अँड द ऑस्कर गोज टू ...जॅकी चॅन!
पडघम - सांस्कृतिक
निलेश पाष्टे
  • जॅकी चॅन ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना...
  • Mon , 21 November 2016
  • पडघम सांस्कृतिक जॅकी चॅन Jackie Chan ब्रूस ली Bruce Lee कुंग फू Kung fu ऑस्कर Oscar

९० च्या दशकात लहानाचं मोठं होत असतानाची माझी सर्वांत संस्मरणीय आठवण म्हणजे व्हीसीआरवर मोठ्या भावाबरोबर सुट्यांच्या दिवसात एकामागून एक इंगजी सिनेमे बघणं. वडिलांच्या मागे लागून आम्ही हा व्हीसीआर मिळवला होता. क्लिंट इस्टवूडचे काउबॉय वेस्टर्नस्, हॉलीवूड अॅक्शनपट, ब्रिटिश कॉमेडीज् अशा वेगवेगळ्या जॉनरचे भलेबुरे सिनेमे आम्ही कुठल्याही प्रकारचा फिल्टर न लावता पहात असू. या पाश्चात्य सिनेमांबरोबरच हाँगकाँग चित्रपटसृष्टीचे ब्रूस ली आणि जॅकी चॅन या कलाकारांचे कुंग फू सिनेमे आमचे भलतेच आवडीचे होते. या सिनेमांचा माझ्यावर इतका प्रभाव पडला होता की, काही काळ मी ताय क़्वान दोसारखं मार्शल आर्ट शिकायचाही प्रयत्न केला होता.

हाँगकाँगचे कुंग फु सिनेमे जगभरात नेले ते ब्रूस लीने. त्याचे सिनेमे पाहून कुंग फू नावाचा अचाट प्रकार जगभरातली लहान मुलं आणि तरुणांनी डोक्यावर घेतला. ‘बिग बॉस (१९७१)’, ‘द फिस्ट ऑफ फ्युरी (१९७२)’, ‘इंटर द ड्रॅगन (१९७३)’सारख्या सिनेमांच्या जोरावर पहिल्यांदाच एक चीनी कलाकार हॉलीवूडमध्ये लोकप्रिय झाला. लोकप्रियतेची शिडी झपाझप चढत असतानाच वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी ब्रूस लीचा गुढ मृत्यू झाला आणि तो एका दंतकथाच बनला. त्याच्या कुंग फु कौशल्याचे आणि जीवावर उदार होऊन हाणामारी करायचे खरे-खोटे किस्से मोठ्या चवीने आम्हा मुलांमध्ये फिरायचे.

ब्रूस लीच्या साध्या, शांत स्वभावाच्या पात्रावर किंवा त्याच्या संबंधितांवर जमीनदार किंवा माफियाकडून अत्याचार होणं आणि आपल्या कुंग फुच्या जोरावर त्यानं त्याचा बदला घेणं अशी एक ढोबळ मांडणी या सिनेमांची असायची. सरंजामी, वसाहतवादी व्यवस्थेत गरिबांच्या श्रीमंताकडून होणाऱ्या पिळवणुकीची पार्श्वभूमी या सिनेमांच्या कथांना होती. ब्रूस ली हा अर्थातच या गरीब कामगार वर्गाचा हिरो होता. एके काळी आपल्याकडे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात अशी मांडणी आपल्याला पाहायला मिळायची (उदा. कुली, १९८३). पण पाश्चात्य प्रेक्षकांना भुरळ घातली ती ब्रूस लीच्या विजेच्या चपळाईने चालणाऱ्या कुंग फु स्टंटची. त्याचं कुंग फु वेगवान, निडर आणि हिंस्र होतं. बिना शर्टच्या ब्रूस लीच्या छातीवर चार घाव आहेत आणि तो आक्रमक कुंग फु च्या पवित्र्यात उभा आहे हे दृश्य आज जगभरातल्या सिनेचाहत्यांच्या मनात कोरलं गेलं आहे.

ब्रूस ली प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सतरा वर्षीय जॅकी चॅन हाँगकाँगच्या चित्रपटांमध्ये स्टंटमनची आणि एक्स्ट्राची छोटी मोठी कामं करत होता. १९५४ साली हाँगकाँग इथे जन्मलेले चॅन यांचे वडील एक स्वयंपाकी होते. त्यांनी लहानपणीच चॅन यांना पेकिंग ऑपरा स्कूलमध्ये भरती केलं. कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कुंग फु, कसरती, नृत्य आणि संगीत शिकवलं जायचं. इथं शिकलेल्या कौशल्यांच्या जोरावर चॅनने हॉंगकॉंग चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. काही दिग्दर्शकांनी त्याच्या स्टंटबाजीने प्रभावित होत त्याला ब्रूस ली पठडीतले चित्रपट दिले. परंतु ते यशस्वी ठरले नाहीत. ब्रूस लीच्या सावलीतून बाहेर पडत वेगळी वाट चोखाळण्यातचं आपलं भलं असल्याचं ओळखून तो अ‍ॅक्शन-कॉमेडी सिनेमांकडे वळला. ‘स्नेक इन द इगल शॅडो, १९७८’, ‘ड्रंकन मास्टर, १९७८’ या सिनेमात त्याची ही कॉमेडी मिश्रित कुंग फु ची शैली प्रेक्षकांसमोर प्रथम आली आणि त्याला बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळालं. गावातला टिवल्याबावल्या करणारा बावळट मुलगा आपल्यावरील अन्यायाचा बदला घेण्यासाठी ड्रंकन स्टाईल, मंकी स्टाईलसारख्या विनोदी कुंग फु शैलींचा वापर करतो अशी साधारण या सिनेमांची मांडणी होती. परंतु आपल्या कॉमेडी कुंग फुचं यश पाहिल्यावर चॅन याने आधुनिक शहरी पार्श्वभूमी असलेले सिनेमे बनवायला सुरुवात केली. यात हॉलीवूड सिनेमांच्या संकल्पना आणल्या. कुंग फु ला पारंपरिक शैलींच्या नियमातून मुक्त केलं. उदा. ‘पोलीस स्टोरी’ (१९८४), ‘प्रोजेक्ट ए’ (१९८३), ‘आर्मर ऑफ गॉड’ (१९८६). जुन्या हॉलीवूड मूकपटांमध्ये बस्टर कीटनसारखे कलाकार स्टंटचा वापर विनोदासाठी करत असत. त्याचीच एक छटा चॅनच्या सिनेमात दिसून येत असे.

चॅनच्या सिनेमांचं एक सौंदर्यस्थळ म्हणजे त्यातले त्याने आणि त्याच्या स्टंटमनने स्वतः केलेले स्टंट. एखादया समूह नृत्याप्रमाणे ते स्टंट बसवलेले असतात. हिंसा हा त्यांचा केंद्रबिंदू नसून एखादया जिम्नॅस्टसारखी चपळता आणि कौशल्य हे त्याचा आकर्षणबिंदू असतो. एक मनुष्यप्राणी जीवावर उदार होऊन अशा अफलातून कसरती करू शकतो याचा प्रेक्षकांना अचंबा वाटतो. चॅनच्या प्रत्येक सिनेमाच्या अखेर नामावली दाखवताना त्यातील स्टंटचं चित्रीकरण करतानाची दृश्य दाखवली जात. यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्या स्टंटमागची मेहनत, क्लिष्टता, धोका बिंबवला जातो. आज कम्पुटर ग्राफिक्सच्या युगात चित्रपटातून असे स्टंट दुर्मीळच झाले आहेत. जुन्या अॅक्शन चित्रपटातील स्टंटची मजा गायब झाली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे चॅनचं पात्रं कुंग फुमध्ये तरबेज असलं, धाडसी असलं तरी ते ब्रूस लीसारखं पारंपरिक योद्धा म्हणून पुढे येत नाही. तर ते एक सामान्य व्यक्ती म्हणूनच पुढे येतं. ब्रूस लीवर त्याच्या प्रतिस्पर्ध्याने धारधार शस्त्राने मार केला तर तो चेकाळून शर्ट फाडतो आणि प्रतिस्पर्ध्यावर अधिक त्वेषानं तुटून पडतो. याउलट चॅनच्या तोंडावर बुक्का बसला तर तो आधी ‘आ ऊ’ करत तोंड चोळत बसतो आणि मगच प्रतिहल्ला करतो. एकामागून एक संकटांना तोंड देणारं चॅनचं पात्रं एक भेद्य लढवय्या म्हणून प्रेक्षकांसमोर येतं. यामुळेच तो प्रेक्षकांना जास्त जवळचा वाटतो.  

गेली चार दशकं हिंसेचं कुठंही उदात्तीकरण न करता निखळ कौटुंबिक करमणूक करणारे अ‍ॅक्शनपट बनवणाऱ्या जॅकी चॅनचं अमेरिकेच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स या ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या संस्थेनं नुकताच मानद ऑस्कर पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अकॅडमीने मानद ऑस्कर पुरस्कारांचा वापर जगभरातल्या चित्रपटसृष्टीला भरघोस योगदान देणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी केला आहे. १९९१ साली सत्यजित रे यांना हा बहुमान मिळाला होता. आता जॅकी चॅनचं यांना हा बहुमान देऊन अकॅडमीने एक प्रकारे चिनी चित्रपटसृष्टीचा गौरव केला आहे.

 

लेखक डायंमड पब्लिकेशन्स (पुणे)चे संचालक आहेत.

nilesh.pashte@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......