अय्यारी : पांडे म्हणे आता, उरलो देशभक्तीपुरता 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार 
  • ‘अय्यारी’ची पोस्टर्स
  • Sat , 17 February 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie अय्यारी Aiyaary नीरज पांडे Neeraj Pandey मनोज वाजपेयी Manoj Bajpayee सिद्धार्थ मल्होत्रा Sidharth Malhotra

नीरज पांडे म्हटलं की, आजकाल 'स्पेशल छब्बीस'सारखे त्याचे किंवा त्याची निर्मिती असलेले चांगले चित्रपट आठवण्याऐवजी नको तितका लांबलेला 'धोनी', उगाचच देशभक्ती जागृत करत असल्याचा आणलेला आव आणि मनोज कुमार, जे. पी. दत्ता यांच्यानंतर आपल्या चित्रपटांमधून बऱ्याच उत्तम प्रकारे चर्चेत आणलेला राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा मुद्दा या गोष्टी जास्त लवकर आठवतात. पण त्याच्या चित्रपटांतून वारंवार दिसणाऱ्या या गोष्टीचा अतिरेक होत आहे, ही भावना निर्माण होते. 'अय्यारी' पाहूनही या भावनेत भरच पडते. 

ढोबळमानानं आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास 'अय्यारी'ची कथा भारतीय लष्करातील भ्रष्टाचाराभोवती आणि एका स्पेशल टास्क फोर्समधील अधिकाऱ्यांभोवती फिरत राहते. ज्यात अभय सिंग (मनोज वाजपेयी) हा सिस्टीम डायग्नोसिस उर्फ 'डीएसएफ' या लष्करातील एका गुप्त विभागाचा प्रमुख आहे. पण याच विभागातील जय बक्षी (सिद्धार्थ मल्होत्रा) या एका अधिकाऱ्याच्या गायब होण्यानं या विभागाचे अस्तित्व आणि गुप्त असणं धोक्यात आलं आहे. 

हा सगळा डाव काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लष्करात जास्त किमतीनं शस्त्रास्त्रं पुरवण्याचं कंत्राट पास करून घेण्यासाठी आखलेला असतो. अभय सिंग आणि लष्कर प्रमुख प्रताप मलिक (विक्रम गोखले) यांना हे काम करण्यासाठी, आणि पर्यायानं डीएसएफचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी, धमक्या मिळत आहेत. मग अभय काय करतो, जय कुठे आहे वगैरे बरेच प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्याभोवती चित्रपट फिरत राहतो. 

थोडक्यात दिग्दर्शक नीरज पांडेला अपेक्षित असलेला सगळा मसाला आणि देशभक्ती वगैरे गोष्टी या मूळ कथानकात गरजेपेक्षा अधिक प्रमाणात आहेत. पण या प्रत्येक गोष्टीच्या जास्त असण्यानं आणि जवळपास फसलेली पटकथा आणि कास्टिंगमुळे चित्रपट एकसंध असण्याचा प्रश्न येत नाहीच. मात्र तसं करण्याचा साधा प्रयत्नही लेखक-दिग्दर्शक पांडे करताना दिसत नाही. आणि या स्वतः तयार केलेल्या तथाकथित 'स्मार्ट' कथानकातच अडकून पांडे आणि पर्यायानं 'अय्यारी' फसतो.

'अय्यारी'तील उणीवा अगदी पहिल्या दृश्यापासून दिसायला सुरुवात होते. कुठल्याही सस्पेन्स किंवा स्पाय चित्रपटात सुरुवातीला मध्यवर्ती पात्राची, हेराची किंवा थोडक्यातच हिरोची एखाद्या स्पेशल 'असाईनमेंट'मधील कामगिरी दाखवून त्या पात्राला अजून प्रभावी बनवत, प्रेक्षकांना भुरळ पाडणारं दृश्य दाखवून एक चांगली ओपनिंग केली जाते. यातही तसं होतं. मात्र अभय सिंग या पात्राची (तथाकथित) चतुराई वगैरे दाखवण्यासाठी जो काही अफाट डाव रचला जातो, तो किती अतार्किक आहे, हे कळालं की पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना येते. 

आणखी एक बाब अशी की, कुठलंही पात्र तितकंसं डेव्हलप केलेलं दिसतं तर नाहीच. पण समोरही मनोजचं पात्र वगळता इतर पात्रं नाटकी भासत राहतात. अगदी कुमुद मिश्रा, आदिल हुसैन, अनुपम खेर यांची पात्रंही इतकी क्लिशे (एखाद्या प्रकाराच्या अतिवापरानं त्यातील नावीन्य हरवलेलं असणं) आहेत की, तीही या तिन्ही अभिनेत्यांना नुसतं वाया घालवलं आहे, हे सांगण्यास पुरेशी ठरतात. 

शिवाय 'अय्यारी'चा डोलारा ज्या मूळ गोष्टीवर, लष्करातील भ्रष्टाचाराची जाणीव यावर उभा आहे, त्यावरील 'जय बक्षी' या पात्राचा 'स्टँड'च खटकणारा आहे. म्हणजे भ्रष्टाचाराची जाणीव झाल्यावर त्याविषयी कारवाई करण्याऐवजी तो थेट सगळं काही सोडून निघून जाण्याचा आणि हा देशच माझ्या व लढण्याच्या लायकीचा नाही असं म्हणतो ते नक्कीच खटकणारं आहे. थोडक्यात 'व्हिस्टल ब्लोअर' म्हणून उभं राहण्याऐवजी पळ काढलेलं दाखवणं कोणत्या 'शूर', पराक्रमी आणि ब्राईट अधिकाऱ्याचं लक्षण आहे ते नीरज पांडेलाच माहीत. एकूणच यात इतक्या अतार्किक गोष्टी आहेत की, त्यांना वेगळं केलं तर मुळात चित्रपटच काय तर त्याचा विषयही उरणार नाही. 

'धोनी : द अनटोल्ड स्टोरी'नंतर तर चित्रपटाच्या लांबीबाबत नीरजवर तसाही विश्वास ठेवावासा वाटत नव्हता. 'अय्यारी'नंतर तो पूर्णतः उडाला आहे. कारण यात खरं तर काहीच गरज नसलेली इतकी दृश्यं आहेत की, विचारता सोय नाही. हे कमी नव्हतं की काय म्हणून शेवटच्या काही दृश्यात सिद्धार्थ मल्होत्रा भ्रष्टाचारामुळे कसा देश पोखरला जातो आहे, आणि माझा कसा यंत्रणेवरून विश्वास उडाला आहे, हा देश कसा माझ्यासारख्या अधिकाऱ्यांना डिझर्व्ह करत नाही यावर बोलतो. यानंतर फक्त 'का?' इतकाच प्रश्न पडतो. हा प्रश्न सगळ्याच बाबतीत विचारावासा वाटतो. म्हणजे नीरजनं हा चित्रपट का लिहिला? तो का बनवला? त्यात अशी अनावश्यक दृश्यं का घातली? कुमुद, आदिल, नसीरुद्दीन या लोकांनी यात काम का केलं? असे अनेक ‘का?’ चित्रपटगृहात असतानाच मनात येतात. पार्श्वसंगीत तर त्रासदायकच आहे. 

आपलीच खासीयत असलेल्या गोष्टी कशा आपल्याला आणि आपल्या कामाला घातक ठरतात, यासाठी राम गोपाल वर्मा ते राजकुमार हिरानीपर्यंत बरीच उदाहरणं देता येतील. आता बदल म्हणून राजकुमार हिरानीदेखील संजय दत्तची 'बायोग्राफी' बनवून स्वतःच तयार केलेल्या, आणि महत्त्वाचं म्हणजे हिट ठरलेल्या फॉर्म्युल्यातून बाहेर पडू पाहत आहे. ही गोष्ट नीरजनंही लक्षात घ्यायला हवी. नपेक्षा त्याचा 'रामू' होण्याची शक्यता आहे. आणि त्याचं सुरुवातीचं काम आणि त्याच्यातील पोटेन्शियल बघता तसं होऊ नये असं वाटतं. बाकी 'अय्यारी' हा 'चित्रपट कसा असू नये' याचं उत्तम उदाहरण आहे. पाहिजे तर या बहुमूल्य 'शिक्षे'साठी तो एकहा पाहून घ्यावा. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख