अजूनकाही
विख्यात लेखक रस्किन बाँड यांच्या ३९ कथांचा अनुवाद ६ पुस्तकांच्या रूपाने ‘रोहन प्रकाशन’तर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. सरस अनुवाद, बोलकी चित्रं आणि उच्च निर्मितीमूल्यं यांच्या मिलाफातून साकारलेल्या या प्रकल्पाच्या जडणघडणीबद्दलचा लेख...
अँग्लो-इंडियन लेखकांमध्ये रस्किन बाँड याचं नाव अग्रस्थानी आहे. आजवर त्यांनी कथा-कादंबऱ्या-ललितलेख यांसारखे विविध साहित्यप्रकार हाताळले असले, तरी रस्किन बाँड आणि बालसाहित्य असं घट्ट समीकरण आपल्या सगळ्यांच्याच मनात तयार झालं आहे. याचं कारणही तसंच आहे. बाँड यांच्या कथांमधून येणारं मुलांचं भावविश्व, धाडस करण्याची वृत्ती आणि निसर्गाचं चित्रण आदी गोष्टी मुलांना भुरळ तर घालतातच, पण मोठ्यांनाही पुन्हा ‘लहानपणात’ नेतात.
त्यांच्या लेखनातले हे पैलू लक्षात घेऊन मराठी मुलांपर्यंत रस्किन यांच्या कथा पोचवण्याचा अभिनव प्रयोग ‘रोहन प्रकाशन’ने रस्किन बाँड यांच्या सहा पुस्तकांचा संच प्रकाशित करून केला आहे. विशेष म्हणजे, ही सगळी पुस्तकं नुसतीच वाचनीय नाहीत, तर ती ‘प्रेक्षणीय’ झाली असून हा संच दिमखादार व आकर्षक अशा केसमध्ये देण्यात आला आहे.
ज्येष्ठ लेखिका व अनुवादिका नीलिमा भावे आणि तरुण अनुवादिका- लेखिका रमा हर्डीकर-सखदेव यांनी रस्किन यांच्या ३९ कथांचा रसाळ मराठी अनुवाद केला आहे. आणि हा गुलदस्ता चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या बोलक्या चित्रांनी सजला आहे.
''रस्किनच्या कथा अनुवादित करणं हा माझ्यासाठी एक नॉस्टॅल्जिक अनुभव होता'', असं नीलिमा भावे यांनी सांगितलं. त्या काही वर्षं मसूरी आणि देहरादून या भागात राहिलेल्या असल्याने त्यांना तिथल्या वातावरणाचा पुनःप्रत्यय रस्किन यांच्या कथांचा अनुवाद करताना घेता आला. या कथांबद्दल त्या म्हणाल्या, “तरलता, निळखता आणि साधेपणा ही या कथांची वैशिष्ट्यं आहे. त्याच्या लेखनातली बरीचशी पात्रं ही पहाडी भागातली, फारशा महत्त्वाकांक्षा नसलेली अशी असतात. त्यांची सुखदु:खही छोटीशीच असतात. हे शांत जग रस्किन प्रत्ययकारीपणे चितारतात. त्यामुळे या काहीशा अपरिचित जगाचा अनुभव या कथांमधून मुलांना घेता येईल. या कथा वाचताना त्यांची एका वेगळ्याच जगातून सफर घडेल, जी त्यांना अंतर्मुख करेल आणि त्यांचं विश्वही व्यापक करेल.”
''निसर्ग हा रस्किन यांच्या साहित्यात केंद्रस्थानी असतो'', असंही भावे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “निसर्गाशी एकरूप होण्याची ओढ त्यांच्या कथांमधल्या कित्येक पात्रांना असते. म्हणूनच त्यांच्या कथांमध्ये त्यांच्या आजोबांनी लावलेली झाडं, त्यांनी पाळलेले प्राणी आणि त्यांविषयी वाटणारी आपुलकी आपल्याला दिसते.”
रमा यांनी रस्किन यांच्या कथा लहानपणी वाचल्या आणि त्या कथांमधल्या 'इमोशनल' धाग्याने त्या रस्किन यांच्या लेखनविश्वाशी जोडल्या गेल्या. नंतर अनुवादिका म्हणून काम करायला लागल्यावर रस्किन यांचं साहित्य मराठीत यावं असं त्यांना वाटू लागलं. याबद्दल त्यांनी सांगितलं, “गंमत अशी की, जेव्हा मी या अनुवादासाठी ‘रोहन प्रकाशना’शी संपर्क साधला, तेव्हा तेही याच प्रकल्पाची आखणी करत होते! आणि मग रस्किन यांच्या कथा हा आमच्यातील एक सामायिक ‘बाँड’च झाला!”
त्या पुढे म्हणाल्या, “ ‘सीता आणि नदी’, ‘भूकंप’ किंवा ‘टेकड्यांच्या पलीकडे’ या कथा अनुवादित करताना मला विशेष मजा आली. या कथांमधलं साहस, गमतीशीर घटना-प्रसंग, विनोदाला असलेली कारुण्याची झालर यांमुळे मी अंतर्मुख झाले. तसंच या सगळ्या कथांमधलं वातावरणं, त्यांतली पात्रं भारतीय असल्याने अनुवादही सहज झाला. मराठी मुलांना (आणि पालकांनाही) या कथा नक्की आवडतील. या कथांमधली प्रांजळता त्यांना भावेलच, शिवाय त्यातली रंजकता आणि साहसही त्यांना खिळवून ठेवेल.”
चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचा रस्किनशी परिचय झाला, तो कमलाकर सोनटक्के यांनी केलेल्या अनुवादामुळे. तो वाचून त्यांनी रस्किन यांचं इतरही साहित्य वाचून काढलं आणि या लेखकाने त्यांच्या मनात घरच केलं. ते म्हणाले, “हा लेखक ब्रिटिश असला, तरी तो इथल्या मातीत रुजला आहे. मला त्यांचं लेखन वाचून 'डेव्हिड जंटलमन' या चित्रकाराची आठवण झाली.”
चंद्रमोहन यांना या प्रकल्पातल्या कथांमधलं लहान मुलांचं भावविश्व, ते चितारण्याची हातोटी, प्राणिप्रेम, त्यांतली माणसं आणि साधंसरळ स्टोरी टेलिंग या गोष्टी जवळच्या वाटल्या. या प्रकल्पात काढलेल्या चित्रांबद्दल त्यांनी सांगितलं, “या मालिकेसाठी चित्रं काढणं हे जबाबदारीचं काम होतं. लेखनातला काळ आता जरी किंचित जुना वाटत असला, तरी त्यातलं साहस आणि भावविश्व आजही रिलेट होणारं आहे. रोहन प्रकाशनाच्या रोहन चंपानेरकर यांनी या प्रकल्पाचं काम माझ्यावर सोपवल्यावर चित्रं काढण्यापूर्वी बाँड यांच्या पुस्तकांना इतर चित्रकारांनी कशी चित्रं काढली आहेत, याचा मी अभ्यास केला. बाँड यांची कथा सांगण्याची शैली सरळसाधी आहे; त्यात प्रतीकात्मकता नाही. ती ‘रिअॅलिस्टिक’ आहे. त्यात एक थ्रीडी एलिमेंटही आहे. या सगळ्याचा विचार करून मी ही चित्रं काढली.” चित्रं काढल्यानंतर पुस्तकांची मांडणी आणि प्रेझेंटेशनही चांगलं होईल याकडे चंद्रमोहन यांनी विशेष लक्ष दिलं. ते म्हणाले, “आम्हाला ‘रस्किन बाँड’ मुलांपर्यंत पोचवायचा होता. म्हणून मी त्यांचं नाव ठळक दिसेल अशी योजना केली आणि त्यांचा फोटोही वापरला. पुस्तकांची मालिका वाटावी यासाठी कव्हरही एकाच शैलीत विशिष्ट प्रकारे सजवली.”
आजची लहान-कुमारवयीन मुलं उद्याची वाचक असतात. त्यामुळे वाचनसंस्कृती जोपासायची असेल, तर या मुलांना चांगलं मराठी वाचायला दिलं पाहिजे, असं मत ‘रोहन प्रकाशन’चे रोहन चंपानेरकर यांनी मांडलं. ते म्हणाले, “मुलांना चांगलं साहित्य वाचायला मिळावं, यासाठी गेली काही वर्षं आम्ही सातत्याने ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’, डॉ. कलाम यांची पुस्तकं यांसारखे प्रकल्प राबवत आहोत. त्यासाठी ‘किशोर वाचन’ नावाचा विभागही आम्ही सुरू केला. याअंतर्गत फेलूदानंतर मुलांना कोणता लेखक वाचायला द्यायचा, असा विचार करत असताना मी आणि आमच्या संपाकदीय टीमने एकमुखाने 'रस्किन बाँड' हे नाव निश्चित केलं. कारण आम्ही सगळ्यांनीच वेळोवेळी रस्किन यांच्या कथा वाचल्या होत्या आणि त्या आम्हाला खूप आवडल्याही होत्या. चांगल्या अनुवादकांना प्रकल्प दिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की, रस्किन बाँड यांच्या कथांना साजेशी चित्रंही हवीत. जेणेकरून उत्तम साहित्य आणि उत्तम चित्रं यांचा संगम साधला जाऊन हा प्रकल्प वेगळ्या उंचीवर जाईल.” पु्स्तक प्रकाशित करण्यामागचा उद्देश सफल होण्यासाठी असे प्रकल्प वाचकांपर्यंत चांगल्या प्रकारे नेणंही तितकंच आवश्यक असतं, असंही चंपानेरकर म्हणाले. त्यांनी सांगितलं, “प्रकल्पातल्या आशयाचा विचार करता, ही पुस्तकमालिका तशाच दिमाखदार पद्धतीने मुलांपर्यंत पोचवावी, असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही संचासाठी पुठ्ठ्याची आकर्षक अशी ‘केस’ तयार केली. ज्यामुळे संच हातात घेतल्यावर मुलांना ‘भारी’ वाटेल! त्यांना तो मित्रांना दाखवावासा वाटेल आणि ‘कलेक्टर्स एडिशन’ म्हणून ठेवावासाही वाटेल.”
या संचातल्या सगळ्या कथा मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही वाचायला हव्यात, असं मत ‘रोहन’च्या संपादकीय टीममधले संपादक अनुजा जगताप आणि प्रणव सखदेव यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “या कथा घराघरात पालक आणि मुलं यांनी एकत्र बसून वाचायला हव्यात, या कथांबद्दल गप्पा मारल्या जाव्यात, त्यातून पालक-मुलांमधलं शेअरिंग वाढावं. या कथांमध्ये असलेली निखळता, भावनाशीलता आणि निरागसता या गोष्टी पालक आणि पाल्य यांच्यातलं नातं अधिक सुदृढ करण्यास हातभार लावतील असा आम्हाला विश्वास वाटतो.”
रस्किन बाँड संच : भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता - रस्किन बाँड, मराठी अनुवाद - नीलिमा भावे, रमा हर्डीकर,रोहन प्रकाशन, पुणे, पाने - ६८४ (एकत्रित), मूल्य - ९०० रुपये (एकत्रित).
हा संच सवलतीत खरेदी करण्यासाठी - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/313
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment