अजूनकाही
'प्यार का पंचनामा' एक आणि दोन या दोन्ही चित्रपटांची शहरी आणि निमशहरी भागात, विशेषतः तरुणाईमध्ये बरीच 'क्रेझ' आहे. टाळ्या घेणारे डायलॉग्ज, अपेक्षित वळणं घेणारी कथा, वगैरे बऱ्याच सामान्य गोष्टी यात असल्या तरी हे चित्रपट बरेच चर्चेत असतात. त्यामुळे याच टीमचा नवीन चित्रपट 'सोनू के टिटू की स्वीटी'नं बऱ्याच लोकांचं लक्ष वेधून घेतलं नसतं तर नवल. आणि पहिल्याच दिवशी मिळालेलं बऱ्यापैकी चांगलं ओपनिंग, निमशहरी भागात जवळपास चाळीसेक टक्के प्रदर्शित, यातून मसाला चित्रपटाला उसळणाऱ्या गर्दीचा प्रत्यय तर येतोच, शिवाय अजूनही बॉलिवुड 'मास एंटरटेनर' या संज्ञेच्या जोरावरच चालतं आहे, हेही लक्षात येतं.
सोनू (कार्तिक आर्यन) आणि टिटू (सनी सिंह) हे दोघं एक दुसऱ्याकरिता काहीही करणारे, कुठल्याही हद्दीपर्यंत जाणारे, ब्रोमान्सचं मूर्त रूप असणारे जीवलग मित्र असतात. सुरुवातीलाच टिटूची गर्लफ्रेंड त्याच्यासाठी योग्य नाही म्हणून सोनू त्यांचं ब्रेकअप घडवून आणतो. नंतर टिटू घरच्यांच्या आणि सोनू आधी म्हणायचा त्या हिशोबानं अरेंज मॅरेजकरिता बोहल्यावर चढतो. त्याला सुंदर, सुशील, संस्कारी (आणि सुडौल) स्वीटी (नुशरत भरूचा) ही मुलगीही मिळते. सर्व काही सुरळीत सुरू असतं. मात्र सोनूच्या लक्षात येतं की, हीदेखील मुलगी त्याच्यासाठी योग्य नाही आणि केवळ पैशांकरिता, काहीतरी कपटाच्या हेतूनं याच्याशी लग्न करत आहे. मात्र टिटू आता ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतो. त्यामुळे ही परिस्थिती सुरळीत करण्याचं काम सोनूकडे येतं. त्यात तो यशस्वी होतो की नाही वगैरे पुढील गोष्टी येतात.
पण मुळात हा प्रश्नच तसा उद्भवत नाही. लव्ह रंजनचे आधीचे चित्रपट आणि सुरुवातीच्या तासाभरातील प्रवास पाहता या खेळात कोण जिंकणार हे स्पष्ट होतं. शिवाय ते कसं घडेल याची उत्सुकता असण्याचंही कारण उरत नाही. कारण एकूणच लेखकाचं आधीचं काम पाहता तो स्वीटी आणि या किंवा त्याच्या इतरही चित्रपटांतील स्त्री पात्रांचा प्रवास त्यांना 'गोल्डडिगिंग व्होअर्स' म्हणून समोर दाखवणार आणि पुरुष विरुद्ध स्त्री असा माहौल तयार करणार हेही स्पष्ट आहे.
बरं यालाही आक्षेप नाही. कारण असे कॉन्फ्लिक्ट्स आपण याआधीही पाहिलेले आहेतच. मात्र असं असायला किमान मूळ घटना किंवा पात्रं या गोष्टीला, या (तथाकथित) संघर्षाला न्याय देणारी असायला हवीत. तुम्ही जर एखाद्या ताणलेल्या आणि सुमार कथेला स्त्री विरुद्ध पुरुष असं रूप देत असाल तर त्यामागे किमान तर्क, मानस वगैरे असावं इतका साधा संकेत असतो.
मुळातच चित्रपट मेट्रो सिटीतील, 'दिल्ली बॉईज'च्या हिशोबानं लिहिला असल्यानं आणि हे संकेत (जनरलायझेशन करण्याचा प्रयत्न टाळूनही) त्यांच्याकरिता 'किस झाड की पत्ती' असल्यानं फाट्यावर मारले जातात. आई किंवा आजी वगैरे वगळण्यालायक अपवाद आहेत म्हणून ते सोडता इतर एकूणच सर्व स्त्रिया या भोगवस्तू म्हणून समोर उभ्या केल्या जातात.
बहुतांशी संवाद आणि एकूण कथानकदेखील टाळ्याखाऊ आणि पुरुषवर्गाला खुश करणारं आहे. एकुणातच पुरुषी मानसिकतेच्या रूपातूनच बहुतेक सगळं काही दिसत राहतं. मध्यवर्ती स्त्री पात्रं एकतर खलनायकी स्वरूपाची आहेत किंवा शोभेच्या बाहुल्या म्हणून वापरली आहेत. शिवाय चित्रपटात नको त्या ठिकाणी येणाऱ्या तीनेक पार्टी साँग्जमधूनही स्त्रिया एक 'सेक्स ऑब्जेक्ट' म्हणून उभ्या केल्या जातात. अर्थात हा आक्षेप किंवा टिप्पणी कपडे किंवा वृत्ती याबाबत नसून पात्र सादरीकरणाबाबत आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383
.............................................................................................................................................
लव्ह रंजनचं दिग्दर्शन वगैरे एकदम टापटीप म्हणता येईल असं आहे. त्याची जी काही (भलेही ते खटकणारं का असेना) दिग्दर्शकीय दृष्टी आहे, तिच्या वापरानं तो त्याला हवी तशी दृश्यं कथेच्या रूपात समोर मांडतो. प्रत्येक कलाकार त्या व्यक्तिरेखेला (!) साजेसं काम नक्कीच करतो.
मात्र संगीत - पार्श्वसंगीत अनेकदा क्लिशे आणि नको तितकं लाउड वाटतं. जवळपास सर्व गाणी पार्टी साँग्ज आणि पंजाबी लहेजाची आहेत. ती ठिकठाक वाटतात. सुडौल आणि समाजानं सौंदर्यवती म्हणून मान्यता दिलेल्या, सडपातळ बांधा असणाऱ्या, झीरो फिगर अबाधित ठेवणाऱ्या आणि इतर सामान्य लोकांना कॉम्प्लेक्स देणाऱ्या नायिका असलेली (!) गाणी आणि त्यातील पुरुषी नजरांना 'नयनरम्य' भासणारी दृश्यं यांच्या रूपात गाणी समोर येतात. 'तेरा यार हूँ मैं' या गाण्यात या गोष्टींचा बऱ्यापैकी अभाव असल्यानं ते जरा बरं भासतं, इतकंच. बाकी संगीतकाराला 'ट्रम्पेट' या वाद्याचा नव्यानं शोध लागला की काय अशी शंका येण्याइतपत त्या माध्यमातून तयार केलेल्या ट्यून्स लाउड पद्धतीनं वाजत राहतात.
एकुणात हा चित्रपट कसा आहे असा प्रश्न जर मला विचारला तर - 'खलनायकी प्रवृत्तीची, एकांगी आणि हिचा विरोध म्हणजे पुरुषार्थाच्या विजयाचा सोहळा वाटावा अशी मध्यवर्ती भूमिकेतील स्त्री पडद्यावर आल्यावर 'नायक नहीं खलनायक हूँ मैं' हे संजूबाबाचं गाणं आठवतं!
चित्रपट मनोरंजनासाठी असतो, असं तुमचं मत असल्यास दोन घटका तुमचं मनोरंजन नक्कीच करेल. मात्र त्याहून जास्त काही मिळेल किंवा मिळावं अशी अपेक्षा तुम्ही ठेवत असाल तर पुरुषी अहंकाराला सुखावणारी अनेक दृश्यं आणि शेवट सोडता हाती काहीच लागणार नाही.
आणि हो, समोर उद्देशहीन पण गोल्डडिगर म्हणवल्या गेलेल्या स्त्रीचं आणि एकूणच समस्त स्त्रियांची खिल्ली उडवली जात असताना लोक खुश होऊन टाळ्या आणि शिट्या वाजवताना ऐकू येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ‘वो उनका मजाक बनाकर रखते गए और हम तालियाँ बजाते रह गए’ अशी अवस्था होते!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment