कॉपी : तेव्हा आणि आताही!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 10 March 2018
  • पडघम कोमविप कॉपी दहावी परीक्षा बारावी परीक्षा

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या की, कॉपीच्या बातम्याचं पिक बहरात येतं. या वर्षी या बातम्या वाचताना आणि पाहताना स्वानुभव आठवला आणि या पिकाला मरण नाही कायम भाव आहे याची खात्री पटली.

पत्रकारितेत आलो तरी १९९८पर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि अधूनमधून कॉपी हा केवळ बातमीचा विषय होता; तोही दुरूनच. औरंगाबादला असतांना आमची कन्या-सायली, दोस्तयार डॉ. अंजली व डॉ. मिलिंद देशपांडे यांचा मुलगा अनिरुद्ध आणि डॉ. जया व डॉ. अमृत महाजन यांची कन्या नेहा एकाच वर्षी दहावीला आणि दैनंदिन संपर्कात होते. त्यांची दहावीची परीक्षा म्हटल्यावर या विषयाशी जवळचा आणि थेट संबंध आला तो मार्च २०००मध्ये आणि माझी या संदर्भातली मध्यमवर्गीय पांढरपेशी शिक्षणविषयक मूल्याधारित, गोंडस, आदर्शवादी धारणा पार उद्धवस्त झाल्या. औरंगाबादचं बळीराम पाटील हायस्कूल हे परीक्षेचं केंद्र आमच्या कन्येला मिळालंय हे कळल्यावर आमच्या ग्रुपमध्ये हल्लकल्लोळ झाला. आदल्या दिवशी ती शाळा बघायला चार्टर्ड अकाऊंटंट विवेक अभ्यंकर यांच्यासोबत गेलो तर अगदी रस्त्यालगत कंपाऊंड नसलेलं समोर मैदान आणि त्याच्या टोकाला खेटून एका ओळीत डबे मांडल्यासारखी इमारत. इमारत म्हणजे पत्र्याच्या काही खोल्या!

आम्हा दोघांच्याही पाल्याची बसण्याची व्यवस्था याच पत्र्याच्या खोलीत. भगदाडासारख्या सताड उघड्या खिडक्या, खोलीत पंखा नाही, समोर रखरखीत मैदान, उन्हानं ४२ डिग्री सेल्सियसचा आकडा ओलांडलेला अशा अवस्थेत परिक्षेच्या दिवशी आम्ही पोहोचलो. औरंगाबाद शहरातल्या सेंट लॉरेन्स, सरस्वती भुवनसारख्या प्रतिष्ठित शाळातील विद्यार्थ्यांना केंद्र म्हणून ही शाळा मिळालेली. औरंगाबाद शहरातील बहुतेक सर्व मध्यमवर्गीय पांढरपेशे, पण बर्‍यापैकी उच्चभ्रूंची गर्दी. उच्चभ्रू एवढ्यासाठी म्हणायचं की, बहुसंख्य परीक्षार्थी कारमध्ये त्यांच्या आई किंवा वडिलांसोबत आलेले. मोजके छानपैकी स्वतःच्या बाईकवर; काही सायकलवर कोणतंही टेन्शन न घेता काहीशा बेफिकीरच आविर्भावासह. परीक्षा सुरू होण्याच्या आधी, पण आमच्या मुलांनी शाळेत प्रवेश केल्यावर विवेक अभ्यंकर, एक देशमुख नावाच्या सरकारी महिला वकील वगैरे आम्ही गप्पा मारत रस्त्यावर उभे असताना एक मर्सिडीज आली आणि थेट शाळेच्या आवारात शिरली. कारमधून एक मुलगा उतरला. मुख्याध्यापकासोबतच अनेक शिक्षकांनी त्याच्या स्वागतासाठी धाव घेतली. तो ऐटीत एका खोलीत गेला. अवघ्या चार-पाच मिनिटांतच धावपळ सुरू झाली. लगेच त्याच्या खोलीत पंखा पाठवला गेला. पुढच्या पाच-सात मिनिटांतच शीतपेयाची बाटली घेऊन एक चपराशी गेला. त्याच्यासोबत दोन-तीन शिक्षक होते. उत्सुकता चाळवली म्हणून त्या कारच्या चालकाकडे चौकशी केली तर तो मुलगा एक राज्यमंत्र्यांचा असल्याचं कळलं. त्याचे वडील एका बड्या वृत्तपत्र समूहाचे मालकही होते!

नंतरच्या पंधरा-वीस मिनिटांतच अचानक आतून बाहेर येणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली. ही सर्व मंडळी शेजारच्या एक टपरीवजा हॉटेलात जात होती आणि लगेच बाहेर पडून पुन्हा वर्गात जात होती. जाऊन बघितलं तर, एक माणूस पुस्तकांच्या गठ्ठ्यातून आतून आलेल्या माणसानं विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तर शोधून ते पुस्तक किंवा झेरॉक्स कॉपी त्यांच्या हाती देत होता. ते पुस्तक किंवा त्या इसमानं दिलेली झेरॉक्स प्रत घेऊन ही मंडळी वर्गात जात होती. थोडक्यात ही सरळ सरळ कॉपी होती, पण त्या लोकांच्या जाण्या-येण्यावर शाळेच्या कर्मचार्‍यांपैकी कोणीच हरकत घेत नव्हतं. बंदोबस्तावरचे दोन पोलिस या सर्व प्रकाराकडे त्यांचं काहीच घेणं-देणं नाही असं बघत होते. अखेर निकटचे स्नेही असलेले तत्कालिन पोलिस आयुक्त श्रीपाद कुळकर्णी आणि सहायक पोलिस आयुक्त सुधीर दाभाडे यांना मोबाईलवरून फोन केला. दहा-पंधरा मिनिटांत सिडको पोलिस ठाण्यातून पोलिसांची जीप आली. त्यातून उतरलेल्या पोलिसांनी लोकांना हाकललं. आमची चौकशी केली. अनुभवलेला कॉपीचा ‘सामूहिक अविष्कार’ आम्ही त्यांना सांगितला. थोडा वेळ थांबल्यावर काही मदत लागली तर फोन करण्याचा सल्ला देऊन पोलीस निघून गेले. पुन्हा पाच-दहा मिनिटांत तोच प्रकार जोमानं सुरू झाला. आम्ही हतप्रभ होऊन पाहात राहिलो. पेपर सुटल्यावर बाहेर आलेल्या आमच्या मुला-मुलींनी कॉपी कशी जोरात सुरू आहे, हे सांगतानाच माझा पेपर छान गेला ही सुखद वार्ता दिली आणि आम्हाला छान वाटलं.

लेकीला घरी सोडून लोकसत्ताच्या औरंगाबाद कार्यालयात पोहचल्यावर सर्वांत आधी बोर्डाच्या कार्यालयात संपर्क साधला. शेंडे नावाचे चेअरमन होते. आम्ही दोघेही परस्परांना नागपूरपासून ओळखत होतो. अतिशय सज्जन अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक मला माहीत होता. ते भेटायला या म्हणाले. लगेच गेलो. त्यांना भेटलो. सर्व हकिकत सांगितली. ते अस्वस्थ झाले. उद्या मला फोन करा असे काही दिसलं तर, असं ते म्हणाले.

दुसर्‍या दिवशी कॉपीचं तेच जाहीर नाट्य सुरू झालं. ठरल्याप्रमाणे शेंडे यांना फोन केला. भरारी पथक लगेच पाठवतो अशी ग्वाही त्यांनी दिली. नंतरच्या पंधरा मिनिटांतच अचानक पोलिस सक्रिय झाले. शाळेतले पर्यवेक्षक वर्गातली पुस्तकं बाहेर टाकताना दिसू लागले. भरारी पथक आलं, तेव्हा कॉपीचा मागमूस नव्हता. स्वतः शेंडेसाहेब आले होते. त्यांना कुठेच कॉपी दिसली नाही. दिसणार तरी कशी? ते भेटले. ‘कॉपीबिपी काही नाही’ म्हणाले, ‘विनाकारण टेन्शन घेऊ नका’, असा सल्ला देऊन गेले. ते गेल्यावर पुन्हा तोच प्रकार सुरू झाला. लगेच शेंडेसाहेबांना फोन केला. ते लगेच परत आले. भरारी पथक येण्याआधी जे घडलं ते पुन्हा घडलं. शेंडे साहेबांना वर्गाबाहेर पडलेल्या कॉप्यांचे तुकडे दाखवले. सर्व वर्गांच्या बाहेर तेच चित्र. भरारी पथक येणार असल्याची खबर आमच्यापैकीच कोणी तरी दिली, हे त्यांनी निराशाजनक स्वरात कबूल केलं. विमनस्क होऊन ते निघून गेले.

कॉपीची पुनरावृत्ती सुरू झाली. एक पोलिस शिपायानं येऊन ‘काही मदत पाहिजे का’, असं विचारलं. ‘हा कॉपीचा तमाशा का थांबवत नाही’ असं विचारल्यावर ‘आभाळच फाटल्यावर थिगळ कुठे लावणार?’, असा डायलॉग त्या वृद्ध पोलिसानं मारला. पेपर संपल्यावर कन्येशी या विषयावर बोललो तर ती म्हणाली ‘बाबा, तू टेन्शन घेऊ नकोस. माझे पेपर व्यवस्थित जाताहेत. तू कितीही मोठ्या वृत्तपत्राचा पत्रकार असला तरी कॉपी रोखू शकणार नाहीस’. संध्याकाळी पुन्हा शेंडेसाहेबांना बोललो. मंडळाचेच काही अधिकारी-कर्मचारी यात इनव्हॉल्व आहेत, अशी कबुली देऊन काहीच मदत करता येत नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांची हतप्रभता समजण्यासारखी होती, कारण ते निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते. शिवाय सज्जन आणि मवाळ. सेन्ट लॉरेन्सचा संचालक कॉलिन्स एकदम उमदा आणि मोकळा ढाकळा माणूस. त्यांना फोन केला आणि कॉपीबद्दल बोललो. ‘तुम्ही काहीच का करत नाही’, हे विचारलं. कॉलिन्स म्हणाला, ‘सर छोड दो ये बात. कॉपी होऊ द्यावी म्हणून प्रेशर येतं. मला ते पटत नाही. मग या काळात मी शाळेत जात नाही, घरी थांबत नाही आणि फोनही घेत नाही. ‘आप टेन्शन मत लो. सब ठीक होगा’, असं म्हणून त्यानं फोन बंद केला.

आता कन्येची परीक्षा सोडून मला या विषयात जाम इंटरेस्ट निर्माण झाला. तिसर्‍या दिवशी कन्येला पेपरसाठी सोडून मी शहरातील इतर शाळात काय परिस्थिती आहे पहायला बाहेर पडलो. पुढच्या पाच-सहा दिवसांत शहरातील आणि शहरालगतच्या चिखलठाणा, पाचोड, अडूळ, बिडकीन, वाळूज या गावातील ४०-४२ तरी शाळांना भेट दिली. कॉपीचा ‘ऑक्टोपस’ सर्वत्र इतस्तत: पसरलेला होता. कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखी सर्वत्र कॉपी चाललेली होती. या राज्यात जणू काही विना कॉपी परीक्षाच होऊ शकत नाही आणि कॉपीला शासनमान्यता आहे असंच हे चित्र होतं. आंबेडकर महाविद्यालय, सरस्वती भूवन, सेंट लॉरेन्स अशा काही मोजक्या शाळा-महाविद्यालयांचाच त्याला अपवाद होता. याच काळात एकदा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (त्यांना आम्ही ‘नानासाहेब’ म्हणतो!) यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं, ‘ही केवळ कॉपी नाही. त्यामागे फार मोठं अर्थकारण आहे’. कॉपीची माहिती मिळवायला नवीन दिशा मिळाली. शाळांच्या बाहेर उभ्या असलेल्या आणि कॉपी ‘कांडा’त सहभागी होणार्‍यांशी बोलू लागलो. कॉपी करू देण्याचा ‘रेट’ एका विद्यार्थ्यामागे दररोज दीड ते दोन हजारांपासून ते पाच हजारांपर्यंत होता . सर्वाधिक दर इंग्रजी आणि गणित या विषयांचा ; तो क्वचित दहा हजारापर्यंतही असल्याचं या जर्नालिस्टिक उचापतीतून स्पष्ट झालं.

एक दिवस, भाषेच्या ऐच्छिक पेपर संपायच्या वेळेच्या काही वेळ आधी बळीराम पाटील विद्यालयापाशी पोहोचलो. एक सत्तरीचा इसम. बहुधा त्याचा नातू असावा. त्याला फडाफडा बोलत होता. नातवाला दोन झापडाही त्यानं लगावल्या. रणरणत्या उन्हात तिसरी झापड मारायच्या आधीच त्याचा हात पकडला, समजावलं. सकाळीच त्या वृद्धानं शिक्षकाला हजार रुपये देऊनही नातवानं उर्दूच्या पेपरला कॉपी केली नाही. पेपर वाईट गेला. म्हणून म्हातारा भडकला होता. हे ऐकल्यावर मी सर्द झालो.

काही शाळा तर मुलांना पास करू देण्याइतके गुण मिळवून देण्याची हमी घेऊन आपली शाळा केंद्र म्हणून निवडून देण्याची मुभा देत. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जे केंद्र मिळालंय, त्या शाळेच्या पर्यवेक्षकांना पटवण्यासाठी शिक्षक मरमर करताना दिसत. ‘तुम्ही असे उद्योग का करता?’ या प्रश्‍नाला यापैकी बहुसंख्य शिक्षकांनी उत्तरं दिली -रिझल्ट कमी लागला तर पटसंख्या रोडावते. मग अनुदान कमी होते आणि नोकरी जाण्याची भीती असते. काही शिक्षकांनी तर आम्हाला ‘वरचे पैसे कमावण्याचा हाच एकमेव मार्ग’ असल्याचं स्पष्टपणे सांगून ‘चांभार चौकशा कशाला करता, पत्रकार काही कमी करप्ट नाहीत...’, असंही सुनावलं.

सलीम अली यांच्या नावानं औरंगाबादला एक सरोवर आहे. तिथं तर शिक्षक सरळ सरळ उत्तरांचे डिक्टेशनच देत होते. बळीराम पाटील विद्यालय या तुलनेत एकदमच मागासलेलं होतं असं म्हणायची वेळ आता आली होती. बळीराम पाटील शाळेतील एका शिक्षकाशी बोलत असताना त्यांनी मी कोण, काय करतो वगैरे चौकशी केली. पत्रकार आहे कळल्यावर माझ्याही मुलीला विनामूल्य मदत करण्याची तयारी दर्शवली.

या ग्रेट शोधमोहिमेत लक्षात आलेली आणखी एक बाब म्हणजे, कॉपीलाही जात, धर्म असतो. कोणत्या शाळेचं व्यवस्थापन कोणत्या जाती-धर्माचं आहे, हे त्या समोरच लावलेल्या कोनशीलेवरून समजायला लागलं आणि त्या केंद्रावर कोणाला कॉपी करायला मुभा आहे, हे सहज लक्षात यायला लागलं. शाळेचे उद्घाटक म्हणून अब्दुल रहेमान अंतुले, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, वसंतराव नाईक किंवा सुधाकरराव नाईक किंवा अन्य राजकीय पुढार्‍यांची नावं दिसली की, त्या केंद्रावरच्या कॉपीची जात कळायला लागली. हे कळणं कधीही चूक ठरलं नाही. आणखी एक पैलू समोर आला-राजकारणात काही तरी करण्याची महत्त्वाकांक्षा असणार्‍या एका परिचित शिक्षक नेत्यानं स्पष्टच सांगितलं, ‘...इतकी वर्षं आम्हाला डावललं. आता आम्हाला पुढे जायचं आहे. काहीही करून. आता जगाची भाषा बदलली आहे राव, प्रेमात आणि परीक्षेत सारं काही माफ असतं, असं तुम्हाला वाटत नाही का?...’ त्यांच्या या प्रश्‍नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं.

कन्या अकरावीला गेल्यावर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या काळात मी एकदा लातूर आणि बीडला गेलो. लातूर हा विलासराव देशमुख आणि बीड हा गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा. तेव्हा निकालाचा लातूर पॅटर्न खूपच गाजत होता. मलाही या पॅटर्नची उत्सुकता होती, पण मोजक्या काही शाळा वगळता लातूर शहर आणि बीड जिल्ह्यात कॉपीचा अविष्कार सामूहिक आणि अधिक उघड होता. लातूर जिल्ह्यात तर ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती...’ इतका बेडर! बीड जिल्ह्यात या संदर्भात कोणाला काही विचारलं तर तो म्हणायचा ‘जे काही सांगायचं ते साहेबांना (म्हणजे गोपीनाथ मुंडेंना) सांगा’. यावर आपण काय बोलणार?

मुलगी बारावीला गेली आणि परीक्षेला तिला केंद्र म्हणून शासकीय महाविद्यालय मिळालं. आदल्या दिवशी तिथं गेलो तर अधिष्ठाता प्राचार्य शिरोळे यांची भेट झाली. गप्पात कॉपीचा विषय निघाला. आमच्या केंद्रावर कॉपी होतच नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला. विश्‍वास बसला नाही, पण अनुभव विपरीत आला. परीक्षा सुरू होण्याच्याआधी पाच मिनिटे प्राचार्य शिरोळे स्वतःच्या देखेरेखीखाली महाविद्यालयाचे दरवाजे उघडत आणि परिसरातून पालक, हौशे-नवसे-गवसे सर्वांना पार गेटच्या बाहेर हाकलून देत. बारावीच्या परीक्षेच्या वेळेस मी निश्‍चिंत झालो म्हणून शहरात पुन्हा भटकलो. एकेकाळी आदर्श शिक्षणाचा मापदंड समजल्या जाणार्‍या देवगिरीसारख्या महाविद्यालयात आणि विचारवंत म्हणून मान्यता असलेल्या डॉ. रफिक झकेरिया नेतृत्व करत असलेल्या शिक्षण संस्थेतही इतक्या मोठ्या प्रमाणात आणि उघड सामूहिक कॉपी होते, हे पचवून घ्यायला जड गेलं. चित्र दहावीपेक्षा आणखी भीषण झालेलं होतं. ‘कॉपी करून परीक्षा देणारे’ आणि ‘कॉपी न करता परीक्षा देणारे’ अशा दोन निकषावर आता परीक्षा व्हायला हव्यात असं वाटू लागलं. या दोन्ही परीक्षांत त्या राज्यमंत्र्यांच्या मुलाला माझ्या कन्येपेक्षाही दहा टक्के गुण कमी मिळाले तरी त्यानं पुढचं शिक्षण परदेशात घेतलं. ही तक्रार नाही, त्याबद्दल खंतही नाही.

यापुढचा वेगळा, पण धक्काच पुन्हा एकदा विदर्भात आल्यावर बसला. दरम्यान माझी बदली नागपूरला निवासी संपादक म्हणून झाली. एका वर्षी बारावीच्या परीक्षेच्या काळात एक कार्यक्रम आटोपून उमरेडहून परतत होतो. परिचित शिक्षण सम्राटांची शाळा दिसली. तेही गेटरवरच उभे होते. मी थांबलो. नमस्कार-चमत्कार झाला. शाळेचा बराच विस्तार झालेला होता. मराठवाड्यातलं कॉपीचे चित्र ‘सही रे सही’ इथेही होतं. ‘अहो हे काय?’, मी विचारलं. तर ते म्हणाले, ‘विदर्भातली जास्तीत जास्त पोरं पास व्हायलाच पाहिजेत. बॅकलॉग दूर करायची सुरुवात आपल्यापासूनच करायला नको का?...’ ते अतिशय गंभीरपणे बोलत होते. कॉपीचा हा नवा पैलू कळला आणि मी निरुत्तर झालो.

२०१८. दहावी-बारावीला आता आमच्या घरातलं कुणीच नाही. तरी कॉपीच्या बातम्या वाचून पुन्हा सुरसुरी आली. एक दिवसभर फिरलो. जे पाहिलं त्यामुळे सुन्न झालो. मुद्रित माध्यमात जी वाचायला आणि प्रकाश वृत्तवाहिन्यांवर जे बघायला मिळतंय, त्यापेक्षा परिस्थिती भीषण आहे... पूर्ण हाताबाहेर गेलेली आहे.

आपण नेमकं कुठे जातोय?

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Shantanu C

Mon , 12 March 2018

सुंदर लेख ! एक विनंती करतो की आता त्या शिक्षक नेत्याची पुन्हा मुलाखत घ्या व विचारा त्याला, बाबारे तुझ्या डावलल्या गेलेल्या जातीचा /धर्माचा वगैरे बॅकलाॅग पूर्ण झाला काय रे ? काहीही करून पुढे जायचे होते तुम्हाला, कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही लोक या गेल्या २० वर्षात ?


vishal pawar

Sat , 10 March 2018

अज्ञानाकडे....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......