आत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजा!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
राम जगताप
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Fri , 16 February 2018
  • साहित्य संमेलन Sahitya Sammelan ९१ वे साहित्य संमेलन बडोदा

‘जागतिकीकरणातील सांस्कृतिक संघर्ष’, ‘जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न’, ‘जागतिकीकरणात माझी कविता’, ‘जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य’, ‘जागतिकीकरण, समाज आणि मराठी साहित्य’, ‘जागतिकीकरण आणि मराठी साहित्य’, ‘जागतिकीकरण आणि मराठी भाषा’, ‘जागतिकीकरण आणि मराठी ग्रामीण साहित्य’, ‘जागतिकीकरणाचा मराठी भाषा व साहित्यावरील प्रभाव’, या वा सुरुवातीला ‘जागतिकीकरण’ आणि नंतर ‘मराठी साहित्य’ या दोन शब्दांचा समावेश असलेलं कुठलंही संपादित पुस्तक पाहिलं की, हल्ली धडकीच भरते! (गंमत म्हणजे या विषयांवरील बहुतांश पुस्तकं संपादित स्वरूपाचीच असतात. स्वतंत्र पुस्तकं फारच क्वचित दिसतात; जी असतात, ती ‘पुस्तिका’ म्हणावीत अशीच असतात. या पुस्तिका म्हणजे कुठं तरी केलेली भाषणं किंवा चर्चासत्रांमध्ये वाचलेले निबंध असतात!)

धडकी भरण्याची अनेक कारणं आहे. त्यांपैकी पहिलं म्हणजे, या विषयांवरील जवळपास सर्व लेखांमध्ये जागतिकीकरणाचा कसा भयावह दुष्परिणाम झालेला आहे, याविषयीची सरधोपट अनुमानं मांडलेली असतात.

दुसरं, क्वचित प्रसंगी निरीक्षणं बरोबर असली, तरी ती परिपूर्ण नसतात, चार-दोन उदाहरणांवर बेतलेली असतात. त्यामुळे साहजिकच त्यावरून काढलेले निष्कर्ष बहुतांश वेळा चुकीचे असतात.

तिसरं, ‘जागतिकीकरण’ या विषयावर लिहिणारा मराठीतला जवळपास प्रत्येक लेखक ‘जागतिकीकरण कसं वाईट आहे’, याचीच मांडणी करतो. त्यामुळे त्यांनी सांगितलेले ‘जागतिकीकरणाचे परिणाम’ही सरसकट नकारात्मकच असतात.

चौथं, जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय आहे, हे या विषयावर लिहिणाऱ्या लेखकांना कळलं असल्याचा त्यांचा आव असतो, पण खरं तर त्यांना या विषयाची फार तर स्थूल कल्पना असते.

पाचवं, जागतिकीकरणामुळे मराठी समाज, मराठी साहित्य, मराठी भाषा, मराठी सांस्कृतिक जीवन यांवर नेमके काय परिणाम झाले आहेत, याचं समग्र चित्र गेल्या पंचवीस-सव्वीस वर्षांत कुणालाही नीटपणे मांडता आलेलं दिसत नाही. या विषयावरील मराठी पुस्तकं वाचली की, ‘सात आंधळे आणि हत्ती’ या गोष्टीचाच पुनःप्रत्यय येत राहतो.

सहावं, जागतिकीकरणाचे सकारात्मक परिणाम किंवा जागतिकीकरणामुळे बरेचसे नकारात्मक परिणाम झालेले असले, तरी काही सकारात्मकही परिणाम झालेले आहेत, याची मांडणी करणारा जवळपास एकही लेखक मराठीमध्ये दिसत नाही. मराठीमध्ये जागतिकीकरणाचे सगळे समर्थक हे केवळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ किंवा अर्थक्षेत्रातील लोक असतात. तेही डाव्या विचारसरणीचे नसलेलेच असतात. मराठी साहित्यिक वा लेखक वा पत्रकार यांच्यामध्ये असा समर्थक जवळपास एकही दिसत नाही.

सातवं, मराठीमध्ये जागतिकीकरणाच्या संदर्भात साप म्हणून भुई धोपटणाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक दिसते.

आठवं, जागतिकीकरणामुळे झालेल्या बदलानं शहरी लेखक भोवंडून गेले आहेत, तर ग्रामीण लेखक पुनरुज्जीवनवादी झाले आहेत. त्यामुळे शहरी लेखक ‘निरीक्षणं बरोबर निष्कर्ष चूक’ या पद्धतीचं लेखन करत आहेत, तर ग्रामीण लेखक ‘काल’ किती चांगला होता आणि ‘आज’ किती वाईट आहे, या पद्धतीचं लेखन करत आहेत.

नववं, जागतिकीकरणाला पंचवीस वर्षांचा काळ उलटून गेला असला, तरी या संदर्भात लेखन करणाऱ्या मराठी लेखकांची मजल एखाद-दुसरा लेख लिहिण्यापलीकडे का जात नसावी? ‘अभ्यासोनी प्रगटावे’ असं समर्थ रामदास म्हणतात; पण जागतिकीकरणाचा अभ्यास करायचा तर आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण यांचं चांगलं वाचन हवं. मात्र मराठीतील बहुतांश लेखकांचं इंग्रजी वाचन यथातथा असतं. त्यामुळे इतरांनी या विषयावर लिहिलेलं वाचून किंवा वर्तमानपत्रातील तात्कालिक लेख वाचून ते आपले लेख सजवतात.

दहावं, या सर्वांच्या परिणामी मराठीमधील ‘जागतिकीकरण आणि अमूकतमूक’ अशा विषयांवरील लेख थोड्याफार फरकानं एकसारखेच असतात. त्यांवर लेखकांची नावं लिहिली नाहीत आणि ते कुणाही जाणकाराला वाचायला दिलं, तर संबंधित लेखकांचं साहित्य वाचलेलं असूनही त्यांचा लेखक या जाणकाराला पटकन सांगता येणार नाही. कारण सर्वांची निरीक्षणं, अनुमानं आणि निष्कर्ष साधारणपणे सारखेच असतात. कारणांची ही मालिका अजूनही लांबवता येईल. असो.

२.

जागतिकीकरणानं मराठी साहित्यिकांसमोर नेमकी कुठली आव्हानं उभी केली आहेत, या विषयावर मी गेल्या पंचवीस वर्षांमध्ये वाचलेल्या लेखांपैकी मला सर्वांत विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि वास्तवाधारित वाटलेल्या दोन लेखांपैकी पहिला लेख राज्यशास्त्राचे प्राध्यापक-अभ्यासक (कै.) प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे यांचा आहे, तर दुसरा मिलिंद बोकील यांचा.

‘बदलते वास्तव आणि लेखकांसमोरील आव्हाने’ हा भास्कर लक्ष्मण भोळे यांचा लेख ‘अनाघ्रात’ या अर्धवार्षिकाच्या जुलै ते डिसेंबर २००५च्या अंकात प्रकाशित झाला आहे. मुळात, ते त्यांनी साताऱ्यामध्ये ५-६ मार्च २००५ दरम्यान आंबेडकर अकादमीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साहित्यविषयक चर्चासत्रात केलेलं बीजभाषण होतं. मराठी लेखकांसमोर जागतिकीकरणानं उभ्या केलेल्या आव्हानांबद्दल प्रा. भोळे या लेखात लिहितात -

“नव्या काळातील शक्तिशाली प्रवाहांचे अंतरंग, आधारभूत अधिष्ठाने, मानवी विश्वातील ज्वलंत प्रश्नांवरच्या त्यांच्या भूमिका आणि त्यातील वेगळेपणा उलगडून दाखवण्याचे आव्हान मराठी साहित्यिकांनी गंभीरपणे स्वीकारले आहे, असे दिसत नाही… मानुषतेला पारखी झालेली, स्वत:चे सांस्कृतिक संचित गमावून बसलेली, भेडसावणारी, अनन्यता हरवलेली आणि भाषिक क्षमता नष्ट झालेली भाषा झपाट्याने संज्ञानपनविश्वाचा ताबा घेऊ लागली आहे. तिला मानवी संघर्षशील कशी ठेवता येईल हे लेखकांसमोरचे तातडीचे आव्हान आहे. लेखकाची भाषा ही जर त्याला व्यापक समाजवास्तवापासून तोडत असेल, तर सर्जनशीलतेच्या दृष्टीने त्याच्यापेक्षा मोठे कोणतेच संकट उद्भवत नाही.

“मागणीनुसार पुरवठा करीत मेटाकुटीला येत असलेला लेखकवर्ग निर्माण होत आहे. त्याला चार पैसे जास्त मिळत असतील, पण साहित्याचे सत्व जपणे मात्र त्याला शक्यच राहत नाही. साहित्यनिर्मितीचा मागणीबरहुकूम पुरवठा करणारे यंत्र अशी अवकळा त्याच्या सर्जनाला प्राप्त होते… लेखकापुढे व्यवस्थेने लावलेला दुसरा सापळा सवंग सन्मानांचा म्हणता येईल. लेखकाला जेव्हा त्याच्या लेखनापेक्षा जास्त महत्त्व मिळू लागते, तेव्हा त्याच्यातील लेखकाचा मृत्यू होणे अटळ असते.

“बाजारप्रणालीची अघोषित सेन्सॉरशिप हा असाच एक सापळा असून लेखक त्यात स्वत:हून जात आहे. मानवी संबंध आणि जीवनव्यवहार जणू केवळ बाजाराद्वारेच शक्य होतात, मानवी मैत्रीचा आधार जणू मालकीचा असलेला वस्तुसंग्रह व त्यावर आधारित सामाजिक प्रतिष्ठा हाच असतो, आणि माणसांपर्यंत पोचायचा बाजार हाच एकमेव मार्ग असतो हे एकदा सर्जनशील लेखक-कलावंताच्या मनावर भिनले की, तो झापडबंद होतो.

“आजच्या परिस्थितीने लेखकापुढे लावलेला एक मानवी पिंजरा उत्तर-आधुनिक दृष्टिकोनाचा आहे. भांडवलशाहीचा नवा अवतार जेथे जातो तेथे तो हा दृष्टिकोन सोबत नेतोच. त्या दृष्टिकोनांचे मुख्य प्रतिपादन असे असते की, ‘आमूलाग्र  सामाजिक परिवर्तनाचा महासिद्धान्त भ्रामक आहे. वर्गभावनेपेक्षा वंश, धर्म, गोत्र, जात, लिंग, प्रदेश ही कारकेच मानवी व्यवहारात अधिक प्रभावक्षम व निर्णायक असतात. राजकारणही याच कारणांनी नियंत्रित होत असते. समाजापुढील समस्यांचा विचार, विश्लेषण आणि निचरा तुकड्या-तुकड्यांनी करणेच अधिक श्रेयस्कर ठरते.’ आपले अनेक लेखक स्वत:च्या कल्पनाशक्तीला या पिंजऱ्यात बंदिस्त करून बसले आहेत.

“लेखकांपुढचे सर्वांत मोठे आव्हान अर्थातच आजच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे आणि त्यामुळे हवालदिल झालेल्या जनजीवनाचे आहे… मध्यमवर्ग जरी १९८०च्या तुलनेत आज बरे जीवन जगत असला तरी एकंदर जीवनमानाची पातळी मात्र सतत घसरत चालली आहे… लेखकांच्या दृष्टीने प्रश्न असा आहे की, जणू काही घडलेले किंवा बिघडलेले नाही असा शहामृगी पवित्रा घेऊन स्वस्थ बसायचे की आपल्या परीने या अरिष्टांचा मुकाबला करायचा? आजतरी अगदीच तुरळक अपवाद सोडल्यास ग्रामीण लेखकांसह बहुसंख्य मराठी लेखक या वास्तवाची गुंतागुंत समजून घेण्याचा किंवा परिवर्तनाच्या शक्यता कोठे दिसतात काय याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत नाहीत…

ग्रामीण जीवनासंबंधी लिहिल्या जाणाऱ्या साहित्यातूनही ग्रामीण अर्थव्यवस्था मरणोन्मुख होण्याच्या मूलगामी कारणांचा शोध फारच क्वचित घेतला जाताना दिसतो. खरे तर महान साहित्यकृतींच्या निर्मितीसाठी आशादायी परिस्थितीपेक्षा निराशाजनक स्थिती अधिक पोषक असते असे म्हणतात आणि महान शोकात्मिकांची उदाहरणे त्या संदर्भात दिली जातात. मग याचे प्रत्यंतर मराठी साहित्यातून का मिळत नसावे?

“नव्वदनंतरचे लेखक वाचकांना प्रभावित किंवा मोहित करू पाहतात, पण सांगण्यासारखे मात्र त्यांच्यापाशी फारसे काहीच नसते, कारण मुळात त्यांच्या स्वत:च्या अशा राजकीय भूमिकाच नसतात हा आक्षेप संपूर्णतया निराधार म्हणता येईल काय? स्वत:च स्वत:कडे साहित्यप्रांताचे पुढारपण घेणाऱ्या या संघटित व्यासपीठांशी संलग्न लेखकांच्या संवेदनांची पाळेमुळे प्रत्यक्षात किती सशक्त आहेत? की अमरवेलीप्रमाणे परजीवी अनुभवांवरच त्यांची भिस्त असते? या लेखकांच्या वस्तुनिष्ठेचे मूळ त्यांच्या व्यक्तिनिष्ठेच्या भयात तर सामावलेले नसते ना?”

सारासार वा तारतम्यानं विचार करणाऱ्या कुठल्याही मराठी साहित्यिकाचे प्रा. भोळे यांनी नोंदवलेल्या आव्हानांबाबत मतभेद होतील असं वाटत नाही. कारण यातील बहुतांश आव्हानं मराठी लेखकांना भेडसावत आहेत, पण ही आव्हानं समजून घेण्यात दुर्दैवानं ते कमी पडत आहेत. कारण आत्ममग्न, आत्मलुब्ध आणि लबाड लोक कधीही स्वत:च स्वत:चं मूल्यमापन करत नसतात. शिवाय ते इतरांनी केलेल्या त्यांच्या मूल्यमापनाकडेही खेळकर वा तटस्थपणे पाहू शकत नाहीत. याचं साधं उदाहरण म्हणून प्रा. भोळे यांच्याच लेखाचा दाखला देता येईल. २००५ साली म्हणजे तब्बल १२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या लेखाची चर्चा तर सोडाच त्याची फारशी नोंदही मराठी साहित्यिकांनी घेतलेली दिसत नाही.

३.

कथा-कादंबरीकार मिलिंद बोकील यांनी जागतिकीकरणाबाबतचे गैरसमज आणि जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा कसा सामना करता येऊ शकेल, या विषयावर मडगाव येथील गोमंत विद्या निकेतनात २४ डिसेंबर २००५ रोजी पंडित महादेवशास्त्री जोशी जन्मशताब्दीनिमित्त भाषण केलं होतं (म्हणजे प्रा. भोळे यांच्या भाषणानंतर बरोबर नऊ महिन्यांनी बोकील यांनी हे भाषण केलं आहे). ‘जागतिकीकरणामुळे होणारं सांस्कृतिक सपाटीकरण रोखायला आपापल्या भाषा सांभाळा!’ या नावानं ते ‘साप्ताहिक सकाळ’च्या २४ जून २००६ च्या अंकात प्रकाशित झालं आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही की, या लेखाचीही फारशी दखल मराठी साहित्यविश्वानं घेतल्याचा पुरावा निदान प्रस्तुत लेखकाच्या तरी वाचनात, पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही.

जागतिकीकरणाचा सामना कसा करता येईल, याची दिशा बोकील यांनी अतिशय नेमकेपणानं सांगितली आहे. त्यामुळे मराठी साहित्यविश्वातील जाणकारांनी त्याची योग्य दखल घ्यायला हवी होती. पण तसं काही झालेलं दिसत नाही. बोकील या लेखात म्हणतात -

“जागतिकीकरण म्हणजे पश्चिमीकरण नव्हे; पण या प्रक्रियेचे नेतृत्व प्रगत, पाश्चिमात्य देशांकडे असल्याने त्यांचे जे सांस्कृतिक मानदंड आहेत, तेच सगळ्या जगभर पसरतात… या प्रक्रियेतून जे सांस्कृतिक सपाटीकरण होऊ घातलेले आहे, त्याला आपण कसा प्रतिसाद देणार हा मुख्य प्रश्न आहे… इथे मी ‘प्रतिसाद’ हाच शब्द मुद्दाम वापरत आहे. याचे कारण ‘विरोध’ किंवा ‘पाठिंबा’ या दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टीने गैरलागू आहेत. ते आपल्याला पर्याय म्हणून तर उपलब्ध नाहीतच आणि असते तरी ‘त्यातला कोणता योग्य’ याबद्दल आपण निश्चित निर्णय करू शकणार नाही. दुसरी गोष्ट अशी की, जागतिकीकरणात पाश्चिमात्य देशांचे, विशेषत: त्यांच्यातील बहुदेशीय कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले असले, तरी जागतिकीकरण हा एखादा कट किंवा कारस्थान आहे, असे मानायचे कारण नाही. आपल्याकडे काही लोक अशा भाषेत बोलतात; पण तसे म्हणणे योग्य नाही. मानवी संस्कृतीने इतिहासाच्या या टप्प्यावर स्वीकारलेली ही जीवनाची पद्धत एक आहे. राष्ट्राराष्ट्रांमध्ये विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या प्रक्रियेचा काही लोकांना फायदा होणे आणि काही लोकांना तोटा होणे, असे अटळपणे घडणार आहे; पण हा ठराविक देशांविरुद्धचा कट आहे असे नाही. आपल्यापुरता विचार करताना ‘आपला तोटा होणार नाही’ ही दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. त्यामुळे आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या या आव्हानाला आपण प्रतिसाद कसा देणार असाच प्रश्न असू शकतो.”

जागतिकीकरण हे भांडवलशाहीचं कट-कारस्थान आहे, यावर केवळ डाव्या विचारसरणीच्या लेखकांचंच नाही तर जवळपास सर्वच विचारसरणींच्या आणि कुठलीच विचारसरणी नसलेल्या साहित्यिकांचं, या एका गोष्टीवर मात्र एकमत असतं.

४.

मराठी साहित्यविश्व किंवा साहित्यिकांनी जागतिकरणानं निर्माण केलेल्या आव्हानांना दिलेला प्रतिसाद केवळ नकारात्मक स्वरूपाचाच आहे. तो बोकील यांच्या प्रस्तुत लेखाआधीही नकारात्मकच दिसतो आणि त्यानंतरच्या १२ वर्षांमध्येही तसाच दिसतो.

कारण अशी सकारात्मक चर्चा करणारं लेखन मराठीमध्ये कथा, कादंबरी, कविता या सर्जनशील साहित्यप्रकारांमध्ये आणि वैचारिक स्वरूपामध्येखील फारसं कुणी केलेलं दिसत नाही. त्यामागचं कारण सुरुवातीला नमूद केलेलं आहेच.

जागतिकीकरणाच्या गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मराठी भाषेच्या भवितव्याविषयी गळा काढणारी चर्चा अगदी उच्चरवानं होत असते. मराठीच्या भवितव्याची चर्चा प्रत्येक साहित्यसंमेलनात, मराठीविषयीच्या प्रत्येक परिसंवादात-चर्चासत्रात, शिबिरात, भाषणांमध्ये त्याच त्या ठरावीक पद्धतीनं होत असते. इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर, इंग्रजी भाषेवर मराठीच्या दुरवस्थेचं खापर फोडून बहुतेक जण स्वत:चं समाधान करून घेतात आणि त्यांच्यासारखेच कृतक विचार असलेल्यांना ते ऐकवून किंवा त्यांच्यापर्यंत पोहचवून त्यांच्याकडून दाद वगैरे मिळवत राहतात.

भाषा हे नेमकं कशा प्रकारचं शस्त्र असतं, याची मराठी साहित्यिकांना फारशी गंधवार्ता नसल्याचेही अनेक दाखले देता येतील. त्यातील एक महत्त्वाचं कारण असतं – भाषेचं विज्ञान आणि समाजशास्त्र त्यांना माहीत नसतं.

बोकील यांनी मात्र आपल्या लेखात भाषेच्या जोरावरच आपण जागतिकीकरणाचा सामना करू शकतो, याची ग्वाही दिली आहे. त्यांनी म्हटलंय -

“आपण आपली भाषा सांभाळतो तेव्हा काय करतो? आपण फक्त एक-दुसऱ्याशी बोलत नसतो किंवा नुसत्या गोष्टी लिहीत नसतो, तर आपण सगळ्या जगाला, सगळ्या मानवजातीला एक स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण असा जगण्याचा दृष्टीकोन देत असतो. इंग्रजीत ज्याला ‘वर्ल्ड व्ह्यू’ म्हणतात तसा. प्रत्येक भाषेचा ‘वर्ल्ड व्ह्यू’ वेगवेगळा असतो. तो त्यांच्या शतकानुशतकांच्या अस्तित्वाने, भौगोलिक पर्यावरणाने, त्यांच्या संस्कृतीने, साहित्याने आणि त्या माणसांच्या जगण्याच्या जिवंत अनुभवाने तयार झालेला असतो. आदिवासींचा एखादा लहानसा गट असला, अगदी शे-पन्नास लोकांचा, तरी त्यांचा असा एक ‘वर्ल्ड व्ह्यू’ असतो; जो त्यांच्या भाषेत असतो. असा लहानसा जरी गट नष्ट झाला किंवा त्यांची भाषा नष्ट झाली, तरी मानवी संस्कृतीची अपार हानी होते; कारण सबंध जगातल्या मानवी संस्कृतीला एक वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि सुवास देणारा तो ‘वर्ल्ड व्ह्यू’ त्यांच्यासोबत नाहीसा होतो. हे लहान गटांबाबतही होते, तर मग एका प्रचंड भूभागावर पसरलेल्या आणि कोट्यवधी लोक बोलत असलेल्या भाषेबाबत झाले, तर मग मानवी संस्कृतीची केवढी तरी हानी होईल.”

भाषा कशी सांभाळायची याविषयी बोकील म्हणतात - “भाषा सांभाळायची म्हणजे प्रत्यक्षात काय करायचे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपली भाषा हिरिरीने बोलायची, दुसरी गोष्ट म्हणजे भाषेच्या सर्व बोली सांभाळायच्या, तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या भाषेचे दरवाजे नवनवीन बदलांना कायम उघडे ठेवणे, चौथी गोष्ट म्हणजे अर्थातच तिच्यात सर्व तऱ्हेचे बहारदार साहित्य निर्माण करणे. कथा, कविता, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान एवढेच नाही, सर्वसामान्यांनाही आकर्षित करतील अशी गाणी, गोष्टी, भारुडे, लावण्या, खेळे, पोवाडे असे डोंगराएवढे साहित्य आपण आपल्या भाषेत तयार केले पाहिजे.”

पहिल्या तिन्हींबाबत मराठी साहित्यविश्व व साहित्यिक शंखनाद करण्यापलीकडे फारसं काही करत आहेत, असं दिसत नाही. आपली भाषा हिरिरीनं बोलण्याऐवजी ते मराठीच्या भवितव्याविषयी तळमळीनं बोलण्यात आणि इंग्रजी भाषेच्या नावानं खडे फोडण्यात धन्यता मानतात. बोली भाषेविषयीची चर्चा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. वर्तमानपत्रंही त्याविषयीचे लेख, त्या विषयीची सदरं अधूनमधून प्रसिद्ध करू लागली आहेत; पण याबाबतही चर्चा, लेख, तथाकथित शोधनिबंध यापलीकडे दस्तवेजीकरणाबाबत किती गांभीर्यानं काम होत आहे, हा संशोधनाचाच विषय आहे. मराठी भाषेचे दरवाजे नवनवीन बदलांना उघडे करण्याऐवजी काही लोक ते तोडून टाकण्याचे आणि काही लोक ते बंद करण्याचे उद्योग करत आहेत. म्हणजे इंग्रजी-हिंदीतून शब्दांची थेट उचलेगिरी करून धड मराठी नाही, धड इंग्रजी वा हिंदी नाही अशी भाषा लिहायची-बोलायची किंवा इंग्रजाळलेल्या मराठी भाषेची टिंगल करायची. बस्स, एवढ्यापुरताच आमचा नव्या बदलांविषयीचा दृष्टीकोन मर्यादित आहे!

शेवटचा मुद्दा म्हणजे सर्व तऱ्हेचं साहित्य मराठीमध्ये जागतिकीकरणाच्या काळात उदंड प्रमाणात निर्माण होत आहे. टोळधाड म्हणावी इतकं वारेमाप कवितेचं पीक आलं आहे. वैचारिक साहित्याच्या नावाखाली कुठलाचा विचार नसलेलं साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे.

थोडक्यात, बोकील म्हणतात तसं बहारदार साहित्य निर्माण होत नसलं, तरी सुमार साहित्य मात्र भरपूर निर्माण होत आहे. प्राध्यापकांच्या तथाकथित शोधनिबंधांचं तर इतकं बेसुमार पीक माजलं आहे की, विचारता सोय नाही. यामुळे मराठी साहित्याची उंची डोंगराएवढी होण्याऐवजी आहे त्या टेकडीवरचीही माती दिवसेंदिवस घसरत चालली आहे. कुठल्याही माध्यमाचा बेसुमार वापर ते माध्यम निष्प्रभ होण्यातच होत असतो. मराठीतल्या साहित्यामुळे मराठी भाषेची स्थितीही तशीच होत चालली आहे.

५.

बेलगाम, बेमुर्वत उद्धटपणा; आपल्यापेक्षा वेगळं मत असणाऱ्याविषयीची तुच्छता हा मराठी साहित्यिक, बुद्धिजीवी, बुद्धिवादी यांचा स्थायीभाव होत चालला आहे. एखाद्या व्यक्तीला वा पुस्तकाला महत्त्वाचा पुरस्कार मिळतो, याचा अर्थच असा असतो की, त्या व्यक्तीचा वा पुस्तकाचा विचार हा अनुकरणीय आहे, समाजाला पुढे नेणारा आहे, निदानपक्षी विचारप्रवृत्त करणारा आहे; पण आपल्यालाच पुरस्कार मिळावा, यासाठी मराठी लेखकच मोठ्या प्रमाणावर लॉबिइंग करताना दिसतात. दुसरीकडे पुरस्कारांची संख्याही इतकी भरमसाठ वाढली आहे की, त्यामुळे चांगल्या पुरस्कारांची प्रतिष्ठाही उणावत चालली आहे.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये कथा-कादंबऱ्या आणि कवितांमध्ये प्रचंड साचलेपण आलं आहे; पण या विषयांवरील पुस्तकं प्रकाशित होण्याची संख्या मात्र कमालीची वाढली आहे. कारण ती प्रकाशित करणं तुलनेनं सोपं झालं आहे. कालपर्यंत ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या, ते लेखकही आता पठारावस्था आल्यासारखे संथ झाले आहेत. जुनेच विषय नवी रंगरंगोटी करून लिहीत आहेत. स्वत:च्या बुद्धीला फार ताण न देणं, कुठल्याही प्रश्नाचा खोलात जाऊन अभ्यास न करणं आणि सभोवतालच्या बदलांकडे ३०-४० वर्षांपूर्वीच्याच चष्म्यातून पाहणं, हे सर्जनशील लेखकांसाठी सर्वाधिक फायद्याचं असतं. मराठीतले बहुतांश सर्जनशील लेखक तेच करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कथा-कादंबऱ्या-कवितांमध्ये सध्याच्या वर्तमानाविषयी प्रचंड नकारात्मकता दिसते. वास्तवाचं यथायोग्य आकलन करून घेण्यासाठी सत्यनिष्ठ असणं ही पूर्वअट असते, पण सत्याची व्याख्याच व्यक्तिसापेक्ष असेल, तर कोणताही उपाय चालत नाही. सत्याचा संबंध मूल्यांशी, नीतिमत्तेशी असतो, पण मराठीतल्या सर्जनशील लेखकांची सत्यनिष्ठा, नीतिमत्ता आणि मूल्यव्यवस्था कायमच संशयास्पद राहिलेली आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, लोकशाही, शासनव्यवस्था या विषयीचं त्यांचं आकलन सुरुवातीपासूनच तोकडं असल्याचं दिसून येतं. त्यामुळे त्यांच्याकडून सत्याचा अपलाप, मूल्यांची धरसोड, तारतम्यपूर्ण विवेकाशी फारकत, नीतिमत्तेला तिलांजली हे अपराध कमीअधिक प्रमाणात सतत घडत आले आहेत.

अलीकडच्या काळात महानगरी साहित्याला ओहोटी लागलेली दिसते, तर ग्रामीण साहित्याला भरतीचे दिवस आले आहेत. जागतिकीकरणाच्या गेल्या २५-२६ वर्षांमध्ये शहरांमध्ये राजकीय-सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक-शैक्षणिक-व्यावसायिक अशा अनेक स्तंरावर झालेल्या प्रचंड स्वरूपाच्या बदलांचा आवाका पकडता येणं महानगरी साहित्यिकांना शक्य होताना दिसत नाही. म्हणून मॉलविषयी नकारात्मक कविता लिहिणं किंवा मोबाइलमुळे माणूस माणसाला पारखा होत चाललाय यावर उपहासात्मक कथा लिहिणं, असे सहजसोपे आणि फॅशनेबल प्रकार ते करताना दिसतात.

दुसरीकडे ग्रामीण भागातल्या लेखकांनाही आपल्या खेड्यांमध्ये होणाऱ्या बदलांकडे नीट पाहता येत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. पैकी एक म्हणजे, या लेखक मंडळींचं भोवतालच्या एकंदर घडामोडींबद्दलचं आकलन नेहमीच अपुरं राहिलेलं आहे. त्यांना व्यापक परिप्रेक्ष्यात पाहता येत नाही आणि सामग्य्रानं विचारही करता येत नाही. ते कथा-कादंबऱ्यांमध्ये स्वत:च्या, शेजाºऱ्याच्या आणि आजूबाजूच्या इतर लोकांच्या अनुभवांची सरमिसळ करतात आणि त्यातून एक व्यापक चित्र मांडल्याचा त्यांचा दावा असतो. त्यांना एकेका व्यक्तीचा सुटासुटा विचार करता येतो, पण अनेक व्यक्तींचा एकसमयावच्छेदेकरून विचार करता येत नाही. तसंच कुठल्याही एका व्यक्तीच्या अनुभवाला मर्यादा असतात आणि कुठल्याही एकाच व्यक्तीच्या अनुभवाचे सामाजिक सिद्धान्त होत नाहीत; पण या दृष्टीनं सर्जनशील लेखकांनी स्वत:ला विकसित केलेलं दिसत नाही. परिणामी, वैयक्तिक अनुभव किंवा इतरांचे आपल्यासारखे अनुभव घेऊन त्यावरून सर्जनशील लेखक निष्कर्ष काढतात. परिणामी ग्रामीण भागात होणाऱ्या बदलांमुळे जुन्या गोष्टी नष्ट होताना दिसत असल्यानं ग्रामीण सर्जनशील लेखक पुनरुज्जीवनवादी झाले आहेत. ‘जुनं कसं छान होतं आणि नवीन कसं वाईट आहे’, या एका थीमवर ते आपल्या कथा-कविता-कादंबऱ्या बेतत आहेत.

थोडक्यात, जागतिकीकरण पर्वानं मराठीतल्या सर्जनशील लेखकांची मोठी अडचण करून ठेवली आहे. सभोवताली घडणाऱ्या बदलांचा वेग इतका प्रचंड आणि सर्वव्यापी आहे की, त्यांचा वेध आणि गती समजून घेणं कुणाचीही दमछाक करणारंच आहे. त्यामुळे जागतिकीकरणामुळे झालेल्या बदलांचा गाभा आणि आवाका समजू शकेल असा एकही कवी, कथाकार, कादंबरीकार ग्रामीण भागात आणि महानगरांतही दिसत नाही.

मराठीतली बहुतांश मंडळी सर्वसामान्यांना पचेल, रूचेल आणि समजेल अशा भाषेत लिहिण्याऐवजी केवळ स्वत:च्या पांडित्याचं प्रदर्शन करण्यासाठीच लिहीत असतात की काय असं वाटतं! मराठी प्राध्यापक मंडळी तर विनाकारण अगम्य शब्द, वाक्यरचना आणि संकल्पना वापरून वाचकांना घाबरून टाकतात. हीच बहुतांश मंडळी मराठीमधील साहित्यिक म्हणून गणली जातात. पण यांचं लेखन वाचलं तर कुणाच्याही लक्षात येईल की, यांनी मराठी भाषेला ‘फोले पाखडितो आम्ही’ या स्थितीला नेऊन ठेवलं आहे. निरुपयोगी, कुचकामी, आशयहीन परिभाषेचा उपयोग करून आपण काहीतरी मौलिक सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत, या अभिनिवेषापलीकडे त्यांच्या लेखनात दुसरं काहीही फारसं सापडत नाही. यूजीसीच्या नियमामुळे शोधनिबंध, पुस्तकं यांवर वेतनवाढ, पदश्रेणी अवलंबून असल्यानं ही मंडळी वारेमाप लेखन करतात, पण त्याचं वर्णन ‘सुमार’ या शब्दाच्या पलीकडे जाऊन करता येणं शक्य नाही. कविता, कादंबऱ्या, कथा या ललितवाङ्मयप्रकारातही हीच मंडळी आहेत.

जागतिकीकरणानं जगभरातल्या मानवी समुदायांसमोर आपापल्या भाषा, संस्कृती, कला, आचारविचार, प्रथा, परंपरा यांच्या जतन-संवर्धनाचं, त्या प्राणपणानं जपण्याचं संकट उभं राहिलं. त्यातून नवे सांस्कृतिक संघर्ष उभे राहिले. मराठीमध्ये झालं काय तर नव्यानं लिहू लागलेल्या बहुतेकांनी कविता हेच आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम निवडलं. त्यातच हिमनगाचे पाण्याखालचे भाग उघड होत जावेत, तसा व्यक्तिवाद जागतिकीकरणाच्या काळात समोर येत गेला. त्यामुळे या काळातली कविताही अधिकाधिक व्यक्तिवादी आणि आत्मकेंद्री होत गेली.

गेल्या दोन-अडीच दशकांमध्ये मोठ्या शहरांमधला मध्यमवर्ग अधिकाधिक स्वार्थी, आत्मकेंद्री, समाजाविषयी असंवेदनशील आणि स्वत:च्याच खुज्या भावभावनांचं स्तोम माजवू लागला आहे. तोच प्रकार शहरांमधून लिहिणाऱ्या लेखक-कवींच्या लेखनातही चालू झाला. आणि त्यालाच त्यांची ‘अभिव्यक्ती’, ‘नवा प्रवाह’ म्हणण्याची ‘फॅशन’ही सुरू झाली. या फॅशनपासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करणारे काही लोक आहेत, नाही असं नाही. पण त्यांची संख्या इतकी रोडावत गेली की, त्यांच्या मोजदादीसाठी दोन्ही हातांची बोटंसुद्धा जास्त भरावीत. या थोड्या लेखक-कवींनी जागतिकीकरणाच्या लाटेत दिवसेंदिवस होत असलेल्या मूल्यांचा ऱ्हास (उदा. आसाराम लोमटे, अरुण काळे इ.) आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला, करत आहेत. पण आत्मकेंद्रीपणाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या लेखक-कवींची संख्या इतक्या झपाट्यानं वाढत जात आहे की, ती आता फक्त मुंबई-पुणे या शहरांपुरतीच मर्यादित राहिली नसून औरंगाबाद, नाशिक, नागपूर, लातूर, बीड, उस्मानाबाद या शहरांपासून अगदी तालुक्यापर्यंत पोचली आहे. या लोकांची साहित्यिक आकांक्षा इतकी मध्यमवर्गीय आहे की विचारता सोय नाही! त्यामुळे शहरी मध्यमवर्गीय लेखक-कवी आणि खेड्यातले लेखक-कवी यांच्यातला भेदच नाहीसा होत आहे.

पॅरिस शहरात नवनव्या फॅशन्स जन्माला येतात, पण सध्या महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठी साहित्यात फॅशनेबल विचार, फॅशनेबल भूमिका, फॅशनेबल आचार, फॅशनेबल नकार (म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात सर्व सुखसोयींचा उपभोग घ्यायचा, पण आपल्या साहित्यातून मात्र त्यांच्याविषयी तुच्छतेनं लिहायचं!) आणि फॅशनेबल अभिव्यक्ती यांची सुगी सुरू आहे.

लेखक-कवी म्हणून असलेली नैतिकताही टिकवता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली की, तिचं ‘संक्रमणाचा काळ’ असं वर्णन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पण सध्या तर सगळीच परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, त्याच्यापुढे विचारवंतांपासून सामान्यजनांपर्यंत सारेच हतबल झाले आहेत. या हतबलतेवर नव्वदोत्तर काळात लिहू लागलेल्या लेखक-कवींनी मोठा नामी उपाय शोधला आहे. त्यांनी सरळ आपल्या गोंधळलेपणाचा उरूस साजरा करायला सुरुवात केली आहे.

६.

त्यामुळे जागतिकीकरणानं मराठी साहित्यात काय उलथापालथ केलीय, याचं खरंखुरं उत्तर द्यायचं झालं तर ते असं देता येईल की, आव्हान न पेलता येणाऱ्या, मुळात बौद्धिक आव्हानांचा तिटकाराच असलेल्या ‘आत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजा’ मराठी साहित्यात निर्माण झाल्या आहेत!

(‘शब्दमल्हार’ दिवाळी २०१७मध्ये पूर्वप्रसिद्ध झालेला लेख काही किरकोळ दुरुस्त्यांसह.)

.............................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......