‘सिनेमास्केप’ वाचताना लक्षात घेण्याजोगी आहे, आजच्या बदलत्या काळाची, विचाराची पार्श्वभूमी
ग्रंथनामा - आगामी
गणेश मतकरी
  • ‘सिनेमास्केप’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 02 March 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सिनेमास्केप Cinemascape गणेश मतकरी Ganesh Matkari

चित्रपट अभ्यासक गणेश मतकरी यांचं ‘सिनेमास्केप’ हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसच्या वतीनं प्रकाशित होत आहे. या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगणारं लेखकाचं हे मनोगत...

.............................................................................................................................................

या पुस्तकाला ‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागे दोन कारणं आहेत.

पहिलं हे की ‘सिनेमॅटिक’मध्ये ज्या पद्धतीचे लेख आहेत, त्याच प्रकाराला हे पुस्तक पुढे नेतं, त्यामुळे नावातलं साधर्म्य हे त्या दिशेचा निर्देश करणारं.

सिनेमावर लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला स्वतंत्र चित्रपटांची समीक्षा, मग ती मोठ्या लेखांमधून स्वतंत्रपणे करण्यात आलेली असेल, वा वृत्तसमीक्षा असेल, हा एक लोकप्रिय सर्वपरिचित प्रकार झाला. त्याखेरीज त्यासंबंधातल्या दिग्दर्शक, कलाकार अशा व्यक्तींविषयी लिहिणं, त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणं, हा एक भाग होऊ शकतो. किंवा कला म्हणून (अन् तंत्रज्ञान म्हणूनही) या क्षेत्रात जे बदल होत गेले, त्याबद्दल लिहिलं जाऊ शकतं. वैचारिक पातळीवर चित्रपटांनी शंभर-सव्वाशे वर्षांच्या कालावधीत जी मजल मारली आहे, ती क्वचितच इतर कोणत्या कलेनं मारली असेल. त्यामुळे त्या संबंधातलं सैद्धान्तिक लिखाण हा एक प्रांत आहे. इतरही आहेत.

मी वेळोवेळी यातल्या वेगवेगळ्या प्रकारांत लिखाण केलेलं आहे. ‘सिनेमॅटिक’मध्ये ज्या प्रकारचं लिखाण होतं आणि इथं ज्या प्रकारचं आहे, ते वरच्या विविध प्रकारांना काही प्रमाणात एकत्र आणणारं आहे. म्हणजे त्यात स्वतंत्र सिनेमांबद्दलचा काही भाग जरूर आहे, पण केवळ एकट्यादुकट्या चित्रपटाची समीक्षा हा या लेखांचा हेतू नाही. चित्रपटमाध्यम हे अनेक प्रतिभावान कलावंत आणि त्यांच्या विविध सामाजिक पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या, विविध विचारशैलींशी जोडलेल्या कलाकृतींमधून तयार होत असतं. स्वतंत्र चित्रपटाची घेतलेली दखल ही तो चित्रपट समजून घेण्यासाठी योग्यच असली तरीही एकूण कलाप्रांतात त्याचं स्थान काय आणि हे माध्यम कोणत्या दिशेनं कुठे निघालंय हे समजून घेण्यासाठी पुरेशी नसते. या पुस्तकातल्या लेखांमध्ये परस्परांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे साधर्म्य असणाऱ्या चित्रपटांचा एकत्रित विचार केला गेलेला आहे. हे साधर्म्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे. उदाहरणार्थ, काही लेखांमधून विशिष्ट चित्रप्रकार, शैली आणि त्यांच्या जडणघडणीबद्दलचा विचार आहे; काहींमधून भारतीय चित्रपटांमध्ये होत गेलेल्या बदलाबद्दल बोललं गेलंय; काहींमध्ये आपला चित्रपट आणि पाश्चिमात्य चित्रपट यांचा तुलनात्मक विचार आहे. याशिवाय इतर काही लेखांत चित्रपटांच्या बदलत्या स्वरूपाबरोबरच प्रेक्षक म्हणून आपली भूमिका आणि आपली जबाबदारी यांची नोंद घेण्यात आलीय.

‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागचं दुसरं कारण आहे, ते त्या शब्दातून ध्वनित होणाऱ्या अर्थाशी संबंधित. चित्रपटाचा प्रांत, परिसर या दृष्टीनं हा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. स्वतंत्र चित्रपटाबाहेर जाऊन एकूण चित्रपटसृष्टीचा घेतलेला आढावा या दृष्टीनं हे नाव लेखांमागची भूमिका स्पष्ट करणारं आहे, असं मला वाटलं.

पूर्वी जेव्हा चित्रपटांबद्दल, खासकरून पाश्चिमात्य, वा जागतिक चित्रपटांबद्दल लिहिलं जायचं, तेव्हा वाचणाऱ्याच्या डोळ्यांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह असायचं, प्रश्न असायचा, तो आपण या सिनेमांबद्दल वाचलं खरं, पण आता हे बघायचे कुठे, हा. आज मी असं म्हणू शकेन, की हा प्रश्न फारसा उरलेला नाही.

मी लहान होतो, तेव्हा जागतिक सिनेमा पाहायचा, तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या फिल्म सोसायटीचे सभासद असणं आवश्यक असायचं. मी स्वत: शाळेत असताना वडिलांबरोबर प्रभात चित्र मंडळाच्या एका स्क्रिनिंगला जाऊन अकिरा कुरोसावाचा ‘राशोमॉन’ हा मास्टरपीस पाहिल्याचं मला आठवतं. पण अशी तुरळक स्क्रिनिंग्ज (तीही ओळख लावून अटेंड केलेली, कारण फिल्म सोसायट्याही अठरा वर्षांखालच्या मुलांना प्रवेश देत नसत, नाहीत.) सोडता चित्रपटगृहात लागतील ते, मी आठवी-नववीत असताना सुरू झालेल्या व्हिडिओ लायब्रऱ्यांमध्ये मिळतील ते आणि दूरदर्शन दाखवील ते, या पलीकडे चित्रपट पाहणं मनात येऊनही अशक्य होतं. गेल्या पंचवीसेक वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदललं आहे.

सॅटेलाइट टीव्हीवर आलेले मुव्ही चॅनेल्स, आधी डीव्हीडी आणि मग ब्रॉडबँड इंटरनेटवर सुरू झालेली पायरसी, अॅमेझॉन आणि आय ट्यून्ससारख्या माध्यमातून चित्रपट अधिकृतपणे विकत घेण्याची झालेली सोय आणि शेवटी नुकतेच सुरू झालेले नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओ हे वेब चॅनेल्स, या चार कलमी कार्यक्रमांतून हा प्रश्न पूर्णच निकालात निघाला आहे. शहरं सोडता ब्रॉडबँड आणि वेब चॅनेल्स अजून हव्या तितक्या कार्यक्षमतेनं काम करत नाहीत असं मी ऐकून आहे, पण ते चित्र हळूहळू बदलेल आणि पुढल्या चार-पाच वर्षांत सर्वसाधारण प्रेक्षकाला स्वत:ला अशिक्षित ठेवण्यासाठी काहीही एक्स्क्यूज उरणार नाही.

आता हे सांगताना एक निश्चित म्हणेन, की जे चित्रपट अधिकृतपणे उपलब्ध आहेत, आणि आज तसे खूप प्रमाणात आहेत, ते तसेच पाहावेत. चित्रपटगृहात लागलेला वा वेब चॅनेलवर असणारा चित्रपट पायरसीच्या मार्गानं मिळवला जाऊ नये. कलावंतांचा न्याय्य मोबदला चुकवणं हे कलाक्षेत्राला पुढे मोठ्या संकटात आणेल, जे टाळणंच योग्य होईल. आता जे चित्रपट आपल्याला अधिकृत मार्गानं उपलब्धच नसतील, त्यांची गोष्ट अर्थातच वेगळी.

मुद्दा हा, की पूर्वी जसं सिनेमाबद्दल वाचणं ही केवळ एक साहित्यिक हौस होती, तशी आता उरलेली नाही. वाचण्याबरोबर पाहणं, त्यावर बोलणं, लिहिणं हे आपल्याला हे माध्यम नीट समजण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतं. चांगली गोष्ट ही, की आजचा तरुणवर्ग या चारही गोष्टी हिरिरीनं करताना दिसतो आहे. लिहिण्यासाठी त्याला सोशल नेटवर्क हे नवं माध्यम उपलब्धही झालंय, जे कसं वापरावं याबद्दलचा संभ्रम मात्र अजून अनेकांच्या मनात दिसतो आहे.

‘एव्हरीवन्ज अ क्रिटिक’ असं म्हटलं जातं आणि सोशल नेटवर्क आल्यापासून हे शब्दश: खरं झालेलं आहे. सोशल मीडिआचा फायदा हा आहे की आपण जे लिहितो, त्यावर लगेच प्रतिक्रिया मिळू शकते. शिवाय चित्रपटांमधले अनेक दिग्दर्शक, कलाकार, यांच्याशी इथं आपला थेट संपर्क होऊ शकतो. त्यांच्याशी बोलणं, आपली प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहचवणं, हे आजवर शक्य न झालेलं सारं आज होताना दिसतंय. खासकरून मराठी आणि काही प्रमाणात हिंदी चित्रपटक्षेत्राबाबत हे अगदीच खरं आहे. मात्र लिहिता तरुणवर्ग याचा हवा तसा, तितका फायदा न घेता, केवळ शेरेबाजी, पुरेसा विचार न करता घाईनं मत मांडणं, आस्वादापेक्षा झोडणं आणि आपल्या वाचकांकडून लाइकरूपी वाहवा मिळवणं, यालाच अधिक महत्त्व देताना दिसतो आहे. यामुळे सोशल नेटवर्कच्या चौकटीत तो थोडा अधिक लोकप्रिय होतो हे निश्चित! मात्र त्याची समज वाढण्याच्या दृष्टीनं या संधीचा फायदा झालेला दिसत नाही.

आजचा तरुणवर्ग केवळ प्रेक्षक नाही. त्यांच्यातले अनेकजण या क्षेत्रात काहीतरी करून पाहण्याच्या प्रयत्नात दिसतात. डिजिटल क्रांती हे यातलं एक महत्त्वाचं कारण आहे. फिल्म आता पुरती निकालात निघाली आणि त्याची जागा डिजिटल डेटानं घेतली. यामुळे चित्रपट या माध्यमात काही प्रमाणात लोकशाहीकरण झाल्याचं गेल्या काही वर्षांत दिसून आलं. फिल्म वापरली जात असे तोवर सामान्य प्रेक्षक आणि चित्रकर्ते यांच्या मध्ये एक मोठी दरी होती. हे माध्यमच इतकं खर्चिक होतं, की बहुतेकांना ते आपल्या अवाक्याबाहेरचं वाटायचं. त्यामुळे सिनेमाचा आणि सर्वसामान्य माणसाचा संबंध केवळ घटकाभरची करमणूक इतकाच होता. आज डिजिटल क्रांतीनं सिनेमा बनवणं सोपं झालंय. सोपं म्हणजे केवळ कलात्मक अंगानं नव्हे, तर खर्च, तंत्र, तंत्रज्ञान अशा सर्व बाजूंनीच. आज चांगल्या मोबाइल्सना टीव्हीवर ब्रॉडकास्ट करण्याइतपत चांगलं चित्रित करता येतं; कॅमेरे एकूणच स्वस्त झाले आहेत; प्रत्येकाच्या घरी असलेल्या संगणकावर संकलन करता येणं शक्य झालंय, या सगळ्यातून आजचा प्रत्येक प्रेक्षक हा संभाव्य दिग्दर्शक बनलेला आहे आणि आज प्रचंड संख्येनं शॉर्ट फिल्म्स बनणंही याच परिस्थितीकडे निर्देश करतंय. मात्र या क्रांतीचा फायदा आहे, तसा तोटाही. पूर्वी गोष्टी आवाक्याबाहेर असताना चित्रित झालेल्या प्रत्येक फूट फिल्मचा विचार होत असे. ती वाया जाऊ नये यासाठी प्रचंड प्रमाणात पूर्वतयारी केली जाई, ज्या दरम्यान कलाकृतीला आकार येत असे आणि एकूण परिणामात पुरेशी भर पडे. आता या इकॉनॉमीची गरजच उरली नसल्यानं नव्या होतकरू दिग्दर्शकांच्या कामात बऱ्याच अंशी एक विस्कळीतपणा येत चालला आहे. हे टाळायचं तर प्रत्येकानेच माध्यमाचा विचार पुरेशा खोलात जाऊन करणं ही आज गरज बनली आहे. हा विचार पुढे नेण्याच्या दृष्टीनं या लिहिण्याचा काही उपयोग होऊ शकला, तर आनंदाची गोष्ट आहे.

‘सिनेमास्केप’ वाचताना लक्षात घेण्याजोगी ही पार्श्वभूमी. आजच्या बदलत्या काळाची, विचाराची.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4391

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......