अजूनकाही
या वर्षीच्या (तसं पाहता गेल्या वर्षीच्या) ऑस्करमधील महत्त्वाच्या पुरस्कारांच्या शर्यतीत असलेल्या 'गेट आउट' या भयपटातील एक पात्र संमोहनाच्या (हिप्नॉटिझम) संदर्भानं आणि साहाय्यानं ‘द सन्कन प्लेस’ नावाची एक संकल्पना निर्माण करतं. त्यामुळे ज्याच्यावर संमोहनाचा प्रयोग केला आहे, तो थेट एका काळोख्या ‘ब्लॅक होल’सम भासणाऱ्या काल्पनिक जागेत जातो. हे आठवण्याचं कारण म्हणजे काही चित्रपट आपल्याशी मानसिक आणि भावनिक पातळीवर अशाच प्रकारे खेळतात. ज्यात अनेक क्राइम थ्रिलर, सायकॉलॉजिकल थ्रिलर किंवा इतरही अनेक प्रकारचे चित्रपट येतील.
मात्र हे चित्रपट प्रभावी वाटण्यापूर्वीही अशीच आणखी एक महत्त्वाची गोष्ट सुप्त (subconcious) पातळीवर घडत असते. ती म्हणजे एखादं पात्रं आपल्या मनात रुतून बसण्यासाठी त्याच्याशी एक प्रकारे भावनिक नातं तयार होणं गरजेचं असतं. जोवर हे प्रभावीपणे होत नाही, तोवर बऱ्याचदा आपल्याला समोरच्या व्यक्तीशी, पात्राशी काहीच घेणंदेणं नसतं. याउलट जेव्हा एखादं पात्र आपल्याला आवडतं, तेव्हा आपण सुप्त पातळीवर त्याच्याशी जोडले गेलेलो असतो.
तर सांगायचा मुद्दा असा की, या गोष्टींचं कथानकामध्ये आणि एकूणच चित्रपटांमध्ये फार महत्त्वाचं स्थान असतं. आणि हीच गोष्ट '३ स्टोरीज' या चित्रपटाबाबत चांगल्या अर्थानं दिसून येते. अगदी सुरुवातीलाच येणाऱ्या मस्त नरेशनमधून काहीतरी वेगळं दाखवणार असं सांगत दिग्दर्शक-लेखक जोडी आपल्याला एका भन्नाट आणि सत्य विश्वात घेऊन जातात. आणि नंतर याच कथानकाच्या माध्यमातून मध्येच लुडबूड न करता शेवटी ‘तो’ आवाज ऐकू येतो. त्यामुळे हे कथन कथेत अडथळा ठरत नाही.
'३ स्टोरीज'मध्ये त्याच्या नावानुसार तीन कथा आहेत. मात्र मुळात हे नाव मिसलिडिंग आहे आणि तेही चक्क चांगल्या अर्थानं. मात्र चित्रपटानं आपल्याला मिसलिड करण्याचं सत्र थेट इथपासून सुरू होतं इतकं मात्र नक्की. शिवाय हाच प्रकार तो यातील पात्रं आणि अभिनेते यांच्या नावांबाबतही करतो. म्हणजे शर्मन जोशीचं पात्र, शंकर, ज्या ‘माशुमी’च्या पात्राला ‘जोशीजी’ असं संबोधतं, तर ज्या धर्माच्या नावाखाली मालिनी आणि सोहेल यांच्या प्रेमाला विरोध होत असतो, त्या अभिनेत्यांची नावं त्याच पात्राच्या अगदी उलट आहेत. आता हा सगळा योगायोग आहे का, असा प्रश्न पडतो.
मिस मेंडेन्सा (रेणुका शहाणे), वर्षा (माशुमी मखिजा) आणि मालिनी (आयशा अहमद) व सोहेल (अंकित राठी) यांच्या या तीन कथा आहेत. त्या एक अँथोलॉजी म्हणून काम करतात. ज्याचं वर्णन 'मुंबईतील चाळ संस्कृती' अशी थीम घेऊन करणं जास्त सोपं आणि योग्य होईल. मिस मेंडेन्साला त्यांचं घर विकायचं आहे, ज्यासाठी रामूजी या ब्रोकरकरवी विलास नायक (पुलकित सम्राट) ही व्यक्ती ते घर पाहायला येते. तिकडे वर्षाचा पती तिला सतत त्रास देत असतो. त्यामुळे ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी नसते. तर मालिनी आणि सोहेल यांचं प्रेमप्रकरण सुरू असतं. मग मायानगर (शेवटी विचार करता हे नावही कसलं लक्षपूर्वक दिलं आहे हे जाणवतं!) या चाळीचा बॅकड्रॉप वापरून आपण या तिघांच्या किंवा खरं तर त्याहून जास्त लोकांच्या, तीनहून अधिक कथा पाहतो.
चित्रपट छायाचित्रण आणि संकलनात काही लक्ष वेधून घेणारे प्रयोग करतो. मात्र या गोष्टी खास पाहण्यालायक आहेत इतकं नक्की. चित्रपटात फक्त चारच गाणी, तीही कथानकाच्या ओघात येतात. आणि त्यातीलही एक स्वप्न म्हणून दिसल्यानं ते अडथळा ठरण्याचा प्रश्न येत नाही. मात्र इतरही गाणी फारसा अडथळा ठरत नाहीत.
रेणुका शहाणेला उत्तम दिग्दर्शक आणि भूमिका हे दोन्ही मिळालं तर ती त्याचं सोनं करू शकते, हे तिनं पुन्हा एका दाखवून दिलं आहे. शर्मन जोशीही जराशा लहान म्हणाव्या अशा भूमिकेत चमकून गेला आहे. इतरही सर्वांची कामं खास आहेत. फक्त रेणुकापुढे पुलकित सम्राट त्याच्या अभिनयाच्या मर्यादांमुळे जरासा पोरकट वाटतो.
अर्जुन मुखर्जीचं हे दिग्दर्शकीय पदार्पण नक्कीच दखल घेण्याजोगं आहे. अल्दी कौशलची ही 'हॅपी न्यू इअर' आणि 'नूर'च्या नंतरची पटकथा आधीच्या कामाहून नक्कीच उजवी आहे. गेल्या काही वर्षांत फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हे दोघे निर्माते म्हणून काही उत्तम चित्रपट आणि सोबतच उत्तम फिल्ममेकर्स घेऊन येत आहेत. त्यात आता याचंही नाव घेता येईल.
जवळपास एक दशकापूर्वी आलेल्या विद्या बालनच्या 'कहानी' चित्रपटाची टॅगलाईन होती - 'अ मदर ऑफ अ स्टोरी'. ज्याचा सरळ अर्थ 'सर्व कथांची आई' असा होईल. मात्र या टॅगलाईनचं महत्त्व आणि उद्देश आपल्याला चित्रपट पाहून झाल्यावर कळाला. हेच ढोबळमानानं '३ स्टोरीज'ला लागू पडतं. मात्र थेट ‘कहानी’शी साधर्म्य सांगण्याचं कारण एकूणच यातील थ्रिल, अफाट आणि एकाच वेळी प्रेडिक्टेबल व तितकाच अनप्रेडिक्टेबल असणारा शेवट यांच्यामुळे.
बाकी चित्रपट काही वेळा बराच सरस असला तरी त्यातील काही घटनांचं प्रेडिक्टेबल असणं त्याचा एकूण परिणाम जरासा कमी करतं. मात्र या गोष्टीला कोण किती महत्त्व देतो आणि कोणावर तो किती परिणाम करतो, यावर अवलंबून आहे. पण तो आवडेल हे मात्र खरं.
खासकरून जो चित्रपट त्यानेच निर्माण केलेल्या विश्वाभोवती प्रश्नचिन्ह निर्माण करत, आपल्याला ‘आता आपण काय नक्की पाहिलं’ असा विचार करायला लावतो, तो एक प्रकारे यशस्वी झालेला असतो. त्यामुळे हा चित्रपट इतर वेळी त्याच्या प्रेडिक्टेबल असण्याच्या मर्यादेखेरीज आवडून जातो.
क्वेंटिन टॅरंटिनो या दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार ‘प्रत्येक चित्रपटासाठी तो रिलीज होण्याचा काळ हा सर्वांत धोकादायक असतो’. कारण वीकेंडच्या शेवटी जमा झालेला गल्ला त्या विशिष्ट चित्रपटाची शेल्फ लाईफ ठरत नाही. तर ती ठरते तिच्या जास्तीत जास्त काळ समकालीन राहण्याच्या खात्रीनं. ‘मान्सून शूटआऊट’ नंतर हाही चित्रपट स्टोरीटेलिंगच्या बाबतीत खास आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment