काँग्रेसचं जहाज भरकटायला नको...
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Sat , 17 February 2018
  • पड़घम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi पंडित नेहरू Pandit Naheru इंदिरा गांधी Indira Gandhi सोनिया गांधी Soniya Gandhi राहुल गांधी Rahul Gandhi

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी संसदेत आणि राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात करावयाच्या भाषणात सरकारच्या कामाची भविष्यातील दिशा काय राहील, सरकारच्या काही धोरणात्मक बाबींचा उहापोह, काही संभाव्य समाजहितैषी योजना यावर भर देणं अपेक्षित असतं. तशी भारतीय संसदीय लोकशाहीची परंपराही आहे. अशा भाषणात विरोधकांना एखाद-दुसरा टोला लगावला जातो आणि तो क्षम्यही असतो. कारण या चर्चेत भाग घेताना विरोधकांनीही सरकारवर बऱ्यापैकी टोलेबाजी केलेली असते. केंद्र सरकारचा २०१८-१९चा अर्थसंकल्प सादर होण्याआधी प्रथेप्रमाणं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेला संबोधित केलं. त्यांचं संसदेला संबोधित करणारं हे पहिलंच अभिभाषण होतं. त्यावर जी काही थोडीफार चर्चा झाली (आजकाल संसद असो की, विधिमंडळ कोणत्याच सभागृहात कोणत्याच विषयावर गंभीर चर्चा होतच नाही म्हणा. होतो तो गोंधळ, पण त्यालाच कामकाज म्हटलं जातं! सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाला धूप घालायची नाही आणि विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या सर्वच बाबींना विरोध करायचा हीच सर्वपक्षीय पद्धत अलिखित सर्वसंमतीनं अलिकडच्या काळात रूढ झालीये!)

त्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडाखेबंद भाषण केलं आणि काँग्रेस तसंच नेहरू-गांधी घराण्यावर सणसणीत टीकास्त्र सोडलं. असंच टीकास्त्र आणीबाणीच्या काळात तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांवर सोडलं होतं. त्याचं केवळ स्मरण करून देणारंच नाही, तर त्यापुढे एक पाऊल टाकणारं चर्चेला उत्तरादाखल केलेलं संसदेतलं मोदी यांचं हे भाषण होतं.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसच्या राजवटीत देशाचा आजवर विकास झालेला नाही, असा ठपका नरेंद्र मोदी यांनी ठेवला. काँग्रेस पक्ष तसंच जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या माजी पंतप्रधान आणि सोनिया गांधी व राहुल गांधी या ‘रिमोट कंट्रोल पंतप्रधानां’वर नरेंद्र मोदी यांनी एखाद्या जाहीर प्रचार सभेत करावी तशी टीका केली. लोकशाहीतल्या प्रथा आणि परंपरांशी मोदी यांना फारसं काही देणंघेणं असल्याचा संदर्भ बळकट नाही. साधारणपणे स्वत:चं म्हणणं मांडण्यापुरतेच ते सभागृहात येतात. मुख्यमंत्रीपदी असतानाही ते केवळ हजेरीपुरते विधिमंडळात येत असत, असा दाखला गुजरातेतील पत्रकारांनी दिलेला आहे.​​

पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नि:संशय कर्तृत्व आणि त्यांच्या घराण्यानं केलेला त्याग मान्य न करण्याचा संघ आणि भाजपचा बदसुरी बाणा क्षणभर बाजूला ठेवला तरी; पंडित नेहरू संसदेत सर्वाधिक काळ हजर राहिलेले आणि सर्वाधिक चर्चांना उत्तर देणारे पंतप्रधान आहेत, या वस्तुस्थितीकडेही दुर्लक्ष करणं ही मोदी यांच्या राजकीय व्यवहार व वर्तनाची शैली आहे. त्या शैली आणि वर्तनाला ते याहीवेळी जागले आहेत. शिवाय विरोधकांना जाळ्यात अडकवण्यात ते माहीर आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.

पंतप्रधान मोदी यांनी उत्तरादाखल केलेलं अप्रस्तुत भाषण बाजूला राहिलं आणि रेणुका चौधरी यांनी केलेलं विकट हास्य, त्यावर मोदी यांनी मारलेला टोला, त्या टोल्याला सत्ताधाऱ्यांकडून मिळालेला प्रतिसाद याभोवती सर्व चर्चा केंद्रित झाली. हे सारंच लोकशाहीविषयी संवेदनशील असणाऱ्यांना उबग आणणारं होतं आणि अजूनही आहे. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर मारलेला अपयशाचा शिक्का तसंच नेहरू-गांधी घराण्यावर केलेल्या टीकेचा प्रतिवाद करण्याचं काँग्रेसला सुचू नये म्हणून रेणुका चौधरी यांच्या खलनायकी आवाजातील हास्यावर टोला मारताना मोदी यांनी जाळं फेकण्याचं टायमिंग अचूक साधलं आणि त्यात काँग्रेसजन अडकले!

नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आजवर ‘मुळीच न झालेल्या’ विकासाचा काँग्रेस सरकार, नेहरू आणि गांधी घराण्यावर ठेवलेला ठपका आता संसदेच्या अधिकृत रेकॉर्डचा एक भाग झालेला आहे. कारण तो खोडून काढण्यात आलेला नाही. मोदी यांचं हे म्हणणं वस्तुस्थिती नसल्यानं ते भाषण रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणी करण्याचा भानही काँग्रेसला राहिलेलं नाही, हे जास्त चिंताजनक आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात विधानसभा निवडणुकीत देशाच्या राजकारणात जे काही ‘कम बॅक’ करण्यात काँग्रेसला यश आलेलं आहे. त्या ग्लानीतून हा पक्ष अद्याप बाहेर आलेला नाही असा त्याचा अर्थ आहे.   

काँग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंबावर ठेवलेला ठपका नाकारण्याऐवजी राफेल विमानाच्या खरेदीत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्याभोवती राहुल गांधी भरकटत गेले. त्यांचं हे भरकटणं रोखावं हे कोणाही काँग्रेस नेत्याला सुचलं नाही. काँग्रेसनं संसद आणि विधिमंडळ कामकाजात पाडलेले भले-बुरे पायंडे आणि त्याचाच एक भाग असलेले संरक्षण विषयक खरेदीचे सर्व तपशील जनतेसमोर मांडणं शक्य नसण्याची प्रथा काँग्रेस सरकारांनीचं पाडलेली आहे, हे राहुल गांधी यांना माहिती नसणं हे एक वेळ समजण्यासारखं आहे, पण त्याचा विसर मुरब्बी म्हणवल्या जाणाऱ्या संसदेतल्या अहमद पटेल, अँटोनी, चिदंबरम, गुलाम नबी आझाद यासारख्या एकापेक्षा एक मुरब्बी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पडावा. यातून या नेत्यांची खुजी उंची आणि मुरब्बीपणाचं पितळ उघडं पडलं.

गेल्या आठ-दहा महिन्यात काँग्रेस पक्ष अलिकडच्या काळात झालेल्या सलग पराभवांच्या मानसिकतेतून बाहेर येण्याच्या स्थितीत आल्याची चिन्हं दिसू लागलेली आहेत. राहुल गांधी यांचीही कामगिरी कात टाकल्यासारखी आशादायक दिसू लागलेली आहे, हे गुजरात निवडणुकीनं सिद्ध केलंय आणि कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता किमान आत्ता तरी धूसर दिसू लागलेलं आहे.

याशिवाय एकुणातच महाराष्ट्रासह देशातलं वातावरण भाजपच्या विरोधात झुकू लागल्याचं स्पष्टपणे जाणवतं आहे. गेल्या वर्षी होता तसा नरेंद्र मोदी तसंच भाजपबद्दल मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया फ्रेंडली राहिलेला दिसत नाहीये. समाजमाध्यमांवर तर नरेंद्र मोदी आणि भाजपची तुफान टिंगल होते आहे, त्यांच्या अपयशाची पाढे वाचले जातायेत (त्यात अनेकदा कांगावा, एकारलेपणा आणि ऐकीव माहिती जास्त असते, हा भाग भाग वेगळा). वातावरण बदलत आहे, हे काही मोदी आणि अमित शहा या दुक्क्लीला समजत नाहीये असं नाहीये. गुजरात विधानसभा निवडणुकीनं झालेल्या दमछाकीतून तो धडा घेण्याइतकं शहाणपण या जोडीत आहे. म्हणूनच हे दोघे आणि त्यांचा पक्ष इथवर मजल मारू शकलेला आहे. शिवाय डावे, जनता पक्षाची विविध छकले आणि दोन-तीन अपवाद वगळता अन्य प्रादेशिक पक्ष कोसो लांब पडलेले आहेत.

राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हेच आपले खरे प्रतिस्पर्धी आहेत, हे आता वास्तव म्हणून समोर आलेलं आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी अत्यंत राजकीय धूर्तपणे काँग्रेस आणि हा पक्ष ज्या छायेत आहे, त्या नेहरू-गांधी कुटुंबावर टीकास्त्र सोडलेलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी ‘शहजादा’, ‘चहावाला मुलगा’, ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशा भूलभुलैयात काँग्रेस नेत्यांना अडकवून ठेवलं. पक्ष बांधणी, निवडणुकीची तयारी, राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्याला सन्मान तसंच मनसबदाऱ्या मोडीस काढण्याच्या योजना आकारास आणण्यापेक्षा अख्खा काँग्रेस पक्ष त्या मोदींनी टाकलेल्या त्या भूलभुलैयात फिरत राहिला. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचे धुरीण असं काही तरी जाळं फेकतात आणि त्यात काँग्रेसजन अडकतात (बहुमताच्या जवळ जाऊन अशाच जाळ्यात अडकून गोव्यासह तीन राज्यांची सत्ता काँगेसनं थोडक्यात गमावलेली आहे!) असं गेल्या चार वर्षांत अनेकदा घडलेलं आहे. त्यापासून धडा घेत राजकारणाच्या तुफानात काँगेसचं जहाज भरकटू न देण्याची जबाबदारी आता राहुल गांधी यांची आहे.

सुमारे १३० वर्षापूर्वी या देशात अस्तित्वात आलेल्या काँग्रेसी विचाराचा वारसा राहुल गांधी नेतृत्व करत असलेल्या १९६९साली स्थापन झालेल्या विद्यमान काँग्रेस पक्षाला लाभलेला आहे. गांधी घराण्याच्या हौतात्म्याची परंपरा या काँग्रेसला आहे. देशाच्या सर्व जाती-उपजाती-पोटजाती-सर्व धर्म-भाषा-संस्कृती आणि त्या सर्वांचं संचित यांचं काँग्रेस एक प्रतीक आहे. तेच काँग्रेसचं शक्तिस्थान तसंच मजबूत पाया आहे. भाजपनं ते शक्तिस्थान आणि त्या पायावर रीतसर डल्ला मारलेला आहे. त्यात राजकारण म्हणून गैर काहीच नाही, उलट तो तसा डल्ला मारू दिला गेला यात दोष काँग्रेसचाच आहे. म्हणून, आता तरी सावध होऊन ते शक्तिस्थान मजबूत करणं, भुसभुशीत झालेला पाया भरभक्कम करणं यावर भर देण्याची नितांत गरज आहे, हे राहुल गांधी यांनी विसरू नये. त्यांनी खूप आणि सतत बोलण्यापेक्षा म्हणजे ट्वीट करून नरेंद्र मोदी यांच्या तोंडी लागण्यापेक्षा दुरावलेला कार्यकर्ता पुन्हा पक्षाशी जोडण्याची व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

दिल्लीच्या तत्कालिन पत्रकार उमा वासुदेव यांनी आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांची एक मुलाखत घेतली होती. ‘​टू फेसेस ऑफ इंदिरा गांधी’ या पुस्तकात ती प्रकाशित झालेली आहे. (सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांच्या राजहंस प्रकाशनानं अशात प्रकाशित केलेल्या ‘इंदिरा गांधी – एक वादळी पर्व’ या पुस्तकात त्या मुलाखतीचा काही भाग आलेला आहे.) ‘काँग्रेस पक्षात नेतेच खूप झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय,’ अशी खंत त्या मुलाखतीत संजय ​गां​धी यांनी व्यक्त केलेली होती. या बाबतीत आत्ताच्या काँग्रेसची अवस्था तेव्हापेक्षा अत्यंत वाईट झालेली आहे, हे लक्षात घेता राहुल गांधी यांच्यासमोर असणाऱ्या आव्हानांची तीव्रता लक्षात येते. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि कंपनीनं उभ्या केलेल्या राजकीय तुफानात काँग्रेसचं जहाज भरकटणार नाही याची काळजी राहुल गांधी यांना डोळ्यात तेल घालून घ्यावी लागणार आहे.

भाजप ही देशाची गरज आहे अशी धारणा बाळगण्याचा अधिकार लोकशाहीत आहे. मात्र ती धारणा जपणाऱ्यांनी म्हणजे काँग्रेसमुक्त भारताची स्वप्नं रंगवणाऱ्यांनी हेही लक्षात घ्यावं की, काँग्रेसही या देशाच्या लोकशाहीची आणि त्या लोकशाहीत जगणाऱ्या एका मोठ्या गटाची गरज आहे. म्हणूनच काँग्रेसचं जहाज भरकटायला नको, हे कळण्याची आणि त्याप्रमाणे भान राखत वागण्याची सुबुद्धी एकजात सर्व काँग्रेसजनांना मिळो!  

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 20 February 2018

प्रवीण बर्दापूरकर, तुम्ही म्हणताय की काँग्रेसचं तारु भरकटता कामा नये. कारण की त्यांच्याकडे १३० वर्षांचा वारसा आहे. पण ती काँग्रेस १९६९ साली फुटून इतिहासजमा झाली ना? १९७८ नंतर तर चक्क इंदिरा काँग्रेस होती ती. आजच्या काँग्रेसच्या माथ्यावर वारशाचं ओझं ठेवणं कितपत उचित व व्यवहार्य ठरेल? मला शंकाच आहे. आजची काँग्रेस केवळ सत्तातुरांचा गोतावळा आहे. तो टिकला काय आणि न टिकला काय जनतेचं काहीच बिघडंत नाही. मात्र असं असलं तरीही लोकशाहीच्या दृष्टीने भाजपला तुल्यबळ विरोधी पक्ष असायला हवा हे खरंय. मात्र हे स्थान कमाविण्याची इच्छाशक्ती आजच्या काँग्रेसकडे दिसंत नाही. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......