अजूनकाही
बॉलिवुड अभिनेत्री श्रीदेवीच्या आकस्मिक निधनानंतर माध्यमांनी, विशेषत: टीव्ही माध्यमांनी ज्या पद्धतीनं बातम्या प्रसारित केल्या, त्याला ‘विकृत’ हा एकच शब्द लावता येईल.
त्यानिमित्तानं याच माध्यमावर ज्या माध्यम-वर्तन चर्चा झाल्या, त्यात लंगडी समर्थनं करून झाली, काहींनी ‘आम्ही त्यात नव्हतो’ म्हणून मागच्या मागे हात काढून घ्यायचे केविलवाणे प्रयत्न केले. सोशल मीडिया हा हमामखाना असल्यानं तिथून काही अपेक्षा करणं म्हणजे अवकाळी पावसाची अचूक पूर्वसूचना दिल्यासारखं होईल.
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो असं म्हणतात. टीव्ही माध्यमाच्या बातमीदारीबद्दल, विश्वासार्हतेबद्दल आणि गंभीरपणाबद्दल विवेकी, समंजस आणि वृत्त, बातमी याबद्दल गांभीर्यानं विचार करणाऱ्या नागरिक, माध्यमतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अशांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन एक व्यापक चर्चा छेडणं गरजेचं आहे.
वृत्तपत्रविद्या शिकताना ‘कुत्रा माणसाला चावला ही बातमी नाही, तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी’ असं सांगितलं जातं. या उदाहरणातला अतिशयोक्तपणा काढून नेमकी कशाची बातमी करावी, बातमीमूल्य कसं जोखावं, त्यातलं वेगळेपण आणि महत्त्व असं सारं समग्रतेनं या उदाहरणातून शिकवलं जायचं.
हे उदाहरण जन्माला आलं, तेव्हा वृत्तपत्र (तेही कृष्णधवल) आणि रेडिओ एवढी दोनच प्रसारमाध्यमं होती. यापैकी रेडिओ हे सरकारी माध्यम. (तरीही त्यावरच्या बातम्या आजही विश्वसनीय मानल्या जातात.) या शिवाय काही श्रोते विश्वसनीयतेसाठी थेट बीबीसी ऐकत.
त्या काळात (तो काळ म्हणजे अगदी ८० सालापर्यंतचा) एखादी बातमी वृत्तपत्रात येणं म्हणजे खूपच क्रेडिटेबल, मेरिटेबल वगैरे समजलं जायचं. तोवर वृत्तपत्रं, संपादक या गोष्टींना थेट टिळक-आगरकर परंपरेशी जोडून पाहिलं जायचं. यातून काही वृत्तपत्रं त्यांचे संपादक यांचे हस्तीदंती मनोरे उभे राहिले, तर काही संपादकांनी वृत्तपत्र आणि संपादक यांना जनचळवळीचं स्वरूप दिलं. अशा पद्धतीनं दोन स्तर असले तरी पांढऱ्यावर काळं करताना अनेक कसोट्या लावल्या जात. प्रत्येक वर्तमानपत्राची एक अलिखित विचारधारा, राजकीय कल नियमित व नीट वाचन करणाऱ्या वाचकांच्या लक्षात येई. अशा प्रकारे वर्तमानपत्रं आणि माहिती, बुद्धी, चिकित्सा, मर्मभेद, अंकुश यांचा अन्योन्य संबंध होता.
पुढे वर्तमानपत्रं ही ध्येयवादी पत्रकारितेसाठी, आतबट्याची म्हणून चालू ठेवण्याची गरज वृत्तपत्र मालकांच्या पुढच्या पिढ्यांना अनावश्यक वाटू लागली. त्यांना वर्तमानपत्र हे एक उत्पादन म्हणून तयार करून त्याला विक्रीमूल्य येईल असे बदल करावेसे वाटले. त्यातून रंगीत छपाई, वाढीव पानं, विविध पुरवण्या आल्या. पुस्तकं, कला-क्रीडा यांना असणाऱ्या जाहिरात सवलती बंद करून त्यांचा आकारही मर्यादित करण्यात आला. याशिवाय जिल्हानिहाय आवृत्त्या काढल्या जाऊ लागल्या. माहिती, ज्ञान याऐवजी रंजनाला प्राधान्य व ग्राहकोपयोगी माहिती, पर्यायानं ग्रहोपयोगी बाजारपेठेच्या जाहिराती यांना बातमी, लेख, अग्रलेख यापेक्षा अधिक महत्त्व आलं. पुढे पुढे वर्तमानपत्रं प्रायोजक झालीच, पण अन्य प्रायोजक घेऊन वर्तमानपत्रं काही उपक्रम राबवू लागली. त्यात मेंदी डिझाइनपासून नाटक, सिनेमा ते आरोग्य, अर्थसल्ला, आरोग्यभान, खाद्यसंस्कृती, पर्यटन असे विषयही येऊ लागले. आज वर्तमानपत्र या सगळ्या गोष्टींसहच उपलब्ध असतं.
दूरचित्रवाणी माध्यमांच्या उगमानंतर तेही पूर्ण सरकारी नियंत्रणातील असल्यानं इथल्या बातम्यांनाही महत्त्व आलं. सरकारी हे एक कारण व बातमी देणारा\देणारी यांचं ‘दर्शन’, यांचं नावीन्य होतं. भक्ती बर्वे, अनंत भावे, स्मिता पाटील, स्मिता तळवलकर, प्रदीप भिडे, बुद्धभूषण गायकवाड, चारूशीला वर्तक यांची लोकप्रियता सेलिब्रेटीपणाकडे झुकणारी होती.
९०नंतर माध्यम स्फोट झाला आणि उपग्रह वाहिन्या सुरू झाल्या. त्या नुसत्याच सुरू झाल्या नाहीत, तर २४ तास, ३६५ दिवस सुरू झाल्या. मनोरंजनापासून सुरू झालेल्या या वाहिन्यांमध्ये वृत्तवाहिन्यांची भर पडली आणि बातमीचा चेहराच शब्दश: बदलला. सुरुवातीला अक्षरक्ष: क्षणोक्षणी मिळणाऱ्या ताजा दृश्य बातम्यांमुळे आता वर्तमानपत्रं पटकी किंवा प्लेग झाल्यासारखी मरतात की काय अशी अवस्था आली. काही पत्रकारांनी माध्यमांतर केलं, पण त्यांच्या पिढ्या लवकरच अस्तंगत करून मालकांनी वृत्तवाहिन्यांचं वय चाळिशीच्या आत आणलं. विशी, बाविशीची मुलं-मुली वृत्तप्रतिनिधी म्हणून अक्षरक्ष: बागडू लागली. त्यातही सुरुवातीला अनेक वाहिन्यांनी समंजस पत्रकारिता केली. पण उपग्रहावरती ब्राँड बँड वाढले, त्यांचे लिलाव होऊ लागले, तसे देशी, परदेशी गुंतवणूकदार त्यात उतरले.
सॅटेलाईट हा बकासूर असतो. कितीही द्या कमीच पडतं. वाहिन्यांची संख्या वाढली. भाषिक वाहिन्याही आल्या आणि सुरू झाली जाहिराती आणि टीआरपीसाठी अनैतिक युद्धं! जीवन-मरणाचा प्रश्न असल्यासारखी ही माध्यमं भरकटली. सनसनाटी, आक्रस्ताळी, हडेलहप्पी आणि विकृतही झाली.
श्रीदेवीचा अध्याय हा त्यातला ताजा नमुना. इथून पुढे असंच किंवा याहून विधिनिषेधशून्य पाहायची तयारी ठेवावी लागेल.
या बाजारीकरणाबरोबरच २०१४पासून वाहिन्या, त्यांचे मालक, पगारी संपादक, वार्ताहर यांनी सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधून घेण्याचा नवाच प्रयोग सुरू केला. सोशल मीडियावर याची सप्रमाण उदाहरणं फिरू लागली. मग लाजेकाजेस्तव काही वाहिन्या सरकारविरोधी बातम्या दाखवू लागल्या. पण अनेकदा कुणाही निष्पक्ष दर्शकाला सहज कळेल इतके सरपटणारे प्राणी सर्वत्र दिसू लागले. त्यात या सरकारनं ६० वर्षांत कुठल्या सरकारनं केला नसेल इतका खर्च जाहिरातींवरच केल्यानं माध्यमांना सरकारी महसूल बुडवणं शक्यच नव्हतं. ताठ कण्याचे संपादक, पत्रकार यांची रवानगी खाजगी वस्तुसंग्रहालयात झाली.
इतकं स्खलन झाल्यावर काही चांगली अपेक्षा करणं चुकीचं कसं ठरतं, हे श्रीदेवी प्रकरणावरून दिसून आलं.
सध्या अश्विनी बिद्रे नामक एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या प्रथम अपहरणाची आणि खुनाची बातमी वाहिन्या देत आहेत. २०१६पासून ही अधिकारी नवी मुंबईतून बेपत्ता झाली होती. तिचे पती व साधारण आठ-दहा वर्षाची मुलगी यांचं दर्शन सुरुवातीच्या बातमीतून घडवलं गेलं. प्रथेप्रमाणे फाईल फोटो, घरातल्या लाईव्ह मुलाखती (पतीच्या. सोबत त्यांना खेटून मुलगी) दाखवल्या जात होत्या.
पतीच्या म्हणण्यानुसार पत्नीचं अपहरण झालं आणि त्यात सहकारी पुरुष अधिकाऱ्यांचा हात असावा. आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न ज्यांच्यावर शोधाची जबाबदारी आहे, ते इतर पुरुष पोलिस अधिकारी करताहेत. साहजिकच या अपहरण नाट्यात मैत्रीसंबंध, विवाहबाह्यसंबंध यांचे संकेत दिसू लागले. एक ऑडिओ क्लिपही वाजवण्यात आली.
पुढे एक व्हिडिओ क्लिप प्रसारित झाली. ती आजही अनेकदा दाखवली जाते. त्यात अश्विनी या अक्षरक्ष: एका सिल्क वनपीस नाईटीमध्ये आहेत आणि त्यांची झटापट चालू आहे. आश्चर्य याचं वाटतं ही क्लिप प्रसारित करण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या पतीनं काही पावलं का नाही उचलली?
ती दृश्यं पाहून आपल्या मुलीच्या, नातलगांच्या, समाजाच्या मनात आपल्या पत्नीची काय प्रतिमा उभी राहील? या अजाण वयात आईचं ते रूप ती मुलगी (सतत) काय म्हणून बघेल?
ज्या प्रकरणात तपासानं निश्चित दिशा पकडली नव्हती, तेव्हा एका महिला पोलिस अधिकाऱ्याचं हे खाजगी वर्तन व दर्शन वाहिन्यांनी प्रसारित करून काय मिळवलं?
काही काळापूर्वी अशी दृश्यं आउट ऑफ फोकस अथवा डिजिटल पडद्यानं झाकली जात. ‘ही दृश्यं मनावर परिणाम करू शकतात’ अशी पूर्वसूचना देऊन काही दृश्यं प्रसारित केली जात.
आता मात्र मृतदेहाचे तुकडे कसे केले, कुठलं मशिन वापरलं, किती तुकडे केलं, त्यातलं काय फ्रिजमध्ये ठेवलं, मग तो जप्त केलेला फ्रिज, धड कसं पेटीत वेगळं ठेवलं व सगळं वसईच्या खाडीत फेकलं, याचा साद्यंत वृत्तांत सध्या चालू आहेत. आणि लोकांना ही माहिती हवी असते किंवा तपासातून उघड झालीय तर मग आम्ही दाखवली तर काय हरकत, हा प्रश्न प्रतिप्रश्न लगेच केला जातो.
श्रीदेवी काय किंवा अश्विनी काय. प्राथमिक तपासानंतर या गोष्टी त्यांच्या कामाच्या संदर्भात नसून त्यांच्या खाजगी जीवनातून घडल्यात हे लक्षात आल्यानंतर या वाहिन्यांनी आपल्या प्रसारणात त्यांच्या खाजगीपणाचा सन्मान करावा किंवा त्याचा वाईट पद्धतीनं बभ्रा होणार नाही याची काळजी घ्यायला काय हरकत होती अथवा असावी?
शेवटी अनेक गोष्टीतल्या सीमारेषा धूसर असतात. त्यामुळे वाहिन्यांचं म्हणणं त्यांचा व्यवसाय म्हणून एका मर्यादेपर्यंत मान्यच करावं लागेल. कुठल्याही व्यवसायात नफ्याचं लोणी हे अंतिम ध्येय असणार, असायला हरकत नाही. पण मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी ओरपणं हे अधम व्यवसायातच लागू होतं.
तूर्तास सुजाण दर्शकांना टाळूवरचं लोणी सर्वांत आधी कोण पटकावतो, हाच खेळ हताशपणे पाहणं याशिवाय पर्याय नाही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Tue , 06 March 2018