शेत-शिवारातलं मूळ दुखणं दूर होत नाही, तोवर वावरातली आग भडकतच राहणार
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • महाराष्ट्र राज्य किसान सभा - नाशिक ते मुंबई लाँग मार्च
  • Wed , 14 March 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर शेतकरी मोर्चा Shetkari Morcha देवेंद्र फडणवीस Devendra Phadanvis लाँग मार्च Long March

१२ मार्च हा दिवस शेतकरी आंदोलनात ऐतिहासिक दिवस म्हणून नोंदवला जाईल. किसान सभेच्या लाँग मार्चपुढे झुकून महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांच्या जवळपास साऱ्या मागण्या लेखी मान्य केल्या. नाशिक ते मुंबई असं २०० किलोमीटर अंतर रणरणत्या उन्हात चाललेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या लढाईचं हे मोठं यश आहे. १२ मार्च १९३० या दिवशीच ८८ वर्षापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दांडी मार्च काढला होता. ‘मिठाचा सत्याग्रह’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. गांधीजींनी मूठभर मीठ उचललं आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला. त्या लढाईची आठवण लाँग मार्च करणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक करताना कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी मुंबईत आझाद मैदानात करून दिली. दांडी मार्च ते हा लाँग मार्च असं संघर्षाचं नातं त्यातून स्पष्ट झालं.

नाशिकहून हा मोर्चा निघाला तेव्हा सत्ताधाऱ्यांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नीट नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘यातले ९५ टक्के आंदोलक शेतकरी नाहीत.’ खासदार पूनम महाजन यांनी तर आपण किती पोरकट आहोत याचा नमुना जगजाहीर केला. त्या म्हणाल्या, ‘हे शेतकरी नक्षलवादी आहेत.’ सूर्य आग ओकतो आहे आणि दररोज ३० किलोमीटर तापलेल्या डांबरी रस्त्यावरून शेतकरी मुंबईच्या दिशेनं न्याय मागण्यासाठी चालतोय. मोर्चात संयम, शिस्त कमालीची होती. एरवी आंदोलक इतरांना त्रास देण्याच्या मानसिकतेत जास्त असतात. हुल्लडबाजी करतात. नासधूस, तोडफोड करण्याकडे कल असतो. पण हे आदिवासी-शेतकरी मुळातच सहनशील. त्यांचा संयम बघून रस्त्यावरच्या गावांनी त्यांना साथ दिली. लोकांनी पाणी दिलं, अन्न दिलं. लोक आंदोलकांशी सहानुभूती दाखवू लागले. कसारा-शहापूर परिसरात हा साध्या माणसांचा एल्गार आला आणि त्याची संख्या, प्रभाव माध्यमांच्या डोळ्यात ठसला. अगोदर माध्यमं त्याकडे लक्ष देत नव्हती. ठाणे जिल्ह्यात मोर्चा घुसला आणि त्याचं भव्य रूप बघून सत्ताधारी चपापले. विरोधी पक्ष मोर्च्याला पाठिंबा देऊ लागले. लाल टोप्या, लाल झेंडे, विळा-हातोड्याचे चित्र, करपलेल्या चेहऱ्याचे आंदोलक हे चित्र जनमानसाला हलवून सोडणारं होतं.

ठाण्यात मोर्चा आल्यानंतर लाँग मार्चचं रूपांतर लाल वादळात झालं. तेव्हा कुठे सत्ताधारी हादरले. शिवसेनेनं मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे मोर्च्याला सामोरे गेले. पाठिंबा देऊन थांबले नाही तर मोर्चेकऱ्यांना सुविधा पुरवते झाले. ठाणे-मुंबई प्रवासात माध्यमांनी मोर्च्याचं जे रिपोर्टिंग केलं, त्यातून आदिवासी शेतकऱ्यांच्या असंतोषाचं विराट रूप सरकारच्या ध्यानी आलं. जवळपास ३० हजार आदिवासी शेतकरी विधान भवनाला घेराव घालतील, मुंबईत रस्त्यावर येतील, तर काय परिस्थिती उदभवेल याची कल्पना पहिल्यांदा पोलीस खात्याला आली. १० हजार पोलीस मोर्चेकऱ्यांच्या दिमतीला ठेवावे लागले. १०-१२ वीच्या परीक्षा होत्या. त्यामुळे परीक्षार्थी मुलांचे हाल होणार, वाहतूक कोंडी होणार त्यातून मार्ग काढण्यासाठी पहिल्यांदा आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरात लवकर तोडगा काढावा, यासाठी पत्र लिहून पुढाकार घेतला. लाँग मार्चचे नेते आमदार जिवा पांडू गावित, कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड अजित नवले आणि मुख्यमंत्री यांचा संवाद घडवून आणला. कपिल पाटील यांच्या या रदबदलीमुळे आंदोलक आणि सरकार यांच्यामधील कटुता कमी होऊन विधानभवनात मुख्यमंत्र्यांसोबत आंदोलक नेत्यांची सविस्तर चर्चा झाली. सर्वच मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग निघाला. आदिवासी शेतकऱ्यांना वनजमिनीवरचा हक्क मिळण्यासाठी महत्त्वाचं पाऊल पुढे पडलं. ४ हेक्टर म्हणजे १० एकरपर्यंत जमीन आदिवासी शेतकऱ्याला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

आजवर आदिवासींना शेतकरी मानलं जात नव्हतं. त्यांच्या नावावर ७/१२ नसायचा. आता या आंदोलनामुळे आदिवासींना शेतकऱ्यांचा दर्जा मिळेल. जुन्या शिधापत्रिका बदलून देणार, रेशन दुकानात त्वरित धान्य मिळणं, निराधार वृद्धांना मिळणारं अर्थसहाय्य वाढवून मिळणं, शेतीमालाला हमीभाव, कृषी मूल्य आयोगाचं कामकाज गतिमान करणं, उत्तर महाराष्ट्रातील नद्यांचं पाणी अरबी समुद्राला जातं ते अडवणं, गुजरातला जाणारं महाराष्ट्राचं पाणी जाऊ न देणं, शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल करणं, विदर्भ-मराठवाड्यातील बोंड अळीग्रस्त कापूस शेतकऱ्यांना पिक भरपाई मदत अशा महत्त्वाच्या मागण्या वेळेत पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन फडणवीस सरकारने मोर्चेकऱ्यांना दिलंय. हे या आंदोलनाचं अभूतपूर्व यश मानता येईल.

या लाँग मार्चनं सरकारला शांततेच्या मार्गानं लढून कसं नमवता येतं, आपल्या मागण्या मान्य करता येतात याचा नवा मार्ग दाखवलाय. या मोर्चाचे खरे हिरो ठरले आमदार जिवा पांडू गावित. गावित हे कम्युनिस्ट पक्षाच्या केडरमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ-सुरगाणा या भागावर त्यांची पकड आहे. या आदिवासी परिसरात घराघरात कम्युनिस्ट कॉम्रेड त्यांनी तयार केले. हे हाडाचे कार्यकर्ते या मोर्च्यात होते. मोर्च्याची राजकीय जाण प्रगल्भ दिसली. ती जाण कम्युनिस्ट चळवळीच्या जडणघडणीतून आलेली आहे. घोषणा कशा द्यायच्या, गाणी कशी म्हणायची? कुठे आक्रमक व्हायचं? कुठे संयम पाळायचा? याचं शिक्षण या चळवळीत मिळतं. अशी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची नाशिक-ठाणे जिल्ह्यातली फौज होती म्हणून हा लाँग मार्च प्रभावी ठरला. राज्यभरातले कॉम्रेडही या मोर्च्यात सहभागी होते.

आंदोलक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाहीत, हे लोकमनाला पटलं तर समाज आंदोलकांना मदत करतो, हे या मोर्च्यात दिसलं. बिनचेहऱ्याची माणसं मोर्च्यातल्या आंदोलकांना पाणी, जेवण देत होती. मुस्लीम, शीख समुदाय मोर्चेकऱ्यांना जेवू घालत होता. डबेवाले पुढे आले. स्वयंसेवी संस्था, लोक आंदोलकांना मदत करू लागले. हे मुंबईत दिसलेलं चित्र आपला समाज जागृत आहे याची खात्री देऊन गेलं. मुंबईनं, साऱ्या समाजानं आंदोलकांना आपलं मानलं आणि तिथंच आंदोलनाचा मोठा विजय झाला. ‘लोक विरुद्ध सरकार’ अशी सरळ लढाई झाली तर लोकच जिंकणार हे सत्ताधाऱ्यांना चांगल कळतं. फडणवीस सरकारलाही ते कळलं. सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं सहा दिवस उन्हातान्हात चाललेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला. अन्नदात्याचा आवाज देशभर पोचला.

या आंदोलनात आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी वावरातली आग त्यामुळे खरोखर शमेल काय? शेती-ग्रामीण भाग खूप मोठ्या अरिष्टातून वाटचाल करतोय. त्या आगीची धग बसतेय म्हणून मराठा मोर्चे निघाले. आताचा लाँग मार्च निघाला. शेत-शिवारातलं मूळ दुखणं जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत वावरातली आग भडकतच राहणार. ही आग शमवायची तर विकासाची संकल्पना उलटी करावी लागणार. शेती उद्ध्वस्त करून उद्योग वाढवायचे, उद्योगांना, विकास प्रकल्पांना जमिनी द्यायच्या, शेतकरी उखडून टाकायचे. जी शेती पिकते तिच्या उत्पादनांना हमीभाव द्यायचा नाही, ही आपली देशव्यापी नीती आहे. या नीतीमुळे शेती संकट गडद बनत चाललंय.

या नीतीविरोधात देशातल्या १९३ शेतकरी संघटना एक झाल्यात. त्यात खासदार राजू शेट्टी आहेत. कम्युनिस्ट, किसान सभाही आहे. मुंबईच्या या मोर्चानं शेतकरी उद्या दिल्लीतल्या कारभाऱ्यांनाही नमवू शकतील हा धडा घालून दिलाय. उद्या वावरातली आग दिल्लीतही पेट घेणार नाही असं कुणी मानू नये. 'मुंबई तो झांकी है, दिल्ली अभी बाकी है!' ही या आंदोलनातली घोषणा होती. पुढे काय घडणार हे स्पष्ट करायला ही घोषणा पुरेशी आहे.

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sourabh suryawanshi

Wed , 14 March 2018

social mediavr आता प्रचार चालुय की मोर्चेकर्यांची जाण्याची सोय सरकारने केली आता बाकीचे कुठंयत? स्वतः ची पाठ थोपटून घायची आणि काय...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......