नाझी हत्याकांडात स्वयंप्रेरणेनं सामील झालेल्या स्त्रिया
अर्धेजग - महिला दिन विशेष
अलका गाडगीळ
  • इल्से कोच आणि थियोडोर अ‍ॅबेल यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Thu , 08 March 2018
  • अर्धे जग women world जागतिक महिला दिन International Women's Day हॅप्पी विमेन्स डे Happy Women's Day इल्से कोच Ilse Koch थियोडोर अ‍ॅबेल Theodore Abel

अ‍ॅन फ्रँकची गोष्ट आपल्यापैकी अनेकांनी वाचलेली असते. हिटलरच्या छळछावण्यातून सुटका झालेल्या इतर बऱ्याच स्त्रियांनीसुद्धा आपल्या कहाण्या लिहिल्या आहेत. अत्यंत छळदायक आणि दु:खदायक परिस्थितीतही इतरांची काळजी घेणाऱ्या गिसेला पर्ल आणि स्टॅनिस्लावा लशकिन्सा यांच्या आत्मकथा अंर्तमुख करणाऱ्या आहेत. खरं तर मानवजातीवरील विश्वास उडून जावा असाच तो काळ होता. अशा काळात अनेक स्त्रियांनी अतुलनीय धैर्य दाखवलं आणि आपल्या छळकर्त्यांनाही त्यांनी मनोमन माफ केलं.  

नाझीकाळामध्ये असंस्कृतता, असंवेदनशीलता आणि अमानवता या भावनांना उधाण आलं होतं. पण ही सारी करणी पुरुषांचीच असली तरी स्त्रियाही या षडयंत्रात स्वखुषीनं सामील झाल्या होत्या. त्यापैकी प्रमुख नाव होतं इल्से कोच. या महिलेचा रानटीपणा आणि परपीडेत आनंद घेण्याची  प्रवृत्ती अशी होती की, तिला ‘बिच् ऑफ बुकेनवाल्ड’ असं टोपणनाव मिळालं!

कोचचा जन्म १९०६ चा. मूळ नाव मार्गारेट इल्से कोहलर. तिच्या बालपणाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. १९३० या दशकाच्या पूर्वार्धात जर्मनीची आर्थिक स्थिती कमकुवत होती. पहिल्या महायुद्धामुळे जर्मनीवर असंख्य निर्बंध आले होते. जर्मनीची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्यामुळे महागार्इ, बेरोजगारी वाढली होती. नोकऱ्या मिळत नव्हत्या. वातावरण अस्वस्थ होतं. हिटलरचे विचार लोकांना पटत होते. त्याच्याभोवतीचं वलय वाढत होतं. इल्से कोहलरसारख्या अनेक तरुणी आणि तरुण नाझी पार्टीत दाखल झाले होते.

हिटलरनं सुरुवातीला लोकशाहीच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. वायमार रिपब्लिक नेत्यांच्या विरोधात अत्यंत कडवट आणि विखारी भाषा तो वापरत असे. पहिल्या महायुद्धाअंती जर्मनीला व्हर्सायच्या करारावर स्वाक्षरी करावी लागली. त्यानुसार इतर देशांना नुकसान भरपार्इ द्यावी लागली, शिवाय नि:शस्त्रीकरणही करावं लागलं.

हा पराभव जिव्हारी लागला होता. ‘पराभूत देशाचे नागरिक म्हणवून घेणं षंढपणाचं लक्षण आहे’, हिटलरच्या अशा वक्तव्यांमुळे जर्मन नागरिकांना सरकारबद्दल अतोनात द्वेष वाटू लागला. हरवलेली अस्मिता हिटलरच परत मिळवणार अशी खात्री त्यांना वाटू लागली.

१९३३ साली हिटलरनं सत्ता हस्तगत केली. इल्से कोहलर पार्टीची सदस्य झाली. तिथंच तिला आपला भावी पती कार्ल ऑटो कोच भेटला. त्यांनी १९३६ मध्ये लग्न केलं. पुढच्याच वर्षी कार्ल कोच यांना ‘बुकेनवाल्ड कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’चं कमांडट म्हणून नियुक्त करण्यात आलं.

डाकाउप्रमाणे बुकेनवाल्डही मोठा कॅम्प होता. त्याच्या विशाल प्रवेशद्वारावर एक वचन लिहिलेलं होतं- Jedem das Seine. त्याचा सरळ अर्थ ‘आपलं आपल्याकडे’ तर लाक्षणिक अर्थ कैद्यांना लागू होत होता - ‘प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे’.

इल्से कोच आपल्या नवऱ्याच्या कामात अत्यंत आनंदानं सामील झाली, एवढंच नव्हे तर पुढल्या काही वर्षांत बुकेनवाल्डची सर्वांत खतरनाक नाझी अशी ख्याती तिला मिळाली.

कैद्यांकडून लुबाडलेल्या पैशांतून खेळाचं मैदान तयार करण्याचं काम इल्से कोचनं केलं. या उपक्रमावर ६२,५०० डॉलर खर्च झाले. आजच्या विनिमय दराप्रमाणे ही रक्कम दहा लाख डॉलरची. या मैदानात इल्से घोडेस्वारी करायची. घोड्यावरून ती कैद्यांच्या विभागात जात असे आणि कैद्यांना हाका मारून लक्ष वेधून घेत असे. पण हाक आल्यामुळे तिच्याकडे पाहणाऱ्यांना ती चाबकाचे फटकारे मारत असे.

नाझी संकटातून वाचलेल्या अनेकांनी आपल्या साक्षीत म्हटलं होतं की, लहान मुलांना गॅस चेंबरमध्ये पाठवणं इल्सेला विशेष आवडायचं. 

इल्सेवर न्युरेनबर्ग इथं खटला सुरू असताना तिचा लॅम्पशेड, बुककव्हर आणि हात मोज्यांचा संग्रह वादाचा विषय बनला होता. बुकेनवाल्डमधील काही कैद्यांच्या म्हणण्यानुसार हा संग्रह मानवी कातडीपासून बनवला गेला होता. 

कोणाच्या शरीरावर काही गोंदलेलं आहे का याकडे घोडसवारी करत असताना तिचं लक्ष असायचं. अशा कैद्यांना वेगळं केलं जायचं. ते मेल्यावर त्यांची कातडी काढली जायची. या कातड्यांपासून दिव्याची शेड आणि इतर वस्तू तयार केल्या जात असत. तिला अटक केल्यानंतर कॅम्पमधल्या तिच्या घरातून या वस्तू पुरावे म्हणून ताब्यात घेण्यात आल्या होत्या. पण नंतरच्या धुमाळीत या चीजा हरवल्या.

युद्ध समाप्त व्हायच्या आधीच म्हणजे १९४३ साली इल्से आणि कार्ल ऑटो कोच यांना अटक करण्यात आली. कैद्यांचे खून आणि त्यांच्या चीजवस्तूंचा अपहार केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. खरं तर ज्यू आणि नाझीवादाला विरोध करणाऱ्यांना अटक करणं, त्यांचा छळ करणं हा कार्यक्रम नाझी पार्टीचा. पण कार्ल आणि इल्से कोच यांची कृत्यं पक्षाच्या तत्त्वांच्या चौकटीत न बसणारी आहेत, असा अहवाल या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सादर केला.

कार्ल ऑटो कोच यांना बुकेनवाल्ड कॅम्प मुक्त होण्याच्या दहा दिवस आधी फाशी देण्यात आलं. इल्से कोचला अटक करण्यात आली, पण तिच्यावरचा खटला सुरू होऊ शकला नाही. 

युद्ध संपल्यानंतर १९४५ साली बुकेनवाल्डच्या अनेक बंद्यांनी तिच्या विरोधात साक्षी दिल्यामुळे दबाव वाढत गेला आणि खटला उभा राहिला. आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिल्यानंतर तिनं आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं. तरीही गुन्ह्यांचं षडयंत्र योजणं, खून करण्यास प्रोत्साहन देणं आणि इतर युद्ध गुन्ह्यांत समावेश असल्याचे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आणि तिला जन्मठेपेची शिक्षा मिळाली.

गुन्हा सिद्ध झाल्यानंतर दोन वर्षांनी ल्युसीअस क्ले या जर्मनीस्थित अमेरिकेच्या लष्करी गर्व्हनरांनी शिक्षेची मुदत कमी करून ती दोन वर्षांवर आणली. माणसांच्या गोंदवलेल्या कातड्यांपासून वस्तू बनवल्या या आरोपाशी निगडित खात्री वाटण्यासारखा पुरावा नसल्याचं कारण त्यांनी दिलं होतं. तिची मुक्तता झाली तरी आपल्या निकालपत्रात त्यांनी म्हटलं- ‘इल्से कोचबद्दल मला काडीइतकीही सहानुभूती नाही. ती अनैतिक चारित्र्याची आहे. तिनं नि:संशयपणे निंदनीय कृत्य केली. त्या कृत्यांसाठी नव्हे तर युद्धगुन्ह्यांच्या आरोपांसाठी तिच्यावर खटला सुरू आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे.’

इल्से कोचच्या मुक्ततेमुळे खळबळ उडाली होती. तिला पुन्हा अटक करण्यात आली आणि पुढचा खटला १९५०साली सुरू झाला. या वेळेस २५० साक्षीदारांनी साक्ष दिली. ज्यांच्या अंगावर गोंदवलेलं आहे अशा कैद्यांना ती निवडत असे असं चार साक्षीदारांनी सांगितलं. त्यापैकी दोघांना या कातड्यापासून वस्तू बनवण्याचं काम करायला लागलं होतं.

यावेळेस तिच्यावर खुनाला प्रोत्साहन देणं, खून करण्याचा प्रयत्न करणं असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आणि तिला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. 

या शिक्षेविरोधात तिने याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला. शिक्षेमुळे तोही अधिकार नसल्यामुळे इल्सेनी मानवी हक्क आयोगाकडे निवेदन पाठवलं. तेही फेटाळलं गेलं.

इल्सेला प्रथम अटक करण्यात आली, तेव्हा ती गरोदर होती. तिला झालेल्या मुलाला बालकाश्रमात पाठवण्यात आलं होतं. ती शिक्षा भोगत असताना तिच्या मुलाला आपली आर्इ कोण आहे आणि ती कुठे आहे याची माहिती मिळाली. तुरुंगातच जन्म झालेला उवे हा तिचा मुलगा तिला भेटायला जात असे. ‘अयचाच’ या जर्मनीतील तुरुंगात ती शिक्षा भोगत होती. १९६७ साली इल्सेनं आत्महत्या केली. त्यावर्षी उवे तिला भेटायला गेला, तेव्हा ती जिवीत नसल्याचं त्याला समजलं. तुरुंगाच्या स्मशानात तिचं थडगं कुठेतरी आहे.

पण तिनं माणसांच्या त्वचेपासून बनवून घेतलेल्या दिव्यांच्या शेड सापडल्याच नाहीत. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार या वस्तू अस्तित्वातच नव्हत्या. पण मार्क जेकबसन या ज्युर्इश इतिहासकारानं त्यांचा छडा लावण्याचा निर्धार केला आहे. साताठ वर्षांपूर्वी अमेरिकेत कतरिना वादळ आलं होतं. त्यानंतर अनेक वस्तूंचा कतरिना बाजार भरवण्यात आला होता. या बाजारातून स्किप हेंडरसेन यांनी ‘नाझी’ लॅम्पशेड विकत घेतली. तेव्हा मानवी कातड्यांपासून बनवलेली हीच ती शेड अशी बातमी छापूनही आली. हेंडरसेन यांनी ती जेकबसन यांच्याकडे पाठवली. डीएनए टेस्टनुसार ती मानवी कातड्याची असण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं. पण ही फक्त शक्यता आहे, निष्कर्ष नाही असंही नमूद करण्यात आलं. 

थियोडोर अ‍ॅबेल (Theodore Abel) हे येल विद्यापीठाचे समाजशास्त्रज्ञ एका उपक्रमासाठी १९३४ साली जर्मनीला गेले होते. तिथं जाण्याआधी त्यांनी हिटलर प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केला आणि प्रस्ताव दिला. जर्मनीच्या बाहेर हिटलर आणि नाझी पार्टीबद्दल लोकांना फारसं काही माहिती नाही, ते माहीत व्हावं म्हणून त्यांनी अर्ज केला होता. तो मंजूर झाला. त्यांना जर्मनीत येऊन त्यांनी योजलेली स्पर्धा घेण्याची परवानगी मिळाली. स्पर्धा आत्मकथन लिहिण्याची होती. नाझी पार्टी सदस्य किंवा पार्टीच्या समर्थकांना आत्मकथन लिहिण्याचं आवाहन करण्यात आलं. स्पर्धेच्या विजेत्यांना चारशे मार्क्स देऊ केले होते. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतून ५८३ निबंध मिळाले. या निबंधातून भरपूर डाटा मिळाला. या आत्मकथनांवर आधारलेलं अॅबेल यांचं ‘Why Hitler Came Into Power’ हे पुस्तक १९३८ साली प्रसिद्ध झालं. नाझीवादाच्या अभ्यासकांना हे पुस्तक टाळून पुढे जाताच येत नाही.

कोणतंही काम करण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाही, असं अनेक स्त्री सदस्यांनी आपल्या आत्मकथनात लिहिलं होतं. हलकं काम दिल्याबद्दल त्यांची तक्रार नव्हती. बोहेम स्टोल्झ या तरुणीला पार्टीप्रचाराचं साहित्य तयार करण्याचं आणि स्त्रियांच्या मिटिंग आयोजित करण्याचं काम मिळालं होतं. या मिटिंगांमधून ती नाझी विचारांचा प्रचार करत होती. बोहेम स्टोल्झनं स्वत:चं वर्णन ‘वंशाच्या अस्स्ल आणि शुद्ध आत्म्यासाठी लढणारी सैनिक’ असं केलं होतं.

नाझी राज्यात स्त्रियांची काय भूमिका असेल या विषयी हिटलरच्या स्पष्ट कल्पना होत्या. ती कौटुंबिक जीवनाच्या केंद्रस्थानी असेल, एक गृहिणी आणि आर्इ. त्यामुळे स्त्रियांनी करिअर करू नये असा विचार होता. स्त्री डॉक्टर, शिक्षिका, सरकारी नोकरीतील स्त्रियांना आपल्या नोकऱ्या आणि करिअरवर पाणी सोडावं लागलं. सशस्त्र सैन्यात स्त्रियांना प्रवेश नव्हता.

जर्मन भाषेतील तीन ‘क’ करांभोवती स्त्रीचं आयुष्य असावं, असं नाझी पार्टीच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्येच नमूद करण्यात आलं होतं. ते तीन ‘क’कार होते– चर्च, मुलं आणि स्वयंपाक. (चर्च, चिल्ड्रन आणि कुकिंग)

गोबेल्स म्हणाला होता - स्त्रियांनी सुंदर असावं आणि सुंदर मुलांना या जगात आणावं. हिटलरचे ‘सुप्रजनानाचे’ प्रयोग सुरू होते. जननदर वाढावा, त्यामुळे लोकसंख्या वाढेल. तसंच प्रत्येक कुटुंबानं चार मुलांना जन्म द्यावा असा कायदा करण्याचंही घाटत होतं. पण युद्ध आणि जननदर वाढवणं एकाच वेळी शक्य नसल्यामुळे युद्ध जिंकल्यानंतर कायदा करावा असं ठरलं.

सृदृढ बाळं जन्माला यावीत म्हणून मुलींचा बॉडी मास इंडेक्स वाढवण्यासाठीच्या कार्यक्रमांचं नियोजन झालं होतं. कृश राहण्यापासून मुलींना परावृत्त करण्यात येत असे. कृश मुलींना प्रसूतीवेळी त्रास होऊ शकतो म्हणून हा खटाटोप. 

विवाह उत्तेजनार्थ ‘लॉ फॉर एनकरेजमेंट ऑफ मॅरेज’ असा कायदा पारीत करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत जोडप्यांना हजार मार्क्सचं कर्ज देण्यात येत असे. प्रत्येक बाळीमागे अडीचशे मार्क माफ केले जात. आठ किंवा आठपेक्षा जास्त मुलं असलेल्या स्त्रियांना सुवर्णपदक दिलं जायचं. शुद्ध आर्यन वंशवृद्धीसाठी अविवाहित तरुणींनाही आवाहन करण्यात आलं. एस.एस. या निमलष्करी स्वयंसेवकांपैकी ‘शुद्ध’ आर्यन रक्त असलेल्या तरुणांकडून त्यांना मातृत्व मिळावं अशी योजना होती.

स्त्रियांनी शेतकरी स्त्रियांसारखा साधा पोषाख करावा, केसांच्या वेण्या बांधाव्या, सपाट पायताणं वापरावी, सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढू नये, मेकअप करू नये आणि केसांना रंग लावू नये, असं सरकारच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं होतं.

यातील बराचशा कल्पना कुठेतरी वाचल्यासारख्या आणि ऐकल्यासारख्या वाटतात का?

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ‘सुप्रजनाना’ची मार्गदर्शिका काढली होती. गोरी आणि उंच बाळं होण्यासाठी तुम्ही उंच आणि गोरं असण्याची आवश्यकता नाही. पालकांचं शुद्धीकरण, संभोगासाठी ग्रहांच्या चक्रानुसार योग्य काळ, गर्भ राहिल्यानंतर सेक्स वर्ज्य आणि नियंत्रित आहार. गोरं, उंच आणि देखणं बाळ होण्याची गॅरंटी.

‘माँ निर्माता होती है, चाहे तो नर से नारायण बना सकती है, माँ चाहे तो विध्वंसक बना सकती है’, संघाच्या महिला शाखेच्या चंद्रकांता युवतींसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या. स्त्रिया आणि पुरुषांच्या भूमिकांबद्दलही ठाम मतं त्यांनी भाषणात व्यक्त केली होती. ती अशी-  ‘पुरुष का है बाहर का काम करना, धन का काम करना, पौरुष उसका गुन है. स्त्री का गुन मातृत्व है. उस गुन को औरत ने कभी भूलना नहीं चाहिए’.

प्रजनन आणि संगोपनाच्या वर्तुळात स्त्रियांना बंदिस्त करण्याच्या कल्पना इथंही आहेत आणि तिथंही.

स्त्रिया हिंसा का आणि कधी करतात? कोचसारख्या स्त्रिया कशा निर्माण होतात? स्त्रियाही या समाजाचाच भाग आहेत. जे आणि जसे संस्कार पुरुषांवर होतात, ते आणि तसेच संस्कार स्त्रियांवरही होतात. एखा़द्या वंशाबद्दल, जातीबद्दल समाजाच्या मनात द्वेष निर्माण झाला की, तो द्वेष तिच्याही मनात निर्माण होतो. समाजानं शस्त्र उचललं की तिच्या मनातही हिंसा जागृत होते. पुरुषसुद्धा जन्मजात हिंसक नसतो, त्याच्या मनात हिंसा जागवली जाते.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Sun , 11 March 2018


???? ?????

Thu , 08 March 2018

खुपच मस्त.... नाझीवाद आणि त्यावेळेसची स्त्री प्रतिमा अगदी डोळ्यांसमोर उभी केलीत


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा