अजूनकाही
जगातील सर्वोत्कृष्ट थरारपट असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो ‘वेजेस ऑफ फियर’ हा फ्रेंच चित्रपट जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या हाराकिरीवर टाकलेला झोत आहे. हेन्री जॉर्ज क्लूझो या फ्रेंच दिग्दर्शकांची ही सर्वोत्कृष्ट कलाकृती १९५३ साली प्रदर्शित झाली. क्लूझोंचे त्या आधीचे चित्रपट आपटले होते, हा मात्र मात्र धो धो चालला.
‘वेजेस ऑफ फियर’ची कथा मेक्सिकोतील ला पीएद्रास नावाच्या गावात घडते. या गावात स्थानिक मेक्सिकन आणि गोऱ्या लोकांच्या वस्त्या वेगवेगळ्या असतात. गोऱ्या लोकांच्या विभागात युरोपीय समाजानं टाकून दिलेले बेकार, बेबाक, बेरोजगार, तडीपार आणि भामटे तरुण इकडेतिकडे फिरताना आणि स्थानिकांना त्रास देत फिरत असतात. त्यातले काही टवाळ एका रेस्टॉरंटच्या आवारात निर्हेतूकपणे बसलेले असतात.
या गावात काहीच घडत नाही. कोणताही रोजगार मिळत नाही. गाव सोडून मायदेशी जाण्यासाठी लागणारा प्रवासखर्च या बेकार पुरुषांना परवडण्यासारखा नसतो. आला दिवस उधार मागून किंवा कष्टकरी मित्राच्या कमार्इवर ढकलायचा. मारियो हा बेकार तरुण (येव मोतांड) आपल्या भूतपूर्व प्रेयसी लिंडाच्या (वेरा क्लूझो) जीवावर मजा मारत असतो आणि तिचा येता-जाता अपमानही करत असतो.
अशा या कंटाळवाण्या गावात कोठूनतरी पळून आलेला जो (चार्ल्स वानेल) हा उतारवयाचा तस्कर दाखल होतो. जो आणि मारियोची दोस्ती जमते. सदर्न ऑर्इल कंपनी या अमेरिकन तेल कंपनीला माणसांची जरुरी आहे अशी वार्ता जोला मिळते. या कंपनीच्या दूरवर असलेल्या तेल विहिरींना आग लागलेली असते आणि ती आटोक्यात आणण्यासाठी नायट्रोग्लिसरीन या रसायनानं भरलेले दोन ट्रक तिथं पाठवण्याची जरुरी असते. ज्वालाग्रही रसायनाचा नियंत्रित स्फोट घडवायचा असतो. स्फोटाच्या आघातामुळे भडकलेली आग शमते.
रस्ता खाचखळग्यांचा असतो आणि तीव्र रसायन ज्वालाग्रही असतं. खळग्यामुंळे ट्रक उलटला तर रसायनाचा स्फोट होणार हे निश्चित. हे दोन ट्रक पोचवण्यासाठी चार ड्रायव्हरची जरुरी असते. शिवाय हे दोन ट्रक एकमेकांपासून विविक्षित अंतर ठेवून चालवायचे. पहिल्या ट्रकनं पेट घेतला तरी दुसरा ट्रक सुरक्षित राहील अशी ही योजना असते. यासाठीच दोन ट्रक आणि चार ड्रायव्हर हवे असतात. जो, मारियो, लुर्इगी आणि बिम्बा हे चार ड्रायव्हर आपल्या कामगिरीवर निघतात. या कामासाठी कंपनीनं प्रत्येकी २००० डॉलर देऊ केलेले असतात.
या टप्प्यापर्यंत सिनेमाची गती अत्यंत धीमी आहे. रस्ता खाचखळग्यांचा आणि निसरडा असतो. गोगलगायीच्या गतीनं जाणं आवश्यक असतं. रसायनं आणि भूगोल हे दोन अडथळे समोर असतात.
ट्रक रडतखडत चाललेले असले तरी या टप्प्यावर सिनेमा वेग पकडतो. गियर बदलत जातात... व्हील फिरवलं जातं... टायर गरगरा फिरत असतं... सिगरेट पेटवण्यासाठी काडी ओढली जाते... खड्डयात फसलेलं चाक काढलं जातं... क्लोज शॉटमध्ये हे प्रसंग दिसतात आणि धडधड निर्माण करतात. दगडांनी भरलेल्या वळणावर ट्रक डगमगू लागतो. प्रत्येक खळग्यावर, प्रत्येक टप्प्यावर काय होणार या आशंकेनं प्रेक्षक घेरला जातो.
तेल विहिरांचा विभाग सुरू होतो. रस्त्याच्या मध्येच चिकट चिखलाचा प्रवाह असतो. गाडी रुतते. हा प्रवाह किती खोल आहे हे पाहण्यासाठी मारियो जो ला त्यात उतरायला सांगतो. इथवर येर्इपर्यंत चोवीस तासापेक्षा अधिक काळ लोटलेला असतो. वय झालेल्या जोला प्रवाहात अजिबात उतरायचं नसतं, पण मारियोच्या दंडेलीपुढे त्याचं काही चालत नाही. जो चिखलात पाय घसरून पडतो. त्याला वर उठणंही मुश्कील होतं. पण मारियोला काही करून ही कामगिरी पूर्ण करण्याची घार्इ झालेली असते. जोच्या नाकातोंडात चिखल गेलेला असतो. रुतलेली गाडी काढण्यासाठी जी हाराकिरी करावी लागत त्यानं थरार निर्माण होतो.
लगोलग प्रचंड विवरं असलेला भाग सामोरा येतो. एका बाजूला खडक आणि दुसऱ्या बाजूला दरी असते. दरीच्या डाव्या बाजूला लाकडाचा पूल असतो. खड्डे चुकवण्यासाठी मोडकळीस आलेल्या पुलावरून गाडी नेण्याचा निर्णय मारियो घेतो. या पुलाच्या अगदी टोकापर्यंत गाडी मागे घेऊन ती डावीकडे वळवायची असते. पुलावरचा लाकडाचा प्रत्येक ओंडका करकरू लागतो. या दृश्याची संकल्पना आणि चित्रीकरण निव्वळ विस्मयजनक आहे. पुढे हे ट्रक आगीच्या स्थानापर्यंत पोचतात का? या नरक प्रवासात पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा.
भारतातही एका मोठ्या वर्गाला आपल्या अस्तिवासाठी जीवघेणी कामं करावी लागतात. खाणकामगार आणि सफार्इ कामगारांना रोजंच धोक्याचं काम करावं लागतं.
दुसरं महायुद्ध हिटलरच्या वंशवादामुळे सुरू झालं. जर्मनीने पोलंडवर १९३९ साली स्वारी केली. पोलिश लोक हीन वंशाचे आहेत या धारणेनंच ही चढार्इ करण्यात आली होती. भारतात सामाजिक व्यवस्थेनं हजारो वर्षांपूर्वीच दलित जातींविरोधात अत्यंत छुपं युद्ध पुकारलं. गरीब, आदिवासी आणि दलितांना घाणीची आणि धोक्याची कामं करावी लागतात. हाही अस्तित्वाचा लढा आहे आणि यातील थरारही काही कमी नाही. हृदय पिळवटून टाकणारा थरार आहे तो.
भारतातल्या कोळसा खाणीत दर दहा दिवसांत एका खाण कामगाराचा मृत्यू होतो. दगडी कोळशाच्या खाणीतील अगदी चिंचोळ्या आणि उंचीनं कमी असलेल्या वाटांमधून फक्त लहान मुलं जावू शकतात. खाणीतल्या या गुहा कधीकधी कोसळतात आणि माणसं गाडली जातात.
जम्मू-काश्मीरच्या सीमेवर लढण्याइतकाच धोका गटारात उतरून अडकलेली मानवी विष्ठा साफ करण्याच्या कामात आहे. २०१० ते २०१७ दरम्यान जम्मू-काश्मीर सीमेवर ४११ जवान मृत पावले. त्याच काळात तुंबलेल्या गटारात घुसमटून ३५६ सफार्इ कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला. २०१७मध्ये ९० सफार्इ कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत.
अस्तित्व टिकवण्यासाठी गरीब जनतेला धोके पत्करून कामं करावी लागतात. माणसं मूलत: एकाकी, हीन आणि हिंसक असतात असा अस्तित्वादी विचार त्या काळी प्रचलित होता. दुसऱ्या महायुद्धाचे चटके बसल्यामुळे अस्तित्वादी निराशेचं सावट पसरलेलं होतं. माणसं एकमेकांवर हिंसा करतात, जगण्यासाठी स्वत:वरच हिंसा करावी लागते, अत्यंत वार्इट कामं करावी लागतात असं खणखणीत भाष्य हा सिनेमा करतो.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अर्धं फ्रान्स नाझीव्याप्त झालं होतं. या नाझीव्याप्त फ्रान्समध्ये एका जर्मन फिल्म कंपनीत क्लूझोंनी पटकथा विभागात काम केलं होतं. या काळात ज्यू लेखक आणि छायाचित्रकारांशी त्यांची दोस्ती जमली म्हणून जर्मन फिल्म कंपनीनं त्यांना कामावरून कमी केलं होतं.
युद्ध १९४५ साली संपलं. फ्रान्स मुक्त झाला. नाझी सैन्याधिकाऱ्यांवरचे खटले सुरू झाले. हिटलर आणि त्याच्या साथीदारांच्या क्रौर्याचे तपशील पुढे येऊ लागले. नाझींशी हातमिळवणी करणाऱ्या नागरिकांवरही आरोप ठेवण्यात आले. युद्धकाळात जर्मन फिल्म कंपनीत काम केल्यामुळे क्लूझोंवर ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यावर चित्रपटबंदी आली. १९४९ पर्यंत ही बंदी सुरू होती. ज्यूंशी मैत्री केल्यामुळे जर्मन कंपनीनं काढून टाकलं, तर मायदेशानं जर्मन कंपनीत नोकरी केल्यामुळे चित्रपटबंदी आणली. दोन्ही वेळेला लढा अस्तित्वाचा होता.
अस्तित्ववादासोबत भांडवलशाही आणि वसाहतवादाविरोधातील मांडणी ‘वेजेस ऑफ फियर’मध्ये दिसते. भर दुपारी रस्त्यावर एक मुलगा झुरळाचा छळ करत असतो. या दृश्यानं सिनेमाची सुरुवात होते. या दृश्यामुळे पुढे काय मांडून ठेवलंय याचं सूतोवाच होतं. नंतर या मुलाला आर्इस्क्रिमची गाडी दिसते. तो त्याच्या मागे जातो. पण आर्इस्क्रिम त्याला परवडणारं नसतं. या निराश वातावरणाच्या पार्श्वभूमीवर क्लूझोनं थरारही निर्माण केला. या चित्रपटाचे हीरो मारियो आणि जो रस्त्यावर गुजारा करणाऱ्या वर्गापैकी आहेत. त्यांची अस्तित्वाची लढार्इ सुरू असते.
जो, मारियो, बिंबा आणि लुर्इगीसमोर दोन हजार डॉलर कमवण्याची संधी असते, पण या कामात सर्वस्व हरपण्याचा धोकाही असतो. मेक्सिकोच्या ला प्रिएदास गावातील अनेक मेक्सिकन तेल विहिरीत काम करत असतात. त्यांची कमार्इही धोक्याची.
स्पेननं सोळाव्या शतकातच मेक्सिको आपल्या घशात घातलं होतं. १९१७ साली मेक्सिकोला स्वातंत्र मिळालं. चाळीसच्या दशकांत मेक्सिकोच्या तेलसाठ्यांवर डल्ला मारण्यासाठी अमेरिकन तेल कंपन्या मेक्सिकोत दाखल झाल्या.
फक्त फायदा आणि अधिक फायदा हेच भांडवलशाहीचं मूलभूत तत्त्व असतं. मानवी मूल्य किंवा मानवी जीवनाचं मोल या व्यवस्थेला नसतं. भांडवलदारांची आणि सत्ताधाऱ्यांची नेहमी युती होते. अनेक खाजगी कंपन्यांना पैशांची अफरातफर करणं या युतीमुळेच शक्य होतं. काही आंतरराष्ट्रीय विशाल कॉर्पोरेट्स हत्याकांडातही सहभागी असतात. अमेरिकेनं फोर्डसारख्या कॉर्पोरेट्सच्या साह्यानं आर्थिक वसाहती निर्माण केल्या. याला विरोध करणाऱ्या राजकारण्यांना आणि राज्यप्रमुखांचा खातमा करण्यात आला. या हत्याकाडांचे तपशील जॉन पर्किन्स यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ इकनॉमिक हिटमॅन’ या पुस्तकात सापडतील.
भारतातील गरीब भूमीहीन मजूरांना जगण्यासाठी कसा लढा द्यावा लागतो याची कहाणी ‘दो बिघा जमीन’ या बिमल रॉय दिग्दर्शित चित्रपटात पाहायला मिळते. शंभू महातो कलकत्त्यात पैसे कमवण्यासाठी आलेला असतो. सावकाराकडे गहाण ठेवलेली आपली जमीन सोडवून घेण्यासाठी महानगरात अधिकाधिक कामं करावी असा त्याचा मनसुबा असतो. हातरिक्षा चालवण्याचं काम त्याला मिळतं. एकदा धनिक प्रवाशाचं भाडं त्याला मिळतं. त्याच्या हौसेखातर दुसऱ्या हातरिक्षाबरोबर स्पर्धा लावली जाते. दुसऱ्या रिक्षात त्याची प्रेयसी बसलेली असते. दोन्ही रिक्षांची चढाओढ सुरू होते. आपली रिक्षा अधिकाधिक जलद चालावी यासाठी प्रवासी सतत ओरडत असतो. ही हौस पुरी करता करता शंभू कोसळतो.
या अस्तित्ववादानं क्लूझोंना झपाटलं होतं. त्यांच्या चित्रपटातील विनोद तीक्ष्ण, मूलतत्त्व राजकीय आणि शोक गूढ तसंच काळोखा असे.
साऱ्या जगभर लोक अन्नासाठी दाही दिशा फिरत असतात. कामं मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी काठावर जगणाऱ्या समूहांना अनेकदा जीव धोक्यात घालून अन्न मिळवावं लागतं. हेच सत्य हा चित्रपट अधोरेखित करतो. हा अस्तित्वाचा लढा आहे. हाताला चटके बसल्याशिवाय भाकरी मिळत नाही!
.............................................................................................................................................
लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.
alkagadgil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 27 February 2018
अलकाताई, लेख चांगला आहे. फक्त एक वाक्यं खटकलं. तुम्ही म्हणता की भारतात सामाजिक व्यवस्थेनं हजारो वर्षांपूर्वीच दलित जातींविरोधात अत्यंत छुपं युद्ध पुकारलं. हे साफ चुकीचं आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतात दलित नव्हतेच. मनुस्मृतीत अवर्ण्य नावाचा प्रकार नाही. आंबेडकरांच्या मते अस्पृश्य जाती इ.स. चौथ्या शतकानंतर निर्माण झाल्या (संदर्भ : https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/ambedkar-against-untouchability-318001-2016-04-14 ). बाकी परीक्षण छान जमलंय. आपला नम्र, -गामा पैलवान