तोच आहे माझ्या स्वप्नातला राजकुमार, नसेना का त्याच्याकडे ‘काचेचा रथ!’
ग्रंथनामा - झलक
जेन हॉकिंग
  • स्टीफन हॉकिंग आणि जेन हॉकिंग. मध्यमभागी जेन यांच्या आत्मचरित्राचं मुखपृष्ठ
  • Wed , 14 March 2018
  • ग्रंथनामा झलक स्टीफन हॉकिंग Stephen Hawking जेन हॉकिंग Jane Hawking ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी : माय लाइफ विथ स्टीफन Travelling to Infinity : My life with Stephen

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं आज इंग्लंडमध्ये वयाच्या ७६व्या वर्षी निधन झालं. त्यांची प्रथम पत्नी जेन हॉकिंग यांनी ‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी : माय लाइफ विथ स्टीफन’ या नावानं आपलं आत्मचरित्र इंग्रजीमध्ये लिहिलं आहे. हे इंग्रजी आत्मचरित्र व त्याचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसनं प्रकाशित केला आहे. हा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे. या पुस्तकातील हा संपादित अंश प्रकाशकाच्या पूर्वपरवानगीनं...

.............................................................................................................................................

एका संध्याकाळी मी घरी परत आले तर माझी आई, हातात एक कागद पडपडवत, हसतमुखानं दारातच माझ्या जणू स्वागताला उभी होती. स्टीफननं मला ‘मे बॉल’च्या कार्यक्रमाला केंब्रिजला बोलावलं होतं! उत्साहात उगवणारी आणि उल्हासात मावळणारी एक संपूर्ण रात्र म्हणजे स्वर्गाचा आभास आणि त्यातून स्टीफनचा सहवास! माझं मन त्या कल्पनेनंच थुईथुई नाचू लागलं. स्टीफननं फोन केला तेव्हा त्याला होकार देताना, त्या रात्रीच्या कल्पनेनंच माझ्या अंगावर काटा आला. आता व्यवहारी प्रश्न - काय घालायचं? ऑक्सफर्ड स्ट्रीटवरच्या माझ्या क्लासजवळच्याच एका दुकानातल्या पांढऱ्या आणि गर्द निळ्या रंगाच्या दुरंगी सुंदर रेशमी झग्यावर माझी नजर पडली आणि सुदैवानं त्याची किंमतही माझ्या आवाक्यात होती!

केंब्रिजच्या आडमुठेपणामुळे ‘मे बॉल’ ‘मे’ महिन्यात न होता जूनमध्ये होत असे. त्यामुळे मला तयारीला जवळजवळ दोन महिने मिळणार होते. मुख्य म्हणजे पैशांची सोय करणं महत्त्वाचं होतं. त्या रेशमी झग्यानं नाही म्हटलं तरी खड्डा पडलाच होता. शिवाय मला या उन्हाळ्यातही स्पेनला जायचं होतं. मी तात्पुरतं काम शोधून देणाऱ्या सेंट अल्बान्समधल्याच एका संस्थेत नाव नोंदवलं. दीड दिवसांचं हॅटफील्डमधल्या वेस्ट मिनिस्टर बँकेत पहिलंच काम मिळालं.

बघता-बघता मे महिना संपला.

जूनमधल्या एका गरम दुपारी स्टीफन मला ‘मे बॉल’साठी केंब्रिजला न्यायला आला, तेव्हा त्याला पाहून मला धक्काच बसला. त्याची तब्येत कमालीची खालावली होती. आम्ही नाटकाला गेलो होतो, त्या दिवशीचा स्टीफन आणि आजचा - ओळखूच येत नव्हता. त्याने त्याच्या वडिलांची जुनी अवाढव्य फोर्ड गाडी आणली होती. स्टीफनला इंग्लंडमध्ये शिकायला ठेवून बाकी हॉकिंग कुटुंब काही वर्षांपूर्वी भारतात राहिलं होतं. तिथल्या काश्मीरमधल्या नद्यांचे पायउतार बहुधा या गाडीत बसून त्यांनी ओलांडले असावेत. अशक्त, क्षीण, कृश झालेला स्टीफन ती फुरफुरणारी अजस्त्र गाडी कशी ताब्यात ठेवणार हे मला कळेना. स्टीअरिंग व्हीलच्या आधाराने मान वर उंचावून बघितल्याशिवाय त्याला रस्ताही नीट दिसू शकत नव्हता. मी निघण्यापूर्वी स्टीफनची आणि आईची औपचारिक ओळख करून दिली. तिने कुठल्याही प्रकारचं आश्चर्य अथवा धास्ती चेहऱ्यावर दर्शवली नाही. उलट परीकथेतल्या परीसारखी ती दारात उभी राहिली आणि तिच्या राजकन्येला, राजकन्येच्या स्वप्नातल्या राजकुमाराला आणि त्या दोघांना घेऊन विहरत जाणाऱ्या ‘काचेच्या रथा’ला हात हलवून प्रेमाचा निरोप देत राहिली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

काचेचा रथ कसला - त्या लोखंडाच्या रणगाड्यातला भीतीने थरकाप उडवणारा प्रवास सुरू झाला. स्टीफनचे वडील वेगाने आणि बेफाम गाडी चालवण्याबद्दल प्रसिद्ध होते. घाटात, वळणांवरही पुढच्या वाहनाच्या लीलया पुढे जाणे हा त्यांचा परिपाठच होता. ते दुहेरी वाहतुकीच्या रस्त्यावरही उलट्या, चुकीच्या बाजूने वाहन चालवायला कमी करत नसत. स्टीफन त्यांचाच कित्ता गिरवत होता. गाडीने क्षणात वेग पकडला, वारा उघड्या खिडक्यांतून पिसाटासारखा रोरावू लागला. त्या आवाजानं एकमेकांशी एक अक्षरही बोलणं अशक्य झालं. बघता बघता हर्टफोर्डशायरची झाडं, शेतं मागे टाकून आम्ही केंब्रिजशायरच्या उजाड माळरानात शिरलो. मला धीरच होत नसल्याने मी पुढच्या काचेतून दिसणाऱ्या रस्त्याकडे अजिबात पाहत नव्हते आणि ज्यानं त्याच्याकडे पाहायलाच पाहिजे होतं तो वाहनचालकही विलक्षण धाडसानं आणि बेफिकिरीनं बाकी सगळं न्याहाळत त्या रस्त्याकडे अजिबात पाहत नव्हता. आपलं दुर्दैव आपल्याला नुकत्याच दिलेल्या भीषण धक्क्यापेक्षा जास्त क्रूर होऊ शकणार नाही - अशी बहुधा स्टीफनची धारणा असावी आणि त्यामुळेच तो जराही काळजी न करता गाडी सुसाट चालवत होता. मी जीव मुठीत धरून, परत येताना सरळ ट्रेननंच येण्याचा मनोमन निश्चय करत होते. ‘मे बॉल’च्या परीकथेतली चेटकीणच जणू मला सारखी भेडसावू लागली होती.

अखेर ‘रस्त्यांवरील अपघात - कारणे आणि परिणाम,’ या अभ्यासातील निष्कर्षांना खोटं ठरवून, सुदैवाने आम्ही धडधाकटपणे केंब्रिजला पोहोचलो. तीस वर्षांपूर्वीच्या स्थापत्यशैलीत बांधलेल्या विद्यार्थ्यांच्या खोल्या झाडांनी सावली धरलेल्या एका बागेत होत्या. आम्ही पोहोचलो तेव्हा रात्रीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटायला जमलेले इतर आपापल्या तयारीत गुंतले होते. तिथल्या अधिकाऱ्यानं मला देऊ केलेल्या एका खोलीत मी कपडे बदलले. नंतर स्टीफननं त्याचे सहाध्यायी आणि सहनिवासी यांच्याशी माझी ओळख करून दिली. काही जण त्याच्याशी त्याच्या हुशारीशी तुल्यबल अशा भाषेत, कधी कडवट उपहासानं तर कधी कडक टीकेच्या स्वरात, पण सहसा विनोदी थट्टेच्या सुरात बोलत होते. पण त्यांचे सगळ्यांचे त्याच्याशी वैयक्तिक संबंध मात्र अतिशय मृदू, आस्थापूर्ण, प्रेमाचे दिसले. त्यांच्या वागण्यातल्या या तफावतीचं मला नवलही वाटलं आणि त्याचा मेळ कसा घालायचा असा प्रश्नही पडला. प्रत्येकाच्या वागण्याची एक विशिष्ट रीत असते आणि तो नेहमीच त्याच पद्धतीनं वागणार हे गृहीत असतं; पण इथे स्टीफनच्या विरुद्ध मत मांडून त्यासाठी तावातावानं भांडणारे, जोरजोरात वितंडवाद घालणारे पुढच्या क्षणी वाद संपवून, मतभेद विसरून, काहीही न घडल्यासारखे त्याच्या एखाद्या कामासाठी, एखादी गरज भागवण्यासाठी जीव टाकायला तयार होतात, त्याची काळजी करतात आणि घेतात हे मला नवीन, आकलन न होणारं होतं. भावना आणि तर्क, मन आणि बुद्धी यांचे असे स्पष्ट, पूर्णपणे स्वतंत्र विचारमार्ग यापूर्वी मी कधी अनुभवलेच नव्हते. तिथे माझ्या अजाणतेपणाला हलवणारे काही धडे मला शिकायला मिळाले. केंब्रिजच्या जगात असल्या अजाणतेपणाला स्थान नव्हतं.

किंग्ज परेडच्या कोपऱ्यावरच्या पहिल्या मजल्यावरच्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही बरेच जण जेवायला गेलो. माझ्या जागेवरून मला ईस्ट अँग्लियाच्या क्षितिजावरच्या सूर्याच्या मावळत्या प्रकाशाच्या भगव्या रंगाच्या मोहक पार्श्वभूमीवर किंग्ज कॉलेज, चॅपेल, गेटहाउस यांचे उंच मनोरे आणि त्यांचे निमुळते कळस यांच्या रेखीव कृष्ण छायाकृती असा काहीसा गूढ पण रम्य देखावा दिसत होता. आम्ही त्याच्या खोलीवर परतलो आणि आयत्या वेळच्या काही तरतुदी करून कॅम नदीच्या काठच्या ओल्या हिरव्या वाटेनं दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्टीफनच्या ट्रिनिटी हॉल या कॉलेजच्या इमारतीकडे निघालो. स्टीफननं असा आग्रह धरला की, मधे कधी जरा आपल्याला काही वेळ सोहळ्यातून बाजूला व्हावंसं वाटलं, तर त्याचा टेप रेकॉर्डर आणि काही त्याच्या खास आवडत्या टेप्स बरोबर घेऊन जाऊन त्याच्या एका मित्राच्या कॉलेजजवळच्या खोलीवर ठेवाव्यात; पण त्याचं ओझं त्याला स्वत:ला पेलवेना. तसा त्याचा एक मित्र पुढे झाला, त्यानं ते सगळं हसत-हसत उचललं आणि खोट्या-खोट्या नाखुशीनं म्हणाला, ‘‘हं, मला वाटलंच होतं की, हे मलाच उचलायला लागणार!’’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

ट्रिनिटी हॉलच्या परिसरात काही अगदी पुराणकालीन, काही जुन्या, काही क्वीन व्हिक्टोरियाच्या काळातल्या प्रचंड पण कलात्मक नक्षीकामानं नटलेल्या आणि काही अलीकडे बांधलेल्या अशा नानाविध प्रकारच्या इमारती उभ्या होत्या. मधे-मधे सुखद हिरवळी आणि हसऱ्या फुलांचे ताटवे होते आणि कॅम नदीचे मनोहारी दर्शन घडवणारी एक विस्तीर्ण गच्ची होती. आम्ही येताना कॅम नदीवर नुकत्याच बांधलेल्या फुलावरून आलो होतो. पुलाच्या उंच कमानीवर थांबून स्टीफनने मला मुद्दाम लक्षात राहील अशा पद्धतीने अतिशय गंभीरपणे सांगितलं की, त्या पुलाला त्या कॉलेजच्याच एका विद्यार्थ्याचं नाव देण्यात आलं होतं - टिमोथी मॉर्गन. १९६० साली त्याने त्या पुलाच्या बांधकामाचा आराखडा पूर्ण केला आणि त्याला त्यानंतर लगेच अतिशय दु:खद असा मृत्यू आला होता. पुलावरून दिसणारा देखावा खूपच आल्हाददायक होता. तो पाहून मला अ‍ॅलन फोर्नीयर या फ्रेंच लेखकाच्या ‘ल ग्रँड म्युन्स’ या कादंबरीतल्या रहस्यमय अशा रानातल्या घराची आठवण झाली. त्या कादंबरीच्या ऑगस्टिन म्युन्स या नायकाला रानातल्या खोल अंधारात एक प्रकाशाने उजळलेली गढी दिसते. आणि तो गोंधळून, भांबावून तिच्याकडे पाहता पाहताच भविष्याविषयी अनभिज्ञ अशा अवस्थेत आणि त्यात चाललेल्या नृत्य-संगीत यांच्या अनिर्बंध गलबल्यात ओढला जातो.

आम्ही पुलावर उभे असताना ट्रिनिटी हॉलच्या बाजूने बँड्सनी छेडलेली सुरेल सुस्वर धून कानावर पडत होती, नदीपर्यंत पसरलेल्या हिरवळीवर हजारो दिवे लुकलुकत होते. मध्यभागी उभं असलेलं लालसर पानांचं कॉपर बीचचं झाड दिव्यांच्या लोंबत्या सोडलेल्या माळांनी सजलं होतं. झाडाखाली उभारलेल्या मंचावर तरुण-तरुणींच्या जोड्यांनी नृत्याला आरंभही केला होता. हिरवळीच्या एका टोकाला लावलेल्या तंबूत माझी स्टीफनच्या आणखी काही मित्र-मैत्रिणींशी ओळख करून देण्यात आली आणि मग आम्ही प्रत्येकाच्या वाट्याची शँपेन मिळवण्यासाठी लागलेल्या लांब रांगेत उभे राहिलो. शँपेनचा एक मोठा हौदच होता, त्यातून शँपेन ओतून देत होते. त्यानंतर जेवणाच्या टेबलाकडे वळलो. करमणुकीचे नानाविध कार्यक्रम चालू होते. हॉल प्रेक्षक-श्रोत्यांनी भरगच्च भरला होता. शँपेन उसळत होती, उत्साह उधळत होता. तिथल्या व्यासपीठावरही नाचगाणी चालू होती. एका सजवलेल्या बंद खोलीत चार वादक तंतुवाद्यांवर सपाईदार बोटांनी कोमल स्वर छेडून श्रोत्यांना बेहोश करत होते, तर बाहेर हिरवळीवर जमैकन बँडचे वादक तालवाद्यांवर बोटांच्या नाचाने श्रोत्यांना बेभान बनवत होते. ताल सूर यांनी भारलेल्या वातावरणाला ओल्ड लायब्ररीच्या कोपऱ्यात मिळणारे कोळशाच्या रसरशीत शेगडीच्या निखाऱ्यांवर खरपूस भाजलेले गरम-गरम कुरकुरीत चेस्टनट्स चवदार बनवत होते. आमच्या बरोबरची मंडळी पांगली आणि आम्ही दोघंच गच्चीवर उरलो. दूरवर कॅम नदी आणि खालच्या हिरवळीवर जमैकन बँडच्या तालवाद्यांच्या ठेक्यावर नृत्य करताना गुंगलेल्या, एकमेकांत हरवलेल्या जोड्या. ‘‘माप कर हं, मला नाचता येत नाही.’’ स्टीफन मला म्हणाला. ‘‘ठीक आहे, त्यानं काही बिघडत नाही.’’ मी खोटंच सांगितलं!

आणखी थोडी शँपेन पोटात गेली आणि खाण्याचाही आणिक एक हप्ता झाला. त्या वेळी हिंडताना आम्हाला एका तळघराचा शोध लागला. तिथल्या एका अंधाऱ्या खोलीत जाझ बँड वाजत होता आणि एक प्रकारच्या विचित्र अशा मंद निळसर प्रकाशात स्त्री-पुरुषांच्या जोड्या त्या संगीताच्या सुरावर झुलत नृत्य करत होत्या. स्त्रिया तर अंधारात बुडूनच गेल्या होत्या, पुरुषांच्या शर्टांचा पुढच्या बटणांजवळचा काही भाग आणि बाह्यांची टोकं त्या प्रकाशात जांभळ्या रंगात चमकत होती. मला आश्चर्यच वाटलं. स्टीफननं त्याचं स्पष्टीकरण असं दिलं की, शर्ट धुतल्यानंतरही त्यावर राहिलेलं धुण्याच्या साबणातलं एक रसायन त्या विशिष्ट प्रकारच्या प्रकाशात चमकतं. स्त्रियांचे पोशाख सहसा नवीन असल्यानं ते चमकत नाहीत. मी स्टीफनला खूप आग्रह करून त्या धिम्या नृत्यात सामील व्हायला राजी केलं आणि आम्ही दोघं काही वेळ त्या चमकत्या शर्टांची मजा बघत, जाझच्या सुरांवर डोलत राहिलो. दुर्दैवानं काही वेळातच त्या बँडनं गाशा गुंडाळला आणि आमचं नृत्य संपलं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

रात्र सरली. अगदी सकाळी-सकाळी इतर कॉलेजातल्या ‘मे बॉल’ची सुरुवात झाली आणि उत्साही लोक तिकडे वळले. आम्ही ट्रिनिटी स्ट्रीटवरून कॉलेजकडे गेलो. विद्यार्थी राहत असलेल्या तिथल्या एका इमारतीतल्या खोलीत एका विद्यार्थ्याच्या समजूतदार, हुशार, चटपटीत मैत्रिणीनं नाश्ता बनवायला सुरुवात केली होती. आम्ही तिथे थांबलो. पण एका आरामखुर्चीत बसल्या-बसल्या मला गाढ झोप लागली. कुणी तरी आधार देऊन अर्धवट झोपेतच मला अ‍ॅडॅम्स रोडवरच्या स्टीफनच्या खोलीपर्यंत आणलं. मी तिथे आरामात जी ताणून दिली ती दुपारपर्यंत.

पाहुण्या जोडीदारांसाठी त्या दिवसाचा कार्यक्रम एखाद्या प्रवासी कंपनीच्या कार्यक्षमतेने आखला होता आणि तो मुळीच कंटाळवाणा नव्हता. स्टीफनचे दोन मित्र, निक ह्युजेस आणि टॉम वेस्ली हे रसायनशास्त्रात पीएच.डी. करत होते. त्याबरोबरच ते दोघे केंब्रिजमधल्या युद्धानंतर बांधल्या गेलेल्या इमारतींसंबंधी माहिती देणाऱ्या ‘केंब्रिज न्यू आर्किटेक्चर’ या मार्गदर्शिकेचं संपादन करण्याचं कामही सांभाळत होते. ती मार्गदर्शिका १९६४मध्ये प्रकाशित व्हायची होती. या त्यांच्या उद्योगात स्टीफनला रस निर्माण झाला होता आणि तो त्यांना त्याचा काही वेळ देऊन त्यांचा सल्लागार म्हणून काम करत होता. ज्यांना इच्छा असेल अशांना त्यातल्या काही इमारती दाखवायला ते तिघेही आतूर होते. आज त्या इमारतींकडे कुणी लक्षही देत नाही, पण त्या काळात त्या इमारती युद्धानंतरच्या नव्या पर्वाच्या जडणघडणीच्या, विस्तारप्रकल्पाच्या द्योतक म्हणून फार महत्त्वाच्या मानल्या जात. नव्या इमारती, रस्ते आणि विद्यापीठाचा विस्तार यात अडथळा निर्माण करणाऱ्या जुन्या-फुराण्या इमारती, झाडं, कुरणं यांची कुणीही काळजी करत नव्हतं. पर्यावरणाच्या संरक्षणाची लाटही अजून यायची होती.

ते तिघे जण त्यांच्या अभ्यासाच्या क्षेत्राविषयीच्या कळकळीनं आणि उत्साहानं, त्या विषयातलं अज्ञान चेहऱ्यावरही सहजी दिसून येणाऱ्या माझ्यासारख्या स्त्री पाहुण्यांनाही नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या, बांधकाम चालू असलेल्या निरनिराळ्या इमारतींच्या जागांच्या निवडीतली वैशिष्ट्यं अगदी तपशीलवार समजावून सांगत होते. ह्यु कॅसन या प्रसिद्ध स्थापत्यविशारदाच्या सिडविक साइट आणि चर्चिल कॉलेज या इमारतींना आम्ही भेटी दिल्या. ‘या देशात पुरेसे संशोधक आणि तंत्रज्ञ नाहीत,’ या सर विन्स्टन चर्चिल यांनी व्यक्त केलेल्या गंभीर चिंतेपोटी १९५८मध्ये या चर्चिल कॉलेजची स्थापना केली गेली होती आणि त्यांच्या स्मरणार्थ त्याला त्यांचंच नाव देण्यात आलं होतं. हार्वे कोर्ट, गॉनव्हिल आणि कायस विकास प्रकल्प या ठिकाणी तर ‘केंब्रिज न्यू आर्किटेक्ट’च्या संपादकांना भावनाविवश झाल्यानं बोलणं अशक्य झालं. ‘‘या नूतन प्रयोगामुळे इथे राहणाऱ्यांना आयुष्याच्या नव्या पद्धती आवडून घ्याव्याच लागतील’’ अशा शब्दांत त्यांनी त्या प्रकल्पांचं वर्णन केलं. ते असंही म्हणाले की, ‘कॉलेजमध्ये निवासाचा जो प्रश्न आहे त्यावर नवा, सुयोग्य असा उपाय शोधण्याचा हा केंब्रिजचा धाडसी प्रयत्न आहे’. त्या वेळी मला कुठे माहीत होतं की, बारा वर्षांनंतर या नवजीवनाच्या प्रयोगस्थळाच्या शेजारीच मी राहणार आहे? आमच्या या स्थळयात्रेच्या अखेरीला रिवाजाला थोडीशी मुरड घालून, आमच्यासारख्या बुद्धिमत्तेत जरा डाव्या असलेल्या पाहुण्यांनाही किंग्ज कॉलेजच्या चॅपेलमध्ये आत डोकावून पाहण्याची अमोल संधी देण्यात आली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

दुपारचं जेवण झालं. मग आम्ही छोट्या नावेतून नदीत एक फेरफटका मारला. त्यानंतर परतीच्या प्रवासाविषयी चर्चा सुरू झाली. तशी जरा अनिश्चित स्वरात मी स्टीफनला म्हणाले, ‘‘मला वाटतं मी ट्रेननं जाणं सोयीचं होईल.’’ त्याला स्टीफननं स्पष्ट नकार दिला. तो काहीही ऐकायला तयार नव्हता. त्याला दुखवणं माझ्याही जिवावर आलं होतं, त्यामुळे मी मनात दहशत असून निमूटपणे रणगाड्यात जाऊन बसले. परतीचा प्रवास कुठल्याही बाबतीत येतानाच्या प्रवासापेक्षा कमी नव्हता! मी ‘मे बॉल’चा आनंद मनापासून लुटला पण आम्ही जसजसे सेंट अल्बान्सच्या जवळ येऊ लागलो, तसतसा ‘परत आयुष्यात या गाडीतून प्रवास न करण्याचा,’ माझा निश्चय पक्का होत गेला. आम्ही माझ्या घरापाशी पोहोचलो, तेव्हा माझी आई घरापुढच्या बागेतच होती. मी स्टीफनच्या गाडी चालवण्यावरच्या रागामुळे, अगदी तुटक शब्दात त्याचे कोरडे आभार मानून, मागेसुद्धा न पाहता सरळ घरात निघून गेले. आई माझ्या मागोमाग आत आली आणि रागावून म्हणाली, ‘‘तू त्या बिचाऱ्याला एक कप चहासुद्धा विचारणार नाहीस?’’ तिला माझं वागणं बेपर्वाईचं वाटलं होतं. मलाही माझी चूक लक्षात आली आणि मी उलट्या पावली बाहेर पळत गेले. सुदैवानं स्टीफन अजून गाडी सुरू करत होता. त्यानं गाडी सुरू करताना बहुधा ब्रेक्स सैल केले होते, त्यामुळे गाडी एकदम उतारावर घरंगळू लागली; पण ते लक्षात येताच त्यानं चपळाईनं ब्रेक्स लावले, गाडी व्यवस्थित उभी केली आणि माझ्याबरोबर चहा घ्यायला तो आत आला. आम्ही दोघं बागेच्या दारातच उन्हात बसूनच चहा प्यायलो. माझ्या आईला ‘मे बॉल’ची हकिगत सांगताना स्टीफन अनेक प्रसंगांची अगदी रसभरित वर्णनं करत होता, सगळे तपशील त्याच्या लक्षात होते. त्याचं बोलणं ऐकता-ऐकता माझ्या असं लक्षात आलं की, तो खूप मोहक आहे आणि मला तो खूप आवडतो आहे. इतका की, त्याचं भीतिदायक गाडी चालवणंही मी माफ करू शकते, फार तर त्याच्याबरोबर अगदी कमीत कमी वेळा मी गाडीत बसेन म्हणजे झालं! पण तोच आहे माझ्या स्वप्नातला राजकुमार, नसेना का त्याच्याकडे ‘काचेचा रथ!!’

सेंट अल्बान्समधल्या एका संस्थेतर्फे काही फ्रेंच तरुण-तरुणींना आपल्या घरात राहायला जागा देऊन कुटुंबात सामील करून घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं होतं. माझ्या आई-वडिलांनी त्याला प्रतिसाद दिला आणि एक सोळा वर्षांची फ्रेंच मुलगी आमच्या घरी राहायला आली. विचित्र योगायोग असा की, त्या मुलीची अगदी जवळची मैत्रीण हॉकिंग यांच्या कुटुंबात राहत होती. ‘मे बॉल’नंतरच्या एका लगेचच्या शनिवारी इझाबेल हॉकिंग यांनी त्या दोन फ्रेंच मुली आणि मी अशा तिघींना त्यांच्यासमवेत केंब्रिजला येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांच्या वाहन चालवण्यात त्यांचा नवरा आणि मुलगा यांच्या कोणत्याही भयानक पद्धतींचा समावेश नव्हता. त्यामुळे मला हायसं वाटलं. त्यांच्या बोलण्यातून त्यांची बुद्धिमत्ता आणि विनोदी वृत्ती यांची साक्ष पटत होती. त्यांनी बरोबर काही चविष्ट खाद्यपदार्थ आणले होते. त्याला त्यांनी ‘थंड फराळ’ असं नाव दिलं होतं. स्टीफनच्या अ‍ॅडम्स रोडवरच्या खोलीच्या व्हरांड्यात बसून आम्ही ते खाल्ले.

या ना त्या प्रसंगाने हळूहळू मी आणि माझे कुटुंबीय हॉकिंग मंडळींच्या जास्त जास्त संपर्कात येत राहिलो आणि त्यामुळेच पुढच्या वेळी जेव्हा स्टीफन आठवडाअखेरीला सेंट अल्बान्सला सुट्टीला आला, तेव्हा माझ्या आई-वडिलांनी त्याला एका रात्री घरी जेवायला बोलावलं. त्याच्या ‘वरलिया रंगा’ न भुलता त्यांनी त्याची व्यवस्थित खातीरदारी केली. स्टीफन परत त्याच्या जुन्या वळणावर गेला होता. केस आणखीच वाढले होते. ते मातकट काळ्या रंगाचं जॅकेट आणि लाल रंगाचा वेलवेटचा सैल कसातरी गाठ बांधलेला बो परत आला होता. सर्वमान्य शिष्टाचारांविषयी आग्रही असणाऱ्या माझ्या पालकांना स्टीफनच्या त्या दर्शनानं जरा धक्काच बसला असावा. जरासा दिलासा एवढाच होता की, काही काळ तरी त्यांची मुलगी त्या विचित्र मुलापासून दूर राहणार होती. मी लवकरच स्पेनला जाणार होते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

जुलैच्या सुरुवातीलाच एका सकाळी माझ्या वडिलांनी मला गॅटविकच्या विमानतळावर सोडलं. आमच्या गावातल्या डॉक्टरांचा एक ओळखीचा माणूस - बिल लुईस, मला माद्रिदला भेटणार होता. अखेरीस मी जेव्हा तब्बल चार तास उशिरा म्हणजे दुपारी पाच वाजता कस्टममधून बाहेर आले, तेव्हा तो मात्र या उशिरामुळे चिंतित होता आणि वैतागलेलाही होता. पण मला पाहिल्यावर मात्र तो विनोदानं म्हणाला, ‘‘मला वाटलं आता तुम्ही उत्तर ध्रुवाला वळसा घालूनच येणार बहुतेक!’’ मला त्यानं आधी त्याच्या घरी नेलं. त्याच्या पत्नीला भेटवलं. ‘कुठल्याही दिवशी संध्याकाळी सहानंतर तू आमच्याकडे आलीस ना तर आम्ही अगदी निश्चित घरात असू, तू जरूर ये,’ असं मला तिनं खूप प्रेमाचं आमंत्रण दिलं. नंतर मग बिलनं माझी राहण्याची सोय जिथे केली होती, तिथे तो मला घेऊन गेला.

एक दिवस वातानुकूलित ट्रेन पकडून मी कॅनडाला निघून गेले आणि तिथल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहात मुक्काम ठोकला. कॅनडा म्हणजे सौंदर्य आणि क्रौर्य यांचं एक अनोखं मिश्रण होतं.

मनाला झपाटून टाकणाऱ्या, मनावर परिणाम करणाऱ्या त्या सौंदर्यपूर्ण शहरात असं एकटंच हिंडताना विचारही भटकत राहत आणि मग त्यातून मला एकटेपणाचे, निराशेचे, खिन्नतेचे झटके येत. त्यापूर्वीही अशा मनाला झाकळून टाकणाऱ्या उदासीनतेचे क्षण मी अनुभवले होते. ‘असं का होतं मला?’ या प्रश्नाचं उत्तर, जे मला याआधी सापडलं नव्हतं ते त्या वेळी गवसलं. मला माझे विचार, माझे अनुभव, माझी सुखदु:खं सांगायला माझं असं कुणीतरी हवं होतं. माझ्या असंही लक्षात आलं की, तो ‘कुणीतरी’ इतर कोणी नसून स्टीफन आहे! आम्हा दोघातला सुसंवाद इतक्या अल्प वेळात जुळला होता की, आमच्या दोन मनात एकतानता आणि जवळीक निर्माण होणार हे निश्चित होतं; पण त्याच्या शारीरिक स्थितीमुळे, त्याच्या आजारामुळे ते नातं अस्थिर, असुरक्षित, कदाचित अल्पजीवी आणि म्हणूनच अतिदु:खकारक ठरू शकलं असतं. मी त्याची शक्ती बनू शकेन का? त्याच्यातल्या बीजाचा विकास घडवायला त्याची मदत करणं मला जमेल का? त्याच्या आयुष्यात मला थोडातरी आनंद निर्माण करता येईल का? मला स्वत:च्या क्षमतेविषयी खात्री नव्हती. माझ्या वसतिगृहातल्या नव्या ‘आंतरराष्ट्रीय’ मित्रांजवळ मी माझं मन मोकळं केलं, तेव्हा त्या सगळ्यांनी मात्र मला उत्तेजन दिलं, त्याच दिशेनं पुढे जावं असा आग्रह केला, ‘‘त्याला तुझी गरज आहे, तर तू पुढे होऊन त्याचा हात धरलाच पाहिजेस!’’

मनात चाललेल्या या द्वंद्वाचा मी सामना करत होते. साहसाच्या बाजूला मन ओढ घेत असतानाच त्या विचारांचं गारूड माझ्या मनात टाकणाऱ्या कॅनडापासून मी दूर जायचं ठरवलं आणि एके दिवशी, फिरत्या विक्रेत्यांच्या आणि त्यांच्या पंखांचा फडफडाट आणि कलकलाट करणाऱ्या सजीव, निर्जीव मालानं आणि त्यांच्या संमिश्र वासानं भरलेल्या, उन्हानं तापलेल्या एका बसमध्ये बसले.

दुसऱ्या दिवशी एका खास विद्यार्थ्यांसाठी आयोजलेल्या विमानात बसून मी इंग्लंडला परतले. त्या वैशिष्ट्यपूर्ण देशाच्या भूमीतली अनेकविध चांगली वाईट दृश्यं, मनात विरोधी भावना जागवणारे अपूर्व अनुभव, परिणाम करणाऱ्या ओळखी हे सारं मागे सोडताना डोळे ओले झाले; पण इथे माझ्यापुढे आता विभिन्न, काहीशा परस्परविरोधी अशा अनेक शक्यतांच्या उलगडणाऱ्या मालिकेनं ते दिपून गेले - त्याला कारण होती, एकटीनं केलेल्या त्या सफरीत माझ्या पुढ्यात प्रकट होऊन समोर ठाकलेली, आजवर मनात ‘दडलेली सत्यं!’

.............................................................................................................................................

‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी - माय लाइफ विथ स्टीफन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4396

‘काळाचा छोटासा इतिहास’ या स्टीफन हॉकिंग यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/3014

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......