‘आम्ही गाढवांनाही प्रेम करायला शिकवू!’
सदर - सडेतोड
निखिल वागळे
  • राईट टु लव्ह
  • Thu , 15 February 2018
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle राईट टु लव्ह Right To Love व्हॅलेंटाईन डे Valentine Day

यंदाचा व्हॅलेंटाईन डे तुलनात्मकदृष्ट्या शांतपणे पार पडलेला दिसतो आहे. नाही म्हणायला, नागपूर, हैदराबाद, अजमेर, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये तथाकथित संस्कृतीरक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. लखनऊ विद्यापीठानं आपल्या मनातली ‘मनुस्मृती’ जागवून विद्यापीठाच्या आवारात यायला विद्यार्थ्यांना बंदी केली. व्हॅलेंटाईन डेला विद्यार्थी विद्यापीठात येऊन भारतीय संस्कृतीला काळिमा फासतात असं विद्यापीठाचं म्हणणं होतं. पण असे अपवादात्मक भंपक प्रकार सोडता प्रेमाच्या या उत्सवावर गंभीर हल्ला कुणीही चढवला नाही. उलट, विश्व हिंदू परिषदेचे दुखावलेले नेते प्रवीण तोगडिया यांनी हा दिवस साजरा करा असं फर्मान काढलं. सुरुवातीच्या काळात या दिवसाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा पवित्राही आता पूर्णपणे बदलला आहे. आजोबांच्या काळात सुरू झालेला हा हिंसक विरोध नातू तरुण झाल्यावर मावळला आहे. माणसं किंवा संघटना अशा प्रकारे थोड्या थोड्या का होईना बदलत असतील, तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे.

मी काही व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या पंथातला नाही. या दिवसाचं झालेलं व्यापारीकरण कुणाही सुबुद्ध नागरिकाला खटकणारं आहे. पण या निमित्तानं तरुणांना प्रेमाचं महत्त्व कळणार असेल, प्रेम साजरं करण्याची हिंमत मिळणार असेल तर काय हरकत आहे, ही माझी पूर्वापार भूमिका आहे. माझ्या या भूमिकेला पुढे नेणारी तरुण मंडळी यंदा मला पुण्यात भेटली आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. ‘राईट टु लव्ह’ या नावानं काम करणाऱ्या या संघटनेचं आयुष्य केवळ तीन वर्षांचं आहे. अभिजित के., सुशांत आशा, अॅड. विकास शिंदे, मयुरी आशा अशी ही मोजकी तरुण मंडळी २०१४च्या डिसेंबर महिन्यात लातूर जवळच्या अंकोली गावात घडलेल्या घटनेनं हादरून गेली आणि त्यांनी हातपाय हलवायचं ठरवलं. या गावात संस्कृतीरक्षकांनी एका प्रेमी युगुलाला जबर मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सगळ्या देशात व्हायरल झाला होता. टीव्ही चॅनेल्सनी तो दाखवला आणि त्यावर चर्चा घडवून आणल्या. एवढ्यावर पुण्यातल्या या तरुणांचं समाधान झालं नाही.

२२ जानेवारी २०१५ला त्यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवर निषेध मोर्चा काढला. या मोर्च्याला राज्यभरातल्या माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली. अपेक्षेप्रमाणे मोर्चा निघण्याआधी धमक्यांचे फोनही आले. तुमच्या मोर्च्यात गाढवं सोडून तो उधळून लावू असं बजावण्यात आलं. पण मोर्च्याचे संयोजक आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी धमक्या देणाऱ्यांना बजावलं, ‘तुम्ही गाढवं जरूर सोडा. आम्ही या गाढवांनाही प्रेम करायला शिकवू. पण मोर्चा निघणारच!’

मोर्चा निघाला, यशस्वी झाला. या तरुणांपुढे प्रश्न होता, आता पुढे काय? त्यांनी मग ‘राईट टु लव्ह’ या विषयाच्या विविध पैलूंवर काम करायचं ठरवलं. प्रेमाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, अशी या मंडळींची भूमिका आहे. त्यासाठी कायद्याच्या पैलूंचा अभ्यासही या संघटनेनं गेल्या तीन वर्षांत केला आहे. केवळ प्रेमाला प्रोत्साहन देऊन थांबायचं नाही, प्रेम करणाऱ्यांना संरक्षण देणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे असं हे तरुण मानतात. गेल्या तीन वर्षांत यांनी १४ आंतरजातीय आणि एक आंतरधर्मीय विवाह लावून दिला आहे. अशा प्रकारची लग्न करणाऱ्यांना किती अडचणी येतात, पोलीस कसा त्रास देतात, घरचे लोक मुलीबाळींचे खून करण्यापर्यंत कसे जातात, याच्या असंख्य कथा आपण देशात आणि महाराष्ट्रात ऐकलेल्या आहेत. खाप पंचायत हरयाणात किंवा राजस्थानातच असते हा आपला समजही खोटा ठरलेला आहे. महाराष्ट्रातल्या गावागावांत अशा खाप पंचायती वेगवेगळ्या नावांनी आपली जुलूमशाही राबवत आहेत. अशा जुलमाविरुद्ध संघर्ष करण्याचा निर्धार ‘राईट टु लव्ह’नं व्यक्त केला आहे. आता या संघटनेत विविध क्षेत्रातले तरुण सहभागी होत आहेत. दर शनिवारी हे तरुण भेटतात आणि सखोल चर्चा करतात.

अलीकडेच ‘राईट टु लव्ह’नं पुणे महापालिकेकडे महत्त्वाची मागणी केली आहे. प्रेम करणाऱ्या जोडप्यांना प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगल्या जागा नाहीत. त्यामुळे त्यांना नदीपात्रात, पुलावर किंवा कुठेही आडोसा शोधून बसावं लागतं. ही केवळ पुण्यातलीच नाही तर, भारतातल्या प्रत्येक शहरातली कहाणी आहे. साहजिकच पुणे महापालिकेनं एक ‘कपल गार्डन’ निर्माण करून द्यावं, अशी मागणी त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या आधी काही दिवस केली आणि आयुक्तांनीही तिला सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रेमाबरोबर जबाबदारी येते आणि अशा जबाबदारीची जाणीव नसेल तर प्रेमाशी संबंधित चळवळी भरकटू शकतात. म्हणूनच एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला विरोध करण्याची आणि त्या विरुद्ध कायदेशीर लढा देण्याची ‘राईट टु लव्ह’ची भूमिका आहे. आपल्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत मुलींचा नकार पचवणं मुलांना अवघड जातं. त्यातून ते निराशेच्या भरात विकृत पाऊल उचलतात. यासाठी ‘दोस्ती झिंदाबाद’ म्हणून या तरुणांचं प्रशिक्षण करण्याचा या संघटनेचा विचार आहे. प्रेमाला समतेचं अधिष्ठान आवश्यक आहे याचं भान या तरुणांनी सोडलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालविवाहाला विरोध, कांजरभाट समाजातल्या कौमार्य चाचणीविरुद्ध लढा देणाऱ्या तरुणांना पाठिंबा, असे निर्णयही या मंडळींनी घेतले आहेत.

ही संघटना फार मोठी नसेल, ती सध्या पुण्यापुरती मर्यादित असेल, पण या युवकांनी सुरू केलेलं काम ऐतिहासिक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना मदत करते. पण त्यांचं मूळ काम अंधश्रद्धा निर्मूलनाचं आहे. प्रेम या गोष्टीवर आपलं सगळं लक्ष केंद्रित करणारी ‘राईट टु लव्ह’सारखी दुसरी संघटना माझ्या पाहण्यात तरी नाही. प्रेमाला राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि जातीय असे विविध कंगोरे असतात हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. व्हॅलेंटाईन डे निर्माण झाला तो रोमन सम्राट क्लॉडियस (२)च्या युद्धपिपासू वृत्तीला व्हॅलेंटाईननं केलेल्या विरोधातून. एका परीनं हा, पुढे संत झालेल्या व्हॅलेंटाईननं जुलमी राजसत्तेविरुद्ध पुकारलेला एल्गारच होता. प्रेम दडपण्याचे हे प्रयत्न सर्वकालीन समाजामध्ये वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या पायऱ्यांवर होत असतात. त्याला जातीय किंवा धार्मिक स्वरूप आलं की ते अधिकच हिंसक बनतात.

म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 'अॅनहिलेशन ऑफ द कास्ट’ या ग्रंथात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं आहे. जातसंस्थेला दणका देण्याचा तो एक मार्ग असू शकतो असं त्यांनी ठासून सांगितलं आहे.

लोकशाहीवादी समाजात प्रेमाला नैसर्गिकपणे प्रोत्साहन मिळायला हवं. पण आपल्या देशात ७० वर्षांनंतरही लोकशाही नीट रुजलेली नसल्यामुळे प्रेमाचा गळा कापण्याचे उद्योग जागोजागी होतात. आजच्या तिरस्काराचं विष पसरवण्याच्या काळात तर प्रेमाच्या या मोहिमेला विशेष महत्त्व आहे.

भारतीय समाजाने प्रेम किंवा लैंगिकता (सेक्स) या मुद्द्यांकडे खुलेपणानं पहायचं कायम नाकारलं आहे. राजकीय पक्ष तर सोडाच, पुरोगामी चळवळींनीही या मुद्दयाकडे दुर्लक्ष केलं आहे. खरं तर भारतीय संस्कृतीत प्रेम या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचं विश्लेषणही साहित्यापासून सिनेमापर्यंत अनेक कलांमध्ये सखोलपणे करण्यात आलं आहे. पण सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं प्रेम आणि सेक्स या गोष्टींना केवळ प्रजोत्पादनापुरतीच किंमत आहे. ती काहीतरी झाकून ठेवायची, गुपचूप करायची गोष्ट आहे असा समज अजूनही दूर झालेला नाही. ‘राईट टु लव्ह’सारख्या चळवळीमुळे हा समज दूर झाला आणि प्रेमाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली तर यंदाचा व्हॅलेंटाईन डे कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही.

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Dipak Ingale

Sun , 25 February 2018

खूपच मस्त......


Sourabh suryawanshi

Thu , 15 February 2018

lovable Article...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......