‘स्ट्रँड’चं इच्छामरण
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन रिंढे
  • स्ट्रँड बुक स्टॉल
  • Tue , 27 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो स्ट्रँड बुक स्टॉल Strand Book Stall

मुंबईतलं स्ट्रँड बुक स्टॉल हे बहुचर्चित पुस्तकांचं दुकान २८ फेब्रुवारीला म्हणजे उद्या बंद होत आहे, या बातमीचा सध्याच्या उथळ प्रसारमाध्यमांना आणि केवळ अशा माध्यमांवरच चरणाऱ्या चुकार वाचकांना फारच धक्का वगैरे बसलेला दिसतो आहे. पण जे स्ट्रँडचे निष्ठावान वारकरी होते, त्यांना गेल्या साताठ वर्षांपासून स्ट्रँड बंद होणार हे ठाऊक होतं. त्यापैकी अनेक वाचकांनी स्ट्रँडची होत असलेली वाताहत पाहून तिकडं फिरकणंही सोडून दिलं होतं. एखाद्या अत्यवस्थ पेशंटला केवळ ऑक्सिजनवर जिवंत ठेवतात, तसं हे स्ट्रँडचं जिवंत राहणं होतं. ओस पडलेलं हे दुकान गेली साताठ वर्षं रस्त्यावरून जाणाऱ्यायेणाऱ्यांकडे केविलवाणेपणे पाहात कसंबसं उभं होतं. २८ तारखेला या दुकानाचं शटर शेवटचं खाली खेचलं जाईल, पुन्हा कधीही न उघडण्यासाठी.

वर्तमानपत्रांनी या दुकानाच्या बंद होण्यामागे लोप पावत चाललेली वाचनसंस्कृती असल्याची ओरड सुरू केली आणि भल्याबुऱ्या वाचकांमध्ये भयंकर अपराधगंड दाटून येऊन स्ट्रँडला आपण मरू देतोय याचं त्यांना भयंकर दुःख वाटू लागलं. समाजमाध्यमांवर शोकाचा महापूर आला आणि हे वाचक मोबाईल खिशात टाकून दुकानाकडे धावू लागले. स्ट्रँडच्या चालकांनी दुकानातली शिल्लक पुस्तकं भरघोस सवलतीत विकून टाकण्याचं जाहीर केलं, हेही या धावाधावीमागचं एक कारण होतं. काहींना या ऐतिहासिक दुकानातून अखेरच्या दिवसांत पुस्तक खरेदी केल्याची ऐतिहासिक पावती हवी होती. काही वाचक मात्र स्ट्रँडनं एकेकाळी भरभरून दिलेल्या ऐवजाचं उतराई व्हावं, या कृतज्ञतेच्या भावनेनं आले होते. एवढ्या मायेनं हे वाचक तिथं गेले तर तिथलं वातानुकूलित यंत्रही चालू नव्हतं म्हणे (एवढंही परवडेनासं झालंय की काय स्ट्रँडच्या चालकांना?). स्ट्रँडच्या मृत्यूच्या दुःखामुळे वाचकांची भावनिक घुसमट तर होतच होती, पण गुदमरवणाऱ्या हवेमुळे त्यांची शब्दशः घुसमट देखील झाली म्हणे!

हा सर्व काय प्रकार आहे? टीव्हीवरच्या एखाद्या रिॲलिटी शोसारखा प्रत्यक्ष जीवनात ठरवून केलेला हा ‘इव्हेंट’तर नव्हे? सत्तर वर्षांपूर्वी टी० एन० शानबाग यांनी मुंबईत स्ट्रँड सुरू केलं. तेव्हापासून गेल्या दशकाच्या अखेरीस शानबागांचं निधन होईपर्यंत जे दुकान व्यवस्थित चालू होतं, भारतभरातल्या चोखंदळ वाचकांची भूक ज्या दुकानानं इतकी वर्षं भागवली, पंडित नेहरूंपासून अरुण टिकेकरांपर्यंत अनेक विद्वान, नेते, कलावंत यांना त्यांच्या त्यांच्या अभिरुचीनुरूप पुस्तकं पुरवली, ते दुकान शानबागांच्या मृत्यूनंतर दशकभरातच आचके देऊन बंद कसं काय पडलं? कला, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान या क्षेत्रात जे जे काही नवं छापून आलं ते स्ट्रँडमध्ये शानबागांनी विनाविलंब उपलब्ध करून दिलं. निदान विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तरी ही तत्परता स्ट्रँडनं दाखवली.

शशिकांत सावंत या आमच्या मित्रानं काही वर्षांपूर्वी एका लेखात लिहिल्याचं आठवतं की, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आधुनिकवादाशी संबंधित साहित्याशी स्ट्रँड समकालीन होऊन जोडलं गेलं, परंतु आधुनिकोत्तर साहित्याविषयी तितकी तत्परता ते दाखवू शकलं नाही. तरीदेखील शानबाग हयात होते तोवर त्यांनी आपल्या वाचकांना पुरं पडण्याचा प्रयत्न जारी ठेवला, व त्यात ते यशस्वी देखील झाले. वेगवेगळ्या अभिरुचीच्या चोखंदळ वाचकांची वाचनाची भूक भागवणं एकाच दुकानाला शक्य नसतं. तो पराक्रम बऱ्याच अंशी यशस्वीपणे शानबागांनी करून दाखवला.

मग शानबागांच्या मागे स्ट्रँडला हे का जमलं नाही? गेल्या दहा वर्षांत असे चोखंदळ वाचक मुंबई शहरातून एकाएकी नाहिसे झालेत की काय? शानबागांच्या निधनानंतर एक-दोन वर्षांतच स्ट्रँड ओस पडत का गेलं? त्या एवढ्याशा दुकानातल्या वाचकांच्या गर्दीतून सतत टाय लावून हसतमुखानं आणि तृप्त मनानं फिरणाऱ्या शानबागांचे दक्षिण मुंबईतले वाचक त्यांच्या निधनानंतर गेले कुठे?

ते वाचक दुसऱ्या दुकानांत गेले. उदाहरणार्थ, ‘किताबखाना’ आणि ‘वेवर्ड अँड वाईज’मध्ये गेले. ही दोन्ही दुकानं दक्षिण मुंबईत शानबागांच्या निधनानंतर सुरू झाली. स्ट्रँडमध्ये रमणाऱ्या वाचकांना तिथं हवं ते मिळेनासं झाल्यावर त्यांनी आश्रयासाठी दुसरी ठिकाणं शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना ‘किताबखान्या’त आणि अलीकडे सुरू झालेल्या ‘वेवर्ड अँड वाईज’ या दुकानात हवी ती पुस्तकं मिळू लागली. जे स्ट्रँडचे निष्ठावान वारकरी होते, त्यांना आठवत असेल की शानबागांच्या निधनानंतरच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षांत स्ट्रँड बंद होणार असल्याच्या बातम्या उठल्या होत्या. स्ट्रँडची एक गृहपत्रिका निघत असे. या पत्रिकेत स्ट्रँडच्या नव्या चालकांनी (म्हणजे शानबागांच्या पुढच्या पिढीनं) हे दुकान कधीही बंद होणार नाही, उलट ते शानबागांच्याच धोरणानं पुढेही चालू राहील अशा आणाभाका घेतल्या होत्या (अर्थात ती पत्रिकाच नंतर केव्हा बंद झाली हेही कळलं नाही). तेव्हाच स्ट्रँडच्या भिंतीआड काहीतरी शिजतंय हे जाणत्यांच्या ध्यानात आलं होतं.

नंतर सगळं पद्धतशीर घडलं. नेहमीच्या पुस्तकविक्रेत्यांकडून आयत्या दारात येणाऱ्या ठोक पुस्तकांवर स्ट्रँड विसंबून राहात नसे, तर दरवर्षी युरोप-अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांमधून पुस्तकं निवडून ती स्ट्रँडमध्ये मागवली जात. त्यामुळे अनेक महत्त्वाची पुस्तकं भारतीय वाचकांना उपलब्ध होत असत. शानबागांच्या मागे स्ट्रँडच्या नव्या चालकांनी ही प्रथा प्रथम बंद केली. त्यामुळे नव्या, वेगळ्या पुस्तकांचा पुरवठा बंद झाला. इतरत्र उपलब्ध असणारी सर्वसाधारण पुस्तकंच स्ट्रँडमध्येही मिळू लागल्यानंतर वाचकांना हवं ते पुस्तक मिळवून देणारं दुकान, हा जो स्ट्रँडचा खास लौकिक होता तो नाहिसा झाला आणि केवळ या उद्देशानं स्ट्रँडशी जोडला गेलेला मुंबईतला जो मोठा वाचकवर्ग होता, तो हळूहळू या दुकानापासून दुरावला. त्यानंतरची गेली पाच-सहा वर्षं स्ट्रँडमध्ये अक्षरशः पूर्वीपासून पडून राहिलेल्या पुस्तकांचेच ढीग रचलेले पाहायला मिळत होते. पूर्वी सुंदराबाई हॉलमध्ये स्ट्रँडचं भव्य प्रदर्शन भरत असे. आता अधूनमधून दुकानातच प्रदर्शनाच्या नावाखाली आजवर पडून राहिलेली पुस्तकं पुन्हा पुन्हा मांडली जाऊ लागली. अशा प्रकारे चांगला वाचकवर्ग स्ट्रँडपासून दूर जाईल असा व्यवस्थित बंदोबस्त झाल्यानंतर आपोआपच हे दुकान ओस पडलं. याच काळात स्ट्रँडपासून किलोमीटरभर अंतरावर सुरू झालेल्या ‘किताबखाना’सारख्या दुकानानं स्ट्रँडच्याच धोरणानं पुस्तकविक्रीत जम बसवला. सुंदराबाई हॉलमध्ये ज्या दिमाखानं पूर्वी स्ट्रँडची प्रदर्शनं भरायची, त्याच दिमाखानं आशिष बुक डेपोनं प्रदर्शनं भरवली. या सर्व काळात स्ट्रँडचे चालक आपल्या ऐतिहासिक दुकानाची कबर खोदत बसले! मुंबईतली वाचनसंस्कृती जर गेल्या दहा वर्षांत खरंच रोडावली असेल तर या इतर दुकानांची भरभराट कशी काय झाली?

आता अचानक वाचनसंस्कृती रोडावल्यामुळे स्ट्रँडसारखं दुकान बंद होत असल्याची बतावणी करत उरलीसुरली कचरा पुस्तकं स्ट्रँडच्या चालकांनी सवलतीत वाचकांच्या माथी मारण्याची जाहिरातबाजी सुरू केली. आपण वाचनसंस्कृतीचे रक्षक आहोत असा आव आणत स्ट्रँडचे चालक, प्रसारमाध्यमं गळे काढू लागली. त्यांना समाजमाध्यमांवरचे लोकही साथ देऊ लागले. वाचकांना ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करून दुकानातला शिल्लक कचरा त्यांच्या माथी मारणाऱ्या स्ट्रँडच्या चालकांना हे विचारायला हवं की, भिवंडीजवळच्या त्यांच्या गुदामात पडून असलेली लाखो रुपयांची पुस्तकं त्यांनी वाचकांसमोर का आणली नाहीत? त्यांचं एखादं प्रदर्शन त्यांनी सुंदराबाई हॉलमध्ये लावून ‘अखेरचं प्रदर्शन’ म्हणून त्याची जाहिरात केली असती, तर वाचकांनी त्याला प्रतिसाद दिला नसता? ही पुस्तकं गेली कुठे? लगदा होऊन कारखान्यात की फुटपाथवरच्या पुस्तकदुकानांत?

आम्ही पुस्तकवेडे असलो तरी आम्हालाही थोडा व्यवहार कळतो. आम्ही हे जाणून आहोत की, फोर्टसारख्या परिसरातल्या जागेत असलेला पैसा पाहता तिथं पुस्तकं विकत बसणं हा कुणाला वेडेपणा वाटू शकतो. आणि अशी ‘शहाणी’ माणसं त्या जागेचा खराखुरा ‘सदुपयोग’ करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानाचं वेडपट खूळ समूळ उखडून टाकू शकतात. त्यांना तसं वाटतं तर त्यांनी खुशाल त्याप्रमाणे वागावं. पण स्वतः पुस्तक-संस्कृतीचं थडगं उभारून परमावधीचा स्वार्थ साधत असताना पुस्तक-संस्कृतीच्या नावानं गळे काढून, तिच्या रोडावण्याला वाचकांना जबाबदार धरून, लोकांची भावनिक लुबाडणूक करून हुतात्मा होण्याचा आव कशाला आणावा?

दहा-बारा वर्षांपूर्वी काळबादेवीचं ‘न्यू अँड सेकंडहँड बुक हाऊस’ शांतपणे बंद पडलं; मुंबईतल्या दर्दी पुस्तकवेड्यांना दुर्मीळ पुस्तकांचा आनंद या दुकानानं शतकाहूनही अधिक काळ दिला. त्याच्या थोडं आधी वांद्र्यातलं ‘लोटस बुक हाऊस’ हे अप्रतिम पुस्तकांचं दुकानही आवाज न करता बंद पडलं. तत्त्वज्ञान, वैचारिक साहित्य या विषयांतली पुस्तकं विकणारं ते भारतातलं सर्वोत्तम दुकान होतं असं प्रदीप सेबॅस्टियन या पुस्तकतज्ज्ञानं म्हटलं आहे. या दोन्ही दुकानांचं पुस्तक-संस्कृतीला असलेलं योगदान स्ट्रँडइतकंच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आहे. परंतु या दुकानांच्या मृत्यूची बातमी बनली नाही. अडाणी, उथळ प्रसारमाध्यमांना तर या दुकानांच्या मृत्यूचा वाराही लागला नाही. कोणी त्यांच्या बंद होण्यावर अश्रू ढाळले नाहीत. ही दुकानं बंद पडली तेव्हा समाजमाध्यमं नव्हती, त्यामुळेही असं झालं असेल. पण त्या दुकानाच्या चालकांनी हिरोगिरी केली नाही. त्यांना कोणी पद्म पुरस्कारही दिला नाही, आणि दुकानं बंद करायची असं ठरवलेलं असताना हुतात्मा होण्याचा आवही त्यांनी आणला नाही.

मग स्ट्रँडचीच काय अशी मातब्बरी, की त्याच्या मालकांना स्वतःच्या स्वार्थासाठी दुकान बंद करायचं तर आहे, पण वरतून लोकांकडून पुस्तक-संस्कृतीच्या मसिहाचा मानमरातबही मिळवायचा आहे? आपल्या समाजाच्या भाबडेपणात ढोंगीपणा आरामात जिरून जातो हेच खरं. लोकांच्या भावनांचंही इथं शोषण होतं. सध्या स्ट्रँडचे चालक तेच करत आहेत असं म्हणावं लागतं.

.............................................................................................................................................

लेखक नीतीन रिंढे प्राध्यापक व ग्रंथसंग्राहक आहेत.

neegrind@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Krishna Nikumbh

Tue , 27 February 2018

Mr Parshuram Sir,I think your views are biased. You have unnecessarily entered into wrong territory. Hope you will understand my message.


Krishna Nikumbh

Tue , 27 February 2018

I think there is nothing wrong in switching the business as per the time. No one has got objection on the switching of the business. The point is when public is involved emotionally and they are mislead by the promoters ,no doubt it is objectionable. I agree with your views Dr Rindhe.


Parshuraam Pch

Tue , 27 February 2018

आजकाल उचलली जिभ की लावली टाळ्याला अशी एक प्रवृत्ती देशात निर्माण होत आहे. विषयाची माहिती नसताना केवळ मतप्रदर्शनाच्या नावाखाली बेछूट आरोप लोक करत असतात. पण अश्या टोळक्यामध्ये जेव्हा प्राध्यापक वगैरे मंडळी दिसतात तेव्हा मात्र वाइट वाटते. या लोकांना स्ट्रॅंडचे मालक स्वार्थी वाटतात..पण मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो की काय चुकले स्ट्रॅंडच्या मालकांचे ? अॅडम स्मिथने म्हणले आहे की everything revolves around interest. ते धंद्यालाही लागू होते...जर पुस्तक विक्रिच्या धंद्यातून योग्य परतावा मिळत नसेल तर तो धंदा बंद करून स्वत:चा स्वार्थ जपण्याचा पूर्ण अधिकार मालकाला आहे. तसेच दुसरा धंदा जास्त नफा देणारा असेल तर तोही सुरू करण्याचा मालकाला अधिकार आहे...यात काहिच चुकिचे नाही....जर तुम्ही आजूबाजूलाच पाहिले तर सगळे लोक legal आणि illegal मार्गाने स्वःताचा स्वार्थ साधतात....रूग्णसेवेचे व्रत घेतलेले डाॅक्टर कट'प्रॅक्टीस करतात, प्राध्यापक लोक खोटे काॅपी पेस्ट केलेले प्रबंध सादर करून, पिएचडी मिळवून लाखोंचे पगार घेतात व स्वार्थ साधतात....तसे असेल तर मग पुस्तकविक्रेत्याने लिगल मार्गाने धंदा बंद केला तर इतरांचा विरोध का ? या टिकाकार लोकांनी स्वत: कधी धंदा केलेला आहे का ? त्यांना धंद्यातली काय माहिती आहे ? ते मास्तरकी करण्याइतके नक्कीच सोपे नसते ( हे मी अध्यापन क्षेत्रातील दिग्गजांचा पूर्ण मान ठेवून बोलत आहे. प्राध्यापकांना महिन्याच्या शेवटी पगार मिळतोच, मग ते विद्यार्थ्यांना शिकवो कि न शिकवो किंवा संप करोत किंवा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकोत...अध्यापनाचा दर्जा चांगला नसला, विषय विद्यार्थ्याला समजला नाही, किंवा विद्यार्थी नापास झाला तरी प्राध्यापकांचा लाखोंचा रतिब सुरूच असतो...धंद्याचे तसे नसते. वस्तुला मागणी नसेल तर धंदा करणे कठिण होते..तसेच धंदा चालवताना बॅकांचे कर्ज असते, कामगाराचे पगार देणे असतात, टॅक्सेसही असतात....धंदा चालत नसेल तर हे सर्व करणे खूप कठिण जाते...यातून जो गेला आहे त्यालाच धंदेवाल्याची व्यथां कळू शकते, पगारदारी माणसाला माही. म्हणून लोकांना विनंती कि जर विषय माहित नसेल तर कृपया बेछूट आरोप करू नये.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......