अजूनकाही
कुठलाही चित्रपट हा जॉनर (genre) स्पेसिफिक नसतो, असं माझं मत आहे. म्हणजे त्याचा बेसिक प्रकार, उदाहरणार्थ ड्रामा अथवा कॉमेडी किंवा इतर काही, हा जरी ठरलेला असला तरी त्याला सोबत म्हणून किंवा पूरक म्हणून इतर एक किंवा अनेक प्रकारही समोर येत राहतात. जी गोष्ट 'परी'मध्येही घडते. अर्थात ती चित्रपटासाठी चांगली आहे की वाईट हे नंतर ठरतं, आणि हे मतही व्यक्तीसापेक्ष बदलत जातं.
अर्णब (परांब्रता चॅटर्जी) हा लग्नाकरता एक स्थळ पाहण्यासाठी आलेला आहे. त्याप्रमाणे तो पियालीला (रिताभरी चक्रबर्ती) भेटतो. (पुढे जाऊन त्यांचं लग्नही ठरणार आहे.) मात्र तिथून पुन्हा कोलकात्यात परतत असताना एका जंगली भागात त्याचे वडील गाडी चालवत असताना अॅक्सिडेंट होतो आणि सदर स्त्री मरण पावते. पोलिसांसोबत तिच्या घरी पोचल्यावर त्यांना तिची मुलगी, रुक्साना (अनुष्का शर्मा) साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडते. ते तिला सोडवतात, आणि शव तिच्या हवाली करतात.
तर दुसरीकडे फ्लॅशबॅक्सच्या आणि रिअल टाइम घटनांच्या माध्यमातून आपल्याला प्रोफेसर वसिम अलीची (रजत कपूर) ओळख होते. (जी पुढे बराच काळ संदिग्ध राहते.) तरी साधारण 'इफरित'नामक एका सैतानाशी याचा आणि रुक्सानाचाही काहीतरी संबंध आहे असं कळतं.
'इफरित' आणि हे दोघेही तिच्या मागावर असल्यानं ती अचानक अर्णबपर्यंत येऊन पोहचते आणि त्याच्याजवळ राहू लागते. आणि तोही तिच्या आईच्या जाण्यानं तिला आपली जबाबदारी समजतो. मग एकूणच रुक्सानाचा संदिग्ध भूतकाळ आणि तिचं रहस्य, इफरितचा मागोवा आणि प्रोफेसर अलीचं सत्य या सर्व गोष्टींची गुंफण म्हणजे 'परी' असं किमान शब्दांत वर्णन करता येईल.
ही कथा आणि गुंफण प्रभावी आहे का, तर नक्कीच आहे. ती अगदी अनकन्व्हेन्शनल हॉररही म्हणता येईल. पण तिचा हा प्लस पॉइंटच काही वेळा तिला कुठेतरी अडथळा निर्माण करणारा ठरतो. त्यामुळे ती एकाच वेळी कन्व्हेन्शनल हॉरर चित्रपटांमधील ट्रिक्स वापरत, जम्प स्केअर्सच्या मदतीनं एक वेगळंच विश्व आणि 'माहौल' तयार करते, आणि त्याच वेळी कथेच्या जोरावर अनकन्व्हेन्शनल ठरते.
पण सोबतच होतं असं की, ही गुंतागुंत बरीच वाढत जाते. आधीच समांतर रीतीनं सुरू असलेल्या अशा दोन घटना, ज्यातील पात्रं अनेकदा एकत्र येतात, त्यात पुन्हा फ्लॅशबॅक्सची भर. यामुळे होतं काय की हा प्रकार खिळवून ठेवणारा असला तरी बऱ्याचदा हातचं राखत गोष्टी उलगडत जातात आणि त्यामुळे अगदी गोंधळ उडत नसला तरी सुरुवातीचे दोन्ही अॅक्ट्स रेंगाळतात. आणि आपण नेमका कशाचा मागोवा घेत आहोत हेच आपल्याला कळत नाही.
एवढं होऊनही चित्रपट बराच उजवा ठरतो. अनेक गोष्टी संयतपणे उलगडतो. तयार झालेले (किंवा केलेले) प्रश्न सोडवतच नाही तर पात्रांचा सायकॉलॉजिकल प्रवासही उजवा दिसून येतो. केवळ 'त्या' सैतानाचा नाश करणं किंवा तत्सम गोष्ट त्यांचं ध्येय न राहता तयार झालेली भावनिक नाती जपणं, आणि समोर आलेली समस्या सोडवणं असा दुहेरी उद्देश प्रत्येक कृतीमागे राहतो. आणि शेवटी भलेही निर्णय घ्यायला पियाली, रुक्साना आणि अर्णब या तिघांनाही उशीर झाला तरी तो निर्णय त्यांनी स्वतःला आत्मभान झाल्यानं घेतला आहे, ही गोष्ट एक पात्र म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून त्यांचा मानसिक प्रवास दाखवताना महत्त्वाची ठरते.
हा चित्रपट गेल्या वर्षीच्या प्रसिद्ध 'गेट आउट' या चित्रपटाप्रमाणे अनकन्व्हेन्शनल हॉरर ठरतो. यात अगदी 'सायकॉलॉजिकल थ्रिलर' म्हणावा अशी मूल्यं नसली तरी एक तरल असा उल्लेख करता येईल अशी प्रेमकथा, बऱ्याच ठिकाणी निर्माण झालेली ऑकवर्ड आणि अनइन्टेन्शनल विनोदी दृश्यं यामुळे चित्रपटात हॉरर चित्रपट म्हणावा अशा गोष्टीसोबत यादेखील गोष्टी असल्यानं आणि सोबत बरीच चांगली कथा असल्यानं हा सरसकट निर्बुद्ध किंवा टाकाऊ ठरत नाही.
.............................................................................................................................................
‘गुजरात २०१७ चित्र, चरित्र आणि चारित्र्य’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383
.............................................................................................................................................
याखेरीज चित्रपट प्राचीन बंगाली लोककथा, पाश्चिमात्त्य एलिअन कथा, कुठल्याही गावात पारावरील गप्पांमधून समोर येणाऱ्या भुताखेतांच्या गोष्टींप्रमाणे भासणारं वातावरण दृश्यं इत्यादी सर्वच गोष्टींचा वापर करतो. सोबतच तो 'परी'भोवती कायम गूढ वातावरण कायम ठेवतो, ज्यामुळे आपल्याला समोरील पात्र नक्की कशाला सामोरं जात आहे याची उत्सुकता कायम राहते. शेवटच्या काही मिनिटांत घडणाऱ्या घटना तर अनेकदा आपण करत असलेला विचार खरा ठरेल, असे संकेत देत कधी तो खरा ठरवतात तर कधी हुलकावणी देऊन जातात. त्यामुळे थर्ड अॅक्ट बऱ्याच जलद गतीनं सुरू राहुन याआधी समोर आलेले प्रश्न सोडवत तर काही प्रश्न नव्यानं तयार करत घडत राहतो.
अनुष्कानं साकारलेली रुक्साना एका क्षणी मोहक तर दुसऱ्याच क्षणी भीतीदायक वाटत राहते. तिच्यातील हे झटपट घडणारे बदल तिचं कौतुक करायला भाग पाडतात. निर्माती म्हणून ती जितकी चांगले चित्रपट निवडते आहे, त्याच गतीनं आणि पद्धतीने ती तिच्या अभिनयाबाबतही कौतुकास्पद काम करत आहे. चॅटर्जी 'कहानी'मध्ये जितका प्रभावी वाटला होता, तो यातही तितकाच प्रभावी आहे. शिवाय प्रोफेसर अली म्हणून असलेल्या रजत कपूरच्या रूपानं चित्रपट एक तगडी स्टारकास्ट घेऊन समोर येतो. आणि तितकेच चांगले परफॉर्मन्सही देतो.
चित्रपटाचं साउंड डिझाइन आणि पार्श्वसंगीत पूरकच नव्हे तर चित्रपटातील एक महत्त्वाचा घटक ठरते. सिनेमॅटोग्राफर म्हणून जिश्नू भट्टाचर्जीचं काम कौतुकास्पद आहे. एरवी दिसलेलं कोलकाता आणि यात दिसलेलं कोलकाता यांच्यात बराच फरक दिसून येतो. बहुतेक वेळी कोसळणाऱ्या पावसाच्या सोबतीनं चित्रपटात एक गूढ वातावरण निर्माण करून ते कायम ठेवण्यात त्याचा कॅमेरा आणि पार्श्वसंगीत दोन्ही महत्त्वाचे ठरतात. आणि प्रोसित रॉयही दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून पहिल्याच प्रयत्नात लक्ष वेधून घेतो.
एंड क्रेडिट्स भारी आहेत. ते नक्की पहावेत. स्केचेसच्या सोबतीनं येणाऱ्या या क्रेडिट्सनं मला अलीकडे पाहण्यात आलेल्या एका 'किल्स ऑन व्हील्स' या चित्रपटाच्या एंड क्रेडिट्सची आठवण तर करून दिली. त्यामुळे बॉलिवुडमध्येही काही लोक पात्रांवर विशेष काम करत, केवळ 'होते होते हो गया' या भावनेनं काम करत नाहीत, हे पाहून चांगलं वाटतं. शिवाय शेवटी येणारं रेखा भारद्वाजचं 'सोजा सोजा' हे गाणं फार अफाट आणि खास आहे. ते जरूर ऐकावं. चित्रपटाला क्रेडिट्स आणि सोबतीला हे गाणं याहून जास्त योग्य शेवट लाभला नसता.
एकूणच 'परी' ग्रेट प्रकारात मोडणारा नसला तरी तो दुर्लक्ष करण्याजोगाही नाही. आणि तो इतर टाकाऊ हॉरर चित्रपटांपेक्षा उजवा तर नक्कीच आहे. त्यामुळे तो एकदा पाहण्यास काहीच हरकत नसावी.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment