अजूनकाही
काल मराठी भाषा दिवस, म्हणजेच मराठी भाषेच्या गौरवाचा दिवस साजरा झाला. पण हल्ली या दिवसाला ‘मराठी भाषेच्या नावानं गळा काढण्याचा दिवस’ अशी अवकळा आली असल्याचा कंठशोष काही तथाकथित मराठी विद्वान दबक्या आवाजात करतात. काही ‘हल्ली मराठी भाषा कशी कुणी बोलत नाही’, ‘हल्ली मराठी पुस्तकं कशी कुणी वाचत नाही’, ‘मराठी शाळा बंद केल्या जाऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅड वाढतंय’, ‘मराठी वाचनसंस्कृती लोप पावत चाललीय’, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कशी चालढकल केली जातेय’ अशा विविध प्रकारे गळा काढतात. या अशांची पत्रास बाळगण्याची किंवा त्यांची भीडमूर्वत ठेवण्याची काहीच गरज नाही. जळो त्यांचं लक्षण!
पण यावरून असा समज होतो की, जणू काही मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे. पण तसं अजिबात नाही. ज्यांना सार्थ अभिमानानं ‘महाराष्ट्रकन्या’ म्हणता येईल अशा मॅक्सिन बर्नसन या विदुषीनं काही वर्षांपूर्वी ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकामध्ये ‘जीव घाबरा करणारी मराठी भाषा’ या नावानं एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की – “ही मराठी भाषा खूप छान आहे, पण जीव घाबरा करणारी आहे. मराठी भाषेत बाळबोध लिपीपासून हिंसेचे बाळकडू पाजले जाते. उदाहरणार्थ- पोट फोडणे, अक्षरांचे पाय मोडणे. सामाजिक व्यवहारात तर उघड उघड हिंसाचार दिसतो. नाक दाबले तर तोंड उघडते, अमक्याचे खापर तमक्याच्या माथी फोडणे, धारेवर धरणे, पाठीत खंजीर खुपसणे...”
हा लेख मॅक्सिन मावशीनं कौतुकानं लिहिला आहे. मराठी भाषेतली गंमत सांगण्यासाठी लिहिला आहे. राकट, कणखर, दगडांचा देश असलेल्या महाराष्ट्राची भाषाही कणखर, राकट असणारच. त्यात मॅक्सिन मावशींना दिसते ती हिंसा ही निव्वळ गायीच्या मांसाच्या संशयावरून मरेपर्यंत मारणाऱ्याच्या परंपरेतली हिंसा नाही. तर ती निव्वळ आणि केवळ शाब्दिक हिंसा आहे. हे मराठी भाषेचं वैशिष्ट्य मॅक्सिन मावशीनं या लेखात अतिशय प्रत्ययकारी पद्धतीनं दाखवून दिलं आहे. पण हा लेख छापून आलाय ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकात. तोही साधारण दशकभरापेक्षाही आधी. तो आता मिळणार कसा? त्यासाठी बरीच यातायात करावी लागणार. त्यामुळे मॅक्सिन मावशीनं आपल्या लेखात मराठी भाषेच्या ज्या मौलिक वैशिष्ट्याविषयी एवढ्या कौतुकानं लिहिलं आहे, तो भक्तिभाव आजकालच्या मराठी भाषेत कुठे दिसतो का, याचा आपण आपल्या आजूबाजूला शोध घेतला तर काय दिसतं? आजही मराठी भाषेचं वैभव कायम आहे, याचे सज्जड पुरावे आपल्याला अवतीभवती, विशेषत: सोशल मीडियावर दिसतात. अलीकडच्या काळात, म्हणजे गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तर यात खूपच मोठ्या प्रमाणावर ‘अच्छे दिन’ आलेले आहेत.
मी ‘अक्षरनामा’ या डिजिटल डेली फीचर्स पोर्टलचा संपादक म्हणून काम करतो. त्यामुळे मॅक्सिन मावशी म्हणतात त्या ‘जीव घाबरा करणाऱ्या’ मराठी भाषेचे कित्येक नमुने मला मी छापलेल्या लेखांवरील वाचकांच्या कमेंटसमध्ये पाहायला मिळतात. हे नमुने इतके अस्सल, सणसणीत आहेत की, मराठी भाषेच्या वैभवाच्या नावानं बोंब मारणारे लोक मला हास्यास्पद, दांभिक वाटायला लागतात.
त्यामुळे अजून लांबण न लावता, काही उदाहरणंच पाहू म्हणजे मी काय म्हणतो ते नेमक्यापणानं स्पष्ट होईल.
ही आहे सुहास पळशीकर यांच्या ‘पक्षाच्या शोधात असलेले पक्षाध्यक्ष : राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांना पत्र’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1823
ही आहे संजय पवार यांच्या ‘माध्यमांनी केला लक्ष्मीकांत देशमुखांचा ‘एन्काऊंटर’!’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1821
ही आहे संजय पवार यांच्या ‘…तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1825
ही आहे हितेश पोतदार यांच्या ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१८ : मोठमोठ्या नावांच्या योजनांखाली मात्र सगळं पोकळ पोकळ’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1758
ही आहे राकेश परब यांच्या ‘जिथे गांधीप्रेम व द्वेष फक्त राजकारणासाठी केला जातो, तिथे ‘गांधी नावाची प्रेरणा’ जिवंत ठेवणे, हे आपले कर्तव्य होते!’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1761
ही आहे निखिल वागळे यांच्या ‘आणखी किती धर्मा पाटील?’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1741
ही आहे कुमार केतकर यांच्या ‘मीडिया काय आणि मोदी काय, दोघांनीही जशोदाबेनकडे पाठ फिरवली आहे!’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1802
ही आहे रवीश कुमार यांच्या ‘माध्यमं वाकू शकतात, पण लोकशाही नाही वाकू शकत (उत्तरार्ध)’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1784
ही आहे रवीश कुमार यांच्या ‘माध्यमं वाकू शकतात, पण लोकशाही नाही वाकू शकत (पूर्वार्ध)’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1782
ही आहे राजा कांदळकर यांच्या ‘धनगर सिद्दरामय्या हिंदूविरोधी कसे?’ या लेखावरील प्रतिक्रिया
http://www.aksharnama.com/client/article_detail/1738
यातून केवळ मराठी भाषेचं ‘जीव घाबरा करवणारं’ वैभवच दिसत नाही, तर मराठी भाषा बोलणाऱ्यांची भाषिक-बौद्धिक श्रीमंतीही दिसते. मराठी माणूस बौद्धिकदृष्ट्या किती प्रगत, सुसंस्कृत आणि ज्ञानपिपासू आहे, याचंही या उदाहरणांमधून (प्र)दर्शन होतं. आपल्याला न पटणाऱ्यांचा कसा सहिष्णू भाषेत प्रतिवाद करायचा असतो, ज्यांची मतं आपल्याला पटत नाहीत त्यांना कसं तुच्छ लेखायचं नसतं, तर त्यांच्याही मतांचा आदर कसा करायचा असतो, आपण ज्या विचारधारेचे पाईक आहोत, तिच्याविषयी कुणी ब्र उच्चारला तरी त्याला कसं हिणकस ठरवायचं नसतं, इतरांच्या न पटणाऱ्या मतांचा कसा आदर करायचा असतो, अशा अनेक गोष्टी या मराठी भाषेच्या शिलेदारांच्या मराठी भाषेतून जाणून घेता येतात.
नरहर कुरुंदकरांच्या शब्दांमध्ये थोडासा बदल करत सांगायचं तर औदार्य आणि सहिष्णुतेविषयी मराठी माणूस खूप काही बोलतो, पण स्वत:च्या अंगलट येऊ लागलं की, तो चिडतो. पण वर ज्या मराठी शिलेदारांच्या मराठी भाषेची उदाहरणं दिली आहेत, त्यांचं तसं नाही. त्यांचा मतभेदांवर खरोखरच प्रामाणिक विश्वास आहे. बहुतेक माणसं नाईलाज म्हणून मतभेद सहन करतात. यांचं तसं नाही. आपल्यापेक्षा भिन्न भूमिकांविषयी त्यांना मनापासून आस्था आहे. म्हणून ते मतभेदांचं मनापासून स्वागत करू शकतात, कौतुक करू शकतात आणि अधिकात अधिक मतभेद दाखवणाऱ्याला प्रेमळ उत्तेजन देऊ शकतात. म्हणूनच तर त्यांनी आपला बहुमोल किमतीचा वेळ खर्च करून मूळ लेखकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे!
ही अशी औदार्याची, उदारतेची परंपरा इतर कुठल्या भारतीय भाषेत पाहायला मिळत नाही.
आणि हे सर्व करत असताना ‘जीव घाबरा करणारं’ मराठी भाषेचं जे वैभव आहे, तेही कायम ठेवलं आहे. अशा या मराठी भाषेच्या खऱ्याखुऱ्या शिलेदारांना ‘अक्षरनामा’च्या वतीनं मानाचा मुजरा! जो पर्यंत हे मराठी भाषेचे खंदे वैभव जपणारे पाईक असंच आपलं भाषिक कम बौद्धिक पांडित्य(प्र)दर्शन करत राहतील, तोवर मराठी भाषेला अवकळा येण्याचं काहीच कारण नाही. ती मरणपंथाला लागण्याचंही काहीएक शक्यता नाही. तुम्ही जसं वागता, बोलता, राहता, खाता-पिता; त्यातून तुमची संस्कृती दिसते असं म्हणतात. मराठी भाषेच्या वैभवाची परंपरा बळकट करणाऱ्या या शिलेदारांची आणि पर्यायानं आपली संस्कृतीही किती थोर आहे, याची वरील उदाहरणांमधून खात्री पटते.
मराठी भाषेच्या नावानं गळे काढणाऱ्यांनो, तुम्ही हे वैभव कधी लक्षात घेणार की नाही? किती कर्मदरिद्रीपणा कराल? काल मराठी भाषा गौरव दिन साजरा वगैरे झाला किंवा आपण नेहमीच्या हतोत्साहानं साजरा केला. किमान यापुढे तरी या मराठी भाषेच्या खंद्या शिलेदारांची दखल घेणार की नाही?
.............................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Fri , 02 March 2018
मस्त ... लई आवडला लेख. फक्त एक छोटी दुरुस्ती , ती पण लेख मराठी भाषेवर आहे म्हणून ... लोकं/ जनता 'मराठी भाषिक' नसतात तर 'भाषक' असतात. एखादा भाषाविषयक प्रश्न, समस्या, मुद्दा असेल तर तर तो 'भाषिक मुद्दा' 'भाषिक प्रश्न' इ. असतो .... असो बाकी पोस्ट मधील विचारांशी पूर्णपणे सहमत... आदित्य
Ashawtthama G
Wed , 28 February 2018
मजेशीर लेख !! मॅक्सिन बर्नसन या विदुषीचा ‘जीव घाबरा करणारी मराठी भाषा’ हा मूळ लेखही छापल्यास अजून आनंद वाटेल...येथे एक गोष्ट सांगावयास आम्हास आवडेल की पूर्वी आम्ही इंटरनेटवर केवळ इंग्रजी वेबसाईटच पहायचो, पण आजकाल 'अक्षरनामा' सारख्या वेबसाईटस आल्यामुळे इंटरनेटवर मराठी वाचतां येते व त्यांवर प्रकट होता येते. अक्षरनामावर ( सगळे नाही पण) आठवड्याला २-३ लेख तरी चांगले असतात व वाचून मजा येते. याबद्दल तुमच्या टिमला धन्यवाद. माझ्यामते केवळ लेख नाही तर लेखावरील प्रतिक्रिया वाचूनसुद्धा लोकांची करमणूक होत असते. त्यामुळे इरसाल प्रतिक्रियांकडे नकारात्मकरित्या न पाहता त्रयस्थपणे किंवा शक्य झाल्यास विनोदबुद्धिने पाहिले पाहिजे. जसा लेखकाला असतो तसा मतप्रदर्शनाचा वाचकांचा अधिकार लेखकानेही खिलाडूवृत्तीने स्विकारला पाहिजे. आणि शेवटी काय तर टिकात्मक प्रतिक्रिया असली तरी त्यावरून तुमच्या मराठी वेबसाईटला लोकांनी भेट दिली आहे व त्यावरील मराठी लेख मराठी लोकांनी वाचला आहे हेच सिद्ध होते ना ... आणि अक्षरनामा सुरू करण्यात तुमचा आपली भाषा लोकांनी वाचावी , तिचा इंटरनेटवर प्रसार व्हावा हाच हेतू असेल ना ? मग तो हेतू लेखांवरील विनोदी प्रतिक्रियांनी सफलच होतो असे तुम्हास वाटत नाही का ?
Sourabh suryawanshi
Wed , 28 February 2018
धन्यवाद पण मला समझल होतं की वरची आणि खालची प्रतिक्रिया यामध्ये मी बापडा चुकून सापडलो होतो ते!!!
Ram Jagtap
Wed , 28 February 2018
@ सौरभ - दुरुस्ती केली. सॉरी.
Sourabh suryawanshi
Wed , 28 February 2018
पण माझी इंग्रजीमधील प्रतिक्रिया का घेतलीय मला नाही वाटत माझा प्रतिक्रियेमुळे कोणाचा जीव घाबरला असावा.