अजूनकाही
वसई-विरार पट्ट्यातल्या दहशतीच्या विरोधात आदिवासींच्या बाजूनं बेडरपणे आवाज उठवणारा सामाजिक कार्यकर्ता, माजी आमदार, मित्रवर्य विवेक पंडितचा गेल्या आठवड्यात फोन आला. त्यानं विचारलं, ‘बाबा (म्हणजे मोरेश्वर वडलकोंडावार) बद्दल कळालं का?’
‘नाही’ म्हणून सांगितल्यावर विवेक म्हणाला, ‘बाबा वारला’ .
‘काय सांगतोस, कधी ?’ मी विचारलं. त्यावर विवेक उत्तरला, ‘आठ-दहा दिवस होऊन गेले आता. एका अपघातात डोक्याला मारा लागला होता. उपचार सुरू असतानाच गेला....’
चुकून नजरेतून सुटली असेल ती बातमी असं समजून आठ-दहा दिवस जुनी वृत्तपत्रं काढून चाळली; वृत्तपत्रांच्या विदर्भ-मराठवाडा, पुणे, मुंबईच्या इंटरनेट आवृत्त्या नेटानं काढून वाचल्या, पण कुठंही बाबाच्या मृत्यची बातमी नव्हती. कदाचित एखाद्या वृत्तपत्राच्या चंद्रपूर किंवा मूल आवृत्तीत आली असेल तर सापडली नाही ती बातमी. नंतर प्रकाश वृत्तवाहिन्यांच्या काही प्रतिनिधींशी संपर्क साधला. पत्रकारीतेतला एकेकाळचा सहकारी, चंद्रपूरचा रवींद्र जुनारकर वगळता कुणालाच मोरेश्वर वडलकोंडावार हे नाव माहिती नव्हतं.
मोरेश्वर वडलकोंडावार हा काही आजीमाजी मंत्री-आमदार-खासदार नव्हता, राजकारणी, घोटाळेबाज उद्योगपती किंवा मीडिया हाती असणारा बडा माणूस नव्हता, भ्रष्ट अधिकारी किंवा कर्मचारी नव्हता, एखाद्या स्वयंसेवी संस्थेचा चमको पदाधिकारी नव्हता, उठसूठ कोणत्याही विषयावर जनहित याचिका दाखल करत समाजहिताचा आव आणणारा कथित चळवळ्या कार्यकर्ता नव्हता, गेला बाजार पद्म पुरस्कार मिळवणारा तद्दन धंदेवाईक नट किंवा नटीही नव्हता... थोडक्यात टीआरपी किंवा वाचकांना आकर्षित करू शकणारं ‘वृत्त मूल्य’ असणारा आसामी नव्हता. तर तो एक गांधीवादी होता. ग्राम विकासाचं स्वप्न ओंजळीत घट्ट पकडून ते व्रत आयुष्यभर जपणारा तो एक साधा माणूस होता.
मोरेश्वर वडलकोंडावार, राहणार मूल, जिल्हा चंद्रपूर, वय ७२ वर्ष.
आम्ही त्याला ‘बाबा’ म्हणायचो. आमची ओळख झाली त्याला आता चाळीस वर्षं उलटून गेलीयेत. ते वर्ष बहुदा १९७५ असावं. तेव्हा मी ६० रुपये प्रतिमहा वेतनावर औरंगाबादच्या नेहरू युवक केंद्रात अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून नोकरी (?) करत होतो. या पगारातून उदरभरण करणाऱ्या मेसचे प्रतिमाह ४५ रुपये सुटत असल्यानं ही नोकरी हा माझा मूलभूत आधार होता. शिवाय वाचायला मिळणारी पुस्तकं आणि भेटणारी माणसं हा बोनस होता. पद्माकर खेकाळे, उल्हास उपाख्य राजाभाऊ गवळी, महत्त्वाचं म्हणजे डॉ. कल्पना जोशी ही भली माणसं मला इथंच भेटली. या केंद्रातल्या विविध उपक्रमांत वेगवेगळ्या विचाराचे लोक विशेषतः तरुण येत. वेगवेगळ्या विचाराच्या लोकांनी एकत्र यावं, एकमेकाला समजून घ्यावं, चर्चा कराव्यात, वाद घालावेत, प्रबोधन करून घ्यावं/करावं, अशी तेव्हा पद्धत होती. नेहरू युवक केंद्रासोबतच दूर अरण्य प्रदेशातील बाबा आमटेंच्या आनंदवनात, मुंबईत युवक बिरादरी, पुण्यात राष्ट्र सेवा दल अशी प्रकाशाची अनेक बेटं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तेव्हा होती. परस्परविरोधी राजकीय मतभेद होते, मनभेद नाही. आतासारखा एकारला कर्कश्शपणा आणि परस्परांत मतभेदाचे अभेद्य तट नव्हते. तेव्हा विश्व युवक केंद्राच्या कल्पनेनं दिल्लीला नुकताच आकार घेतलेला होता. तिथले कार्यक्रम प्रमुख मनोहर गोलपेलवार नावाचे विदर्भातले गृहस्थ होते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विचारांच्या तरुणांत परस्पर संवाद, विचार विनिमय, चर्चा, प्रबोधन व्हावं यासाठी ते प्रयत्न करत. त्यांना एकत्र आणण्यासाठी ते अनेक शिबिरं घेत असत.
मनोहर गोलपेलवार यांनी १९७५ साली नागपूरच्या आमदार निवासात आयोजित केलेल्या अशाच एका शिबिरात आम्ही भेटलो. त्यात येवल्याचा मोहन गुंजाळ, ज्याच्यामुळे मी राष्ट्र सेवा दलाकडे जास्त आकर्षित झालो तो पुण्याचा प्रकाश कांबळे, अहमदनगरचा रवी पारस्कर, मुंबईच्या पुष्पा पालेकर, जयश्री भुरे आणि विवेक पंडित, पुढे रुस्तम झालेली नागपूरची भारती गोखले, अमरावतीची वसुधा पांढरीपांडे, औरंगाबादचा एमबीबीएस करणारा रवींद्र जोशी (याच शिबिरात त्याचे सूर पुष्पा पालेकरशी जुळले. दोघांनी पुढे विवाहही केला.) तसंच मूलहून आलेला मोरेश्वर वडलकोंडावार यांच्यासह आम्ही ३०-३२ जण होतो. पहिलं ओळखीचं सत्र झालं, तेव्हा लक्षात आलं की, वयानं मोरेश्वर वडलकोंडावार हा आमच्यात सर्वांत ज्येष्ठ म्हणजे पस्तीशीचा, भारती तिशीच्या घरात आहे तर बाकी आम्ही सर्व पंचविशीच्या आंतले . पहिल्याच सत्रात सूर जुळले आणि आम्ही मोरेश्वर, तसंच भारतीला अरे-तुरे संबोधू लागलो. मोरेश्वरला त्याच्या परिवारात ‘बाबा’ म्हटलं जातं असं कळलं, तेव्हापासून आम्ही सर्वच त्याला बाबा म्हणू लागलो. यातले आम्ही अनेक पुढे कायमचे संपर्कात आलो.
कायम इस्त्री न केलेले खादीचे-त्यातही बहुसंख्य वेळा बिनबाह्यांची बंडी आणि लांबसर चड्डी घातलेला, लहान चणीचा, काळ्या वर्णाचा, गांधी आणि विनोबावर अविचल निष्ठा आणि त्यांच्याविषयी ओतप्रोत आदर असणारा, अत्यंत माफक बोलणारा, काय करतो आहे आणि पुढे काय करायचं आहे याविषयी ठाम असणारा, निर्व्यसनी मोरेश्वर वडलकोंडावार उपाख्य बाबा म्हणजे सालसता, साधेपणा आणि निर्व्याजपणाचं तेवतं प्रतीक होता. ग्राम विकासाचा त्याला ध्यास होता. त्यासाठी आयुष्यात कधीही कोणत्याही शहरात न जाता मूल या गावीच काम करण्याचा त्याचा निर्धार होता. मूल या गावी त्यानं ग्राम विकास सेवा मंडळाची स्थापना केलेली होती. आम्ही बहुसंख्य शिबिरार्थी कानात वारं शिरल्याच्या आणि त्यामुळे हुंदडायची संधी शोधणारे होतो. अनेकदा बाबा आमचं सॉफ्ट टार्गेट असे, पण आमच्या खोड्या सहजपणे घेण्याची सहनशीलतेसोबतच स्तिमित करणारी क्षमावृत्ती त्याच्यात होती. नागपूरच्या त्या प्रसिद्ध जीवघेण्या थंडीत २६ डिसेंबरच्या मध्यरात्री आम्ही त्याला फसवून रूमच्या बाहेर आणलं आणि थंडगार पाण्यानं आंघोळ घातली. नंतर घोर कुडकुडतच बाबा झोपी गेला, पण रागावला नाही. आमचं सुसाट वागणं बाबाच्या सभ्यपणाला धक्के देत असे, तरी त्याचा तो मौन साक्षीदार होत असे.
शिबीर संपलं, आम्ही पांगलो. नंतर पत्रकारितेच्या निमित्तानं माझा मुक्काम नागपूरलाच पडला आणि रिपोर्टिंगच्या निमित्तानं तिकडे गेलं की, बाबाच्या भेटी अनियमितपणे का होईना पुन्हा सुरू झाल्या. बाबा वयानं वाढलेला होता. काळसर वर्ण आणखी रापलेला होता. ग्राम विकासाची त्याची जिद्द कायम होती. स्वस्त किंमतीत घर उभारणी, विधवा-परित्यक्ता-दारिद्र्यरेषेखालील महिलांना रोजगार मिळवून देणं, त्यांना शिलाई कामाचं प्रशिक्षण देणं, अशी अनेक कामं करण्यात तो आकंठ रमलेला होता. विणकामात बाबाला मोठी रुची असल्याचं दिसलं. तो अत्यंत उत्कृष्ट घोंगडी तयार करायचा. (भेट म्हणून त्यानं एक घोंगडी मलाही दिली होती.) खादीवरची त्याची निष्ठा अविचल होती. तो स्वत: चरख्यावर सूत काढून खादी विणायचा. त्यानं चरखा संघ स्थापन केलेला होता.
हळूहळू लक्षात येत गेलं की, हे सगळी काम करत असताना समाजाला मात्र त्याच्या कामाविषयी फार काही आस्था नव्हती, किंबहुना हेटाळणी जास्त होती. एका जमिनीच्या एका तुकड्यावरून तो आणि गावातील काही लोकात संघर्ष सुरू झालेला होता. त्यातच राजकारण, समाजकारण, अर्थकारणाचे पैलू रंग झपाट्यानं बदलण्याचे दिवस आले. जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेमुळे तर हे रंग बदलण्याची गती भोवंडून टाकणारी झाली. लोकांच्या हाती पैसा येऊ लागलेला होता आणि व्यसन आणि चंगळवादाची पुस्तकात वाचलेली आमिषं गावच्या सीमा ओलांडून घराघरात पोहोचलेली होती. बाबासारख्याचा जीव गुदमरवणारं ते वातावरण होतं. निरलस सेवेचं वलयी ‘एनजीओकरण’ होऊ लागलेलं होतं. तो एक उपजीविकेचा ‘हाय प्रोफाईल’ व्यवसाय होऊ लागलेला होता. इकडे बाबा उपाख्य मोरेश्वर वडलकोंडावार मात्र एकखांबी तंबू होता. बदलत्या वातावरणानं तो निराश होऊ लागलेला होता. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारतापासून दूर जाणाऱ्या समाजापासून तुटण्याची बाबाची प्रक्रिया सुरू झालेली होती. तो त्याची लढाई एकटाच लढत होता. एकाच वेळी तो कार्यकर्ता आणि माणूसपण जपण्याचा आटोकाट प्रयत्नही करता होता आणि त्याच वेळी नाऊमेद होतं चालला होता, असं जाणवलं. माझ्या पिढीच्या गांधीवादी किंवा अन्य विचारांच्या पूर्ण वेळ झोकून देऊन काम कारणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या म्लान चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसणारं वैफल्य बाबाच्याही ठायी दिसू लागलं. संस्था बंद करताना मध्यंतरी पाठवलेल्या एका पत्रात बाबानं त्याच्या व्यथा आणि नैराश्यांचाही कबुलीनामा पाठवला, पण आम्ही काहीच करू शकलो नाहीत कारण आम्ही जगण्याच्या त्या भोवंडून टाकणाऱ्या भोवऱ्यात अडकलेलो होतो.
२०१२ नंतर मी आधी काही कौटुंबिक संकटात सापडलो. नंतर तर नागपूर सोडून दिल्लीमार्गे थेट औरंगाबादला आलो आणि स्थायिक झालो. बाबाशी संपर्क राहिला नाही. आता तर तो कायमचा तुटला आहे...
बाबा कार्यकर्ता होता. तो निराश-हताश झाला तरी कार्यकर्ताच राहिला आणि एक कार्यकर्ता म्हणूनच तो मृत्यूच्या अधीन झाला. कोणत्याही स्तरावरचा कार्यकर्ता जसा अलक्षित राहतो तसाचा बाबा उपाख्य मोरेश्वर वडलकोंडावार आयुष्यभर राहिला... त्याचा मृत्यूही अलक्षितच राहिला...
(बाबा उपाख्य मोरेश्वर वडलकोंडावार यांचा मुलगा पुण्यात असतो. त्याचा संपर्क क्रमांक 9922946346 असा आहे.)
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Satish Deshpande
Fri , 09 March 2018
Praveen Bardapurkar Sir-) सर, आपला मोबाईल नंबर मिळाला आपल्याशी संपर्क साधायला मला आवडेल.
Praveen Bardapurkar
Tue , 06 March 2018
Satish Deshpande>>>बाबा उपाख्य मोरेश्वर वडलकोंडावार हा कडवा निष्ठावान होता . असे कडवे लोक तडजोडी करण्यास धजत नाहीत . ते त्यासंदर्भात धगधगत्या विस्तवासारखे असतात . त्या विस्तवाशी छेडछाड करायचा प्रयत्न केला की धग म्हणा की चटका बसणारच . अशी माणसं स्वत:ही ती धग सोसतात ; त्याची किंमत देतात आणि त्याबद्दल त्यांना खेद किंवा खंत मुळीच नसते . कडवेपणामुळे बाबा अतिस्पष्ट होता आणि कुणासही सुनावण्यास किंवा कुणावरही टीका करण्यास तो कचरत नसे ; त्यामुळे अनेकजण दुखावले असणार , यात शंकाच नाही . खूप जुना प्रसंग आहे- एकदा माझ्याकडे आल्यावर त्याला मद्याची बाटली दिसली आणि त्यानं मलाही चांगलं खडसावलं . तेव्हा खरं तर मी मद्य प्रश्न करत नसे आणि पाहुण्यांसाठी ते मद्य आणण्यात आलेलं होतं पण , तेही बाबाला ठामपणे नामंजूर होतं ! कुमार सप्तर्षी यांच्याबाबत बाबाचं मत प्रतिकूल होण्यामागे अनेक कारणं होती . त्यापैकी एक कारण संस्थेच्या नागपूर शाखेत कुमार सप्तर्षी आणि एका वादग्रस्त ( हा माझा शब्द आहे ; बाबाचा शब्दप्रयोग जहाल असायचा ) बिल्डर यांच्यात झालेली मैत्री हे आहे . त्याचे तपशील आता बाबा नसतांना बोलण्यात काहीच हंशील नाही . बोला एकदा . माझा संपर्क क्रमांक ९८२२०५५७९९ आहे .
Satish Deshpande
Sat , 03 March 2018
मी सत्याग्रही विचारधारा मासिकात काम करत असताना त्यांची भेट हाेत असे. ते पुण्यात येत तेव्हा ते आॅफिसात येत असत. आमच्या गप्पा व्हायच्या. त्यांना अन्यायाबद्दलची, भ्रष्टाचाराबद्दल चीड हाेती. ती त्यांच्या बाेलण्यात जाणवत असे. ते कधी कधी मूल, चंद्रपूरहून लेख पाठवत. टायपींग मशीनवर ती पानं टाईप केलेली असत. लेख वाचल्यानंतर ते लेखकाला आवर्जून प्रतिक्रिया पाठवत. मराठीतून आलेले ते मॅसेज मला अजून आठवताहेत. ते टेक्स्ट मॅसेजमधून सुद्धा डिबेट करीत असत. मला त्यांची विराेधी प्रतिक्रिया आवडे. खूप मॅसेजेस झाल्यावर मी फाेन करून मग त्यांच्याशी दीर्घ बाेलत असे. ते एकदा आॅफिसात आले असताना आमचा वाद झाला. त्या वादाचा विषय हाेता- 'डाॅ. कुमार सप्तर्षी हे गांधीवादी आहेत की नाहीत?' डाॅक्टर माझे संपादक , मार्गदर्शक वगैरे.. त्यामुळे साहजिकच मी डाॅक्टर गांधीवादी आहेत असे म्हणायचाे. पण ते एेकून घ्यायला तयार नव्हते. त्यांनी अनेक उदाहरणं दिली. शेवटी मी माघार घेतली. एकदा स्त्रीयांची मासिक पाळी आणि वापरात येणारी वस्त्रे या विषयावर आम्ही बाेललाे हाेताे. अर्थात हा विषय बाेलण्याच्या आेघात निघाला हाेता. त्यांची मतं मला जुनी वाटली. मी त्यांना मला जे जे माहिती आहे, ते ते समजून सांगितलं. इथं मात्र त्यांनी माझी मतं मान्य केली. पॅडमॅन सिनेमा पाहिल्यावर मला त्यांची आठवण आली हाेती. त्यांचं एकाच वाक्यात वर्णन करायचं तर त्यांना - स्वच्छ मनाचा माणूस, असंच म्हणावं लागेल. तळमळ असणारा, गांधी-विनाेबांवर निष्ठा असणारा हा साधा माणूस हाेता. गेली दीड-दाेन वर्षांपासून आमचा संपर्क नव्हता. आज प्रवीण बर्दापूरकर सरांचा लेख वाचून ते गेल्याचं समजतय. सदाशिव पेठेतल्या १४६८ विष्णुदर्शन (युक्रांदचे क्रांतिनिकेतन) या जुन्या इमारतल्या अंधुकशा प्रकाशात, पायऱ्यांवरून वरती येणारी त्यांची शुभ्र कपड्यातली प्रतिमा मला आठवतेय... त्यांना श्रद्धांजली!!! - सतीश देशपांडे