बाळकृष्ण दोशी : जनमानसाच्या हितासाठी काम करणारा योद्धा
पडघम - सांस्कृतिक
वर्षा हळबे
  • प्रख्यात वास्तुविशारद बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी
  • Mon , 12 March 2018
  • पडघम सांस्कृतिक बालकृष्ण विठ्ठलदास दोशी Balkrishna Doshi Pritzker Prize प्रीट्झकर प्राईझ

प्रख्यात वास्तुविशारद बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी यांना ७ मार्च २०१८ रोजी वास्तुशास्त्रातील सर्वोच्च सन्मान- प्रीट्झकर प्राईझ जाहीर झाले आहे. पुरस्कार वितरण सोहळा येत्या मे महिन्यात टोरँन्टोतल्या आगा खान संग्रहालयात पार पडेल. दोशी या सन्मानाचे पहिले भारतीय हक्कदार असून, ही गोष्ट भारतासाठी देखील अत्यंत गौरवशाली आहे.

१९२७ सालचा पुण्याचा जन्म असलेले  दोशी या वर्षी ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांची वास्तुशास्त्रातील कारकीर्द लक्षात घेता, हा पुरस्कार मिळायला त्यांना जरा उशीरच झाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. दोशी यांना याआधी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या पेनसिल्वानिया विद्यापीठाने त्यांना ऑनररी डॉक्टरेट दिली आहे.

दोशी यांनी १९४७ साली सर जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून वास्तुशास्त्राचे शिक्षण घेतले. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी पॅरिसला जाऊन ल कॉर्बुसियेर या सुप्रसिद्ध वास्तुविशारदाच्या हाताखाली केली. त्यांना दोशी गुरुस्थानी मानतात. हातात पैसा नव्हता, पण शिकण्याची जिद्द दांडगी होती. यश हाती आल्यावरदेखील त्यांनी पैशासाठी आपल्या तत्त्वांशी आणि डिझाईनशी कधीच तडजोड केली नाही.

दोशींना कॉर्बूसियेरचे डिझाईन आवडते कारण ते कुठल्याही नियमात जखडलेले नसते आणि त्यामुळे जी कलाकृती निर्माण होते ती अतिशय प्रवाहजनक, लोभक आणि वापराच्या दृष्टीने सुलभ असते. त्यात निसर्गाच्या चक्रांचा योग्य उपयोग केलेला दिसतो.

दोशींच्या डिझाईनमध्ये भारतीय संस्कृती आणि अर्वाचीन वास्तुशास्त्राची छान सांगड लक्षात येते. त्यांचं म्हणणं असतं की, भारतीयांचं आयुष्य म्हणजे एक उत्सव आहे. आणि हीच गोष्ट त्यांच्या डिझाईनमधून अभिप्रेत होते.

भारतात परतल्यावर त्यांनी चंदिगड शहरातील ल कॉर्बुसियेरनं डिझाईन केलेल्या प्रोजेक्टवर देखरेख केले. आजही चंडिगड हे शहर वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून आदर्श मानलं जातं. दोशींचं म्हणणे आहे की, चंडिगडचे डिझाईन करून ल कॉर्बुसियेरनं लोकांच्या लक्षात आणून दिलं की सूर्य, चंद्र, तारे, वारे, ऋतू हे सर्व काही अजूनही अस्तित्वात आहे. 

१९५५ साली दोशींनी त्यांच्या ‘वास्तू-शिल्प’ या स्टुडिओची स्थापना केली. त्या काळात त्यांना लुई कहान आणि अनंत राजे या वास्तुविशारदांबरोबर काम करायची संधी मिळाली. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या डिझाईनमध्ये लुई कहानबरोबर त्यांनी काम केलं. नंतर १९६२ मध्ये तिथेच त्यांनी स्कूल ऑफ आर्किटेक्चर सुरू केलं. या स्कूलसाठी त्यांनी १९६२ ते १९७२ पर्यंत डीन म्हणून काम केलं. त्यानंतर १९७२ साली सेंटर फॉर एनव्हायरन्मेंटलं प्लॅनिंग अँड टेक्नोलॅाजी सुरू केलं (ज्याला २००२ साली ‘सेप्ट’ असं नाव देण्यात आलं), ज्याचे ते १९७९ पर्यंत डीन राहिले. अहमदाबादमधील कनोरिया सेंटर फॉर आर्ट्सचेही ते संस्थापक संचालक राहिले आहेत.

१९७८ साली दोशींनी अहमदाबादच्या कर्णावती रस्त्यावर स्वतःचं ऑफिस डिझाईन केलं. ते १९८० साली बांधून पूर्ण झालं. त्याला त्यांनी ‘संगठ’ असं नाव दिलं, move together through participation  - या अर्थानं. या ऑफिसचं छप्पर घुमटांच्या आकाराचं आहे, जशा भारतातील ऐतिहासिक वास्तू आहेत. बांधकामासाठी वापरलेले घटक स्थानिक ठिकाणी उपलब्ध असणारे आहेत. या वास्तूत सांस्कृतिक घटकांचा समावेश आहे, पण त्याचबरोबर ही वास्तू अनेक आधुनिक बांधकामांसारखीदेखील आहे. सबंध ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये उघडी अंगणं आहेत आणि बंद खोल्यादेखील. दोशींचं म्हणणं असतं की, अशा रचनेमुळे ‘खेड्यापाड्यातला अमुक एक जागा कोणा एकाची नसून, ती सर्वांच्या सोयीसाठी असते’ हा हेतू साध्य होतो. दुसरं आपण केवळ स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांच्या प्राधान्यांनाही महत्त्व द्यायला हवं, याची जाणीव होते. या ऑफिसमध्ये नैसर्गिक उजेडाचा उत्तम प्रकारे वापर केला गेला आहे. जेणेकरून ही वास्तू sustainable होऊ शकेल. बाहेरील बाजूस एक अॅम्फी थिएटर आहे. यातून पुन्हा एकदा आपल्या सांस्कृतिक मूल्यांचं संबोधन होतं. इथं सगळे एकत्र जमून मिटिंग्ज, चर्चासत्र इत्यादी भरवली जातात.

दोशींच्या वास्तुशास्त्रात दोन गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. पहिली, नवनवीन कल्पना वापरून एखादी वास्तू sustainable कशी बनवता येईल; म्हणजे त्या वास्तूची कार्बन फूटप्रिंट कशी कमीत कमी ठेवता येईल. दुसरी, बांधकामाची किंमत आणि विकत घेणाऱ्याची किंमत किमान कशी ठेवता येईल. इंदूरमध्ये त्यांनी केलेल्या अरण्य लो-कॉस्ट हौसिंगमध्ये ८०,०००हून अधिक लोक आपल्या मालकीच्या घरांमध्ये राहत आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये एका खोलीची छोटी घरं आहेत आणि प्रशस्त मोठी घरंदेखील आहेत, जी दुसऱ्यांबरोबर सार्वजनिक अंगणं वाटून घेतात. इथं पुन्हा एकदा, शेजारपाजार, कम्युनिटीमध्ये जागेचं योग्य वाटप जेणेकरून लोकांमध्ये देवाणघेवाण राहील, प्रेम-सदभाव राहील हे घटक लक्षात येतात.

दोशी नेहमी त्यांच्या डिझाईनमध्ये खाजगी, अर्ध-खाजगी आणि सार्वजनिक जागेचा उपयोग करतात. जयपुरातल्या विद्यानगरच्या मास्टर प्लॅनमध्ये दोशींनी पावसाच्या पाण्याचा कसा वापर करता येईल आणि ते पुन्हा कसं वापरता येईल हे दाखवून दिलं आहे. त्या प्लॅनमध्ये त्यांनी जयपूरच्या जुन्या शहराच्या आखणीचा उपयोग केला आहे.

‘अमदावाद नी गुफा’ या त्यांच्या प्रसिद्ध चित्रकार मक़्बूल फिदा हुसैन यांच्या चित्रकलेसाठी बांधलेल्या कलादालनातून असं जाणवतं की, जणू हा एक वास्तुविशारदाचा आणि एका चित्रकाराचा अनोखा मेळ आहे. त्यातून एक वेगळीच चमत्कृती जन्माला आली आहे. एक तर हे कलादालन जमिनीच्या खाली आहे आणि त्यात वेडेवाकडे खांब आहेत. जणू गुहेत कॅल्शियमचे नैसर्गिक खांब (stalactites and stalagmites) आहेत आणि ते एका ओबडधोबड छताला आधार देत आहेत.

त्यांनी केलेल्या बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या डिझाईनमध्ये शिकवण्याच्या वर्गांची, रस्त्यांची आणि मध्ये मध्ये जोडणाऱ्या अंगणांची एक मालिकाच उघडकीस येते. याची प्रेरणा दोशींना भारतातील जुन्या मंदिरं असलेल्या शहर रचनांपासून मिळाली.

दोशींच्या कारकिर्दीत शिक्षणाचा मोठा वाटा आहे हे वर लिहिलेल्या उदाहरणांवरून सिद्ध होतंच. त्यांच्या मते पैसा अर्थात जीवनाची आखणी करतो, पण त्याचबरोबर ‘व्हेल्नेस’ही बघितला पाहिजे. आपण शांततेशी कसा दुआ जोडतो, स्वतःच्या आयुष्याचा वेग कसा ठरवतो, शक्यतो मोटारींचा वापर कसा आणि किती टाळतो यालाही महत्त्व आहे. ते जेव्हा डिझाईन बनवतात, तेव्हा त्यांचा उद्देश हा असतो की, त्या वास्तूचा डायनॅमिक वापर कसा होईल. लोक एकमेकांना कशी जास्तीत जास्त भेटतील, बोलतील, विचारांची देवाणघेवाण करतील. त्यांच्या मते वास्तुशास्त्रज्ञ हा केवळ गिऱ्हाईकाच्या डिझाईनच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नसून तो संपूर्ण जनमानसाच्या हितासाठी काम करणारा योद्धा आहे. वास्तू ही एक निर्जीव गोष्ट नसून जिवंत प्राणी आहे. तिला व्यवस्थित पाळलं, पोसलं गेलं पाहिजे.

दोशी हे प्रीट्झकर प्राईझचे ४५ वे मानकरी असून त्यांच्या सत्तर वर्षांच्या कारकीर्दीतला हा अजून एक मानाचा तुरा आहे. त्यांची वास्तुशास्त्रातील ही उल्लेखनीय कामगिरी अशीच चालू राहो आणि देव त्यांना भरपूर आयुष्य देवो हीच सदिच्छा!

.............................................................................................................................................

लेखिका वर्षा हळबे टेक्सास (यूएसए) इथं राहत असून वास्तुविशारद आहेत.

varsha_halabe@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......