अजूनकाही
‘अनिल अवचट - एक मुक्तछंद’ हा माहितीपट तरुण लेखक प्रदीपकुमार माने यांनी बनवला असून तो ४ मार्च रोजी पुण्यात प्रदर्शित होत आहे. तीस तासांच्या फुटेजमधून साकारलेला हा ४४ मिनिटांचा माहितीपट डॉ. अनिल अवचट यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि कलात्मक या तिन्ही पैलूंचा परिचय करून देणारा आहे. या माहितीपटाचे लेखक, दिग्दर्शक माने यांचं हे मनोगत...
.............................................................................................................................................
पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर अनिल अवचटांच्या जीवनावरील ‘अनिल अवचट - एक मुक्तछंद’ हा माहितीपट आपणासमोर सादर करताना आनंद होत आहे. माहितीपट बनवण्याचा माझा हा पहिलाच अनुभव असल्यानं माझी स्थिती एका अर्थानं बाळ जन्माला घालणाऱ्या आईसारखी आहे. हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. साहजिकच आहे, कुठल्याही नवीन गोष्टीचा अनुभव न विसरण्यासारखा असतो. या लेखातून मी आपल्यासमोर माझ्या या माहितीपटाच्या निर्मितीचा प्रवास मांडणार आहे. या माहितीपटाचं लेखन, संशोधन, दिग्दर्शन आणि निर्मिती सर्व काही मीच केलं आहे. त्यामुळे यातील प्रत्येक क्षेत्रातील अनुभवांतून खूप काही शिकायला मिळालं आहे. महाविद्यालयीन काळापासून डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, हिस्ट्री, बीबीसी या चॅनेल्सवरील विविध प्रकारचे माहितीपट आवडीनं बघतो आहे.
वास्तव समजून घेण्यासाठी माहितीपट खूप महत्त्वाचे असतात असं मला वाटतं. माहितीपट हे ‘वास्तवपट’ असतात असं म्हणायलाही हरकत नाही, पण ते उलगडणं किंवा उलगडून दाखवणं चित्रपटाइतकीच सृजनशील गोष्ट आहे. कुठल्याही माहितीपटासमोरचं ध्येय हे आसपास असणाऱ्या वास्तवाच्या कच्चा मालातून विपर्यास न करता प्रेक्षक मनोरंजकपणे पाहतील अशी कृती बनवणं हे असतं. बाबा (अनिल अवचट)चं ‘माणसं’ हे पुस्तक हातात पडल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली असं म्हणावं लागेल. हे पुस्तक वाचल्यानंतर बाबाची वास्तवाचं दर्शन करणारी ‘धागे-उभे आडवे’, ‘कोंडमारा’, ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘कार्यरत’ अशी पुस्तकं वाचली. सामाजिक वास्तवाचा या अर्थानं ‘फर्स्ट हँड फिल’ या पुस्तकातनं येतो.
या पुस्तकांमुळे इतरांप्रमाणे माझीही आसपासचं सामाजिक वास्तव समजून घेण्याची दृष्टी बदलली. बाबानं सामाजिक वास्तव सादर करून केलेलं साहित्यिक कार्य मराठी साहित्यविश्वाचा विचार करता अजोड आहे. द. दि. पुंडे यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की, ‘साहित्य म्हणजे समाज हे जर समीकरण असेल तर मराठी साहित्यातली सर्व पारितोषिकं अवचटांनाच द्यावी लागतील.’ पुंडे सरांच्या या भाष्यामध्ये काहीजणांना अतिशयोक्ती वाटत असली तरी बाबाचं सामाजिक वास्तववादी लेखन वाचणाऱ्याला असं वाटतं नाही.
मराठी साहित्यात सामाजिक वास्तव येत नव्हतं असं नाही, पण बाबानं ज्या पद्धतीनं ते मांडलंय, ते खरंच ‘युनिक’ आहे. त्यामुळंच एम.ए. करत असतानाच २००७ साली त्याच्यावर माहितीपट करावा अशी कल्पना मनात आली. पण त्याला खरं मूर्त रूप आलं ते २०११ साली.
एका दिवशी आम्ही बाबाला भेटायला गेलो. त्याला म्हटलं आम्हाला तुझ्यावर माहितीपट करायची इच्छा आहे. जेव्हा आमचा तुझ्याविषयीचा अभ्यास होईल, तेव्हा आम्ही तुझ्याकडे येऊ. मग २०११ ते २०१३ या दोन वर्षांत त्याचं प्रकाशित, अप्रकाशित असलेलं साहित्य वाचून काढलं. ते वाचताना लक्षात आलं की, बाबा फक्त सामाजिक लेखकच नाहीत, तर विविध वाटा शोधणारा मनस्वी कलाकार आहे. ‘मुक्तांगण’सारखी संस्था चालवणारे ‘बाबा’ आहे.
या सर्व गोष्टी जाऊन पाहिल्या अन् मग लक्षात आलं की सामाजिक लेखकाबरोबर त्याच्यातील एक मनस्वी कलाकार सतत व्यक्त होत राहिला आहे. ओरिगामी, काष्ठशिल्प, चित्रकला, बासरीवादन असे कित्येक छंद त्यानं जोपासले आहेत. त्यातही तो तितकाच रमतो.
काहीजणांना बाबाचे हे कलात्मक उद्योग आवडत नाहीत. त्यांना वाटतं की, सामाजिक वास्तव सादर करणारा हा लेखक कशाला या गोष्टीत वेळ घालवतो! समाजातले अजून कितीतरी प्रश्न त्यांनी दाखवावेत, असं त्यांना वाटतं. पण मला बाबाच्या पुस्तकांच्या वाचनातून आणि सहवासातून लक्षात आलं की, त्याच्यातील कलाकार हा लेखकाइतकाच नैसर्गिक आहे. त्यामुळे अभय बंग यांनी माहितीपटात त्याच्याविषयी म्हटल्याप्रमाणे ‘त्याचे छंद हे छंद नाहीत तर ते त्याचं जीवन आहे’. मला स्वत:लाही असाच अनुभव आला आहे. मी बाबाकडे जेव्हा जेव्हा जातो, त्या प्रत्येक वेळी तो मला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो. कधी बासरी वाजवतो, कधी कविता वाचून दाखवतो, कधी ओरिगामीतून निर्माण केलेलं एक नवीन मॉडेल बनवतो. या सर्व अनुभवानंतर वाटलं की, बाबाचा जीवनप्रवास दाखवायचा म्हटला तर त्याचं कलात्मक विश्वही यायला पाहिजे. या सर्व कला तो स्वत: साठी करतो. या कलांत त्यानं लेखनापेक्षाही जास्त काळ व्यतित केलाय.
साहित्यिक, कलात्मक कार्याप्रमाणे त्याचा अजून एक पैलू आहे, तो म्हणजे सामाजिक कार्य. सामाजिकता आणि त्याच्या लेखनाचा प्रवास वेगळा करता येऊ शकत नाही. याचं कारण म्हणजे सामाजिक वास्तव पाहिल्यानंतर ते व्यक्त करण्याच्या पोटतिडकीतूनच त्याच्यातील साहित्यिकाचा जन्म झाला आहे. पण ‘मुक्तांगण’ सुरू करेपर्यंत सामाजिक वास्तवाला जाणून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न तो करत राहिलेला आहे. पण ‘मुक्तांगण’ ही त्याच्यासाठी वेगळी गोष्ट आहे. यासारख्या संस्थेचा जन्म हा जरी त्यांच्या ‘गर्द’वरील लेखनातून झाला असला तरी त्यानं ‘मुक्तांगण’च्या कामात कार्यकर्त्याच्या रूपात स्वत:ला गुंतवून घेतलं होतं.
बाबा एकदा माहितीपटाच्या शुटिंगच्या वेळी म्हणाला, ‘लोक मला म्हणतात की, तुम्ही सामाजिक वास्तव व प्रश्न मांडता, पण त्याविषयी काही कृती का करत नाही? ते म्हणतात त्यात अर्थ आहे. पण मला जे मांडावंसं वाटतं ते मी मांडून पुढं सरकतो. कारण माझा लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास आहे. वास्तव मांडल्यानंतर लोक पुढे सरसावतात हा माझा अनुभव आहे. पण एका कामाला मी त्यावर लेखन केल्यानंतर सोडू शकलो नाही ते म्हणजे ‘मुक्तांगण’’.
‘मुक्तांगण’सारखी संस्था उभी करण्यात बाबातील कार्यकर्त्यानं दिलेलं योगदान खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या सामाजिक लेखनाप्रमाणं व्यसनमुक्तीच्या कामालाही महाराष्ट्र विसरू शकत नाही. ‘मुक्तांगण’ जरी त्याच्या पत्नीची निर्मिती असली तरी त्यानंही या संस्थेच्या उभारणीत मोठं योगदान दिलं आहे. सुनंदा अवचट यांनी व्यसनमुक्तांसाठी केलेलं काम अजोड आहे. पण त्या गेल्यानंतर बाबा संस्था मोठी करण्यासाठी जे झटलाय, त्यातून त्याच्यातील ‘कार्यकर्त्याचा’ परिचय होतो.
या सर्वांमुळे आम्ही साहित्यिक, सामाजिक आणि कलात्मक या अवचटांच्या तिन्ही पैलूंचा परिचय करून दिलेला आहे. विशेष गोष्ट म्हणजे ते तिन्ही पैलू एकमेकात इतके अलगदपणे मिसळले आहेत की, त्यांना वेगळं करणं अवघड आहे.
ओरिगामी तो स्वत: साठी जशी करत असतो, तशीच तो ती ‘मुक्तांगण’मध्ये व्यसनमुक्तांना शिकवण्यासाठी, लहान मुलांशी नातं जोडण्यासाठी वापरतो. त्याच्या शिल्पांतही सामाजिक विषय हळूवारपणे येतात. हमाल ओझं उचलून नेत असतानाचं त्याचं एक शिल्प अप्रतिम आहे. हे सगळं दाखवणं आमच्यासाठी आव्हानाची गोष्ट होती, पण तरीही ते आम्ही करू शकलोय असं वाटतं.
बाबा हा या दृष्टीनं पाहावयास गेल्यास ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण हा त्याचा अनप्रेडिक्टेबलपणा, छांदिष्टपणा जगाशी फटकून राहणारा नाही, तर जगाला बरोबर घेऊन जाणारा आहे.
बाबाच्या दहा तासांच्या मुलाखती आणि त्यावरील भंगी, हमाल, निसर्ग, ‘मुक्तांगण’ असं कितीतरी घटकांचं प्रत्यक्ष चित्रण आम्ही केलं. हे प्रत्यक्ष चित्रणही जवळजवळ १० तासांचं आहे. साहजिकच आहे माहितीपट असल्याकारणानं आम्ही बाबाविषयी इतर लोकांचेही बाईट घेतले आहेत. डॉ. सदानंद मोरे, बाबा आढाव, सुमित्रा भावे, सुनिल सुकथनकर, उमा व विरुपाक्ष कुलकर्णी, म.द. हातकणंगलेकर, मिलिंद बोकील, श्री. द. महाजन, सदाशिव अमरापूरकर, मुक्ता पुणतांबेकर, यशोदा वाकणकर, आनंद नाडकर्णी आणि नसिमा हुरजूक यांच्या दीर्घमुलाखतींचा वापर करून त्याच्या कार्याचं मूल्यमापन करायचा प्रयत्न केला आहे.
या सगळ्या तीस तासांच्या फुटेजमधून ४४ मिनिटांचा माहितीपट आमच्यासाठी मोठी कसरत होती, पण तो आम्ही आमच्यापरीनं पार पाडला आहे. ४ मार्च २०१८ रोजी पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात संध्याकाळी ६ वाजता या माहितीपटाचं पहिलं विनामूल्य प्रदर्शन होत आहे. आपण सर्वांनी अवचटांच्या जीवनाचा प्रवास दृश्यरूपात पाहण्यासाठी यावं, ही विनंती.
.............................................................................................................................................
डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक प्रा. प्रदीपकुमार माने यांचं ‘मुंगी - एक अदभुत विश्व’ हे पुस्तक बहुचर्चित ठरलं आहे.
pradeeppolymath@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment