात घेऊन नियतकालिकांवर लक्ष केंद्रित केलं. ती नियतकालिकं त्यांना थोड्या प्रमाणात नफाही मिळवून देऊ लागली. ‘अक्षरमित्र’ निवडक पुस्तकांच्या विक्रीबरोबरच ‘साधना’, ‘वाटसरू’, अंतर्नाद’, ‘मुक्त शब्द’, ‘प्रबोधनपत्र’, ‘विचारशलाका’ ही मराठी नियतकालिकं आणि ‘कॅरॅवॅन’, ‘फ्रंटलाईन’ ही इंग्रजी निरतकालिकं यांचे नवे वर्गणीदार जोडत आहेत. नफ्यातील ८० टक्के वाटा हा इंग्रजी विज्ञान नियतकालिकांचा आहे. त्यामध्ये ‘ब्रेन वेव्ह’, ‘टेल मी व्हाय’, ‘बीबीसी नॉलेज’, ‘स्टोअर’, ‘संदर्भ’ यांचा समावेश होतो.
मला प्रश्न पडत होता, आमीरची स्वत:ची ही बैठक कशी बनत गेली असेल. तो याविषयी सांगू लागला, तेव्हा लक्षात आलं, मूळच्या बीड जिल्ह्यातील आष्टी गावच्या या पोराच्या आयुष्यात सातवीनंतर एकेका टप्प्यानं वैचारिक प्रवास घडत गेला. आमीर सांगतो, “आजूबाजूचं वातावरण कधीच धार्मिकतेची वेष्टणं चढवलेलं नव्हतं. अभ्यासात हुशार होतो. सातवीनंतर पुढच्या शिक्षणासाठी लातूरला गेलो. उंबऱ्यापलीकडच्या एका नव्या जगानं त्याला हाक द्यायला सुरुवात केली. तोपर्यंत सामाजिक काम वगैरेशी दूरान्वये संबंध नव्हता. त्यावेळेस अवांतर वाचनही नव्हतं. मात्र लातूरमध्ये असताना गणिताचे सतिश नरहरी सर फक्त गणित शिकवायचे नाहीत, तर आपल्या विद्यार्थ्यांची जगातल्या निरनिराळ्या घडामोडींशी ओळख करून देण्याचा, त्यांना विविध विषयांवरची पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करण्याचा प्रयत्नही करायचे.”
आपल्याला माहीत आहे त्यापेक्षा जग आणखीनही वेगळं आहे, याची कुणकुण आमीरला लागण्याचे ते दिवस होते. नीतू मांडके यांचं ‘हृदयस्थ’ हे आमीरनं वाचलेलं पहिलं पुस्तक. त्यानंतर त्याची पुस्तकांशी गट्टीच जमली.
दरम्यान लातूरमधल्या पत्रकारितेच्या महाविद्यालयातील प्राध्यापक बापटले सरांच्या आणि ‘आम्ही सेवक’ या संस्थेच्या संपर्कात आमीर आला. आम्ही सेवकची विविध कामं लातूरमध्ये चालतात. आमीर त्या कामात गुंतू लागला. तोवर त्याला आनंदवन-बाबा आमटे, स्नेहालय-गिरीश कुलकर्णी ही नावंही माहीत नव्हती. दहावीत असताना त्यानं साधनाताईंचं ‘समिधा’ वाचलं आणि तो झपाटला गेला. बापटले सरांनी हसेगावला एचआयव्ही मुलांसाठी प्रकल्प चालू केला. एका शेतकऱ्यानं देऊ केलेली जमीन प्रकल्पासाठी साफसूफ करण्यापासून आमीर त्या प्रकल्पाशी जोडला गेला. आष्टी-लातूर आणि पाठोपाठ अहमदनगर असा प्रवास करता करता कुठेतरी आमीरच्या मनात आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार रुजायला सुरुवात झाली. अर्थात शिक्षणाशी तडजोड न करता त्याला हे सगळं करायचं होतं.
त्याच्या या सगळ्या उद्योगात घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या असं विचारल्यावर आमीर मिश्किल हसत सांगतो, “लातूरला होतो तेव्हा घरी काहीच कळू दिलं नाही. लांब रहायचो. त्यामुळे त्यांना कळायलाही तशी काही संधी नव्हती. माझ्या घरातलं वातावरण मोकळं आहे, पण माझे हे उद्योग चालले असते की नाही माहीत नव्हतं. तेव्हा त्यामुळे घरी कधीच त्याबद्दल बोललो नाही. पण एक झालं या सगळ्या उद्योगांचा अभ्यासावर थोडासा परिणाम झाला. म्हणजे मी नापासबिपास झालो नाही, पण पूर्वी सतत टॉपवर असायचो ते सांभाळता आलं नाही. घरचे कधीमधी प्रश्न विचारायचे पण मी कुणालाही कसलीही उत्तरं देत बसलो नाही. टॉपर राहण्याचा अट्टाहास मात्र मी सोडून दिला. कारण मी जे मिळवतं होतो ते मला कोणाला सांगता येत नव्हतं.”
आमीरच्या हुशारीमुळे त्यानं डॉक्टर व्हावं असं त्याच्या पालकांना वाटत होतं. शिवाय याच सुमारास, डॉ. प्रकाश आमटे व डॉ. विकास आमटे, डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्या आनंदवन, सोमनाथ, स्नेहालय अशा विविध सामाजिक प्रकल्पांशी संबंध आला. त्यांच्या प्रभावातून तोही डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहू लागला. बारावीच्या परीक्षेनंतर वैद्यकिय प्रवेशाच्रा तयारीसाठी ब्रेक घेतला. मात्र, तो ब्रेक त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.
आमीर वैद्यकीय प्रवेशपरीक्षेच्या अभ्यासाच्या वेळेस प्रचंड अस्वस्थ होता. त्याला आपल्याला हे करायचं नाही, हे हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं; मात्र, नेमकं काय करावं याचा मार्ग सापडत नव्हता. अखेर त्यानं काय करायचं नाही हे स्वत:पुरतं ठरवून टाकलं. त्याच सुमारास त्याच्या वाचनात ‘नीलची शाळा समरहिल’, रश्मी बन्सल यांचं ‘स्टे हंग्री स्टे फुलीश’ आणि ‘आर हॅव ड्रीम’ ही पुस्तकं आली. त्याच्या मनावर वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची प्रक्रिया सांगणाऱ्या, वेगवेगळ्या कल्पनांनी सामाजिक व्यवसायाचा डोलारा उभा करणाऱ्या तरूण, उमद्या व्यावसायिकांची कथा असलेल्या त्या पुस्तकांचा विलक्षण प्रभाव पडला. त्याला शिक्षणाच्या क्षेत्रातील व्यवसाय आणि सामाजिक कार्य यांचा मेळ घालावासा वाटू लागला. त्याच्या मनात ‘शिक्षणक्षेत्रात काहीतरी करूया’ असा विचार घर करू लागला.
तरीही त्याची अवस्था ‘कल्पना भारंभार, पण प्रत्यक्षात मात्र काहीच नाही’ अशी होती. त्याला ‘आय हॅव ड्रीम’ या पुस्तकामुळे प्रथितयश उद्योजकांनी स्वत:चं व्यवस्थापनकौशल्य सामाजिक कामांसाठी कसं उपयोगात आणलं ते कळलं. त्यामुळे त्याच्या मनात शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य असं काहीतरी अमूर्त चित्र आकार घेऊ लागलं. त्यानं डॉक्टरकीचा प्रश्न निकाली काढल्यामुळे त्याच्या घरचे वैतागले होते. त्यांनी आमीरनं किमान इंजिनिअरींगकडे तरी वळावं यासाठी त्याची मनधरणी सुरू केली. त्यावेळेस आमीर नेमकं काय करावं ते ठरवू शकला नाही. मग त्यानं घरच्यांची विनंती मान्य करत इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी अहमदनगर गाठलं.
पण तोपर्यंत आमीरला ना डॉक्टरकीत रस उरला होता, ना इंजिनिअरींगमध्ये. त्यामुळे आमीरचं अभ्यासात लक्ष लागेना. त्या सुमारास त्यानं नगरमधील ‘स्नेहालय’ इथं प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात केली. तेथील निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. त्याला स्वत:च्या बलस्थानांची जाणीव झाली. आणि एके दिवशी ‘स्नेहालया’च्या आवारातच अक्षरमित्र’ या संकल्पनेनं जन्म घेतला.
आमीरनं ‘अक्षरमित्र’ उपक्रमाला पुस्तक विक्रीकेंद्र बनवायचं नाही हे निश्चित केलं. तो निग्रहानं सांगतो की, “ती केवळ चळवळ नव्हे तर ‘सामाजिक उद्योजकता’ही आहे. मुळात ‘अक्षरमित्र’ ही फर्म कंपनी म्हणून उभी करायची तर आर्थिक स्थैर्य हवंच होतं. चळवळीतील लोकांना अशी आर्थिक विधानं खटकतात, मात्र ‘अक्षरमित्र’ला एनजीओही करायची नव्हती. कारण एनजीओ केल्यानं किंवा देणगी घेऊन काम केल्यानं काय अडचणी, मर्यादा येतात याचा प्रत्यक्ष अनुभव मी काही संस्थांमध्ये करताना आला होता. त्यामुळे हे टाळून ‘सामाजिक उद्योजकता’ (सोशल एन्ट्रप्रिनरशीप) हा प्रकार निवडीचा आणि सोयीचा वाटला आणि त्यापद्धतीतून काम सुरू केलं.”
सामाजिक काम करायचं म्हणजे विनामूल्य, मोफत काम करायचं अशी सर्वसाधारणपणे विचारधारा असते, मात्र आमीरनं सामाजिकतेला उद्योजकतेची जोड हवी या विचारानं पुस्तकांची घरपोच विक्री आणि त्यातून काही नफा अशी कार्यपद्धत ठरवली. त्यासाठी त्यानं ‘घरपोच पुस्तक’ ही कल्पना अवलंबली. ती त्याच्या कामाची वेगळी ओळखही ठरू शकणार होती. त्यानं लोकांना चांगली पुस्तकं शोधून देण्यासाठी प्राथमिक स्तरावर त्याचं स्वत:चं वाचन, संशोधन महत्त्वाचं आहे हे ओळखलं. मग त्यानं पुस्तकांविषयीची माहिती गोळा केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातील तज्ज्ञांची मदत घेण्यास सुरुवात केली.
आमीरच्या घरच्यांनी इंजिनिअरींग शिकायला गेलेला आमीर या उपक्रमासाठी ‘शिक्षणाचे वय वाया घालवत आहे’ असं वाटून त्याला विरोध केला. आमीरच्या वडिलांनी आमीरला अक्कल यावी’ यासाठी त्याला पैसे पाठवणं बंद केलं. शिक्षक असणाऱ्या वडिलांची, आमीरनं शिकावं ही माफक अपेक्षा होती. त्यांनी तोपर्यंत आमीरला नेहमी हवं ते दिलं होतं. पाहिजे ती पुस्तके, अभ्यासासाठी संदर्भग्रंथ. वडिलांना त्याच्यावर केलेला खर्च आणि मेहनत वाया गेली असं वाटू लागलं. पैसे बंद झाल्यानं आमीर अधिकच पेटून उठला. त्यानं अक्षरमित्र’चं काम अधिक जोमानं हाती घेतलं. त्यानंतर वर्षभरातच इंजिनिअरींगलाही रामराम ठोकून घरच्यांना आणखी एक धक्का दिला. त्या सुमारास ‘अक्षरमित्र’चा नगरमध्ये जम बसू लागला होता.
ही प्रक्रिया त्याला काही शिकवत होती का, असं त्याला विचारल्यावर तो चटकन उत्तरला- “ही ‘लर्निंग प्रोसेसच होती. शिक्षण आणि व्यवसाय हे प्रॅक्टिकली समजून घ्यायचं होतं. यातून खूप पैसे मिळतील, ब्रॅण्ड होईल असा कोणताही विचार डोक्यात नव्हता. त्यातील सगळ्याच गोष्टी कळत होत्या, माहीत होत्या असं नाही. काही गोष्टी आनंदाच्या तर काही शिकण्यासारख्या होत्या. दोन वर्षं वेगवेगळे प्रयोग करत आम्ही शिकत होतो. काम सुरू झालं ते असंघटितपणे, ‘ट्रायल अॅण्ड एरर’ पद्धतीनं. मात्र सुरुवातीला काही गोष्टी फसल्या. मागणी तर येत होती मात्र आर्थिक अडचणी होत्या. विद्यार्थिदशा असल्यानं भांडवलही नाही अन कोणी कर्जही देऊ शकणार नाही, अशी अवस्था. अशाही परिस्थितीत गुंतवणूक करणारे पाठीराखे हवे असतात. त्यात तीन एफ महत्त्वाचे- फॅमिली, फ्रेंडस आणि फूल्स. पण तेही नव्हते. काम करणारे आम्ही विद्यार्थीच. जोडीला ना माणसं, ना तंत्रज्ञान. त्यामुळे आमची अॅक्टिव्हिटी आमच्या भोवतीच केंद्रीत झाली. व्यक्तीकेंद्रीत. आम्ही चांगलं काम केलं नाहीतर सगळाच घोळ. पण असं न होऊ देता एक यंत्रणा राबवण्याची इच्छा घर करत होती. कारण माणसं बदलली तरी यंत्रणा उत्तम काम करत राहते. मात्र त्याच सुमारास सगळ्यांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा आला होता. करिअरच्या वाटा खूणावू लागल्या होत्या. लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला तरी कर्जही झालं होतं. लोकांमध्ये आमच्याविषयी चुकीचा समज पसरण्याआधी आपण हे बंद करावं या निर्णयापर्यंत पोहचलो होतो. मात्र सर्वसामान्यांतील अतुलनीय विश्वासच असं करण्यापासून रोखत होता. या वाटेत काही माणसं खंबीरपणे उभी राहिली. रविंद्र सातपुते सर आणि त्यांच्या पत्नी, ज्यांना मी नगरचे ‘आई-बाबा’च म्हणतो. बारावीचे शिक्षक ईश्वर शिंदे, मित्र संदीप बोराटे, गोविंद लासूरे, कॉम्रेड मेहबूब सय्यद. या लोकांनी मनोबल वाढवलं, तसंच आर्थिक ताकदही दिली. त्यामुळे तरलो. डॉ. अरविंद गुप्ता, मंजिरी निंबकर, डॉ. अनिल सदगोपालन आदी माणसं शिक्षणातून विवेकवाद रुजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना मी आदर्शस्थानी मानतो.”
‘अक्षरमित्र’नं पुस्तकांइतकंच नियतकालिकांसाठी एक सामायिक वेबपोर्टल महत्त्वाचं आहे, हे ओळखलं. त्यांचा मराठी-इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील उत्तम निरतकालिकं एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्या माध्यमातून नवे वर्गणीदार तयार करणं आणि वर्गणीदारांना एकाच ठिकाणी हवं ते नियतकालिक उपलब्ध करून देणं असा दुहेरी हेतू आहे. त्यासाठी त्यांना स्वत:चं संकेतस्थळ आणि मोबाईल अॅनप्लिकेशन आणायचं आहे.
आमीरकडे त्याच्या ‘अक्षरमित्र’च्या कामातील एक मार्मिक आठवण आहे. तो नगरमध्ये असताना, सुट्टीत घरी गेला. त्यावेळेस त्याला शिक्षकांनी कोणती पुस्तकं वाचायला हवीत, याची शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेली पुस्तकाची सूची सापडली होती. त्यात ‘नीलची शाळा समरहील’पासून विविध पुस्तकांची नावं होती. त्यानं त्याच्या वडिलांना मुद्दाम ‘नीलची शाळा...’ हे पुस्तक वाचण्यास दिले. ते त्यांना प्रचंड आवडलं. त्यावेळेस आमीरच्या डोक्यात ‘अक्षरमित्र’ सुरू करण्याचे विचार घोळत होते. त्यानं वडिलांना सांगितलं की, ‘तुम्ही शिक्षकांना हे पुस्तक घेण्यास सांगा, मी पुस्तक उपलब्ध करून देतो.’ वडिलांना ती कल्पना आवडली. वडिलांनी आमीरकडून दोनशे पुस्तकं मागवली. आमीरला नंतर कळलं की, ती पुस्तकं वडिलांनी विकली नाहीत; तर, स्वखर्चातूनच इतरांना भेट दिली! आमीरच्या ‘अक्षरमित्र’ला विरोध करणारे वडीलच त्याचे पहिले ग्राहक ठरले!
सध्या आमीर ‘अक्षरमित्र’च्या कामाबरोबरच, पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय संबंध व अर्थशास्त्राच्या पदवीचे धडे घेत आहे. तो सध्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याला ते धडे अर्थगणितांना उलगडण्यासाठी महत्त्वाचे वाटतात. आमीरचा पुढे ‘इंटरनॅशनल बिझनेस इन स्ट्रॅटेजीस अअँड ऑपरेशन्स’ या विषयात एमबीए करण्याचा मानस आहे. आमीरला मुख्य प्रवाहातही नेमक्या शिक्षणाची वाट सापडली, असं म्हणायला हरकत नाही.
इतकंच नव्हे तर, माणसांसाठी आपल्याला काम करायचंय तर आपल्या आसपासची माणसं आहेत तरी कशी, असा आमीर विचार करू लागला आणि माणसांना समजून घेण्यासाठी त्यानं दक्षिण भारताची सायकलवरून भटकंतीही केली. कुणाचाही परिचय न घेता एकट्यानं हा प्रवास करताना त्याला अनेक चांगली, भाबडी, प्रेम करणारी माणसं मिळाली. आपण लोकांवर विश्वास टाकायला शिकलो की, लोकही आपल्यावर विश्वास टाकतात हे या प्रवासात त्याला उलगडलं. या प्रवासाबाबत तो एक वाक्य खूप सहज बोलून गेला, ‘एकदा उंबरठा ओलांडता आला पाहिजे, बाकी प्रवास काही अवघड नाही’.
आमीर असे वेगवेगळे प्रवास करत आहे...
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383
.............................................................................................................................................
लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.
greenheena@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Alka Gadgil
Tue , 27 March 2018
Sorry, Heena
Alka Gadgil
Tue , 27 March 2018
Hi Jeena, hee series far touching ahe, keep it up