अजूनकाही
सचिन कुंडलकर हे एक तरुण प्रयोगशील दिग्दर्शक आहेत. त्यांचे आतापर्यंतचे 'रेस्टॉरंट', 'गंध', 'हॅपी जर्नी', 'राजवाडे अँड सन्स' आदी चित्रपट वेगळ्या पठडीतील होते. त्यांचा नवीन 'गुलाबजाम' हा चित्रपट देखील त्याच पठडीतला आहे. पाककलेसारखा विषय घेऊन सचिन कुंडलकरांनी त्याद्वारे मानवी नातेसंबंधांची छान उकल केली आहे. मानवी जीवन आणि विविध पाककृती यांची अचूक सांगड घालताना त्यांनी पडद्यावर दाखवलेली 'गुलाबजाम'ची पाककृती मस्त जमली आहे. हा 'गुलाबजाम' अति पाकातील नाही वा पाकविरहितही नाही. त्यामुळे तो स्वादिष्ट आणि रुचकर बनला आहे.
'गुलाबजाम' हा चित्रपटाचा विषयच मुळीच पाककलेशी संबधित असल्यामुळे तो फार गहन नाही. मात्र त्यामध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळाची व्यवस्थित गुंफण केली आहे. त्यामधील स्मृती-विस्मृतीचा खेळ चांगलाच रंगला आहे.
आदित्य नाईक (सिद्धार्थ चांदेकर) या लंडनला एका मोठ्या बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणाला पाककलेचं खूप वेड आहे. भारतीय पाककृती, त्यातही खास मराठमोळ्या पाककृती शिकून लंडनला आपलं स्वतःचं हॉटेल थाटावं असं त्याचं स्वप्न असतं. त्यासाठी तो घरच्यांना लंडनला जात असल्याचं खोटंच सांगून चक्क पुण्याला येतो. उत्कृष्ट पाककृती करणाऱ्यांकडून प्रशिक्षण घेण्याचा त्याचा मानस असतो. योगायोगानं तो ज्या मित्राकडे राहण्यासाठी थांबलेला असतो, तिथंच येणारा डबा खाताना त्यातील स्वादिष्ट पदार्थ (गुलाबजाम) खाऊन तो तृप्त होतो. हा गुलामजाब खाताना त्याला त्याच्या आईची आठवण होते. त्यामुळे आपल्याला असाच 'गुरू' पाहिजे, हे त्याला लगेच जाणवतं.
हा डब्बा राधा आगरकर (सोनाली) नावाच्या बाईकडून येत असल्याचं त्याला कळताच पाककलेसाठी तिचं शिष्यत्व स्वीकारण्यासाठी तो तिच्या घरी जातो आणि पाककला शिकवण्याची विनंती करतो. मात्र सुरुवातीला राधा त्याला शिकवायला तयार होत नाही. मात्र त्याचा निग्रह पाहून शेवटी ती त्याला शिकवायला तयार होते. या तरुण असलेल्या राधेचं व्यक्तिमत्त्वही तसं गूढ असतं. पूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात तिची स्मृती हरवलेली असते. त्यामुळे तिला जसा 'भूतकाळ' फारसा आठवत नाही, तसा तिला 'भविष्यकाळात'ही फारसा रस नाही. फक्त वर्तमानकाळातच ती एकलकोंडे जीवन जगते आहे. मात्र आदित्यशी मैत्री झाल्यानंतर जीवन जगण्याचा एक वेगळा आनंद ती घेत राहते. तिचा भविष्यकाळ पाकात मुरलेल्या 'गुलाबजाम' सारखाच रसरशीत कसा होतो यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
चांगला चित्रपट तयार करण्याची कृती आणि पाककलेनुसार कोणतीही 'डिश' रुचकर बनवण्यासाठी केलेली खास कृती यामध्ये तसं खूप साम्य आहे असं म्हणावं लागेल. त्यादृष्टीनं पाहताना हा चित्रपट चांगला होण्यासाठी आणि तो पाहताना प्रेक्षकांना आनंद मिळण्यासाठी लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याचं जाणवतं. चित्रपटाच्या सुरुवातीला आदित्य पुण्यात आल्यानंतर त्याला आलेले पुणेकरांचे 'पुणेरी अनुभव' चांगले खुसखुशीत झाले आहेत. ''आजकालच्या पोरी, नुसता नेल पेंट भारी'' यासारखे संवाद मजा आणतात. त्यामुळे चित्रपटाची 'लज्जत' वाढते.
राधाच्या गूढ व्यक्तिमत्त्वाचं रहस्य कळल्यानंतर चित्रपटाच्या कथेला कलाटणी मिळते खरी, मात्र त्यातील गुंतागुंत म्हणावी तेवढी फारशी वाढवलेली नाही.
कथेचा विषयच मुळी पाककलेशी संबंधित असल्यामुळे पडद्यावर अगदी 'उकड कडबोळी'पासून 'उकडी च्या मोदका'पर्यंत बरेच पदार्थ तयार करताना पाहायला मिळतात. शिवाय 'ऑर्डर'प्रमाणे वेगवेगळ्या डिश घेऊन जाताना आदित्य आणि राधा यांना बऱ्याच वेळा दाखवलं आहे. मात्र त्यामुळे चित्रपट संथ वाटत असला तरी कथा कंटाळवाणी होत नाही. ती पुढे सरकत राहते.
चित्रपटात प्रामुख्यानं आदित्य-राधा ही दोनच पात्रं आहेत. त्यामुळे संपूर्ण कथानक या पात्रांभोवतीच फिरतं. सिद्धार्थ चांदेकरनं आदित्यच्या भूमिकेत चांगला रंग भरलाय. पाककला शिकण्यासाठी राधासारख्या गुरू मिळवण्यासाठी त्यानं दाखवलेला संयम आणि सहनशीलता उत्तम अभिनित होते. सोनालीनंदेखील परिस्थितीमुळे बनलेली 'प्रौढ राधा' छान रंगवली आहे. आदित्यची प्रेयसी कम होणारी बायको (मधुरा देशपांडे) हिचं प्रकरण मात्र शेवटी अध्याहृतच ठेवण्यात आलं आहे. तसेच चिन्मय उदगीरकरची भूमिका आणखी विकसित केली असती तर त्या पात्राला न्याय मिळाला असता असं वाटत राहतं. मिलिंद जोग यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणामुळे 'गुलाबजाम' रुचकरतेबरोबरच प्रेक्षणीय झाला आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment