अजूनकाही
मराठी भाषेचं दळण भाषा दिनानिमित्त नेहमीप्रमाणे भरपूर दळून झालं. ते ‘पीठ’ पुढच्या वर्षापर्यंत पुरेल. मग दिवाळीसाठी जसे खास विविध दळणांसाठी रांग लावतो, तशा रांगा लावायला आम्ही तयार.
नेहमीप्रमाणे अमृताशी पैजा वगैरे मारणारी आमची भाषा म्हणून तेवढ्यापुरते ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज आठवून, छात्या फुगवून ‘अभिमान गीत’ एखाद्या रडगाण्यासारखं गाणं वगैरे प्रकार झाले. अगदी विधानसभा आवारात मुख्यमंत्री, मंत्र्यांसह विरोधी नेते वगैरेही होते.
आदल्याच दिवशी राज्यपालांच्या भाषणाचं भाषांतर, मराठी भाषांतर तयार नसल्यानं मंत्री विनोद तावडे यांना औट घटकेचं भाषांतरकार व्हावं लागलं. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृह, मंत्री यांनी कुठलं काम करावं, न करावं याबाबतचा प्रोटोकॉल सांगण्याचा प्रयत्न केला, पण विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना मंत्र्यांनी अशी पळापळ करून वेळ मारून नेली किंवा भरून काढली याबद्दल आक्षेपार्ह काही वाटलं नाही. वळसे पाटलांचा औचित्याचा मुद्दा त्यांनी जवळपास उडवून लावला. मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंट पार पाडली. पण त्यांच्या व त्यांच्या सरकारच्या प्रतिमेला डागाळणाऱ्या या कृतीमागची प्रशासकीय गंभीर चूक अथवा अंतर्गत पक्षीय राजकारणाचं धाडस, जे काही असेल ते त्यांनी गंभीरपणे घ्यायला हवं.
अभिमान गीतातलं एक कडवं वगळल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मुख्यमंत्री म्हणाले, ‘ते तुमच्या राजवटीवरचंच भाष्य आहे’. मग विरोधकांच्या राज्यकारभाराचे वाभाडे काढणारं ते कडवं वगळलं का? का ते कडवं सार्वकालिक सत्ताधाऱ्यांसाठी असल्याचा साक्षात्कार प्रसिद्धी विभागाला झाला? थोडक्यात मराठीचं वर्षश्राद्ध यंदा विधिमंडळापासूनच रंगलं.
पण या दरम्यान यापूर्वी सेना-भाजप युतीच्या काळात कुसुमाग्रजांचं एक गीत सरकारनं छापून सर्व कार्यालयात लावलं होतं. त्या गीताचं आणि त्यातल्या भावार्थाचं काय झालं?
ज्या कुसुमाग्रजांना स्मरून हा मराठी भाषा दिन साजरा होतो, त्यांनीच म्हटलं होतं की, मराठी लक्तरं नेसून मंत्रालयाच्या दारात उभी आहे. इथं त्यांना भाषा केवळ भाषिक अर्थानं अभिप्रेत नाही. लोकांनी, लोकांसाठी, लोकांचं निवडून दिलेलं सरकार, जनतेशी कुठल्या ‘भाषेत’ संवाद साधतं? सरकार, प्रशासनाला जेव्हा सामान्य माणसाची भाषा, मातृभाषा समजत नाही, तेव्हा धर्मा पाटलांसह अनेकांचा मंत्रालय हा ‘सूसाइड पॉइंट’ होतो. त्यावर ही भाषा बदलण्यापेक्षा, संवाद वाढवण्यापेक्षा ‘जाळी’ बसवायचा निर्णय सरकार घेतं व लगेच अमलातही आणतं. कालच्या भाषा दिनाला मराठी पताका लावायला, ही जाळी छान उपयोगात आणता आली असती!
बाकी सोशल मीडियावर मराठी प्रेमाला महापूर आला. एरवी बोलताना एका वाक्यात एक मराठी व सात इंग्रजी शब्द बोलणाऱ्या आणि मराठी सोहळ्यात हिंदी गाण्यावर नाचणाऱ्या नट्यांना चक्क देवनागरी फाँटसह मराठीच्या काही ओळीच्या ओळी लिहिता किंवा कट-पेस्ट करता आल्या.
दरवर्षी हा दिवस आला की, डोक्यात तिडीक जाते. संपूर्ण भारतात स्वत:च्या मातृभाषेबाबत इतका भेकड, दांभिक व पराभूत समाज दुसरा कुठला नसेल!
जे प्री-नर्सरीच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा प्रवेशासाठी आदल्या रात्रीपासून पार रस्त्यावर झोपायला तयार असतात, त्यांनी मराठीबद्दल का बोलावं?
मराठी प्रथितयश साहित्यिक, उद्योजक, कलाकार, राजकारणी यापैकी ९० टक्के अधिकांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. आजही मंत्रालयात राजकारण्यांना मराठी शाळांऐवजी इंग्रजी शाळेचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यातच रस असतो. अशांनी विधिमंडळासमोर कशाला अभिमान गीत गावं? १३०० मराठी शाळा गुंडाळणारे शिक्षणमंत्रीही अभिमान गीत गातात, तेव्हा त्यांना त्या १३०० शाळांतील मुलं आठवली नाहीत? त्या मुलांनी कुठल्या तोंडानं म्हणायचं- ‘लाभले आम्हास भाग्य’? ही दांभिकता सरकार ते सामान्य, सगळ्यांच्यात ठासून भरलीय.
तुताऱ्या वाजवल्या, फेटे घातले, नथ नाचवली आणि भगवा ध्वज मुसळासारखा वर-खाली केला की, भाषा संवर्धन होतं, असा काहीतरी मूर्ख समज आमच्यात आहे.
या राज्याची राज्यभाषा मराठी आहे. पण गेल्या साठ वर्षांत दुकानांच्या पाट्या मराठी करता आल्या नाहीत. मध्यंतरी आंदोलनं झाली. पाट्या बदलल्या. पण कशा? मुख्य पाटी इंग्रजीतच आणि खाली कोपऱ्यात तळटीप असावी तसं मराठी नाव. शॉप अॅक्ट लायसन्स महापालिका देते. या पालिकेत गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेना सत्तेत आहे. त्यांनी मराठीपणाला जागून शॉप अॅक्टमध्येच मराठी पाटीचा नियम केला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण मातृभाषेपेक्षा ‘टक्केवारीची भाषा’ वरचढ ठरली आणि मराठीच्या अंगावर लक्तरं आली.
प्राथमिक शिक्षमापासूनच जो समाज आपल्या मातृभाषेचा स्वत:हून त्याग करतो, त्यांनी कशाला अभिमान गीताची रडगाणी गावीत?
महाराष्ट्र साक्षर झाला. साक्षरतेचं प्रमाण तालुका स्तरापर्यंत वाढलं, अगदी स्त्री-पुरुष दोघांतही वाढलं. पण या साक्षरतेच्या प्रमाणात मराठी साहित्य, नाटक व सिनेमा इथला वाचक-प्रेक्षक वाढण्याऐवजी घटत गेला. महानगरापासून ते तालुक्यापर्यंत सर्वत्र तीच स्थिती? मात्र त्याच वेळी या तिन्ही क्षेत्रातील निर्मितीची आकडेवारी दरवर्षी वाढतेच आहे.
तुम्ही प्रकाशकाला विचारा, नाट्यनिर्माता किंवा चित्रपट निर्मात्याला विचारा, तो हा ‘आतबट्ट्याचा धंदा’ म्हणूनच रडत असतो. १२ कोटींच्या महाराष्ट्रात एका पुस्तकाची ५०० प्रतींची आवृत्तीही वर्षानुवर्षं संपत नाही. मराठी नाटक-सिनेमाला मुंबई-पुण्याबाहेर प्रदर्शित होत नाही. ‘सैराट’चा अपवाद वगळता १२ कोटी महाराष्ट्राला भूरळ पाडणारा सिनेमा तयार होत नाही. नाटक तर पुण्या-मुंबईबाहेर कॉन्ट्रॅक्ट शोशिवाय प्रयोग करूच शकत नाही.
या सगळ्यात पुन्हा विविध विरोधाभास आहेत. अत्यंत दर्जाहीन, अतर्क्य मालिकांत काम करणारे कलाकार नाटकात असले की, प्रेक्षक नाटकाला गर्दी करतात. पुण्यासारख्या स्वयंप्रज्ञावंतांच्या शहरातही वयोमानानं प्रौढ व ज्येष्ठ झालेले प्रेक्षक नाटकाऐवजी या मालिकातल्या पात्रांना भेटायला रांगा लावतात नि सेल्फ्या काढत बसतात, तेव्हा या भाषेला मारायला कुणा परप्रांतियाची गरज काय हे लगेच लक्षात येतं!
मराठी भाषा आणि या भाषेतील उपक्रम स्वराज्यातच सरकारी अनुदानाशिवाय चालू शकत नाहीत, याची आम्हाला शरम वाटत नाही. मुंबई बहुभाषिक, मराठी टक्का रोडावला, उपनगरात फेकला गेला वगैरे कारणं तर भरपूर. पण महाराष्ट्रात मुंबई हे एकच शहर आहे? कुसुमाग्रज-कानेटकरांच्या नाशकात, गोदातीरी वगैरे ना मराठी नाटकाला प्रेक्षक ना मराठी चित्रपटाला. तरीही त्याच शहरात आम्ही जनस्थान वगैरे पुरस्कार देतो. हे ‘जनस्थान’ नेमकं कुठलं? हे जन कोणते? ज्यांना पुरस्कार मिळतो, त्यांची १२ कोटींत पुस्तकं पोहचली किती? वाचली किती? आता पेट्यातून पुस्तकं जातात, पुस्तकांचं गावही तयार केलंय. हे उपक्रम का करावे लागतात?
जो नवश्रीमंत मराठी वर्ग बर्मुडा घालून आणि दोनशे रुपयांचा टोल भरून मुंबईतून उठून लोणावळ्याच्या धबधब्यात भिजायला, मद्यानंद नि खाद्यानंद उपभोगायला जातो, त्याचा सांस्कृतिक इंडेक्य काय असतो? घरादारात सर्वत्र इंग्रजी किंवा मिंग्लिश. आपल्या आंग्लाळलेपणाचा अभिमान आणि मराठी न येण्याचा निर्लज्ज बेडरपणा! अशा भेकड, दांभिक समाजानं कशाला असा दिवस शोधून पिंडाला कावळे शिववून घ्यावेत? आपण आजही मुलाखती कुणाच्या घेतो? तर पानिपतात हरल्यानंतर जे पळाले किंवा अपरिहार्यपणे तिथंच राहाव्या लागलेल्या मराठी वंशजांच्या. आज या वंशजांचं मराठीसाठी योगदान काय? त्यांचा डीएनए मराठी आहे हे?
संत नामदेव पंजाबात गेले, तर तिथं आम्ही साहित्य संमेलन घेतलं. हरकत नाही. पण प्रत्यक्ष महाराष्ट्रात नामदेव किती लोकांनी वाचला, त्यांची शिकवण अंगी बाणवली? परंपरेचा गुलाल उधळायचा, संतांच्या नावे अबिर बुक्का लावायचा नि जागच्या जागी उभं राहून ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असं गाणं गायचं!
पुण्यात मागच्या आठवड्यात महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’ महाराष्ट्राच्या ‘तरुण राजा’ला म्हणाला, ‘दिल्लीत जायचंय.’ त्याआधी दहा मिनिटं त्यांनी कबुली दिली की, ‘दिल्ली मराठीला कमी लेखते!’ प्रश्न असा पडतो की, ५० वर्षांच्या अखंड राजकीय कारकिर्दीत किती मराठी नेत्यांनी यमुनेला पाणी पाजायची भाषा करून तशी आव्हानं दिली? यशवंतरावांनी आपल्याऐवजी इंदिरा गांधींना संधी दिली. इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीला कंटाळून बाहेर पडलेल्या शरदरावांनी पुन्हा राजीव गांधींचा हात धरून घरवापसी केली. तर विदेशीपणाचा मुद्दा काढून निलंबन ओढवून घेत नवा पक्ष काढला, पण सत्तेसाठी पुन्हा विदेशीकडेच गेले. ही तात्कालिक राजकारणाची अपरिहार्यता होती की, आमच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण?
आजही शिवसेनेसारखा ‘ठाकरी पक्ष’ परस्परविरोधी भूमिका घेऊन सत्ता सोडायला तयार नाही. तळ्यातमळ्यात तर एवढ्यांदा झालं की, तळं कुठलं नि मळा कुठला कळायला मार्ग नाही. कालच्या विधिमंडळातील मराठी अपमानानंतरही वाघाची डरकाळी सोडा, जांभईही ऐकू आली नाही!
मराठी भाषेची ही जर राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक अवस्था असेल तर आम्ही कशाला शोभायात्रेच्या नावाखाली प्रेतयात्रा काढतो दरवर्षी?
ज्यांना आपल्या मुलांना आपल्या भाषेत शिकवायचं नाही; ज्यांना आपल्या भाषेत संवाद साधता येत नाही; ज्यांना उद्दाम कॉर्पोरेटस आपली भाषा, कार्यक्रम यांना ‘डाऊन मार्केट’ म्हणत, अप्पर वरली आणि बीकेसी वगैरे अद्याक्षरात या शहराचं भाषिक, सांस्कृतिक वैशिष्ट्य फ्लश केल्यासारखं झटकून उठतात, तरीही आम्हाला त्याची लाज वाटत नाही; जी भाषा आम्हीच आमच्या जीवनातून वगळत आलोय; तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला काय नि नाही मिळाला काय, सारखंच!
आमच्या वृत्तवाहिन्यांवर ‘श्रीदेवी टबमध्ये पडली, तेव्हा पिलेली होती. ती का पिली…’ असं मराठी वाचल्यावर म्हणाल अभिमान गीत?
भाषा आणि मराठी संस्कृती याबाबत आपण सगळेच भेकड, दांभिक व पराभूत मानसिकतेत आहोत, हे एकदा आरशासमोर कबूल करूया. तेवढं केलं तरी या भाषेसाठी काहीतरी प्रामाणिकपणे केल्याचं समाधान आपल्याला मिळेल.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Wed , 14 March 2018
??????? ?.??
Thu , 01 March 2018
अतिशय रोखठोक स्वपरीक्षण करायला लावणारी मांडणी... पण त्या वरील चित्राचा अर्थ कळला नाही. तो समजेल काय
????? ?????
Wed , 28 February 2018
निराशावादी लेख....
Ashawtthama G
Wed , 28 February 2018
आजकाल मराठी चॅनेलवर फार अशुद्ध मराठी दाखविले जाते. 'श्रीदेवी पिलेली होती' हा त्याचा केवळ एक नमुना. मागे एका चॅनेलवर ( बहुतेक एबिपी माझा) तर चक्क 'दहशतवाद्यांनी २ भारतीय जवानांना कंठस्नान घातले ' हि बातमी वाचला होती. आता कंठस्नान हे शत्रूपक्षाला घातले जाते आपले सैनिक हे शहिद होतात हेही यांना माहित नाही हे बघून थक्क व्हायला झाले....असो पण दूरचित्रवाणीवर असे अशुद्ध मराठी बघून लोकही अशुद्ध बोलतात...आणि त्यांची जर भाषेतिल चूक दाखवली तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. आम्ही उच्च जातीचे असल्याने त्यांच्या चुका काढतो असे त्यांना वाटते व ते रेटून पुन्हा चुकीचेच अशुद्ध मराठी बोलतात...आता तर नाना पाटेकरंनी सुद्धा 'आपला मानूस' असा अशुद्ध नावाचा चित्रपट काढला आहे...तर मग बोलायचे कुणाला आणि किती जणांना ?
Sourabh suryawanshi
Wed , 28 February 2018
मराठी माणसाला त्याला न आवडणारा आरसा दाखवला आशा करूया की या आरशामध्ये पाहून आपल्यामध्ये सकारात्मक बदल होईल...