अजूनकाही
स्त्रिया नोकरी/ व्यवसायाच्या निमित्तानं घराबाहेर पडू लागल्या. त्यासाठी त्यांना तासन्तास घराबाहेर राहावं लागलं. या स्थितीचा फायदा न घेर्इल तर तो पुरुष कसला! या अगोदर हजारो वर्षं घराच्या चार भिंतीच्या आड स्त्रीचं शोषण करण्यात धन्यता मानणाऱ्या पुरुषाला स्त्रीचं शोषण करण्याची एक नवीन जागा सापडली व ती म्हणजे ‘नोकरी/व्यवसायाची जागा’. यातूनच ‘सेक्सच्युअल हॅरॅसमेंट अॅट वर्कप्लेस’ नावाचा नवा गुन्हा अस्तित्वात आला. गेली अनेक वर्षं या गुन्हाची चर्चा सुरू आहे. भारतीय संसदेनं यासाठी २०१३ साली ‘The Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act’ संमत केला. अर्थात असा कायदा आहे म्हणून हे प्रकार बंद झाले असं नाही.
हाच विषय समोर ठेवून रम्या पाँडियन व डॉ. इशमीत नागपाल यांनी सुमारे तासभर चालणारा व हिंग्लीश भाषेत असलेला प्रयोग सादर केला आहे. या प्रयोगाचं नाव आहे ‘टच मी नॉट’ (मला स्पर्श करू नका). प्रयोगाला तशी बंदिस्त संहिसा नाही. रंगमंचावर या दोघी गप्पा करतात, मध्येच प्रेक्षकांना त्यांच्या संवादात सहभागी करून घेतात. याद्वारे त्या दोघी या कथासूत्रात प्रेक्षकांना खेचतात व त्यांच्यासमोर आरसा धरतात.
या प्रयोगात एका प्रसंगी या दोघी काही निवडक प्रेक्षकांना रंगमंचावर बोलवतात. त्यात चार पुरुष तर दोन स्त्रिया असतात. त्यांच्यासमोर नॉन अल्कोहॉलिक पेयाचे ग्लास ठेवतात. नंतर या दोघीपैकी एक जण सूत्रधार बनते व एक विधान करतं. त्यानुसार सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया असलेल्या व्यक्तीनं ग्लास प्यायचा किंवा नाही. उदाहरणार्थ एक विधान असतं की, रात्रीचे साडेअकरा वाजले आहेत व तुम्ही रिक्शाने घरी जाणं पसंद कराल की बसनं? या प्रकारच्या काही प्रश्नांतून सूत्रधार असं दाखवून देतो की आजही पुरुषांसाठी जगणं किती सोपं आहे. रात्री किती वाजले आहेत याचा विचार न करता पुरुष सहज रिक्शानं घरी जाऊ शकतो, तर स्त्रीला याबद्दल दहादा विचार करावा लागतो.
अशा काही प्रयोगांतून सूत्रधार असं दाखवून देते की, आजही पुरुषाला या समाजव्यवस्थेनं काही खास अधिकार दिले आहेत. मुख्य म्हणजे याबद्दल पुरुष विचार करत नाहीत, हे सर्व आपल्याला मिळालंच पाहिजे असा त्याचा दृष्टीकोन असतो. याचं कारण त्या मागे असलेली व आजही जबरदस्त प्रभाव टिकून ठेवलेली पुरुषप्रधान संस्कृती.
ही मानसिकता एवढी खोलवर रूजलेली आहे की, कोणालाच, अगदी पुरुष काय किंवा अनेक स्त्रियांसुद्धा, यात काही वावगं आहे असं वाटत नाही. यासाठी सूत्रधार काही गाजलेली हिंदी गाणी रंगमंचावर म्हणून दाखवते.
यातील एक गाणं म्हणजे ‘हंस मत पगली प्यार हो जायेगा’ हे ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या अक्षयकुमारच्या चित्रपटातील गाणं गाऊन दाखवते. नंतर सूत्रधार समजावून सांगते की, हे गाणं ऐकताना किंवा बघताना फार छान वाटतं. पण आपण हे लक्षात घेत नाही की, नायक नायिकेचे तिच्या परवानगीशिवाय मोबार्इलवर सार्वजनिक ठिकाणी फोटो काढतोय. हा गुन्हा आहे. हे नाटक सादर करणाऱ्यांची अशी धारणा आहे की, मानसिकता आपल्या समाजात खोलवर रुजली आहे. या संदर्भात अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘पिंक’ या हिंदी चित्रपटाचा उल्लेख येणं अटळ होतं. यात वकिलाच्या भूमिकेत असलेला अमिताभ बच्चन म्हणतो- ‘when a girl says no, it means NO.’ या चित्रपटांत असे अनेक अंतर्मुख करणारे व स्त्रीवादी भूमिका घेणारे संवाद आहेत.
या प्रयोगात छोट्याछोट्या प्रसंगातून सूत्रधार एक कथासूत्र बांधत आणतो. प्रत्येक प्रसंग संपला की, ते एखाद्या भरतवाक्यासारखी येतं. ते वाक्य म्हणजे ‘कन्सेंट को मारो गोली’. थोडक्यात स्त्रीची इच्छा आहे की नाही वगैरे गोष्टी बिनमहत्त्वाच्या असतात.
तासभर चालणाऱ्या ‘टच मी नॉट’च्या सादरीकरणात प्रेक्षकांचा सहभाग फार महत्त्वाचा घटक आहे. अनेक प्रसंगी सूत्रधार थेट प्रेक्षकांना प्रश्न विचारून त्यांचं मत अजमावते, तर काही प्रसंगी त्यांना हात वर करून भूमिका घ्यायला भाग पाडते. यामुळे या प्रयोगात एक वेगळीच जान येते, वेगळंच चैतन्य निर्माण होतं.
रम्या पाँडियन व डॉ. नागपाल यांनी प्रयत्नपूर्वक या प्रयोगाची उभारणी केली आहे. यात त्यांची वैचारिक भूमिका पक्की आहे. शिवाय त्यांना नाट्यकलेचं चांगलं भान आहे. त्यामुळे या सादरीकरणात नाट्यकलेचे घटक फारसे वापरले नसले तरी थोडंसं नेपथ्य आहे, थोडीशी वेशभूषा आहे, थोडं पार्श्वसंगीत आहे. परिणामी हा प्रयोग जरी एका प्रकारे प्रचारकी असला तरी प्रचारकी प्रयोग जसे कंटाळवाणे असतात तसं ‘टच मी नॉट’चं होत नाही.
हे सर्व मान्य करूनही ‘टच मी नॉट’च्या संहितेतील एकांगी मांडणी अस्वस्थ करते. यात नेहमीप्रमाणे सर्व दोष पुरुषवर्गाला दिलेला आहे. ही मांडणी २०१८ साली खटकल्याशिवाय राहत नाही. हा प्रयोग जर आपल्या देशात स्त्रीमुक्तीचं वातावरण जोरात होतं, त्या १९८० व १९९० च्या दशकांत सादर झाला असता तर अशा प्रयोगांना समाजानं जसं तेव्हा डोक्यावर घेतलं असतं.
२०१८ साली यातील एकांगी मांडणी मान्य होत नाही. याचं कारण आता स्त्रीतील वार्इट व खल बाजू मोठ्या प्रमाणात समाजासमोर येत आहे. स्त्री खलनायिका फक्त सासू-सुनांच्या मालिकांत नसते तर नोकरी/ व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा आता आढळू लागली आहे. आपल्याला हवे ते फायदे पदरी पाडून घेण्यासाठी स्वतःच्या ‘सेक्स अपील’चा हत्यारासारखा वापर करून घेणाऱ्या स्त्रिया आता सर्रास दिसतात. एवढंच नव्हे तर असं वागून जर अपेक्षित फायदे मिळाले नाहीत तर आपल्या आडवं येणाऱ्या पुरुषांविरुद्ध बलात्काराच्या खोट्या केसेस दाखल केल्या जातात किंवा तशा धमक्या दिल्या जातात. २०१३ साली आलेल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराचा कायदा आल्यापासून तर यात भरमसाठ वाढ झालेली आहे. हे आजचं वास्तव आहे, ज्याची दखल ‘टच मी नॉट’ घेत नाही.
दुसरा तितकाच महत्वाचा आक्षेप म्हणजे सत्तेच्या जागी बसलेली स्त्रीसुद्धा सत्तेचा गैरवापर करून पुरुष सहकाऱ्याचं लैंगिक शोषण करू शकते. या संदर्भात ‘टच मी नॉट’मध्ये १९९३ साली आलेल्या ‘स्लिवर’ या हॉलिवुडपटाचा उल्लेख व त्यावर टीकाटिप्पणी व्हायला हवी होती. या चित्रपटात डेमी मूरच्या हाताखाली मायकेल डग्लस नोकरी करत असतो. मूर त्याच्याजवळ सेक्सची मागणी करते. डग्लस जेव्हा नकार देतो, तेव्हा मूर त्याचा भयंकर छळ करते. हे प्रकार आता भारतातही व्हायला लागले आहेत.
‘नॅशनल क्रार्इम रिसर्च ब्युरो’ ही भारत सरकारची गुन्ह्यांची माहिती गोळा करणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या अहवालानुसार भारतात जेवढा मार पती आपल्या पत्नींकडून खातात, तेवढा पत्नी आपल्या पतीकडून खात नाहीत. पण लाजेकाजेस्तव पुरुष स्त्रीच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवत नाहीत! हे डोळ्यांत अंजन घालणारं वास्तव आहे, जे या सादरीकरणात येत नाही.
राहता राहिला मुद्दा बलात्काराचा. इथंसुद्धा लैंगिक आनंदापेक्षा सत्तेचा खेळ जास्त असतो. अजून या संदर्भातील सत्ता पुरुषांच्या हातात आहे. जसजसा सत्तेचा काटा स्त्रियांच्या बाजूनं झुकेल तसतसे पुरुषांवर बलात्कार करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ होत जार्इल.
गुरुवारी, २२ फेब्रुवारी २०१८ च्या रात्री एका वाहिनीच्या बातम्यांमध्ये कोल्हापुरमध्ये वयानं मोठया असलेल्या मुलीनं एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची बातमी दाखवली होती. हे आजचं गुंतागुंतीचं वास्तव जर ‘टच मी नॉट’मध्ये आलं असतं, तर प्रयोग आता जी उंची गाठतो त्यापेक्षा जास्त गाठता आली असती. असं असलं तरी हा प्रयोग बघितला पाहिजे. कारण इतकी ठसठशीत भूमिका घेऊन क्वचित प्रयोग सादर केले जातात.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment