माध्यमांनी केला लक्ष्मीकांत देशमुखांचा ‘एन्काऊंटर’!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख. सोबतचं रेखाचित्र - संजय पवार
  • Mon , 26 February 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar साहित्य संमेलन Sahitya Sammelan ९१ वे साहित्य संमेलन बडोदा लक्ष्मीकांत देशमुख Laxmikant Deshmukh

यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख हे काही तसे ‘सेलिब्रेटी’ लेखक नव्हेत. ‘पानिपत’कार, ‘मृत्यूंजय’कार, ‘बलुतं’कार किंवा ‘उपरा’कार असा कुठलाही ‘कार’ त्यांच्या नावामागे नाही. ते प्रशासकीय सेवेत राहून साहित्यनिर्मिती करणारे लेखक म्हणून, एका विशिष्ट वर्गात ‘माहीत’ आहेत. ‘लोकप्रिय’ नाहीत. अजूनपर्यंत तरी प्रशासकीय काळातील त्यांचा कुठलाही भ्रष्टाचार बाहेर आलेला नाही किंवा कूजबूज स्वरूपातही कुठे ऐकू येत नाही. अनेक आघाड्यांवर ‘कोरी पाटी’ असलेले देशमुख चर्चेत आले, ते त्यांच्या अध्यक्षीय भाषणावरून! गेल्या अनेक वर्षांतील किंबहुना दशकातील कुणा अध्यक्षाच्या भाषणाची इतकी दखल घेतली गेली. पण त्यात एक गोम आहे. माध्यमांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक करतानाच, कुठे तरी ‘ठिक आहे’, ‘तुम्ही तीर मारताय, पण ते काही तितकं महत्वाचं नाही’ असं म्हणत देशमुखांचा सवाल, मूळातून पंक्चर करण्याचा उद्योग केला, तो म्हणजे एक प्रकारचा बेशरमपणाच!

म्हणजे श्रीपाल सबनीसांच्या १२९ वगैरे पानांचं भाषण, त्याचं वेळीच न झालेलं वितरण, सबनीसांचा बेधडकपणा आणि सनातन्यांच्या धमक्या या पार्श्वभूमीवर त्यांनी नथुराम समर्थकांना झोडपून काढलं, हा ही वेगळा व उल्लेखनीय भाग होता. मात्र सबनीसांची साहित्यिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी ही इथल्या विविध परिवर्तनवादी विचारांसोबत वैचारिक संघर्षाची, समन्वयाची, प्रसंगी विरोधाचीही राहिली. त्यामुळे त्यांनी तशी मांडणी करणं, अपेक्षित नव्हतं, तरी अनपेक्षितही नव्हतं. पण ते संमेलन ‘उणे सबनीस, अधिक पी. डी. पाटील’ असंच लक्षात राहिलं.

विद्रोही संमेलनाचा संस्थापक-सदस्य व दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहिल्यानंतर ‘अखिल भारतीय साहित्य संमेलनावर प्रतिक्रिया देणं आम्ही थांबवलं होतं. त्याच त्या उत्सवी स्वरूपावर, अनुदानावर, अध्यक्षनिवडीवर तेच तेच किती तेच तेच बोलायचं? पण हमों सारखा कुणी ब्राह्मणवाद उकरून काढला तर त्याला जागा दाखवायची यात खंड नाही!

देशमुखांच्या भाषणाबाबत माध्यमांनी (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक) जो पक्षपात केला, तो म्हणजे सत्ताधार्‍यांना जसा सत्तेचा दर्प येतो, त्याप्रमाणे माध्यमसत्तेचा दर्प काही विशिष्ट माध्यमांत विशेषत्वाचे जाणवला.

‘राजा तू चूकत आहेस, हे सांगितलं पाहिजे’ हे देशमुखांनी त्या व्यासपीठावरून, तेही बडोद्यात म्हणणं याला निश्चितच महत्त्व होतं, पण अपवाद वगळता बहुसंख्य माध्यमांनी देशमुखांच्या भाषणाची दखल जुजबी, आतील पानांत वगैरे घेतली. त्यांचं भाषण छापण्याची तसदी तर किरकोळीत घेतली गेली. ‘लोकमान्य लोकशक्ती’ वगैरे म्हणणार्‍या दैनिकानं तर देशमुखांऐवजी श्याम मनोहरांची बातमी पहिल्या पानावर ठळक केली!

एकूणात सर्व माध्यमांनी देशमुखांचं भाषण, त्यातील मुद्यांसकट जवळपास कचर्‍यात टाकलं. (याबाबतचा सविस्तर वृत्तांत याआधी ‘अक्षरनामा’वर आलाच आहे.)

यात काही माध्यमांनी ‘अग बाई, केवढी ही गंमत!’ म्हणत वर देशमुखांनाच ‘म्हणजे तुमचा रोख कुणावर?’ वगैरे बालिश प्रश्न विचारले. अर्थात अशा बालिशपणाचा व बिनडोक धैर्याचा मक्ता हा वृत्तवाहिन्यांकडेच जातो. एका वाहिनीच्या पत्रकार मुलीनं हा प्रश्न देशमुखांना असा विचारला की, जणू काही ती विचारतेय की, काल तुम्ही असं काही तरी बोललात, तर मग ते नेमकं काय होतं सांगाल का? देशमुखांनी उत्तर दिलं. त्यांचं उत्तर संपतय न संपतय तोवर तरुणी थेट पोहचली कसलीशी शेव मिसळ का भेळ खायला. मग बडोद्याच्या त्या प्रसिद्ध डिश, हॉटेल्सची साद्यंत माहिती. साहित्य संमेलनात होतं काय, असं नाक वर करून विचारणारे चॅनेलिय पत्रकार/संपादक या निर्बुद्ध भरतीवर कधी बोलतील?

का कशी पण जनाची नाही पण मनाची वाटली आणि माध्यमं देशमुखांच्या भाषणाकडे वळली. पण त्यातही शिरजोरी कायमच! आपणच ‘श्रेष्ठ’ व इतर सारे ‘भुक्कड’ अशा गंडात वावरणार्‍या एका संपादकांनी ‘देशमुख म्हणजे दुर्गा भागवत नव्हेत’ या प्रकारचं भाष्य करून, साहित्यातल्या सृजनशीलतेपासून ते राजकीय नेतृत्वाला धडा शिकवण्याचा मक्ता भागवत संप्रदायापासून सुरू होऊन भागवत संप्रदायापाशीच संपतो हेच अधोरेखित केलं. इथंही पुन्हा ‘म्हणजे देशमुख अभिनंदनास पात्रच आहेत’ असं उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्र दिल्यासारखं, श्रेय देतानाही कंजुषी करत दिलेलं. आता देशमुखांची साहित्यिक कामगिरी (वाचलीच नसल्यानं) त्यावर भाष्य करण्याऐवजी, ते प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी कधी असा प्रश्न विचारला होता का? का आत्ता निवृत्तीनंतरच त्यांना हे धाडस आलं? प्रश्न तर थेट व बिनचूक. पण मग माधव गोडबोलेंचे दोन-दोन पानी लेख छापताना, हा प्रश्न कधी तरी त्यांनाही विचारा की! का गोडबोले तेवढे नीरक्षिरविवेक जपणारे राजहंस आणि देशमुख वगैरे निवृत्तीपश्चात रामशास्त्री?

माध्यमांचा आत्मा इतका सहजासहजी शांत कसा झाला असता? ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चा इव्हेंट समोर असताना, साक्षात बडोद्यात जाऊन अगोचरपणा करणारा कोण हा टिंबक टू देशमुख? ‘राजा, तू चुकत आहेस’ हा सवाल करून देशमुखांनी जणू राजद्रोहच केलाय, अशा पद्धतीनं त्यांना पिंजर्‍यात घेऊन, त्यांच्यावर सरबत्ती करण्यात आली.

या सरबत्ती करणार्‍यात मग काही तर्ककठोर होते, काही धड ना कलावादी, ना स्वच्छंदवादी असेही होते. शिवाय सूत्रसंचालकांकडे हातचा एक असतोच.

यात मग संमेलनाध्यक्ष निवडण्याची प्रक्रियाच किती लोकशाही विरोधी आहे; गटबाजी, पैसा व साधनांचा, संबंधांचा उपयोग-दुरुपयोग यावरून देशमुखांना कोपर्‍यात ढकलायला सुरुवात झाली. वास्तविक हा प्रश्न देशमुखांच्या निवडणुकीपासून सुरू झालेला नाही आणि त्यांच्या कार्यकाळानंतर तो संपणार नाही, हे सर्व चर्चकांना चांगलंच माहीत होतं. (हा प्रश्न कुणी कधी दुर्गा भागवत, गंगाधर गाडगीळ, पुल, श्रीपु यांना विचारला होता? किंवा बदल करा म्हणून धारेवर धरलं होतं?) पण देशमुखांच्या सवालातील हवा काढायला हे निमित्त चांगलं होतं. पत्रकारितेतील ‘अर्णवनीती’ इथं कामी येते! आणि काही वेळा एरव्ही व्यवस्थाविरोधी मान्यवरही नकळत व्यवस्थेच्या मांडीला मांडी लावून मुख्य शत्रूच विसरतात. तसंच इथं झालं.

बाकी ‘भूमिका’ शब्दाचीच एलर्जी असणारे कलावादी कम स्वच्छंदतावादी कम मुक्तप्रतिभावंत, देशमुखांच्या प्रश्नावर डोळ्यात तिखट गेल्यासारखे थयथयाटले! अशांचा थयथयाट समाजमाध्यमांवर अखंड चालू असतो. या लोकांचा एक आवडता प्रश्न असतो- ‘आम्हाला प्रेम कविता लिहाविशी वाटली तर आम्ही लिहायची नाही का? का त्यात काही भूमिका, सामाजिक वगैरे नाही म्हणून ती कविता प्रेमभावनेसहच टुकार?’

टाळी घ्यावा असाच प्रश्न व कोमल वेदना असते. पण आजवर शारदेच्या दरबारातील सारस्वतांनी हाच तर चंद्र, सूर्य, तारे नि झाडे-झुडपांचा खेळ रंगवला! त्याला विरोध नि आडकाठी कशाला? पीकासोबत ‘तण’ ही माजतं, हा तर निसर्गनियम! भूमिकावाल्यांचं म्हणणं एवढंच असतं की, ‘ ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे एकच असतं, तुमचं नि आमचं सेम असतं’ यावर टाळ्या पिटून, खुदकन गाली हसून झालं नि झोका वर जाऊन खाली आला की, कधी तरी साहिरचं ‘इक शहेनशहानं बनवाके हँसी ताजमहाल, हम गरिबोंकी मुहब्बत का उड़ाया है मजाक यारो’, हे समजून घेतलंच तर धारा आणि बुडबुड्यातला फरक कळेल.’ त्यामुळे या अधल्यामधल्या प्रतिभावंतांनी देशमुखांवर चिडून हल्ला केला तर तो हसण्यावारीच नेला पाहिजे.

लक्ष्मीकांत देशमुखांच्या प्रामाणिक, किंचित धाडसी व काही ठिकाणी स्वसाहित्याच्या अनावश्यक तपशीलानं भरलेल्या भाषणाची ‘दखल’ कुठे तरी घेतली गेली आणि पोसलेल्या माध्यमांतल्या एन्काऊंटर स्पेशालिस्टांनी आपली कामगिरी योग्यपणे पार पाडली!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 27 February 2018

अहो पवारसाहेब, माध्यमांनी लक्ष्मीकांत देशमुखांचा एनकाउंटर बिनकाउंटर केलेला नाहीये हो. खरा एनकाउंटर मी केलाय. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य वाचकांनी केलाय. लक्षांत येतंय का मी ( म्हणजे सामान्य वाचक बरंका!) काय म्हणतोय ते! आपला नम्र, -गामा पैलवान


rama ranade

Mon , 26 February 2018

"आपणच ‘श्रेष्ठ’ व इतर सारे ‘भुक्कड’ अशा गंडात वावरणार्‍या एका संपादकांनी", "‘लोकमान्य लोकशक्ती’ वगैरे म्हणणार्‍या दैनिकानं"- असे अप्रत्यक्ष उल्लेख करण्याची काय गरज भासते? आपण तर स्वघोषित विद्रोही आहात ना, मग म्हणा की, 'गिरीश कुबेर' आणि 'लोकसत्ता' असे. कुबेरांच्या लोकसत्तेमधे अडाणी आकलन असते, असे स्पष्ट म्हणायला तुम्हाला काय अडचण वाटते, कळत नाही. कुबेर यांनी केवळ दुर्गा भागवत आणि नरहर कुरुंदकर यांचे काही लेख वाचले असावेत आणि गोविंद तळवलकरांचे इंग्रजीतून अनुवादित केलेले काही अग्रलेख वाचले असावेत, असे त्यांच्या मांडणीवरून दिसते. खरे तर ते स्वतः अनेकदा इंग्रजी नियतकालिकांमधले लेख मराठीत अनुवादित करून स्वतःच्या शैलीत लिहितात, असे दिसते. असो. मराठी माध्यमांची हीच कुवत आहे. खरे सांगायचे तर पवारांचा लेख प्रामाणिक असेलही, परंतु तोही आकलनाची अपुरी पातळी राखणाराच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 'सूर्य-चंद्र' यांसंबंधीच्या लेखनावरची घिसीपिटी टीका करण्यात व्यर्थ लेखणी झिजवण्याला विद्रोही म्हणत असतील तर म्हणा बापडे.


Kotibhaskar J

Mon , 26 February 2018

महोदय, आपण दखल घेतली ना त्या नव्या-बोलबच्चन साहेबांची ...मग बास झालं ना ...महाराष्ट्रात १० कोटी लोक राहतात, ते रोज काही ना काही बोलतातच. आता त्या प्रत्येकाची दखल घ्यावयास आम्ही काही रिकामटेकडे नाही आहोत. तुम्हास भरपूर वेळ असल्यास घ्या तुम्ही सवडीने दखल...नाहीतर असे करा ...नाटकच लिहा ना तुम्ही दोघे ..." राजा तू चुकलास...." वगैरे नावाचे ! निदान काही आर्थिक कमाई तरी होईल...तसेच इतर काही मराठी हातांना रोजगारही मिळेल.....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......