अजूनकाही
लहान मुलांचं भावविश्व खूपच वेगळं असतं. त्यांच्या आवडी-निवडीला उत्तेजन दिलं तर त्यांच्यातील जिगर वाढते आणि जिगर वाढली की, कोणतंही ध्येय गाठण्यास त्यांना सोपं जातं. ‘फिरकी’ या नवीन मराठी चित्रपटात ‘पतंगबाजी’तून लहान मुलांचं भावविश्व साकारताना असाच काहीसा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भावपूर्ण कथा, बालकलाकार आणि इतर प्रमुख कलाकारांचे संयमित अभिनय, यामुळे हा चित्रपट सुसह्य झाला आहे. मात्र कथा पडद्यावर सादर करताना पटकथेला फारच ‘ढील’ देण्यात आली आहे. त्यामुळे पडद्यावरील या ‘पतंगबाजी’चा पाहिजे तसा प्रभाव पडत नाही.
कल्पना चांगली असली, तरी कथेचा जीव फारच छोटा आहे. त्यामुळे त्याची पटकथा बंदिस्त कशी होईल याकडे लक्ष देण्याची अधिक गरज होती. शिवाय चित्रपटाची मांडणी लक्षात घेता दिग्दर्शनातील नवखेपण जाणवत राहतं. वास्तविक ‘फिरकी’ म्हणजे मांजा गुंडाळलेली ‘चक्री’. पतंगबाजीसाठी ती एक आवश्यक असलेली वस्तू. तिचं प्रतीकात्मक रूप चित्रपटात ठसठशीत स्वरूपात येणं आवश्यक होतं, मात्र तसं ते दिसत नाही. केवळ या ‘फिरकी’भोवतीच चित्रपटाची कथा फिरत राहते. त्यामुळे चित्रपटाचं किमान नाव तरी सार्थ ठरतं.
यात तीन छोट्या मित्रांची कहाणी आहे. गोंद्या, बंड्या आणि टिचक्या अशी उपनावं असलेल्या आणि एकमेकांचे ‘जानी दोस्त’ असलेल्या या मित्रांपैकी गोंद्याला पतंग उडवण्याची भारी हौस असते. मात्र या तिघांचीही आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे चांगला पतंग आणि चांगला मांजा घेण्याइतके त्यांच्याजवळ पैसे नसतात. शिवाय त्यांच्या घरच्यांना हा खुळा नाद वाटतो. त्याऐवजी त्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं अशी त्यांची अपेक्षा असते. याउलट त्यांच्याच वर्गात असणारा पाटलांचा रघू आपलं वर्चस्व गाजवत गोंद्याबरोबरच बंड्या आणि टिचक्याची सतत मानहानी करत असतो. पतंगबाजीत गोंद्या आपला प्रमुख स्पर्धक आहे हेही रघू जाणून असतो. एकदा परीक्षेत रघूनं केलेली कॉपी गोंद्यामुळे उघडकीस येते. त्या दिवसापासून रघू गोंद्याला आणि त्याच्या मित्रांना अधिकच त्रास देण्यास सुरुवात करतो. मात्र शेवटी असंख्य अडचणींवर मात करत मकरसंक्रातीनिमित्त दरवर्षी गावात होणाऱ्या पतंगबाजी स्पर्धेत गोंद्या रघूचं वर्चस्व मोडून काढतो. अशी ही कथा आहे.
वर म्हटल्याप्रमाणे चित्रपटाची पटकथा विस्कळीत आहे. विषय पतंगबाजीचा असल्यामुळे गोंद्याचं आणि त्याच्या मित्रांचं जे 'पतंगप्रेम' सुरुवातीपासूनच दाखवणं अपेक्षित होतं, ते प्रारंभी पाहायला मिळत नाही. त्याच्याऐवजी त्यांचे इतर ‘कारनामे’ पाहायला मिळतात. संवादातून ते मजा आणतात हे जरी खरं असलं तरी कथेचं मूळ सूत्र हरवून बसतं. त्यामुळे गावात पतंगप्रेमी मुलांचा उत्साह आणि गावातर्फे दरवर्षी भरवण्यात येणारी पतंगस्पर्धा या गोष्टींचा अधूनमधून फक्त उल्लेख होत राहतो. त्यादृष्टीनं गावातील वातावरण पतंगप्रेमी लोकांचं भासत नाही. त्या वातावरणनिर्मितीची गरज कथेच्या दृष्टीनं फार आवश्यक होती. तसंच रघूला शह देण्यासाठी चांगला मांजा मिळवण्यासाठी गोंद्या आणि त्याच्या मित्रांना गावातील एकेकाळचा ‘पतंगवीर’ काचेच्या भुकटीचा वापर करून चांगला मांजा करण्याचा जो सल्ला देतो, तो फार ‘घातक’ आहे. या गोष्टीकडे दिग्दर्शकानं चक्क दुर्लक्ष केलं असल्याचं लक्षात येतं. (अशा मांज्यामुळे दरवर्षी अनेकांचे बळी जातात आणि तशा मांज्याची प्रक्रिया शिकवणं ही बाब गंभीर असल्यामुळे ती दुर्लक्षित करून चालत नाही).
याशिवाय चित्रपटातील रघू नावाचं जे खलनायकी पात्र आहे, ते अधिक विकसित करण्याची गरज होती. त्याचाही ‘पाटलाचा मुलगा’ असाच फक्त उल्लेख होतो. मात्र तो कोणाच्या जीवावर ‘मस्ती’ करत असतो तेही दाखवण्याची गरज होती. कारण त्याच्याविरुद्ध करण्यात येणारा संघर्ष हा शेवटी एका प्रवृत्तीशी आहे, हे लक्षात घेणं जरुरीचं होतं. शेवटी पतंगबाजीचा खेळ दाखवतानाही पडद्यावरील पतंगांच्या काटाकाटीची दृश्यंही अधिक जिवंत झाली असती, तर त्याचा आणखी प्रभाव पडला असता. या दृश्यात तोचतोचपणा आला आहे. धवल गनबोटे यांचं छायाचित्रण आणि चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाजू मात्र उत्तम आहेत.
पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर आणि अथर्व उपासनी यांनी अनुक्रमे गोंद्या, बंड्या आणि टिचक्या यांच्या भूमिका अगदी समजून-उमजून केल्या आहेत. त्या तिघांच्या मैत्रीची केमिस्ट्री छान जुळली आहे. त्यातल्या त्यात पुष्कर लोणारकर विनोदी संवाद आणि अभिनयातून अधिक मजा आणतो. गेल्या वर्षी पार्थ भालेरावला ‘बॉईज’ चित्रपटात ‘लग्नाळ’ अवस्थेत पाहण्याची संधी मिळाली होती. मात्र या चित्रपटात त्याला ‘शामळू’ अवस्थेत पाहावं लागतं. अभिषेक भरते यानंही रघूच्या भूमिकेत आश्वासक काम केलं आहे. गोंद्याच्या कर्तव्यकठोर आईच्या भूमिकेत अश्विनी गिरी आणि समंजस वडिलांच्या भूमिकेत हृषीकेश जोशी यांनी गहिरे रंग भरले आहेत. तर ज्योती सुभाष यांची छोटीशी भूमिकाही लक्ष वेधून घेणारी आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment