“घरात भावांना कुस्ती खेळताना पाहत होते. कुस्ती आवडतही होती. मग ठरवलं कुस्तीतच करिअर करायचं.”
सदर - रौशनख़याल तरुण
हिनाकौसर खान-पिंजार
  • शबनम शेख
  • Thu , 15 February 2018
  • रोशनख्याल तरुण शबनम शेख Shabnam Shaikh शब्बीर शेख Shabbir Shaikh

कुस्ती हा काही क्रिकेट, हॉकी, टेनिससारखा वलय असणारा खेळ नाही. हा रांगडा खेळ. हे सारं ठाऊक असतानाही आपल्या मातीतल्या खेळाची वाट धरणं हे कुणाही मुलीसाठी अवघडच. आणि त्यातच ती जर पर्दापद्धतीत बंदिस्त असलेल्या समाजातून आली असेल तर अधिकच अवघड. पण आपल्यापुढील साऱ्या आव्हांनाना पुरून उरत शबनम शब्बीर शेख या युवतीनं कुस्तीचा आखाडा गाजवण्याचं दिवास्वप्न पाहिलं आणि पेललंही.

शबनम अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातल्या आंबीजळगाव या छोट्याशा गावातली. राष्ट्रीय स्तरावरील महान भारतकुमारी कुस्ती स्पर्धेची मुस्लीम समाजातलीच नव्हे, तर महाराष्ट्रातील पहिली विजेती. विशेष म्हणजे ही कुस्ती मातीत खेळली जाते. याशिवाय २०१० मध्ये झालेल्या महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरीची शबनम विजेती आहे. २००९ पासून सलग तीन वर्षं शिर्डी साई केसरी, २०११ मध्ये लातूर केसरी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धेत सलग सहा वर्षं सुवर्णपदकं अशी तिची बहारदार कारकीर्द आहे. तिनं चार आंतरविद्यापीठं, दहा राष्ट्रीय आणि पंधरापेक्षा जास्त राज्यस्तरीय स्पर्धांतही सहभाग घेतला आहे.

शबनमला भेटल्यानंतर ‘स्पोर्टस पर्सन’ असल्याचं आपल्या लक्षात येतं. पंचवीशीतला उत्साह आणि बोलण्यातही बिनधास्त खिलाडूवृत्ती जाणवत राहते. शबनम सध्या औरंगाबादला शारीरिक शिक्षण विषयातून एम.फील. करत आहे. त्यामुळे आमची भेट औरंगाबादला झाली.

शबनमला तिच्या रक्तातूनच कुस्तीचे जीन्स मिळाले आहेत. तिचे आजोबा, नंतर वडील शब्बीर शेख हे पंचक्रोशीतील उत्तम मल्ल. काका, भाऊ हेही कुस्तीगीर. लहानपणी आपल्या भावांना कुस्तीचे धडे गिरवताना पाहून छोट्या शबनमच्या मनातही कुस्तीचं बीज अंकुरायला लागलं. त्याच वेळेस, तिच्या घरात शिस्तशीर व्यायामाची परंपरा होती. त्यामुळे व्यायामाची बैठक बसत गेली. पण कुस्तीकडे वळण्याआधी तिला कबड्डीनं आकर्षित केलं होतं. यामागे एक छोटीशी घटना आहे. शबनम शाळेत उत्तम कबड्डी खेळत असतानाही, एका राष्ट्रीय स्तरावरील खेळासाठी तिच्याऐवजी राखीव खेळाडूची निवड करण्यात आली. शबनमसह तिच्या कुटुंबियांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला. शबनम सांगते, “कबड्डीत निवड न झाल्यानं हताश झाले होते. सांघिक खेळात असा अन्याय कधीतरी ओढवणार हे ओळखून मी वैयक्तिक खेळाची निवड करावी असं वडिलांना वाटू लागलं. त्यांचं म्हणणं मला पटलं. घरात भावांना कुस्ती खेळताना पाहत होते. कुस्ती आवडतही होती. मग ठरवलं कुस्तीतच करिअर करायचं.”

परिस्थिती बेताचीच असतानाही कुटुंबियांनी मुलीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला, पण वडिलांनी तिला बजावलं, ‘कुस्तीच्या आखाड्यात उतरायचं तर पूर्ण तयारीनिशीच. उतावीळपणे स्पर्धेत भाग घ्यायचा नाही.’ वडिलांच्या या आदेशानंतर तिच्या व्यायामात अधिक गांभीर्य आलं. ती सांगते – “पहाटे चार वाजता दिवस सुरू व्हायचा. जोर बैठका मारणं, डीप्स मारणं, भावांसोबत घरापासून शेतापर्यंतचं दहा किमीपर्यंत धावणं, असा दिनक्रम सुरू झाला. शेतात लिंबाचं झाड होतं. त्यामुळे वडील म्हणायचे, ‘रोज एक ताजं लिंबू तोडून आणायचं.’ त्यामुळं आम्ही बहीण-भाऊ अधिक चुरशीनं धावायचो. व्यायामानंतर शाळा, शाळेतून परतल्यावर पुन्हा कुस्तीचा सराव असा दिनक्रम ठरून गेला. मातीतल्या कुस्तीबरोबरच मॅटवरच्या कुस्तीचा सराव होणं आवश्यक होतं. पण मॅटचा खर्च काही सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. शिवाय आसपास मुलींच्या तालमीही नाहीत. मग काय बाजरीचा भुसा पोत्यात भरायचो आणि त्यावर प्रॅक्टिस करायचो! आजही गावी गेल्यानंतर बाजरीच्या पोत्यावरच सराव करते.”

शबनमला घरातून पाठिंबा मिळाला हे कौतुकास्पद असलं तरी माझ्या मनात प्रश्न येत होता की, समाजाचं काय? नातेवाईकांचं काय? मनातला प्रश्न तिला विचारल्यावर ती एकदम उसळून म्हणाली, “आई-वडिलांनी समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करायला शिकवलं. खरं तर माझे वडील पहिल्यापासूनच बंडखोर. ते मराठा रेजिमेंटमध्ये सैनिक होते. त्यांच्या तरुणपणी, त्यांनी माझ्या आईला लग्नानंतर शिकवून एम.एसस्सी केलं. शिक्षणही दुरापास्त असणाऱ्या माझ्या समाजात हे पाऊल उचलणं केवढं धाडसाचं. इथं तर प्रश्न खेळाचा होता. शिक्षणापेक्षाही खेळाला कमी समजणारा आपला समाज, मग काय होणार? नातेवाईकांनी नाकं मुरडायला सुरुवात केली. एवढंच काय, सुरुवातीला आईलाही मी कुस्ती खेळल्याचं आवडत नव्हतं. ती खेळाच्या विरुद्ध नव्हती, पण कुस्तीच्या होती. काही वेळा ती वडिलांना समजवायला जायची. तेव्हा ते एकच म्हणायचे, ‘माझ्या मुलीचं भलं मला जास्त चांगलं कळतं, तू इतरांचं ऐकू नकोस.’ कालांतरानं माझं कुस्तीप्रेम आणि त्यासाठीची जिद्द पाहून तिनं माझं खेळणं स्वीकारलं. आईचं मनपरिवर्तन झालं तरी माझी नानी आजही माझ्या आईला सांगते की, ‘कशाला मुलीला कुस्तीच्या नादीला लावलं. त्यातून काय मिळणार आहे तिला.’ ती बिचारी हे सगळं तिच्या स्तरावर निभावून नेते.”

शबनमनं यश मिळवल्यानंतर लोकांची तोंड बंद झाली, पण ती अर्थात समोर. तिच्या व तिच्या कुटुंबियांच्या मागे अजूनही लोकं बोलतात. आपल्याकडे मुळात क्रीडासाक्षरता कमी. त्यातून कुस्तीसारखा खेळ, खेळाचा पोशाख या सगळ्या बाबतीत खूप बोललं जातं.

शबनम सांगते- “यश संपादन करूनही नातेवाईकांना आजही वाटतं, काय मिळवलं कुस्तीतून! मेडल्स घेऊन काय करणार? शिक्षणानं तरी काय मिळणार? मुलींना घर तर सांभाळायचं. असे विचार आजही लोक करतात. पण अशा परिस्थितीत कुटुंबाचा मानसिक आधार तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो. तो मला लाभलं. त्यामुळे गेल्या सोळा वर्षांपासून कुस्तीच्या आखाड्यात उत्तम कामगिरी करू शकलेय.”

घरची परिस्थिती बेताची असल्यानं शबनमनं तिच्या आहारावरही स्वत:च उपाय शोधला.  लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये जिंकल्यानंतर मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून ती आपल्या डाएटसाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटिन्स किटची तजवीज करते. ‘शासनानं ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी डायट किट मोफत द्यायला हव्यात’, असं तिला वाटतं. “शरीर मजबूत नसेल तर मुली चांगली कामगिरी कशी करणार?’ असाही तिला प्रश्न पडतो.

घरच्या आर्थिक चणचणीतही आई-वडिलांनी तिच्या कुस्तीप्रेमाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. शबनमकडे अशा असंख्य आठवणी आहेत. त्यातील एक आठवण शबनम सांगते. २०१२ मध्ये हिस्सार इथं झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शबनमनं ‘महान भारतकुमारी’ हा किताब पटकावला. यानंतर तिनं पतियाला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टसमध्ये कुस्तीचं दोन वर्षांचं प्रशिक्षण घेण्याचा निश्चय केला. यासाठी तिला दीड लाखांची गरज होती. एवढी रक्कम एकट्यानं उभं करणं अशक्य असल्यानं तिच्या वडिलांनी मदत मिळावी म्हणून आमदार-खासदार, प्रशासनासह ५० हून अधिक जणांशी पत्रव्यवहार केला. पण एका दमडीची मदत मिळाली नाही. नुसते सत्कार झाले. तत्कालिन जिल्हा पालकमंत्र्यांनी मदतीचं आश्वासनही दिलं होतं. मात्र ती सगळी आश्वासनंच ठरली. शेवटी तिच्या वडिलांनी त्यांच्याकडील एक बैलजोडी मिरज बाजारात अवघ्या सव्वीस हजारांत विकली; म्हैस साडे पंधरा हजाराला विकली. पेन्शनवर शहाण्णव हजारांचं कर्ज काढलं आणि तिला पतियालाला पाठवलं. शबनमनं तिथं दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

या प्रशिक्षणापूर्वी तिच्या वडिलांनी आणि मेरठ येथील जबरसिंग सोम यांनी तिला प्रशिक्षण दिलं होतं. तिच्या वडिलांची आर्मी पोस्टिंग अंबालाला होती. त्यावेळी मेरठ येथील चौधरी चरणसिंग युनिव्हर्सिटीतील जबरसिंग सोम यांनी तिची कुस्ती पाहिली होती. मात्र मेरठ परिसरात मुस्लिमांविषयी प्रचंड अढी होती. त्यामुळे केंद्रावर गेल्यावर मुस्लिम असल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यामुळे त्यांनी तिला ‘सोनिया’ हे नाव देऊ केलं. आजही ती त्या परिसरात याच नावानं ओळखली जाते, हे दुर्देवानं खरं आहे.

पतियालाच्या प्रशिक्षणानंतर शबनमनं स्थानिक पातळीवर मुला-मुलींना प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे. मात्र ते अतिशयच मर्यादित स्वरूपात आहे याची तिला खंत वाटते. शबनमच्या मते, “राज्यात चांगल्या प्रशिक्षकांची संख्या कमी आहे. सध्या ज्या महिला कुस्तीपटू आहेत, त्यांना प्रोत्साहन दिलं जात नाही. पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसारखी महिलांची स्पर्धा होत नाही. मुलींना शिकवण्यासाठी स्त्री प्रशिक्षकाची गरज लक्षात घेतली जात नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी ३०-३५ दिवसांच्या अभ्यासक्रमावर काही जणींना प्रशिक्षक म्हणून नेमलं जातं, तर काही वेळा कुस्ती प्रशिक्षकाच्या पत्नीला व्यवस्थापक म्हणून पाठवलं जातं. मात्र दोन-दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना डावललं जातं.” मोठ्या स्पर्धांच्या वेळी खेळाडूंच्या निवड समितीमध्ये जे राजकारण केलं जातं, भेदभाव केला जातो, त्याबद्दलही शबनम तीव्र नाराजी व्यक्त करते.

अलीकडच्या काळात सध्या ‘दंगल’, ‘सुलतान’सारखे चित्रपट निघाल्यामुळे कुस्तीला थोडंसं ग्लॅमर मिळालं आहे. त्यामुळे सध्या येणाऱ्या खेळाडूंची दखल घेतली जात आहे, मात्र या चित्रपटांआधीच्या माझ्यासारख्या कुस्तीगीर मात्र दुर्लक्षित राहिल्या अशी तिला खंत वाटते. शिवाय तिला मुला-मुलींची कुस्ती हा प्रकारदेखील आवडत नाही. ती अशा स्पर्धेतील वास्तवाकडं लक्ष वेधते, “मुलामुलींच्या अशा स्पर्धा म्हणजे प्रेक्षकांना अश्लील कमेंट कण्याची आयती संधी दिल्यासारखं आहे. या एकत्र स्पर्धेदरम्यान केल्या जाणाऱ्या कमेंटमुळे मुली कुस्ती खेळण्याबाबत निराश आणि उदासीन होण्याची शक्यताच जास्त आहे. त्यामुळे अशा स्पर्धा केवळ मनोरंजनापुरत्याच मर्यादित राहतात.”

एकीकडे कुस्ती, प्रशिक्षण असं सुरू असतानाच तिला सलमान खान आणि अनुष्का शर्मा अभिनित ‘सुलतान’ या चित्रपटासाठी बोलावण्यात आलं. या चित्रपटातील कुस्ती दृश्यांसाठी शबनमनं अनुष्काला प्रशिक्षण दिलं आहे. इतकंच नव्हे, तर ती स्वत:ही दोन-तीन सीन्समध्ये झळकली आहे. आधी तिच्या आई-वडिलांनी यासाठी विरोध केला होता. चित्रपट म्हणजे काहीतरी झेंगट असं आजही सर्वसामान्यांचं मत असतं. तिच्या हातून ही संधी हुकणारच अशी परिस्थिती उद्भवली, परंतु तिच्या भावानं हे निभावून नेलं. मैदानात भल्या भल्यांना चीत करणारी शबनम मुंबईत गेल्यावर मात्र  भलेमोठे सेटस आणि मोठे कलाकार पाहून भांबावली. मात्र अनुष्का व सलमान यांनी तिला दिलासा दिल्यानंतर; तिनेही उत्तमरीत्या कुस्तीतील काही डाव अनुष्काला शिकवले. हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असल्याचं ती आनंदानं सांगते.

याच दरम्यान मुंबई प्रवासात तिचा एक अपघात झाला. त्यामुळे एक वर्षभर ती खेळापासून दूर होती. तिच्यासाठी हा अतिशय नैराश्याचा काळ होता. गुडघ्याला व पायाच्या लिगामेंटला जबरी मार लागला होता. त्याच काळात ऑलिपिंकची स्पर्धा तिच्या हातून निसटली. यातून ती आता बाहेर पडू लागली आहे. पुन्हा एकदा कुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचं तिनं ठरवलं आहे. एम. फिल. आणि कुस्तीचा सराव सुरूच आहे. सेट-नेटचीही तयारी सुरू आहे.

एकीकडं तिचं हे व्यस्त शेड्युल आहे, तर दुसरीकडं तिच्या घरी तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला आहे. ‘पेहलवान से कौन शादी करेगा’ असे नातेवाईकांकडून टोमणे ऐकल्यावर तिच्या आईला तिची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तिच्या आईचं मन, ‘आपण आपल्या मुलीला कुस्ती शिकवून चूक तर केलं नाही ना!’ असाही विचार करायला भाग पाडतं. आई अशी खचते, तेव्हा शबनमलासुद्धा डगमगायला होतं. त्यामुळे घरात कोणी नवा पाहुणा आल्यास घरभर असलेली मेडल्स ही आपल्या मुलीनं मिळवलीत हे सांगणं शक्यतो टाळणंच पसंत करतात. त्यामुळे शबनम म्हणते, “मुस्लीम मुलींना कुस्तीत उतरायचं असेल तर त्यांच्या कुटुंबियांनी पूर्णत: त्यांच्या पाठीशी उभं रहायला हवं, तरच त्यांनी यावं. मानसिक सपोर्ट के बिना हड्डीया तुडवाकर, इतना पसीना बहाकर क्या मिलेगा? बक्षीसं आणि सत्काराच्याही आधी घरच्यांकडून पाठ थोपवली तरच पुढचा प्रवास कष्टाचा असूनही आनंदाचा होतो.”

तिच्या खेळाची दखल घेऊन तिला आदर्श क्रीडा पुरस्कार, संत सावता भूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. आगामी काळातील स्पर्धांसाठी ती तयारी करत आहे. याशिवाय मुलींसाठी कुस्तीचं केंद्र उभं करण्याचं तिचं स्वप्न आहे. स्वत:चं केंद्र उभं करण्याआधी किमान एखाद्या महाविद्यालयात तरी असं प्रशिक्षण केंद्र उभं करणं अगदीच सहज सोपं आहे. उत्तम खेळाडूसोबतच उत्तम प्रशिक्षक होण्याची तिची मनीषा आहे, यासाठी तिची सेटनेटद्वारे जोरदार तयारी सुरू आहे.

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......