अजूनकाही
“The human heart has hidden treasures, In secret kept, in silence sealed; The thoughts, the hopes, the dreams, the pleasures, Whose charms were broken if revealed.” - Charlotte Bronte
आम्हाला राज्यशास्त्र शिकवणाऱ्या एका सरांची एक फार इंटरेस्टिंग थिअरी होती. ते म्हणायचे, ‘आपल्या प्रत्येक कृतीमागे राजकारण असतं. आपण किचनमध्ये गेल्यावर माठातलं पाणी प्यायचं किंवा फ्रिजमधलं असा विचार करून माठातलंच पाणी पितो. त्या कृतीमागेही राजकारण असतं.’ राजकारण म्हणजे दरवेळी सत्ता मिळवण्यासाठीचं साधन असंच नसतं. हवीहवीशी प्रत्येक गोष्ट- बंगला, गाडी किंवा कुठलीही भौतिक सुखं असो, इतकंच काय हाडामासाचा माणूस मिळवण्यासाठीही आपण राजकारण एक साधन म्हणून वापरतो.
थोडक्यात काय, राजकारण हे सर्वव्यापी आहे. माणूस म्हणून जन्माला आलो, तेव्हाच राजकारण आपल्या पाचवीला पूजतं. आणि त्या अर्थानं आपण सगळेच राजकारणी. मायक्रो राजकारण खेळणारे राजकारणी. प्रेमातलं राजकारण किंवा स्त्री-पुरुष नात्यातलं राजकारण हा तर प्राचीन खेळ आहे. इव्ह आणि अॅडमइतकाच प्राचीन. फक्त नाव बदलत जातात. खेळ तोच राहतो. ‘रांझना’ हा सिनेमा कुंदन आणि झोयाच्या प्रेमाच्या राजकारणाची गोष्ट सांगतो.
‘रांझना’ची कथा सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यात फार खोलवर जात नाही. कुंदनच्या झोयाच्या प्रेमात बेभान होऊन उदध्वस्त होण्याची कथा ‘रांझना’ सांगतो. सिनेमात कुंदन हिंदू ब्राह्मण आणि झोया ही मुस्लिम दाखवली आहे. दोघांच्या धर्माचा सिनेमात महत्त्वाचा संदर्भ आहे, पण तो काही कथानकातला मुख्य ‘कॉन्फ्लिक्ट’ नाही. कुंदनचं झोयावरचं एकतर्फी प्रेम, तिला मिळवण्याची त्याची धडपड, त्यातून घडत जाणाऱ्या काही अटळ शोकांतिका, त्यातून निर्माण होणारा पश्चातापाचा प्रपात आणि एक अपारंपरिक शेवट अशा वळणावळणाच्या रस्त्यानं ‘रांझना’ची पटकथा जाते.
माझं वैयक्तिक मत असं आहे की, ‘रांझना’मध्ये दोन सिनेमे आहेत. मध्यंतरापर्यंतचा भाग हा खूप हलकाफुलका, काहीसा मजेशीर आणि उत्फुल्ल आहे. प्रेक्षकांना हा भाग आवडण्याची शक्यता जास्त. काही लोकांचं विशेषतः स्त्रियांचं असं म्हणणं आहे की, सिनेमात कुंदन झोयाचा तिची इच्छा नसताना पाठलाग करत असतो, या प्रकारचं (Stalking) सिनेमात उदात्तीकरण करण्यात आलं आहे. पण टीकाकारांनी हे समजून घ्यायला हवं की, हा सिनेमा निमशहरात/छोट्या शहरात घडत आहे. तिथं stalking प्रकार सर्रास चालतो. जे समाजात घडतंय ते दाखवणं म्हणजे उदात्तीकरण नसतं!
आता येतो प्रेमातल्या राजकारणाचा भाग. झोयाला माहीत असतं की, कुंदन तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. तरी ती आपल्या गरजेनुसार (तिला बघायला मुलगा येतो तेव्हा) त्याचा वापर करून घेते. कुंदनला माहीत आहे की, त्याची मैत्रीण बिंदिया (स्वरा भास्कर) त्याच्यावर प्रेम करते. कुंदन पण बिंदियाला वापरून घेतो. हे सगळं चित्रपटात मजेशीरपणे हलक्याफुलक्या पद्धतीनं दाखवलं आहे. पण काळजीपूर्वक बघितलं तर कळेल की, ही सगळी पात्रं आपापले स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कुणालाही वापरू शकतात. हे सगळं प्रेमाचं राजकारण मध्यंतरापर्यंत उलगडत जातं. त्यानंतर कुंदन झोयाच्या मागे मागे फिरत विद्यापीठ परिसरापर्यंत पोचतो. तिथं तर प्रत्यक्ष सत्तेचं राजकारणच कथानकात प्रवेश करतं.
मध्यंतरानंतर झोया कुंदनचा तिरस्कार करायला लागते. अक्रमच्या (अभय देओल) मृत्यूला कुंदन कारणीभूत आहे असं तिला वाटतं. पण परिस्थिती अशी बनत जाते की, कुंदन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अग्रणी बनत जातो. झोयाला अक्रमची जी स्वप्नं पूर्ण करायची असतात, ती कुंदनमार्फतच पूर्ण होऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण होते. कुंदन आयुष्याच्या या टप्प्यावर यशस्वी आहे, पण आपलं जिच्यावर सर्वाधिक प्रेम आहे, ती झोया आपल्याला कधीच मिळणार नाही, हे त्याला कळून चुकतं. जिच्यासाठीच आपण जगतोय तीच मिळणार नाहीये तर जगून काय उपयोग? कुंदनला उमगलेलं हे कडवं सत्य त्याला आयुष्याच्या अटळ शोकांतिकेकडे घेऊन जातं... मृत्यूकडे. कुंदनचं या सिनेमातलं शेवटचं स्वगत फार अप्रतिम आणि त्याची मन:स्थिती सांगणारं आहे -
“मेरे सामने की आग या तो मुझे जिंदा कर सकती है, या फिर मुझे मार सकती है. पर साला अब उठे कौन, मेहनत कौन करे दिल लगाने को, तुडवाने को. अबे कोई तो आवाज दे के रोक लो! ये जो लडकी मुर्दा सी आखे लिये बैठी ही बगल मे, आज भी हा बोल दे तो महादेव कि कसम वापस आ जाए! पर नहीं, अब साला मूड नहीं. आखे मुंद लेने मे हि सुख है, सो जाने मे हि भलाई है. पर उठेंगे किसी दिन.. उसी गंगा किनारे डमरू बाजाने को.. उन्ही बनारस के गलियो में दौड जाने को, किसी झोया के इश्क में फिर से पड जाने को..!’
या संवादामध्ये ‘रांझना’चं सार आहे.
सध्या आशयाच्या बाबतीत बॉलिवुडमध्ये जे नवनवीन प्रयोग होत आहेत, त्याच्यामध्ये तरुण लेखकांचा मोठा वाटा आहे. त्यात सगळ्यात आघाडीवर असणाऱ्या लोकांमध्ये आहे ‘रांझना’चा लेखक हिमांशू शर्मा. अवघ्या पस्तीस वर्षाच्या वयात त्याच्याकडे चित्रपट लेखनासाठीचे दोन राष्ट्रीय पुरस्कार आहेत. बहुतेक उत्तर भारतीयांप्रमाणे IAS होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असणारा हिमांशू आज सगळ्यात जास्त मानधन घेणारा पटकथा लेखक आहे. लेखक म्हणून त्याचा सीव्ही जबरी इम्प्रेसिव्ह आहे.
‘तनु वेड्स मनू’ (पार्ट १ आणि २), ‘रांझना’ आणि ‘स्ट्रेन्जर’ नावाचा चित्रपट त्याच्या नावावर आहेत. त्याचे सगळे चित्रपट दिग्दर्शक आनंद राय सोबतचे आहे. आनंद रायचा पुढचा चित्रपट- ज्यात एका बुटक्या माणसाची प्रेमकथा दाखवली आहे, तो पण- हिमांशूच लिहीत आहे. यात बुटक्या माणसाच्या भूमिकेत शाहरूख खान आहे. हिमांशूच्या चित्रपटातली पात्रं ही अस्सल मातीतली पात्रं असतात. उत्तर भारतीय संस्कृतीचा एक ठसा त्याच्या कामावर आहे. त्यानं लिहिलेल्या चित्रपटाच्या कथा उत्तर भारतातल्या शहरांमध्ये घडतात. त्याचे संवादही टाळ्याखाऊ आणि प्रेक्षकांना रूचतील असे असतात. असे टाळ्याखाऊ संवाद सध्या हिमांशू आणि रजत अरोरा (‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘डर्टी पिक्चर’फेम) हे दोघेच सातत्यानं लिहितात.
‘तेरा प्यार ना हुआ, युपीएससीका एक्झाम हुआ. दस साल से पास ही नहीं हो रहा’सारखा संवाद कुठल्याही एकतर्फी प्रेम करणाऱ्या माणसाला अपील होऊ शकतो. ‘तनु वेड्स मनू’चे दोन्ही भाग संवादलेखन कसं असावं याचे आदर्श आहेत. त्यानं कागदावर उतरवलेली पात्रं एकाच वेळेस विश्वसनीय आणि प्रेक्षक प्रेमात पडतील अशी असतात. जिमी शेरगिलचा ‘तनु वेड्स मनू’मधला राजा अवस्थी, दीपक डोब्रियालचा पप्पी, कंगनाची थेट हरियाणवी दत्तो, ‘रांझना’मधला मोहम्मद झिशान अय्युबचा एकनिष्ठ मित्र मुरारी किंवा स्वरानं केलेली कुंदनवर एकतर्फी प्रेम करणारी बिंदिया ही पात्रं आपल्या आजूबाजूची वाटावीत इतकी अस्सल आहेत.
‘रांझना’चा दुसरा शिल्पकार आहे दिग्दर्शक आनंद राय. भारतीय चित्रपट सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. आपल्या चित्रपटांच्या कथा जास्तीत जास्त शहरात घडत आहेत. नायक-नायिका डिस्को थेकमध्ये पाश्चात्य सुरावटींवर नाचतात. अंगप्रदर्शन आणि सेक्स सीन्स तर हटकून असतातच, पण आनंदचा चित्रपट या सगळ्यांपासून अजूनही दूर आहे. लेखक हिमांशू शर्माची तक्रार असते की, आनंद त्याला पटकथेत सेक्स सीन किंवा चुंबन दृश्य टाकूच देत नाही. आनंदचे नायक-नायिका पडद्यावर शारीरिक होताना तुम्हाला कधी दिसणार नाहीत. जुन्या काळातला हरवून गेलेला ‘इनोसन्स’ अजूनही आनंदच्या चित्रपटात टिकून आहे. त्याच्या चित्रपटाची कथानकं छोट्या शहरांमध्येच घडतात. त्या अर्थानं आनंद राय हा सध्याच्या बॉलिवुडमधला ‘देशीयते’चा प्रणेता म्हणता येईल. त्याचं हे असं असणंच त्याला दिग्दर्शकांच्या भाऊगर्दीपासून वेगळं करतं.
‘रांझना’ बघताना आपण आपल्या डोळ्यावर चढवून ठेवलेले विविध ‘इझम’चे चष्मे काढून ठेवण्याची गरज आहे. कारण ‘रांझना’ हा खूप misunderstood म्हणता येईल असा सिनेमा आहे. वर वर सिनेमात दिसतात ती अतिशय नजाकतीनं शूट केलेली गाणी, टाळ्याखाऊ संवाद, प्रेमात केलेला त्याग इत्यादी गोष्टी. पण सिनेमाच्या अंतरंगात स्त्री-पुरुष नात्यातल्या राजकारणाचा चेहरा दडलेला आहे. तो प्रत्येकाला कसा दिसेल हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असू शकतं. काही लोकांसाठी भेसूर तर काही लोकांसाठी वास्तविक.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Yogesh Deore
Thu , 29 March 2018
बहुत बढिया, अमोल यांची मांडणी सोपी असते पण त्यात खूप चिंतन दडलेले असते. कृपया जमलेच तर आणखी लिहा. खूप लिहा.