अजूनकाही
हिंदी चित्रपटांसाठी 'प्रेम' हा विषय आवश्यकच असतो. किंबहुना प्रेमाशिवाय हिंदी चित्रपट पूर्ण होऊच शकत नाही. अर्थात त्याला काही अपवाद आहेतही. मात्र एखादा 'भयपट' तयार करताना आणि त्यासाठी 'भूत' किंवा 'पिशाच्च योनी'सारखा अतिंद्रिय शक्तीसंबंधीचा विषय हाताळताना तिथंही या 'प्रेमा'ला प्राधान्य देण्याचं ठरवलं तर त्याची पिशाच्च योनीतील 'परी' होते खरी; मात्र या 'परी'चा धड 'अदभुत'पट होत नाही आणि 'भूत'पटही होत नाही. अशीच काहीशी स्थिती 'परी' या नव्या चित्रपटाची झाली आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेबरोबरच निर्मातीही बनलेल्या अनुष्का शर्माच्या या चित्रपटात 'परी' : नॉट ए फेअरी टेल्स' असं सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे, या चित्रपटाची कथा 'अदभुत' नसली तरी फारशी भयप्रदही नाही. त्यामुळे 'हॉरर फिल्म' म्हणून पाहायला जाणाऱ्यांची निराशा होते.
मुळात 'परी'चा विषय फार गुंतागुंतीचा आहे. ‘पिशाच्च योनीतील स्त्रियांना होणारी मुलं’ हा कथेचा मुख्य गाभा आहे. बांगला देशातील एका अघोरी प्रथेशी त्याचा संबध दाखवण्यात आला आहे. कोलकात्याचा एक प्रा. कासीम अली अशी मुलं होऊ नयेत याची खबरदारी घेत असतो. त्यासाठी तो संशयित महिलांना आणून त्यांचा जबरदस्तीनं गर्भपात करत असतो. मात्र चित्रपटातील कथेत याची संकल्पना कोठेही स्पष्ट होत नाही. त्यामुळे चित्रपटातील पिशाच्च योनीतील महिलांचा नेमका उलगडाही होत नाही. एक-दोन दृश्यं वगळली तर थरकापही उडत नाही. त्यामुळे नंतर ती फक्त 'प्रेमकथा' उरते आणि त्या दृष्टीनंच चित्रपट पाहिला जातो.
चित्रपटाची सुरुवात एका अपघातानं होते. लग्नासाठी मुलगी पाहून आपल्या आई-वडिलांसह परतणाऱ्या अर्णब या तरुणाच्या मोटारीसमोर अचानक एक वृद्ध महिला येते आणि धडक बसून मरते. ही महिला जंगलात राहत असते. तिचं घर शोधताना पोलीस तपासात तिला 'रूखसाना' नावाची एक मुलगी असल्याचं स्पष्ट होतं. ही 'रूखसाना' जंगलात अतिशय विचित्र आणि गूढ अवस्थेत राहत असते. आईनंतर तिला कोणीच नसल्यामुळे अर्णब तिला आपल्या घरी आणतो. तिथं रुखसाना त्याच्यावर प्रेम करू लागते. मात्र दरम्यान अर्णबचं पियालीशी लग्न ठरलेलं असतं. तिचे अर्नबला अधूनमधून येणारे फोन रूखसानाला आवडत नाहीत.
एके दिवशी रूखसाना त्याला त्याच्यावरील प्रेमाची कबुली देते. दुसरीकडे प्रा. कासीम अली रूखसानाचा शोध घेत अर्नबच्या घरापर्यंत पोहोचतो आणि रूखसाना नेमकी 'कोण' आहे, हे अर्नबला सांगतो. सुरुवातीला अर्नबचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे तो त्याला हाकलून देतो. मात्र नंतर त्याला रूखसानाचं गूढ व्यक्तिमत्त्व कळून चुकतं आणि तो स्वतःहून रूखसानाला कासीम अलीच्या स्वाधीन करतो. मात्र त्यानंतर रूखसानाची प्रतिक्षिप्त क्रिया काय होते आणि ती आपल्या प्रेमात कशा प्रकारे यशस्वी होते, ते पडद्यावरच पाहायला हवं.
'परी'ची कथा कोलकाता शहरात घडते. कथेचा काळ फार जुना नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. रुखसाना आईबरोबर घनदाट जंगलात का राहत असते इथपासून केवळ 'भूत' म्हणून की आणखी काही? कासीम अलीचा नेमका व्यवसाय काय असतो? पिशाच्च योनीतील स्त्रियांचा आणि शवागारातील लोकांचा आणि त्याचा संबध कोणत्या हेतूसाठी असतो, हे कोडं उलगडत नाही.
मुळात कथेची मूळ संकल्पनाच गुंतागुंतीची असल्यामुळे दिग्दर्शक प्रेषित रॉय यांना ती स्पष्ट उलगडून दाखवण्याचं आव्हान होतं. मात्र ती गुंतागुंत कायम ठेवण्यात आली आहे. बांगला देशातील अघोरी प्रथेचा आणि त्याविरुद्ध करण्यात आलेल्या 'कयामत आंदोलना'चा कथेत उल्लेख करण्यात आला आहे. त्याचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याचा वापर फक्त कथेतील गूढ वातावरण निर्मिती करण्यासाठी केलेला आहे हे स्पष्ट जाणवतं. तसंच पिशाच्च योनीतील स्त्रियांची एक-दोन दृश्यं दाखवली नसती तर हा 'भूत'पट आहे, यावर कोणाचाही विश्वास बसला नसता. भूतपटाला आवश्यक असलेलं पार्श्वसंगीत मात्र चांगलं जमलं आहे. तसंच छोट्या-छोट्या प्रसंगातून अर्णब आणि रुखसाना यांची होत चाललेली जवळीक छान जुळवण्यात आली आहे. यातील काही प्रसंग पाहताना मजा येते.
सतत गूढ शक्तीच्या प्रभावाखाली वावरणारी आणि कमालीची भेदरलेली रुखसाना अनुष्का शर्मानं मोठ्या ताकदीनं उभारली आहे. तर अतिशय साधा-सरळ आणि शामळू अर्णब, परमब्रत चॅटर्जीनं (‘कहानी’फेम) चांगला साकार केला आहे. रजत कपूर (प्रा. कासीम अली) आणि नवोदित रितभरी चक्रवर्ती (पियाली) यांनीही आपल्या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे. अनुष्का शर्मासाठी हा अदभुत नसलेला 'भूत'पट पाहायला हरकत नाही.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment