अजूनकाही
फेडेरीको गार्शिया लोर्का (१८९८-१९३६) या स्पॅनिश कवी नाटककाराचं जीवन वादळी होतं. त्या काळातील सर्व संवेदनशील लेखक/ कवींप्रमाणे त्याला मार्क्सवाद प्रिय होता. त्याचे स्पेनमधील डाव्या शक्तींशी संबंध होते. जेव्हा स्पेनमध्ये १९३० साली हुकूमशाही संपुष्टात आली, लोकशाही शक्ती सत्तेत आल्या, तेव्हा लोर्काला सरकारनं एका नाट्यकंपनीचा संचालक म्हणून नेमलं. ही नाट्यकंपनी उत्तमोत्तम नाटकं बसवून स्पेनच्या ग्रामीण भागाचे दौरे करत असे. याद्वारे समाजाची अभिरूची वाढवता येर्इल असा मानस होता. याच काळात लोर्कानं त्याची सुप्रसिद्ध ग्रामीण त्रिपुटी (rural triology) लिहिली. ‘ब्लड वेडिंग’, ‘यर्मा’ व ‘द हाऊस ऑफ बर्नार्डा अल्बा’ ही ती तीन ग्रामीण नाटकं होत. तेव्हा स्पेनमध्ये जरी लोकशाही होती, तरी राजेशाहीवादी शक्ती पूर्णपणे नामशेष झालेल्या नव्हत्या. परिमाणी स्पेनच्या अनेक भागात यादवी युद्धसदृश्य वातावरण होतं. त्यातून १८ ऑगस्ट १९३६ रोजी लोर्काचा खून झाला.
मुंबर्इस्थित ‘इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन’ (इप्टा) या डाव्या विचारांच्या नाट्यसंस्थेनं अलिकडेच ‘द हाऊस ऑफ बर्नार्डा अल्बा’ या नाटकाचा उर्दू अवतार सादर केला आहे. मे १९४३ मध्ये स्थापन झालेल्या इप्टाचं हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. याचा एक भाग म्हणून इप्टातर्फे त्यांच्या जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. यातच ‘द हाऊस ऑफ बर्नार्डा अल्बा’ या नाटकाचा ‘बिल्कीस बेगम का बाडा’ हा उर्दू अवतार सादर करण्यात आला आहे. लोर्काच्या ग्रामीण त्रिपुटीत ‘द हाऊस ऑफ बर्नार्डा अल्बा’चं महत्त्वाचं स्थान आहे. या नाटकावर आधारित ‘रूकमावती की हवेली’ हा हिंदी चित्रपट १९९१ साली आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन गोविंद निहलानी यांनी केलं होतं. त्यात उत्तरा बावकर, इला अरुण, पल्लवी जोशी, ज्योती सुभाष वगैरेंच्या भूमिका होत्या.
‘बिल्कीस बेगम का बाडा’मध्ये बिल्कीस बेगम व तिच्या पाच अविवाहित मुलींची कथा आहे. नाटकाची सुरुवात होते, तेव्हा बिल्कीसचा नवरा वारलेला असतो. घरातले सर्व सुतकात असतात. एकेकाळी या मोठ्या वाड्यानं भरपूर वैभव बघितलं, पण आता पडझडीला सुरुवात झाली आहे. वाड्यात बिल्कीसचा हुकूम व तिची करडी शिस्त चालते. तिच्या पाचही तरुण मुलींना या गुदमरवून टाकणाऱ्या वातावरणातच जगावं लागतं. नाटक स्वातंत्र्यपूर्व काळातल्या उत्तर प्रदेशातील एक छोट्या गावात घडतं. हे उल्लेख यासाठी महत्त्वाचे ठरतात की, यामुळे खानदानी मुस्लिम कुटुंबात स्त्रीशिक्षण नसणं, मुलींना परंपरेच्या वेदीवर कसं बळी दिलं जातं वगैरे नंतर येणारे उल्लेख अर्थपूर्ण ठरतात.
नाटककार लोर्काला त्या काळातील बुर्झ्वा मानसिकतेवर, मूल्यव्यवस्थेतवर हल्ला चढवायचा होता. या नाटकाला रघुवीर सहाय यांनी सफार्इनं भारतीय बाज चढवला. जागतिक दर्जाच्या कलाकृतींचं हे वैशिष्ट्य असतं की, त्यातील कथावस्तू कोठेही घडू शकते. मग ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा स्पेन असो की, भारतातील एखादं खेडं. या कलाकृती स्थळकाळाच्या मर्यादा उल्लंघून जातात, जगातील कोणत्याही प्रेक्षकाला अंतर्मुख करतात.
या वाड्यात बिल्कीस व तिच्या मुलींबरोबर नव्वदीच्या घरातील आजी व दोन महिला नोकर आहेत. यातील एक नोकर (हुस्ना बुआ) मध्यमवयीन विवाहिता आहे. ती गेली अनेक वर्षं बेगम बिल्कीसच्या सेवेत आहे, तर दुसरी अगदीच तरुण आहे.
बिल्कीसच्या पाच मुलींत सर्वांत मोठी मुलगी फहमीदा आता तिशीला आली असून लग्नासाठी आतूर झाली आहे. गावातल्या एका तरुणाशी तिचं लग्न ठरलं आहे. त्यामुळे ती थोडी खुश आहे. फहमीदाकडे पहिल्या वडिलांकडून भरपूर वडिलोपार्जित मालमत्ता आलेली असते. तिच्या इतर बहिणींच्या मते ती सुंदर नसताना तिचं लग्न ठरलं आहे, कारण तिच्या नशिबी आलेली संपत्ती. खुद्द फहमीदालासुद्धा असा संशय असतो की, आजकाल तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं तिच्यावरील प्रेम कमी झालं. एका प्रसंगी ती आर्इला सांगते की, ‘आता तो मला कर्तव्यबुद्धीनं भेटायला येतो.’ एवढंच नव्हे. तिला असाही संशय येतो की, त्याचं प्रेम तिच्या सर्वांत लहान बहिणीवर, आदिलावर बसलं असून तिच्याशी रात्री भेटून झाल्यावर तो धाकट्या बहिणीला म्हणजे आदिलाला भेटण्यासाठी परत वाड्याच्या बाहेर येतो.
यातील मजेची बाब म्हणजे ज्या तरुण पुरुषावरून, अथर युसुफवरून त्या पाचही बहिणींमध्ये एवढा ताण असतो, तो कधीही रंगमंचावर येत नाही. इथं लोर्कासारख्यांच्या प्रतिभेची चुणूक दिसते. लोर्कानं युसुफच्या माध्यमातून असं एक पात्र निर्माण केलं आहे की, ज्याच्या अस्तित्वामुळे नाटकाचं कथानक गती घेतं. एक प्रसंग असा आहे की, फहमीदा आर्इला सांगते की आज रात्री युसुफ तिला भेटायला येणार नाही. त्यावर बिल्कीस बेगम चटकन म्हणते, ‘म्हणजे आजची रात्र तरी आपण सर्वच शांतपणे झोपू शकू’. बिल्कीसला अंदाज असतो की, तिच्या पाचही मुली या युसुफसाठी वेड्या झाल्या आहेत.
नाटकात हुस्ना बुआ हे महत्त्वाचं पात्र आहे. या हवेलीत तिनं अनेक वर्षं नोकरी करत आहे. ती विवाहित असल्यामुळे फावल्या वेळात या पाचही अविवाहित मुलींना नवरा म्हणजे काय, मुलं होतात म्हणजे काय वगैरे उपयुक्त सल्ले देत असते. आणखी एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे तिचे व बिल्कीसचे समलिंगी संबंध असल्याचं अप्रत्यक्षपणे दाखवलं आहे. यामुळे ती प्रसंगी बिल्कीसला खडसावून चार शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकते. बिल्कीसच्या या बाजूमुळे नाटकाला आणखी एक आयाम प्राप्त होतो.
नाटक जसजसं पुढे सरकतं तसतसं त्या पाच मुलींच्या वासना तीव्र होत जातात. युसुफवरून तर आदिला व फहमीदा यांच्यात उघडपणे वादावादी सुरू होते. आदिलाला पक्की खात्री असते की, युसुफचं तिच्यावर खरं प्रेम आहे. तो केवळ पैशासाठी फहमीदाशी लग्न करत आहे. एकदा तर फहमीदाच्या लक्षात येतं की, युसुफ आपल्याला दिलेल्या भेटीच्या वेळी न येता नंतर खूप उशिरा आदिलाला भेटायला येऊन गेला आहे. दोन बहिणीतील ही स्पर्धा बिल्कीसला मान्य होत नाही. ती आदिलाच्या बाहेर जाण्यावर निर्बंध घालते. एका रात्री विरहानं बेभान झालेली आदिला युसुफला भेटण्यासाठी बाहेर पडते, तेव्हा बिल्कीस रायफलनं दोघांना गोळ्या घालते. इथं नाटक संपतं.
नाटक संपतं तेव्हा प्रेक्षक एका उदध्वस्त करणाऱ्या अनुभवातून हळूहळू बाहेर पडतात. या शोकांतिकेत कोणाचं चुकलं? आदिलाचं? फहमीदाचं? की गोळ्या घालणाऱ्या बिल्कीसचं? अशा अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नांसोबत घेत प्रेक्षक बाहेर पडतात. लोर्काला बुर्झ्वा समाजजीवनात असलेल्या खोट्या जीवनमूल्यांवर कोरडे ओढायचे होते. या मूल्यांमुळे बिल्कीस स्वतःच्या मुलीला गोळी मारू शकते. भारतीय प्रेक्षकांना उच्च नैतिक मूल्यांसाठी स्वतःच्या मुलाला गोळी मारणारी ‘मदर इंडिया’ माहीत आहे. पण ‘घराण्याची प्रतिष्ठा’ वगैरेंपायी स्वतःची मुलीला गोळी मारणारी बिल्कीस या नाटकातून समोर येते.
याचा अर्थ असा नव्हे की, घराण्याची किंवा जातीच्या प्रतिष्ठेपायी आपल्याकडे आर्इ-वडील आपल्या अपत्यांच्या संदर्भात क्रूर होत नाहीत. आपल्याकडेसुद्धा ‘ऑनर किलिंग’चे प्रकार वाढले आहेत. एकेकाळी शिक्षणाचा प्रसार झाल्यावर जातीव्यवस्था कालबाह्य होतील अशी अपेक्षा सर्रास व्यक्त केली जात असे. आज तर असं दिसतं की जातीव्यवस्था व ऑनर किलिंगसारख्या प्रकारात वाढच झाली आहे. याचा अर्थ आजही भारताच्या गावागावांत, शहराशहरांत बिल्कीस बेगम वावरत आहेत!
या नाटकाचं भारतीयीकरण रघुवीर सहाय यांनी केलं असून यात त्यांना शमा झैदी यांनी मोलाची मदत केली आहे. नाटकाच्या उभारणीत इप्टातील ज्येष्ठ मंडळी आहेत. प्रकाशयोजना, नेपथ्य व वेशभूषा एम.एस. सथ्यू (‘गर्म हवा’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक) यांचं आहे. त्यांनी बिल्कीस बेगमचा वाडा इतका हुबेहूब उभा केला आहे आणि पात्रांची वेशभूषा एवढी खरी वाटते की, प्रेक्षकांना आपण त्या वाड्यात राहात आहोत, असं वाटायला लागतं. या नाटकात काही गाणी आहेत, ज्यांना इप्टाचे ज्येष्ठ सभासद व संगीतकार कुलदीपसिंग यांनी चाली लावल्या आहेत. या नाटकात एवढी पात्रं आहेत तरीही रंगमंचावर गर्दी जाणवत नाही. याचं कारण दिग्दर्शक मसूद अख्तर यांनी पात्रांच्या हालचाली व्यवस्थित पक्क्या केल्या आहेत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नाट्यकर्मीनं या नाटकाचं दिग्दर्शन केल्यामुळे नाटकाचा प्रभाव द्विगुणीत होतो.
सौम्या श्रीवास्तव (बिल्कीस बेगम), हुस्ना बुआ (मलिष्का मेंडोंसा), फेहमीदा (अनुराधा शाबादी), कुदसिया (नम्रता दलाल), आमिला (कामना पाठक), मुश्तरी (मोनिषा मोंदोल), आदिला (रंजना श्रीवास्तव) या सर्वांनी आपापल्या भूमिका समजून केल्या असल्यामुळे नाटकाची रंगत उत्तरोत्तर वाढत जाते. त्यातही सौम्या श्रीवास्तव यांनी बिल्कीस बेगमच्या व रंजना श्रीवास्तवनं आदिलाच्या भूमिकेत जे रंग भरले त्याचा उल्लेख केला पाहिजे. एका नकारात्मक अर्थानं नाटक बिल्कीस बेगमभोवती फिरतं. तिची सत्ता, तिची घराण्याची प्रतिष्ठा सांभाळण्याची धडपड, बदलत्या काळाशी तडजोड न करण्याची हट्टी वृत्ती आणि तिच्या लैंगिक गरजा या सर्व भावना सौम्या श्रीवास्तव यांनी चांगल्या सादर केल्या आहेत. रंजना श्रीवास्तवनं साकार केलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला तरी तिची अभिनयाची ताकद लक्षात येते. तिचीमधली बहीण मुश्तरी जेव्हा आदिलाला आपल्या मोठ्या बहिणीचा प्रियकर पळवल्याबद्दल दोष देते, तेव्हा आदिला उत्तर देते ‘मेरे लिये वो सिर्फ एक औरत है’. हा प्रसंग रंजनाच्या लाजबाब अभिनयानं अंगावर काटा आणतो.
इप्टाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अशी दर्जेदार नाटकं सादर होणार आहेत. नाट्यरसिकांसाठी ही पर्वणीच आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 20 February 2018
प्राध्यापक अविनाश कोल्हे, मला नाटकांतलं फारसं कळंत नाही. पण एका मार्क्सवादी नाटककाराने स्त्रीवादाविरुद्ध भूमिका घेतलेली आहे याचं नवल वाटलं. आपला नम्र, -गामा पैलवान