बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत
ग्रंथनामा - झलक
इरावती कर्णिक
  • ‘बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 02 March 2018
  • ग्रंथनामा झलक बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत Batlitalya Rakshasinich Manogat इरावती कर्णिक Irawati Karnik

तरुण नाटककार इरावती कर्णिक यांचा ‘बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत’ हा लेखसंग्रह नुकताच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालाय. या पुस्तकातील त्याच शीर्षकाचा हा लेख...

.............................................................................................................................................

सकाळी खिडकीबाहेरच्या ग्रिलमध्ये लक्ष जातं आणि आठवतं की, आपण गेले अनेक दिवस झाडांना पाणी घालायला विसरतोय. आजीने नागपूरहून पाठवलेलं रोपटं मेल्यासारखं दिसतंय. आपल्याला स्वत:ला सांगावंसं वाटतं की, पाणी घालून बघू; दोन दिवसांत नीट होईलही. पण ज्या तऱ्हेनं त्यानं मान टाकलीय, त्यावरून आपल्याला आत कुठेतरी कळतं की, ते मेलंच आहे. भयानक अपराधीपणाची भावना येते. वाटतं, आपण आयुष्यात काहीच नीट करू शकत नाही. सतत जवळच्यांना निराश करतो. आजपर्यंत आपण निरर्थक कोर्सेस, क्लासेसवर आई-बाबांचे केवढे पैसे फुकट घालवलेत! सगळं चुकलंय. आता काहीही सुधारण्याची वेळ उलटून गेलीय. आपण एक मोठ्ठं फेल्युअर आहोत.

केस कापायला गेलं असताना आपण वाट बघत बसलेले असतो. एक चकचकीत मासिक आपण चाळायला घेतो. त्यात माओरी आदिवासी जमातीबद्दल एक स्टोरी असते. त्यांची घरं, त्यांचे कपडे, त्यांचं जेवण, त्यांचे दागिने, त्यांची शस्त्रं, त्यांची चित्रं! अचानक आपली नजर एका रेखाटनावर पडते. गोलाकारात एक नक्षीदार शार्क मासा एका वेलीत गुंफलेला असतो. मध्यभागी फुलपाखरासारखा दिसणारा पाण्याखालचा मँटा रे नावाचा प्राणी असतो. हे त्या जमातीत मैत्री आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, असं लिहिलेलं असतं. आपल्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. आपण गेले इतके महिने टॅटूसाठी जे डिझाइन शोधतोय ते हेच- याची खात्री पटते. आपण स्वत:ची त्या टॅटूसकट कल्पना करतो. कोणी विचारलंच, की हेच का, तर विलक्षण वाटेल असं उत्तर माहिती वाचून घोकून ठेवतो. आयुष्यात सगळं आपल्या मनाप्रमाणेच घडतंय असा विश्वास वाटतो. पुढेही आपण ठरवू तेच घडेल, हे पटतं. वाटतं, सगळं जसं असायला हवं तसंच आहे.

घरातून बाहेर पडायची घाई असते. धावपळीत अर्ध्या गोष्टी सापडत नसतात. हेअर ड्रायर, डिओ, लोशन, कपडे पटापटा निवडावे लागतात. नशिबाने टॉपला इस्त्री असते. जीन्समध्ये दोन्ही पाय घालून ती चढवायची वेळ येते आणि लक्षात येतं की, खूप जोर काढावा लागतोय. धुतल्या धुतल्या जीन्स थोड्या घट्ट असतात हे खरं, पण इतकी मेहनत नाही घ्यावी लागत घालताना. कशीबशी जीन्स घातली जाते आणि पराकोटीच्या प्रयत्नानंतर बटण लागतं. एव्हाना बाहेर पडायचा उत्साह संपलेला असतो. वाटतं, आपण किती कुरूप आहोत! आपल्याकडे का कोणी बघेल! आपल्यासोबत हिंडणाऱ्या व्यक्तीला किती त्रास होत असेल! आपली घाणच वाटत असणार सगळ्यांना. आता बारीक झाल्याशिवाय घराबाहेर पडायलाच नको. आता काही खायलाच नको. कशालाच काही अर्थ नाही.

आपण केबलवर वेळ लक्षात ठेवून एक सिनेमा बघायचा ठरवलेला असतो. त्याच वेळी लाइट जातात. आपला राग राग होतो. तेवढ्यात ग्रुपमधल्या एकाचा फोन येतो. सगळे झेंझी नावाच्या क्लबमध्ये जायचा प्लॅन करत असतात. आपण एका पायावर तयार होतो. रात्री खूप नाचतो. खूप पितो. टाइट होतो. खूप हसतो. वाटतं, आपल्याला आणखी काही नको! याला म्हणतात सुखी असणं!

रस्त्यातून जाता जाता एका बिल्डिंगच्या कडेला झोपलेलं एक लहान बाळ दिसतं. त्याच्या अवतीभोवती कोणीही नसतं. ते नागडंच झोपलेलं असतं. थोडं बाजूला किंचित अन्न सांडलेलं असतं. चिंध्या पडलेल्या असतात. काळा चिखल सुकलेला असतो. बाळाभोवती माश्या घोंघावत असतात. तरी ते गाढ झोपून राहतं. आपल्याला स्वत:ला शिव्या द्याव्याशा वाटतात. आपण किती वायफळ खरेदी करतो! नको तेवढे पैसे खर्च करतो. आपल्याला काही लाजच नाही. खरेदी करताना काही कंट्रोलच राहत नाही. आपण फालूत आहोत. आपली जगण्याची लायकी नाही. आपण नालायक आहोत. आपण मरून जावं किंवा निदान आपल्याला जोरात लागावं आपलं फार वाईट चाललंय.

फेशियलची खोली अत्यंत आरामदायक असते. आपण निर्धास्तपणे मागे रेलतो. तिथली बाई हळूहळू आपल्या चेहऱ्यावर निरनिराळे लेप थापत राहते. मसाज करत राहते. अख्खं शरीर आपोआप शिथिल होत जातं. आपण डोळे मिटून म्हणतो- याला म्हणतात आयुष्य.

फोन वाजतो. लाडकी रिंगटोन. स्क्रीनवर बॉयफ्रेन्डचा फोटो. आपण उत्साहात फोन घेतो. आपण प्रेमात येणार तेवढ्यात तो आपल्याला थांबायला सांगतो आणि गंभीर आवाजात आपलं नातं संपवण्याची वेळ आली असल्याचं सांगतो. आपल्याला काय चाललंय, काहीच कळत नाही. आपल्याभोवतीचं आपलं अख्खं जग आपल्याला कोसळताना दिसतं. हातातून सगळं निसटत चाललंय असं वाटतं. हरवल्यासारखं, हताश वाटतं. आपण बटर घालून मॅगी खातो. चीज सिंगल खातो. चॉकलेट्स खातो. आपलं ठरतं- आयुष्याला काहीही अर्थ नाही.

आज नेटचं कनेक्शन फारच फॉर्मात असतं. क्लिक करताच साइट्स ओपन होतात. आपलाही मेंदू पटापटा चालतो. आज चॅटरूममध्ये आपल्याला खूप चमकदार आणि चतुर बोलायला सुचतं. स्वत:चा हजरजबाबीपणा आपल्याला थक्क करतो. स्वत:चं इतकं आकर्षक व्यक्तिमत्त्व आपण निर्माण करतो, की एक नाही, दोन नाही, तीन अनोळखी मुलं आपल्याशी फ्लर्ट करतात. आपल्याला वाटतं, आपण आहोतच अशा. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकानं खरं तर स्वत:ला लकी मानलं पाहिजे. सगळ्यांना आपण बनावंसं वाटत असणार. लाइफ कसं जगावं? आपल्यासारखं!

एक दिवस अगदी रिकामी दुपार असते. वर्णन नसलेली. आणि पाऊस येतो. सगळं नवं, स्वच्छ, हिरवं होतं. बाटलीतून बाहेरचं हिरवं दिसतच असतं. आतलंही हिरवं होतं. आपण भिजतो. सगळं ओलं होतं... आणि लक्षात येतं की, याचा अर्थ बाटलीचं झाकण उघडंच आहे.

बाहेरचं जग कसं असेल? तिथं आयुष्याला अर्थ असेल का नसेल? ते आपल्याबद्दल असेल का नसेल? आपल्याला माहीत नसलेलं तिथे किती असेल? कोणास ठाऊक, कदाचित तिथं आपल्याला न सुचणारे प्रश्नही असतील तर? आणि उत्तरं मिळण्यासारखी असतात. बाटलीतून बाहेर पडून फक्त त्याआधी ती आडवी पाडावी लागणार. सगळं सुरळीत चालू असताना गदागदा हलवून बॅलन्स घालवावा लागणार.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4392

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......