अजूनकाही
तुम्ही कधी बॅंकेचं कर्ज काढलंय? पाच हजार, पन्नास हजार किंवा पाच लाख? मग कर्जाचा एक हप्ता चुकला की, बॅंक कशी बेजार करते हे तुम्हाला ठाऊक असणारच. कर्जाच्या तणावानं हैराण झालेले शेकडो लोक आपल्या अवतीभवती सापडू शकतात. बॅंक अधिकारी त्यांना कोणतीही दयामाया दाखवत नाहीत.
या पार्श्वभूमीवर निरव मोदीसारखा, डिझायनर दागिने तयार करणारा हिरे व्यापारी पंजाब नॅशनल बॅंकेला ११,५०० कोटी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर सहजी पळून जातो, हे पटतं तुम्हाला? सरकारी यंत्रणा कशी चालते याचं ज्ञान असलेला कुणीही माणूस यावर विश्वास ठेऊ शकत नाही. वरपासून खालपर्यंत सगळे सामिल असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा घडू शकत नाही, हे शेंबडं पोरही सांगू शकेल. या प्रकरणी सीबीआयनं २१ जणांना अटक केली आहे. यात बॅंकेच्या कनिष्ठ अधिकाऱ्यापासून मुकेश/ अनिल अंबानीच्या चुलत भावाचा, विपुलचाही समावेश आहे. हा विपुल, निरव मोदीच्या कंपनीत उच्चपदस्थ आहे. त्याला या घोटाळ्याची माहिती होती, तो आणि या कंपनीतले इतर वरिष्ठ त्यात सहभागी होते, असं सीबीआयचं म्हणणं आहे.
गंमत ही की, या प्रकरणातले मुख्य आरोपी मात्र आता देशाबाहेर पळून गेलेत! निरव आणि त्याचा भाऊ निशल मोदी १ जानेवारीला, तर त्याचा मामा मेहुल चोक्सी ४ जानेवारीला आणि पत्नी ६ जानेवारीला विजय मल्ल्याचा आदर्श ठेवून देश सोडला. जणू काही मोदी सरकारला आणि त्यांच्या यंत्रणांना याची काही कल्पना नव्हती! याच निरव मोदीनी २३ जानेवारीला डावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, इतर उद्योगपती आणि पंतप्रधानांसोबत फोटोही काढून घेतला. निरव मोदी या फोटोत ऐनवेळी घुसले असा खुलासा आता सरकारी यंत्रणा करत आहे. पण त्यावर कोण विश्वास ठेवणार? पंतप्रधानांभोवतीची सुरक्षा भेदून अशी घुसखोरी करणं शक्य तरी आहे काय? अरुण जेटलींच्या उद्योगपतींच्या यादीतच या छोट्या मोदींचं नाव होतं हे मान्य करण्यावाचून सरकारला गत्यंतर नाही. शिवाय, हे निरव मोदी आणि मामा मेहुल चोक्सी पंतप्रधानांचे गुजरातपासूनच निकटवर्तीय आहेत, हे सुद्धा सरकारला नाकारता येणार नाही, कारण याचे फोटोसकट सर्व पुरावे उपलब्ध आहेत.
महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, सध्याच्या सत्तेच्या जवळ असल्यानं या निरव मोदी आणि टोळीला वाचवलं जातंय का? या प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल केला डावोस परिषदेनंतर, म्हणजे २९ जानेवारीला. पंजाब नॅशनल बॅंकेनं तक्रार केली निरव मोदी सुखरूपपणे देशाबाहेर पडल्यावर. या घटना इतक्या बोलक्या आहेत की, हे सगळं संगनमतानं घडतंय की काय अशी शंका यावी! हा घोटाळा उघडकीला आल्यापासून आजवर, म्हणजे गेल्या ८ दिवसांत, ५१०० कोटी रुपयांचे दागिने आणि मालमत्ता निरव मोदीच्या घरातून जप्त केल्याचा दावा सीबीआयनं केला आहे. यावर जाणकार विश्वास ठेवायला तयार नाहीत.कारण निरवकडे एवढी संपत्ती असेल तर त्याला बॅंकेला फसवण्याची आणि देशाबाहेर पळण्याची काय गरज होती? तेव्हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी हा तपासाचा फार्स तर नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे.
या घोटाळ्याची कल्पना मोठ्या मोदींना अजिबात नव्हती या दाव्यातही तथ्य नाही. बंगलोरचे एक व्यापारी हरिदास यांची मेहुल चोक्सीशी केलेल्या व्यवहारात मोठी फसवणूक झाली होती. त्यांनी बॅंकांपासून सीबीआयपर्यंत विविध यंत्रणांकडे तक्रारी केल्या. पण दाद न लागल्यानं २०१६ मध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे धाव घेतली. पंतप्रधान कार्यालयानं ही तक्रार कंपनी व्यवहार खात्याकडे पाठवली. तिथं कोणतीही चौकशी न करता फाईल बंद करण्यात आली. असं का झालं याचा खुलासा आजवर झालेला नाही. मेहुल चोक्सी हे नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असल्यानं ही दडपादडपी झाल्याचा आरोप होतोय. पंतप्रधानांनी याचा जाहीर खुलासा करायला हवा किंवा ‘मन की बात’ तरी. अन्यथा हे संशयाचे ढग दूर होणार नाहीत.
निरव मोदीच्या या घोटाळ्यानंतर भाजपमध्ये घबराट पसरल्याचं वृत्त ‘द टेलिग्राफ’नं दिलं आहे. यात आश्चर्य काही नाही. ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ अशी गर्जना करत मोदी सत्तेत आले. ‘मी भ्रष्टाचाराविरुद्ध चौकीदाराचं काम करेन’ असं आश्वासन त्यांनी आपली छप्पन्न इंचाची छाती ठोकत दिलं होतं. आता छोट्या मोदींनी या सगळ्यावर चक्क बोळा फिरवला आहे. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार नाही या प्रतिमेलाही तडा गेलाय. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे घडत असल्यानं भाजप हादरून जाणं स्वाभाविक आहे. आपल्या एकमेव तारणहार नेत्याला या निरव घोटाळ्यानं अडचणीत आणल्याची ही भावना आहे.
म्हणूनच कदाचित, गोंधळलेल्या या पक्षानं, ज्यांचा या घोटाळ्याशी काही एक संबंध नाही अशा, रवीशंकर प्रसाद आणि निर्मला सीतारामन या मंत्र्यांना बचावासाठी पाठवलं. त्यांनी हा घोटाळा युपीएच्या काळातला असल्याचा आरोप केला. पण निरव मोदीच्या बहुसंख्य एलओयू २०१७ च्या आहेत असं सांगून सीबीआयनंच या आरोपातली हवा काढली. या घोटाळ्याची प्रक्रिया २०११ ला सुरू झाली असली तरी मोदी सरकारच्या काळात तो तिपटीनं वाढला, असं पंजाब नॅशनल बॅंकेच्या माजी अध्यक्षांनी जाहीर केलं आहे. याचा खुलासा खरं तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी करायला हवा होता, पण पहिले चार दिवस तर ते दडून बसले आणि मोठे मोदी आजही बाहेर आलेले नाहीत!
निरव मोदी आणि टोळीचं काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल. जे विजय मल्ल्याला परत आणू शकत नाहीत, ते या नव्या गॅंगला आणतील याची कुणालाही खात्री नाही. पण प्रश्न तेवढ्यापुरता मर्यादित नाही. मोदी सरकारच्या काळात घडणाऱ्या भ्रष्टाचाराचा हा प्रातिनिधीक नमुना आहे काय, हे तपासण्याची गरज आहे. बडे उद्योगपती जेव्हा एखाद्या बड्या नेत्याभोवती गोळा होतात, तेव्हा त्यांचा उद्देश काही अध्यात्मप्राप्तीचा नसतो. हा परस्परपूरक धंदा आहे. राजकारणी उद्योगपतींचा फायदा करून देतो आणि त्या बदल्यात उद्योगपती राजकारण्यांना हवं ते देतो. ही पूर्वापार चालत आलेली भ्रष्ट पद्धत आहे. पूर्वी युपीएच्या मंत्र्यांच्या भोवती घोटाळणारे हे धनदांडगे आता मोदींभोवती जमा झाले आहेत. अंबानी, अडानीपासून निरव मोदीपर्यंत किती नावं घेता येतील! हेच धनदांडगे सत्ताधाऱ्यांना देणग्याही देत असतात. आधुनिक काळातलं भ्रष्टाचाराचं हे नवं रूप आहे का, हा प्रश्न जनतेच्या मनांत आहे. बड्या लोकांचा बडा भ्रष्टाचार. छोट्या मोठ्या थैल्यांची आता गरजच नाही. या छोट्या मोदींनी भाजपला मोठ्या देणग्या दिल्याचा आरोप भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं केला आहे. त्याचा कोणताही खुलासा भाजपनं केलेला नाही.
चौकीदाराला या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. निरव मोदीच्या पाठोपाठ राफेलचं भूत लपलेलं आहे. नाहीतर, वेताळाच्या गोष्टीप्रमाणे ही भूतं चौकीदाराचा ताबा घेतील!
............................................................................................................................................
लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.
nikhil.wagle23@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Mukunda Mali
Tue , 21 August 2018
आपल्या मतासि सहमत वागळे साहैब...कूना बङ्या व्यक्तीच्या वरदहस्त या छोट्या मोदिवर आहै..यात मोदि है नाव आल्याने BJP ला घाम फूटलाय है बाकी खर...!