अजूनकाही
आपल्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून कितीतरी शिक्षक धडपडत असतात. त्यांच्यासाठी पुस्तकं उपलब्ध करून देणं, लेखकांच्या भेटी घडवणं, ग्रंथालयं खुली करणं, गोष्टी सांगणं असे विविध मार्ग चांगला शिक्षक हाताळतो. परंतु आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मातीतल्या माणसांविषयी सांगण्यासाठी जर विद्यार्थ्यांच्या भाषेत ते पुस्तकच उपलब्ध नसेल तर? चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत त्या गोष्टी, कहान्या ऐकवतो. पण नसरीन सय्यद या उर्दू माध्यमातील शिक्षिका अधिक वेगळ्या आहेत.
मुलींच्या शिक्षणाची वाट खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्य-फुले’ या कवितासंग्रहाचा त्यांनी उर्दूत अनुवाद केला. उर्दू माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंची ओळख मुळातून व्हावी आणि ती त्यांच्या काव्यातून व्हावी या अभिलाषेनं सय्यद यांनी या अनुवादाची जबाबदारी स्वत:हून घेतली. त्यामुळे सावित्रीबाई फुले या आद्यशिक्षिकेला उर्दू भाषेत नेणाऱ्या त्या पहिल्या लेखिका-अनुवादिका ठरल्या.
नसरीन या मुळच्या लातूरच्या. लग्नानंतर त्या नोकरीसाठी म्हणून पुण्यात स्थायिक झाल्या. पुण्यातील महापालिकेच्या उर्दू शाळेत त्या शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. सध्या त्या सहयोगी या पदावर काम पाहतात. त्यांच्या अंतर्गत आठ शाळा येतात. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील समन्वय राखण्याचं, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याचं, शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या करत आहेत. उर्दू माध्यमातून शिकलेल्या सय्यद यांना पहिल्यापासूनच वाचनाची आवड होती. त्यासोबत हळूहळू त्यांना लेखनाची आवड वाटू लागली. २००३ मध्ये त्यांनी लहान मुलांसाठीच्या छोट्या गोष्टींचं पुस्तक लिहिलं. आजपर्यंत नसरीन यांची १३ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
नसरीन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कवितासंग्रहाचा अनुभवाद ‘शायरा सावित्रीबाई फुले’ या नावानं केला. अनुवादाचा हा प्रपंच कसा घडला याविषयी नसरीन सांगतात, “आम्ही दरवर्षी महात्मा फुले जयंती, पुण्यतिथी, सावित्रीबाई फुले जयंती, पुण्यतिथी अशा दिवसांच्या निमित्तानं मुलांना महात्मा फुले वाडा पाहण्यास नेत असू. त्यावेळेस या दाम्पत्याची तोंडी माहिती देत असू. दरवेळेस माझ्या मनात येई की, यांचं साहित्य उर्दूतून हवं. जेणेकरून जो कोणी उर्दूभाषिक असेल त्यास ते वाचून समजून घेता येईल. मी शिक्षिका असल्यानं कदाचित मला माझ्या या आद्यशिक्षिकेविषयी फार कुतूहल होतं. अठराव्या शतकात मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्नं करणं हे काही येरागबाळ्याचं काम नव्हतं. तिथं त्यांनी संपूर्ण कामच उभारलं. खरंतर आजही जिथं मुलींच्या वाट्याला शिक्षणाची वाट सहजासहजी येत नाही आणि काहींच्याबाबत तर कधीच येत नाही, तिथं अठराव्या शतकात उपेक्षा, अवहेलना, अपमान सहन करून स्वत: शिक्षण घेऊन त्या पहिल्या शिक्षिका झाला. या गोष्टीचा माझ्या मनावर खोल परिणाम झालेला आहे. शिवाय वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी ‘काव्य-फुले’ हा कवितासंग्रह लिहिला. केवढ्या लहान वयात केवढी प्रगल्भता! धर्म, धर्मशास्त्र, कुरीती, प्रथा यांच्यावर सडेतोड प्रहार त्यांच्या कवितांतून दिसतो. महिलांवरील अत्याचार, त्यांची सामाजिक स्थिती याला जबाबदार असणारा धर्म, ब्राह्मणवाद यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. हे सर्व मोलाचं वाटत होतं. उर्दू ही देशात कुठंही बोलली जाणारी भाषा, आंतरराष्ट्रीय स्तरावरही. त्यामुळे या भाषेत आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या आणि मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लढणाऱ्या या मायेविषयी लिहिण्याची इच्छा रोखता आली नाही, म्हणून मग मी या कवितांचा अनुवाद करायचा ठरवला.”
अनुवाद करायचा म्हणजे मुळात तुम्हाला दोन्ही भाषा पुरेपूर यायला हव्यात. मराठीही आणि उर्दूही. उर्दूतून शिक्षण घेतलेल्या नसरीन यांना ते कसं शक्य झालं असा एक स्वाभाविक विचार मनात आला तर त्या पटकन म्हणाल्या, “मी भलेही उर्दू माध्यमातून शिकले, पण माझा भवताल मराठी होता. मी जिथं राहत होते तिथं घराबाहेरच्या वातावरणात मराठीतूनच संवाद व्हायचा. मराठी कानावर पडत होतीच. त्यामुळे मराठीची गोडीसुद्धा लहानपणापासून लागली. त्यातूनच माझी मराठी भाषाही विकसित होत गेली. त्याचा फायदा अनुवादासाठी झाला. अगदीच काही अडलं तर मी त्यातील तज्ज्ञांची, शब्दकोशाची मदत घेत होते. त्यामुळे अनुवादासाठी फार त्रास झाला नाही. अनुवाद करण्यातही वेगवेगळ्या पद्धती असतात. काव्याचा अनुवाद करताना आपल्या भाषेत यमक जुळवत अनुवाद केला जातो. मात्र मी इथं तसं अजिबात केलं नाही. सावित्रीबाईंना जे म्हणायचं होतं, मी तसंच ते उर्दूत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते ‘आझाद नज्म’ या प्रकारात मोडणारं झालं आहे.” आझाद नज्म म्हणजे मुक्तछंद म्हणायचं असेल असा मी कयास लावला.
बोलता बोलताच त्यांनी उर्दूत केलेल्या दोन कविताही सादर केल्या.
‘इल्म नहीं तालीम नहीं
वो हासिल करने का जज्बा नहीं
अक्ल है लेकिन चलती नहीं
उसे इन्सान कहे क्या?’
औरत काम करती रहे
तुफैली ये खाता रहे
हैवानों में ऐसा होता नही
उसे इन्सान कहे क्या?
लिखना पढ़ना आता नही
नसीहत वो पसंद करता नही
हैवान जो समझे वो ना समझे ये
उसे इन्सान कहें क्या?
....................
नींद से जागो तालीम हासिल करो
उठो अति शूद्र भाईयों जाग उठो
रिवायत की गुलामी ये तोडने उठो
मनू और पेशवे मर गये, आंग्लाई है देखो आई
ममानअत तालीम के लिए, मनू की थी वो उठ गई
आलीम अंग्रेज आए, इल्म हासील करलो रे
......
या दोन्ही कविता शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करतात. एका शिक्षेकेची ओढ शिक्षणाकडे असणार हे उघड दिसत होतं. नसरीन यांनी केवळ अनुवादच केला नाही, तर २०१५ मध्ये त्यांनी स्वखर्चानं या पुस्तकांची निर्मिती केली. कुठल्याही पद्धतीनं या पुस्तकांतून नफा कमवण्याचा त्यांचा हेतू नव्हता. जर कुणाला विकत घ्यायचं असेल तर ठीक, अन्यथा कुणी आपल्या मुलांसाठी म्हणून हे पुस्तक मागितलं की, त्या स्वत:हून स्वत:च्या खर्चानं पुस्तक देतात. अनेकदा तर कुणी अभ्यासासाठी, संशोधक विद्यार्थी असेल तर त्यांना त्या टपालखर्चानं मोफत पुस्तक पाठवतात. कुणाच्या अभ्यासासाठी जर ते पुस्तक कामी येणार असेल तर त्याहून वेगळी किंमत काय मिळणार असा त्यामागचा त्यांचा विचार. नसरीन यांच्या या कार्यामुळे सावित्रीबाईंचं लेखन उर्दू भाषेच्या नगरीतही जाऊन विसावलं.
नसरीन यांनी ‘काव्य-फुले’चा अनुवाद केल्यानंतर सावित्रीबाई यांची ‘शक्सियत’ पूर्णपणे आकळता यावी म्हणून त्यांनी त्यांचं साहित्य, त्यांच्याविषयी लिहिलेल्या साहित्याचं वाचन केलं. त्याचवेळेस महात्मा ज्योतीबा फुले यांच्याही समग्र साहित्याचं त्यांचं वाचन सुरू होतं. या साऱ्याचा परिणाम असा झाला की, त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या अनुवादानंतर त्याच वर्षी म्हणजे २०१५ मध्ये महात्मा फुले यांच्यावरही अभ्यास करून उर्दूत एक पुस्तक लिहिलं. ‘महात्मा ज्योतीराव फुले - नजरियात और उनका अदब’ हे ते पुस्तक. ते त्यांनीच प्रकाशितही केलं. यात त्यांनी म. फुले यांचा विविध धर्माकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर त्यांनी संशोधनात्मक लेखन केलं आहे. विशेष म्हणजे ‘नॅशनल कौन्सिल फॉर प्रोग्रेस ऑफ उर्दू लॅग्वेज’ यांच्यावतीनं या पुस्तकाचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला. शिवाय या संस्थेच्या ग्रंथालयात या पुस्तकाला जागा मिळाली. ज्यामुळे मुस्लिमेतर परंतु उर्दूप्रेमी व्यक्तीदेखील त्यांच्या पुस्तकाचा आस्वाद घेऊ शकतात.
लेखनाची आवड असणाऱ्या नसरीन या स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. आपल्या शालेय दैनंदिन कामाकाजातून वेळ काढून त्यांनी ‘फातिमा बी शेख’ व ‘सुलताना चाँद बी’ यांच्यावर संशोधनात्मक चरित्र लेखन केलं आहे. ही दोन्ही पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. याचाही खर्च अर्थात नसरीन यांनी स्वत:च पेलला आहे. नसरीन सांगतात, “क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या सोबती असणाऱ्या फातिमाबी. मात्र त्यांच्याविषयी कुठलंही लेखन कुठल्याही भाषेत उपलब्ध नाही. त्यांच्याविषयीची माहिती केवळ मौखिक स्वरूपात आहे. सावित्रीबाईंच्या चरित्रात थोडीफार माहिती आहे, मात्र ती सखोल नाही. त्यामुळेच त्यांच्या मौखिक माहितीच्या आधारे तरी लिखित पुस्तक असावं असं वाटत राहिलं. त्यातूनच फातिमाबी शेख यांच्यावर पुस्तक लिहिलं. मला जाणीव आहे की, हे पुस्तक परिपूर्ण नाही. मात्र जी काही माहिती आहे ती काळाच्या ओघात निसटून जाऊ नये यासाठी माझी धडपड सुरू आहे. म्हणूनच उपलब्धतेवर आधारित असं पुस्तकलेखन केलं आहे. याचबरोबर सुलताना चाँद बी यांचंही उर्दूतून चरित्रलेखन केलं आहे.”
नसरीन यांची शैक्षणिक साहित्यिक सेवा पाहून पुण्यातील ‘अजबाक’ या उर्दूत अव्वल असणाऱ्या त्रैमासिकानं त्यांच्या एकूण साहित्यावर एक विशेषांक काढला आहे. शिवाय त्यांना ‘अजबाक पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे.
आपल्या विद्यार्थ्यांसाठी इतक्या तळमळीनं काम करणारे शिक्षक आजही आहेत, हे नसरीन यांना भेटून कळत होतं. पुस्तक लिहिणं, अनुवाद करणं याचबरोबर त्यांना एक अनोखा छंद आहे. ते म्हणजे पुस्तकाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचायला देणं. भले त्यासाठी स्वत:च्या खिशाला भार पडला तरी चालेल! नसरीन यांचे पती छोटासा मॅरेज हॉल चालवतात. त्यांना एक मुलगा आहे. तो सहाव्या इयत्तेत शिकतो आहे. हे छोटंसं कुटुंब आपल्या गरजा भागवतानाच इतर मुलांच्या वाचनाची भूक भागवायलाही नेहमीच तत्पर असतं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383
.............................................................................................................................................
लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.
greenheena@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Asiya Khan
Sun , 11 March 2018
Good work(nasrin mam)... It's very useful for Urdu readers who wants to know about Savitri bai phule