हलीमाबी कुरेशी हे सध्या मराठी टीव्ही माध्यमांमध्ये ठळकपणे दिसणारं मुस्लिम नाव. कुरेशी समाज म्हणजे खाटीक. या समाजातून शिक्षण घेत ती स्वबळावर पुढे आली आणि आता आपल्या मुळाशी असणाऱ्या अंधाराला प्रकाशित करण्याचं काम करत आहे. हलीमानं या माध्यमात प्रवेश केल्यापासूनच समाजात सलोखा, संतांची शिकवण पुढे नेण्यासाठी आपली मुस्लिम आयटेंटीटी वापरू दिली आणि त्याच वेळी कुणी तिच्याकडे निव्वळ ‘मुस्लिम’ म्हणून पाहत असेल तर त्याही गोष्टीला तिनं तितक्याच ताकदीनं झिडकारलंय, हे मी जवळून अनुभवलं आहे.
‘आयबीन लोकमत’ या वृत्तवाहिनीवर आपल्या सुरुवातीच्या काळातले पत्रकारितेचे धडे गिरवतच, हलीमानं उत्कृष्ठ पत्रकारितेचा एक लाख रुपयांचा रामनाथ गोयंका पुरस्कार पटकावला आहे. मी तिला भेटत होते, त्यात तिची खासीयत तिनं हा पुरस्कार मिळवला इतकाच नव्हता, तर तिनं तो ज्या डॉक्युमेंटरीसाठी मिळवला त्यात होती. भाजप सरकारनं बंदी घातलेल्या गोवंश बंदीच्या पडसादाविषयी हलीमानं एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली. खाटिक समाजावर या निर्णयाचा झालेला थेट परिणाम मांडत तिनं त्या ‘अनकही’ला व्यासपीठ दिलं. अल्पमतात जगणाऱ्यांसमोर किती काही भयंकर उभं करून ठेवलंय हे सांगणारी ती फिल्म होती. या फिल्मसाठीच तिला हा पुरस्कार मिळाला आहे. भाजप सरकारच्या काळात गोवंशहत्या बंदीविरुद्ध फिल्म बनवणं आणि गुजरात दंगलीचा मोठा ठपका ज्यांच्यावर सर्वाधिक राहिला अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारणं, यात तिचं खरं वेगळेपण दडलेलं आहे.
हलीमाचं मूळ गाव गंगाखेड तालुक्यातलं राणी सावरगाव. तिचा जन्मही तिथलाच. पुढं तिचं कुटुंब पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात केडगाव चौफुल्याला स्थायिक झालं. वडील अब्दूल कुरेशी ट्रक ड्रायव्हर होते. घरात तिच्यासह पाच बहिणी, दोन भाऊ. मोठा कुटुंब कबिला आणि कमावणारे हात फक्त दोनच. पण तिच्या वडिलांनी कायमच घरात शिक्षणाची गंगा वाहती ठेवली.
वडिलांच्या या भूमिकेविषयी हलीमा सांगते, “वडील ट्रक ड्रायव्हर होते. त्यानिमित्तानं ते भारतभर फिरले. त्यांनी जिथं तिथं पाहिलं की, मुलींना शिक्षण देणं किती महत्त्वाचं आहे. स्वत:च्या पारावर उभं राहणं किती महत्त्वाचं आहे. आम्ही मुली म्हणून आधीच आई-वडिलांना खूप हिणवलं जायचं. त्यातच आम्ही शिकतोय म्हणूनही लोकांना खूपायचं. मुली पळून जातील अशीही भीती दाखवली जायची. पण वडिलांनी कधीच आमच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. मी माझ्या घरात तिसऱ्या क्रमांकाची. अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार. त्यामुळे तर वडिलांनी मोठी ‘ऑफिसर हो’ म्हणून स्वप्न पाहिलं आणि मलाही दाखवलं. माझ्या कुटुंबातील मी पहिली दहावी, पहिली बारावी, पहिली ग्रॅज्युएट, पहिली पोस्ट ग्रॅज्युएट मुलगी आहे. इतकं काय पण आमच्या खानदानात, माझ्याआधी कोणता मुलगाही शिकलेला नाहीये.”
वडिलांच्या या पाठिंब्यामुळेच हलीमा बारावीनंतर आपलं गाव सोडून बाहेर पडली. अनेकदा शिक्षणाची सोय जवळपास नसल्यानं मुस्लिमच काय पण एकूणच समाजातल्या मुलींची शिक्षणाची दारं बंद होतात. हलीमाला मात्र तिच्या वडिलांनी बारामतीला पाठवलं. बॉटनी विषयातून ती बी. एसस्सी. झाली. बारामतीच्या या कॅम्पसमध्ये तिच्या उपजत गुणांना अधिक पैलू पडले. शाळेपासूनच हलीमा वकृत्वस्पर्धेत, विविध स्टेज समारंभात पुढे राहिली. इथंही तिनं तोच कित्ता गिरवला. त्यामुळे अल्पावधीत ती कॉलेजच्या विविध उपक्रमांमध्ये दिसू लागली. कॉलेजमध्ये एनसीसीचा उपक्रम असूनही तो बंदच होता. शेवटी हलीमानंच पुढाकार घेऊन संबंधित शिक्षकांना सांगितलं की, आपण तो उपक्रम सुरू करूयात का? त्यावर तिच्या शिक्षकांनी मुलींना जमवण्याचं टास्क तिला दिलं. कशाबशा सात-आठ जणी तयार झाल्या आणि यानिमित्तानं कॉलेजमध्ये हा उपक्रम पुन्हा सुरू झाला. प्रजासत्ताकदिनी, राजपथावर परेड करण्याची संधी तिला मिळाली. राजपथावर आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व करणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली.
या परेडच्याआधी मुंबईला १५ दिवसांचं प्रशिक्षण शिबीर होतं. दिवसभर अतिशय शिस्तीत कवायती, परेड व्हायच्या. रात्री झोपताना, पाय जाम दुखायचे. असंच एकदा कवायती उरकल्यावर तिला तिच्या अम्मीचा फोन आला. त्यावेळेस ती भयंकर शिस्तीविषयी आणि थकवणाऱ्या व्यायामाविषयी कुरकुरत होती. अम्मी मायेनं तिची सांत्वना करत होती, वडिलांना संभाषणाचा सूर लक्षात आला. त्यांनी लगेच आईकडून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाले, “पाय तुटले तरी चालतील, पण ज्या कामासाठी गेलीस ते फत्ते करून यायचं.” झालं, निर्वाणीचा सूर ऐकल्यावर तक्रारीला जागा कुठे होती! मग हलीमानंही अत्यंत मन लावून या परेडमध्ये सहभाग घेतला. वडील अशा छोट्या छोट्या गोष्टींतून जगण्याचे धडे देत होते.
एकदा वडिलांच्या मित्राच्या छानशा कारमधून प्रवास करत पुण्याला पोहचताना कार बंद पडली. मग एका साध्याशा जीपमधून जावं लागणार होतं. त्यावेळी नुकतीच अकरावीला प्रवेश घेतलेली हलीमा वैतागली. तेव्हा तिचे वडील तिला म्हणाले, ‘वक्त कब बदलेगा पता नहीं. हर हालात को अपना बनाना आना चाहिए और उससे लढना.’ हलीमा सांगते, “वडील हे असं कृतीतूनच सांगायचे. ते संस्कार कळत-नकळत मनावर रुजले. त्यातूनच कितीही संकटं आली तरी पाय जमिनीवर ठेवण्याची शक्ती मिळाली.”
वडिलांची ही शिकवण जगण्याची वेळ तिच्यावर लवकरच आली. हलीमाचा शिक्षणाचा प्रवास एकीकडे सुरू असतानाच, घरी मात्र आर्थिक परिस्थिती अधिकाधिक खालवायला लागली. वडिलांनी कर्ज व पैशांची जुळवाजुळव करून घेतलेली वीटभट्टी बिनकामाची निघाली. तोपर्यंत जमा केलेली पुंजी त्या वीटभट्टीत गुंतवली होती, पण त्यातून नफा तर सोडा निव्वळ मुद्दलही मिळणार नाही हे लवकरच ध्यानात आलं. हाताशी असलेला एक ट्रकही विकावा लागला. घरात खाणारी तोंड, त्यांचं शिक्षण पाहता तिच्या वडिलांना साहजिकच ताण जाणवू लागला आणि त्यातच त्यांना किडनीचा गंभीर आजार उदभवला.
हलीमा त्या वेळी पुणे विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयातून एम. एसस्सी करत होती. वाचनाची पहिल्यापासून आवड असल्यानं तिचं भाषेविषयीचं प्रेम आणि समजही चांगली होती. आपली ही समज अधिक वाढावी म्हणून तिनं पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागातून जर्नालिझमच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला होता. तिथं प्रवेश मिळाल्यावर अब्बांनी तिला एक प्रश्न विचारला होता, ‘बाई पत्रकाराला पगार असतो का ग?’
त्यावेळी परिस्थिती अशी होती की, वडील कुठल्याही प्रकारे काम करू शकत नव्हते. त्यामुळे हलीमानं नोकरी करणं भाग होतं. तिचा सर्वांत लहानगा भाऊ तेव्हा दहावीत होता. घरातली परिस्थिती पाहून त्यानं शिक्षण सोडलं आणि दुसऱ्याच्या ट्रकवर किलनर बनून जाऊ लागला. त्यातून कसंबसं घर भागत असलं तरीही वडिलांच्या औषधांची सोय, लहान बहिणींची शिक्षणं या गोष्टीसाठी कुणीतरी ठोस नोकरी करणं अत्यंत आवश्यक होतं. हलीमाच्या बोलक्या स्वभावामुळे आणि एका कार्यक्रमातील तिचं वकृत्त्व कौशल्य पाहून तिला ‘आयबीएन लोकमत’चे तत्कालिन संपादक निखिल वागळे यांनी प्रशिक्षणार्थी नोकरीसाठी विचारणा केली.
खरं तर त्याचवेळेस ती स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत होती. दिवसातले पंधरा-सोळा तास तिनं स्वत:ला अभ्यासाभोवती बांधून घेतलं होतं. तिला ‘यशदा’कडून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. हलीमापुढे त्यावेळेस दोन पर्याय होते. आयबीएन लोकमतची नोकरी स्वीकारणं आणि यशदाची शिष्यवृत्ती घेऊन दिल्लीला जाणं. परिस्थितीची लक्षात घेत तिनं नोकरीचा पर्याय स्वीकारला. मोठ्या दोन बहिणींची लग्न झाली होती. पण आता घरची परिस्थिती बदललेली होती. घरची कर्ती- मोठी अशी हलीमाच होती. तिच्या लहानग्या बहिणीही शिकत होत्या. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, गावाकडच्या घरचा खर्च आणि स्वत:चा खर्च अशा तिहेरी खर्चाची ओढाताण करत हलीमा एकेका स्टोरीनं लोकांपुढे येत होती. त्याच सुमारास वडिलांचा आजार बळावला. एका मोठ्या ऑपरेशनची गरज होती, मात्र तेवढी रक्कम जमवणं तिला अशक्य होतं. केवळ डायलिसीसची सुविधा देणं इतकंच तिच्या हातात होतं. त्यासाठी तिनं भरपूर धावपळ केली. तो संपूर्ण काळ तिच्यासाठी खूप त्रासाचा होता. मात्र खूप प्रयत्न करूनही वडील वाचले नाहीत.
हलीमा सांगते, “मी कुरेशी समाजातली. आमचा परंपरागत व्यवसाय खाटकाचा. माझे मोठे मामा, ख्वाजा हुसैन कुरेशी याच धंद्यात आहेत. वडील गेले, त्यावेळी मी बराच काळ गावी सावरगावलाच होते. माझे नातेवाईक, मोहल्ला अस्वस्थ होता. शासन गोवंशहत्याबंदी कायदा करणार असल्याचं कळताच भाऊबंदकी सुन्न झालेली. कायदा झाला तसा हातातला रोजगार जाऊन भिकेला लागायची वेळ त्यांच्यावर आली. तशी १९७६ पासून गोहत्याबंदी होतीच. पण आता गोवंशहत्याबंदीही झाली. मामांशी बोलले. गावातल्या या धंद्यावर अवलंबून असलेल्या इतरही लोकांचं म्हणणं ऐकलं. ते जे सांगत होते, त्यातून मनात चर्रर्र होत होतं. कारण केवळ मुस्लिमच नाही, भटके-विमुक्त, दलित, ढोर-चांभार असा एकूण आर्थिक निम्न वर्गच यात होरपळत होता. पण त्या लोकांना हे सगळं मांडायचं कुठं हे कळत नव्हतं. त्याहीपेक्षा आपलं ऐकणार कोण? असा प्रश्न पडला होता. मी माझे वरिष्ठ अद्वैत मेहता सरांशी बोलले. त्यांच्यासोबतच कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांनी मला ही कल्पना घेऊन पुढं जायला सांगितलं. मग मी मामासोबत थेट बैलबाजारात गेले.... तिथल्या अरुंद गल्ल्या, कळकटपणा आणि सगळीकडं भरून राहिलेला तीव्र वास अनुभवला. पुण्यातल्या ढोर गल्लीतही गेले.”
हलीमानं या डॉक्युमेंटरीत आजवर कुणीच न ऐकलेल्या गोष्टींना दृश्य स्वरूप दिलं. हलीमा सांगते, “हा विषय अभ्यासाला घेतला तेव्हा बरंच काहीकाही हाती येत होतं. वेगवेगळे प्रश्न, एकमेकांत गुंतून; ते तसेच मांडण्याचा मी प्रयत्न केला. ढोल-तबल्याची वादी बैलाच्या कातडीपासून बनते. कोल्हापुरी चप्पलही याच कातडीची बनते. या व्यावसायिकांच्या समोरचे प्रश्न अवघड होते. सोबतच इथले शेतकरीही त्रस्त होते. कितीही म्हातारा बैल असला तरी त्याचे ३५-४० हजार मिळायचे. आता काय, याचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं. गोशाळांनाही भेट दिली. देशी गायी आता उरलेल्याच नाहीत अशी कबुली मला तिथल्या गोशाळा चालवणाऱ्या माणसानंच दिली. हा सगळा फक्त मुस्लीमांचा प्रश्न नाही. हिंदूही यात होरपळलेत ते दाखवणंही तितकचं महत्त्वाचं वाटत होतं. मी भीमपुऱ्यातही गेले. दलित-मुस्लीम खाटिकांची वस्ती तिथं आहे. हे सगळे रोज कष्ट करून दोन वेळचं मिळवणारे लोक आहेत. हे लोक इथल्याच अर्थसंस्कृतीचा एक भाग नाहीत का? हे प्रश्न या स्टोरीतून ठळकपणे लोकांसमोर नेता आले. आमचे कॅमेरामन गणेश कदम सगळ्या ठिकाणी माझ्यासोबत हिंडले. खरं तर मी हे खूप काही केलं नाही, एक छोटासाच भाग आहे. पण तिथलेच लोक सांगू लागले की, आता आमचे प्रश्न माध्यमातून येत आहेत. केवळ जनावरं पकडली जातात, यापलिकडे त्यांच्या खऱ्याखुऱ्या बातम्या येऊ लागल्यात असं ते सांगू लागले आहेत.” यावेळी तिनं तिच्या मनातील एक खंत बोलून दाखवली, हलीमा कुरेशीच ही स्टोरी का करते? या समाजाची कोंडी फोडायला त्यांच्यातच जन्मलेली कुणी का लागते? असो, हे करू शकले. त्यामुळं माझ्या समाजाचा माध्यमांवरचा उडू पाहणारा विश्वास पकडून ठेवायला थोडा हातभार नक्की लावू शकले.”
या स्टोरीत तिनं या प्रश्नांचा केवळ सामाजिक-आर्थिक पैलूच समोर आणला. तिच्या १८ मिनिटांच्या या स्टोरीला पत्रकारितेच्या वर्तुळात प्रतिष्ठेचा मानला जाणारा रामनाथ गोयंका पुरस्कार मिळाला. तत्कालीन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिनं हा पुरस्कार स्वीकारला. मोदींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यावरूनही काहींनी तिला असं करणं चूक होतं. ज्या गुजरात हत्याकांडात मोदींचा हात असल्याचे बोललं जातं, त्यांच्याकडून पुरस्कार स्वीकारायला नको होतं. यावरही हलीमा स्पष्ट म्हणते, “मी संविधान मानते आणि त्याअर्थी पतंप्रधान हे पद देशाचं महत्त्वाचं पद आहे. अशा वेळी मी नरेंद्र मोदी या व्यक्तीकडून नव्हे तर माझ्या देशाच्या पंतप्रधानांकडून पुरस्कार स्वीकारत होते ही गोष्ट लक्षात का घेतली जात नाही, हे कळत नाही. उलट याकडे मी वेगळ्या नजरेनं पाहते. गोवंशहत्याबंदी विरुद्धच्या स्टोरीला नरेंद्र मोदींकडून पुरस्कार’ असं का नाही पाहिलं जातं. एकेकाळी मुस्लिम विरोधी म्हणून ज्यांचं चित्रण केलं गेलं, त्यांच्यासाठी हा खूप काही सांगणारा क्षण असणार आणि माझ्यासाठी आपण काहीतरी करू शकतो याची जाण देणारा, असंच मला तरी वाटतं.”
हलीमानं या आधी पुणे ते पंढरपूर ही वारी कव्हर केली. अर्थात रिपोर्टिंग हा तिच्या कामाचाच भाग. पण तिनं रिपोर्टिंग केल्यानं याकडे अनेकांनी विस्मयचकित पाहिलं. याबाबतीत तिचं कौतुक झालं, तर काहींनी मुस्लिम मुलीनं पंढरीच्या वारीसाठी नववार नेसणं, कुंकू लावणं याविषयी उलटसुलट चर्चाही केली. हलीमा मात्र याविषयी म्हणते, “मी तर काम करत होते, पण लोकांनी त्याला विशिष्ट धर्माच्या नजरेतून पाहण्यास सुरुवात केली. मग मीही आपल्या नावाचा उपयोग करायचं ठरवलं. हलीमा पंढरीची वारी करते यातून अप्रत्यक्षरीत्या संतांनी सांगितलेलाच सलोख्याचा संदेश द्यायला सुरुवात केली. यात दोन्हीकडच्या धर्मवेड्यांना त्रास होणं साहजिक होतं. पण त्याहीपेक्षा सर्वसामान्यांसाठी आपण एक चांगली पायवाट करू शकतोय, हे जास्त मोलाचं वाटत होतं. सर्वसामान्यांनी त्याकडे अतिशय सकारात्मकतेनं पाहिलं.”
पंढरीची वारी असेल की कोणा स्त्रीवरच्या अन्यायाची कहाणी हलीमा त्याच तडफेनं स्टोरीसाठी उतरते. आपल्या हातात एक माध्यम आहे, ज्यातून काहीतरी चांगलं पेरण्याची, कुणीतरी दखल घेण्याची शक्यता आहे हे ओळखून हलीमा आपल्या संवेदनशील मनानं आणि कणखर बाण्यानं बातमीदारी करत आहे. इतकंच नव्हे तर, मुस्लीम तरुण माध्यमांमध्ये येतील तेव्हा हे मुस्लिमांविषयी असणारे गैरसमज बरेच बदलतील असंही तिला वाटतं.
हलीमानं नुकताच प्रेमविवाह लग्न केला. तिच्या जोडीदाराचं नाव दानिश अहमद शेख. तो स्त्रीमुक्ती- हुंडाविरोधी चळवळीत काम करतो. तो मुस्लीम समाजात ‘चार-शरबत पे शादी’ उपक्रम यशस्वीपणे राबवतोय. या दोघांचं लग्नही अगदी साध्या पद्धतीनं, काहीच न देता-घेता झालं. सध्या दानिश आणि हलीमा दोघं मिळून समतेचं सहजीवन कृतीत उतरवताहेत. हलीमा आपल्यासोबतच आपल्या बहिणींनाही आयुष्याची घडी बसवण्यास मदत करत आहे. ही मदत आर्थिक, मानसिक सर्वच स्तरावरची आहे. तिच्याहून लहान इराफाना कॉमर्समध्ये मास्टर्स झालीय आणि वडिलांचं शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे. यास्मिन पोलिस खात्यात आहे.
गोयंका पुरस्कारानं कुरेशी समाजालाही माहीत झालेल्या हलीमाचा नुकताच त्यांच्या कुरेशी समाजाकडूनही गौरव करण्यात आला. त्याविषयी हलीमा म्हणते, “गोयंका पुरस्कारानं मी जितकी आनंदित झाले नाही, त्याच्या कैकपटीनं मी या पुरस्कारानं आनंदित झाले. यावेळी मी माझ्यासोबत माझ्या बहिणींनाही घेतलं होतं. यास्मिन पोलिसांच्या वेशातच होती. ज्या लोकांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्त्वं ओळखलं नाही त्यांच्यापुढे आम्ही उदाहरणं म्हणून समोर उभे होतो. मुलींच्या मोकळ्या जगण्याविषयी, त्यांच्या इच्छा-आकांक्षाविषयी आणि त्यांनाही स्वप्नं पाहू देण्याविषयी मी कुठल्याही स्टोरीतून सांगू शकणार नव्हते, ते आम्हा बहिणींच्या केवळ उपस्थितीनं शक्य होतं. मुलींच्या शिक्षणाबाबत खोडा करणारी हीच मंडळी, ज्यांतील काहींनी आमच्यावरही संशय व्यक्त केला होता. तेच लोक आता त्यांच्या मुलींसाठी आम्ही काहीतरी पायवाट दाखवू अशी आशा ठेवत होते. हे खूपच समाधान देणारं होतं. त्यामुळेच हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा वाटला. आणि त्याच वेळी या दोन्ही पुरस्कारांनी आपण अधिक सक्षम काम करण्याची जबाबदारीही टाकली आहे. त्यासाठी आता अधिक मेहनत करणार आहे.”
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383
.............................................................................................................................................
लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.
greenheena@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment